मावळातील (मराठी) मनोमिलन

4
40
carasole

सिंहगडापासून घाटमाथ्यापर्यंतच्या मावळाच्या सा-या टापूत आपल्याला तुळशीदासाच्या सिंहगडाच्या पोवाड्यात उल्लेखलेले मराठे, धनगर, कोळी समाज भेटतात; त्यांच्या शिरकाई, वाघजाई, बापूजी बुवा यांसारख्या देवतांच्या आख्यायिका ऐकायला मिळतात. त्या आख्यायिकांच्यात त्या समाजांच्या पूर्वेतिहासाचे प्रतिबिंब नजरेस येते. चैत्र वद्य प्रतिपदेला पानशेत  तलावाकाठच्या शिरकोळी गावच्या शिरकीच्या जत्रेला प्रचंड गर्दी लोटते. लोककथांनुसार, शिरकाई देवीला तिचे ठाणे मांडण्याला अतोनात कष्ट पडले-संघर्ष करावे लागले. ती देवी पाच-सहा शतकांपूर्वी काशी खंडातून पुणे मार्गे मुठेच्या उगमाकडे निघाली, तर तिला बापूजी बुवाने खडकवासल्याच्या वरील अंगापासून जागोजाग अडवले. त्याला चुकवत, ती शिरकोळीला पोचली. तेथे धनगरांच्या  -हे सह्याद्रीत गायी-म्हशी सांभाळणारे धनगर, मेंढपाळ नव्हेत – वाघजाईचे ठाणे होते. वाघजाईने शिरकाईला तिच्या शेजारी बसण्यास अनुमती दिली. तेव्हा बापूजी बुवाने लग्नाची मागणी घातली. शिरकाईने ती नाकारताच पुन्हा धुमश्चक्री झाली. शिरकाईला एका घळीत दडून काही दिवस कंठावे लागले. अखेर, शिरकाईची सरशी झाली. बापूजी बुवाला शिरकोळीपासून दहा कोस दूर ठाणगावला जावे लागले. तेथे एक कोळी उपासक त्याची देखभाल करतो. मध्यंतरी, काही वर्षे कोळी पुजारी उपलब्ध नव्हता, तेव्हा मराठेच त्याची पूजाअर्चा करायचे. वर्षात केवळ एके दिवशी, चैत्र वद्य प्रतिपदेला उत्सवाच्या वेळी, बापूजी बुवाला शिरकोळीला परतून शिरकाईच्या आसपास काही विशिष्ट भागात वावरण्याची परवानगी असते. मग उरलेले वर्षभर पुन्हा हद्दपार.

या सा-या कहाण्यांचा अर्थ काय? मावळात मराठ्यांची वसाहत होण्याअगोदर तेथे कोळी व धनगर समाज राहत असावेत. त्यांच्या देवता बापूजी बुवा, वाघजाई यांची आराधना होत असावी. राजवाडे यांच्या प्रतिपादनाप्रमाणे नाग व कोळी हे डोंगरद-यांतील कोळी, समुद्राकाठचे मासेमार नव्हेत – तीन-चार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वसतीला आले.

पुरातत्त्वीय माहितीनुसार साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील आद्यतम – लोखंडी अवजारविरहित तंत्र वापरणा-या शेतीला सुरुवात झाली. कोळी हे बहुधा त्या आघाडीच्या कास्तकार समाजापैकी असावेत. उत्तरेकडून दक्षिणापथाला निघालेला, तथाकथित आर्यांचा, लोखंडाची आयुधे घेऊन येणारा ओघ हा नंतरचा; सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीपासून होऊ लागला.

पण त्याच्या आधीच, दक्षिण भारतात एका वेगळ्या, तथाकथित महापाषाणीय संस्कृतीचे लोक तीन-साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोखंडाचा, घोड्यांचा वापर करू लागले होते; पशुपालक बनले होते. कानडी भाषेत ‘धनगळू’ म्हणजे गायी-म्हशी. धनगरांचे पूर्वज कृष्णेच्या खो-यातून दक्षिणेकडून दीड-दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले असावेत.

राजवाडे यांच्या मते, अर्वाचीन मराठे पाचशे वर्षांपूर्वी उत्तरेकडून महाराष्ट्रात पोचले. त्यांच्याबरोबर काशी खंडातील शिरकाईचा पुणे जिल्ह्यात प्रवेश झाला नसावा. कोसंबी यांच्या प्रतिपादनाप्रमाणे त्या कोळी – धनगर – मराठा समाजांत आरंभी जे संघर्ष झाले, जी हातमिळवणी झाली, त्याचे प्रतिबिंब त्या समाजांच्या देवतांशी निगडित रुढींत, आख्यायिकांत पाहण्यास मिळते. असे दिसते, की अखेर तिन्ही समाजांची दिलजमाई झाली. मावळात ते सारे समाज एकोप्याने बापूजी बुवाची, वाघजाईची, शिरकाईची आराधना करतात.

भारतीय संस्कृतीत महाराष्ट्राचे खास स्थान आहे. येथे भारतातील मूलवासी नागांची संस्कृती आणि लोखंडाची आयुधे व घोड्याचे रथ घेऊन आलेल्या आर्यांची संस्कृती यांचा मिलाफ झाला. येथे उत्तरेहून माळवा-गुजरात मार्गे दक्षिणेकडे निघालेल्या व दक्षिणेतून गोदावरी-कृष्णेच्या खो-यांतून उत्तरेकडे वाटचाल करणा-या समाजांच्या संस्कृतींचा संगम झाला. येथे महाराष्ट्री, सौरसेनी, अपभ्रंश अशा प्राकृत भाषा, नाग भाषा, द्रविड भाषा यांच्या मंथनातून मराठी उपजली. गावागावातील अगणित लोकपरंपरांत त्या इतिहासाचे प्रतिबिंब पाहण्यास मिळते. त्यात महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे चित्र आहे.

-माधव गाडगीळ

(माधव गाडगीळ यांच्या मूळ ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध लेखामधून)

About Post Author

Previous articleपद्मश्री डॉ. विकास महात्मे (Padmashree Dr. Vikas Mahatme)
Next articleअक्‍कलकोटच्‍या राजवाड्यातील शस्‍त्रागार
माधव गाडगीळ यांनी हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्राचा लेक्चरर, बर्कले विद्यापीठात इन्डो- अमेरिकन डिस्टिन्ग्विश्‍ड लेक्चरर, स्टॅन्फर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केले आहे. गाडगीळ १९७३ पासून २००४ पर्यंत इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्‍यांनी तेथे परिसरशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात करून दिली. सध्या ते गोवा विद्यापीठात कोसांबी अध्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. गाडगीळ हे निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, संस्कृतिप्रेमी जीवशास्त्रज्ञ आहेत. सह्याद्रीच्या द-याखो-यांत, रानावनांत हिंडत परिसराचा व मानवी जीवनाचा अभ्यास करणे हा त्याचा छंद आणि व्यवसाय आहे. त्‍यांनी परिसरशास्त्र व उत्क्रान्ती या विषयांवर दोनशेहून अधिक शास्त्रीय निबंध प्रकाशित केले आहेत. त्‍यांनी राम गुहांसोबत 'धिस फिशर्ड लॅंड' हे भारताच्या पर्यावरणीय इतिहासाबद्दलचे पहिले पुस्तक लिहिले आहे. गाडगीळ यांनी डॉ. वर्तकांसोबत देवरायांच्या शास्त्रीय अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच त्‍यांनी स्‍वतः भारतातील हत्तींची पहिली शिरगणती केली. गाडगीळ यांनी अनेक दशके इंग्रजीत व मराठीत नियमित वृत्तपत्रीय लिखाण केले आहे.

4 COMMENTS

  1. आज डोंगर कपारीत राहणा-या गरीब
    आज डोंगर कपारीत राहणा-या गरीब कोळी जमातीच्या लोकांना हे शासन आदिवासी मानत नाही, त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. याबद्दल सरकारी दरबारी आपण आवाज उठवावा…

  2. आज रोजी कोळी समाजाला आदिवाशी
    आज रोजी कोळी समाजाला आदिवाशी चा दर्जा दिला नाही .महाराष्ट्र सरकारने क्षेत्रबंधन च्या नावाखाली समाजावर अन्याय केला आहे. क्षेत्रबंधन हे महाराष्ट्रात इतर कोणत्याच समाजावर लावलेले नाही.हा समाज संघटीत नसल्यामुळे वराजकीय पाठबळ नसल्यामुळे वंचीत आहे.

Comments are closed.