मानसिक आजार – माणुसकीची गरज

3
72
carasole

प्रकृतीमध्ये काही कारणाने विकृती निर्माण होणे ही नैसर्गिक घटना होय. विकृती म्हणजे आजार. माणसाच्या बाबतीत आजार दोन पातळ्यांवर उद्भवतात. एक म्हणजे शारीरिक आजार आणि दुसरा प्रकार म्हणजे मानसिक आजार. शारीरिक आजारांची कारणे विज्ञानामुळे मानवाला चांगली परिचित झाली आहेत. त्यामुळे रूग्णाबद्दल सहानुभूती वाटणे, त्याला समजून घेणे, दिलासा देणे, सेवाशुश्रूषा करणे आणि सर्व प्रकारची मदत करणे या गोष्टी माणसांकडून घडतात. शरीर-आजारी रूग्णाबद्दल माणसांना वाटणारी सहानुभूती आणि आत्मीयता यांमुळे माणसे त्या रूग्णासाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त होतात. समाजाकडून आणि शासनाकडूनही शारीरिक-व्याधीग्रस्त व अपंग व्यक्तींसाठी निरनिराळ्या संधी, आर्थिक सहकार्य उपलब्ध असतात. त्यातून माणुसकीचे दर्शन घडते.

दुर्दैवाने, त्याच्या नेमकी उलट प्रतिक्रिया असते ती मानसिक रूग्णांबद्दल. मानसिक आजार हा इतर कोणत्याही शारीरिक आजाराप्रमाणे शरीरातील घटकपेशी किंवा घटकद्रव्ये यांच्या ढळलेल्या तोलाचा म्हणजेच असंतुलनाचा (imbalance) परिणाम असतो. मानवी मेंदूमध्ये काही रसायने असतात. ती रसायने त्यांच्या आवश्यक प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाली, म्हणजेच असमतोल झाली, की त्याचा दृश्य परिणाम म्हणजे मानसिक विकार! शरीराने त्या त्या रसायनाला नेमून दिलेले काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे विस्कळीतपणा येतो. परंतु दुर्दैव असे, की कुटुंबातून किंवा समाजातूनही त्याला सहकार्याचा हात तर मिळत नाहीच; उलट, उपेक्षा आणि तिरस्कारच त्याच्या वाट्याला येतात. त्यामुळे त्याचा एकलकोंडेपणा पोसला जातो आणि मूळचा आजार बळावतो.

मानसिक आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. उदा. स्क्रिझोफ्रेनिया, मेजर डिप्रेशन, बायपोलर मूड डिसआर्डर. त्याचप्रमाणे फोबिया (भीती वाटणे), अँक्झायटी (चिंतारोग), पर्सनॅलिटी डिसऑर्डर (व्यक्तिमत्त्व दोष), ओ.सी.डी. (मंत्रचळेपणा) इत्यादी. लोकसंख्येच्या पंधरा ते वीस टक्के लोकांना कोठला ना कोठला तरी मानसिक आजार असतो. साधारण दहा टक्के लोकांना गंभीर मानसिक आजार असतात, तर दर साठ लोकांमागे एकाला स्क्रिझोफ्रेनिया हा आजार झालेला दिसून येतो. या आजाराचे हेच प्रमाण संपूर्ण जगामध्ये दिसून येते. मग त्यांचा देश, धर्म, जात, संस्कृती, लिंग, सामाजिक व आर्थिक स्तर कोठलाही असो.

स्क्रिझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डर्स (बायपोलर, मेजर डिप्रेशन इत्यादी) हे आजार गंभीर मानसिक आजारांत मोडतात. माणूस हा सर्व सजीवांपैकी उत्क्रांतीच्या वरचढ अवस्थेत पोचलेला आणि म्हणून सर्वात प्रभावी प्राणी. प्रभावी का तर त्याच्याकडे बौद्धिक व विचार करण्याची क्षमता असते आणि तो तिचा परिणामकारक वापर करू शकतो. माणसाने रोजच्या जगण्यापासून ते अंतरिक्षाला गवसणी घालण्यापर्यंत प्रवास त्या वरदानाच्या बळावर केला. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र त्या वरदानाला गालबोट लागते ते स्क्रिझोफ्रेनियासारख्या आजाराच्या निमित्ताने.

स्क्रिझोफ्रेनिया आजारामुळे माणसाच्या जवळच्या व्यक्तीचे अक्षरशः अनोळखी व्यक्तीत रूपांतर होते. आयुष्याचा प्रवास अत्यंत चढउताराचा करणारा तो आजार, आजूबाजूचे जग अर्थपूर्ण वाटत असताना अचानक भूलभुलैय्यामध्ये नेणारा बाह्य आणि आंतरिक गोष्टींची कोडी घालणारा, मेहनतीने बांधलेल्या आयुष्याच्या इमारतीला पायरीपायरीने, तडा जावा असा तो आजार. अनेक चमत्कारिक आणि ताब्यात न राहणारे विचार आणि वेगवेगळ्या प्रकारचे भास यामुळे वास्तवापासून (reality) दूर नेणारा आणि काल्पनिक (fantasy) आयुष्यामध्ये जगण्यास लावणारा असा तो आजार. त्या आजाराने त्रस्त व्यक्तीची तिच्या करिअरवरची, नातेसंबंधांवरची पकड ढिली होते. तिचा स्वतःवरचा आणि जगावरचा भरवसा उठतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःला या सगळ्या बदलांबाबत काही करता येत नाही! असा हतबल करणारा तो आजार आहे – स्क्रिझोफ्रेनिया.

व्यक्तीच्या शरीरात जैव-रासायनिक बदल (Bio-Chemical Changes) होतात आणि त्यामुळे व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन यांमधील सुसूत्रता (co-ordination), सुसंगती नाहीशी होते. त्यामुळे जी लक्षणे निर्माण होतात त्यांना वैद्यकशास्त्राने स्क्रिझोफ्रेनिया, म्हणजेच छिन्नमनस्कता असे नाव दिले आहे. सुसंगती नसते म्हणजे नेमके काय होते? सर्वसाधारण माणूस सुसंगत, सुरळीत वागत असतो. म्हणजे हसण्याच्या जागी हसतो, बोलण्याच्या जागी बोलतो, योग्य तेथे गप्प बसतो, कामाच्या वेळेला काम करतो, झोपण्याच्या वेळेला झोपतो, कुटुंबावर प्रेम करतो, त्याच्याशी संबंधित लोकांवर विश्वास टाकतो. सगळे सुरळीत चाललेले असते. इतके, की सर्वसाधारण माणूस ते गृहीत धरून चालतो. पण एकाद्या व्यक्तीच्या बाबतीत त्या वागण्यामध्ये काही बिनसले तर काय होईल? म्हणजे तो माणूस हसण्याच्या जागी रडू लागला, कारण नसताना रागावू लागला, बोलण्याच्या वेळी गप्प बसला, चूप बसावे तेव्हा बडबडू लागला, कामाच्या वेळी झोपून राहिला, झोपण्याच्या वेळी हिंडत बसला, कुटुंबीयांबाबत तिरस्कार, स्वकियांबद्दल संशय, इतरांबद्दल अकारण शत्रुत्व, असे काही  करू लागला तर सगळेच बिनसेल की नाही? हे ‘सगळेच बिनसले’ अशी जी स्थिती आहे त्याला व्यक्तिमत्त्वभंग, छिन्नमनस्कता म्हणजेच स्क्रिझोफ्रेनिया असे म्हटले जाते. त्या व्यक्तीच्या बाबतीत विचार इकडे, भावना तिकडे, वर्तन आणखी तिसरीकडेच! अशी सगळी तोडफोड होते. रोजचे जगणे कोलमडून जाते.

मानवी शरीररचनेत हे जैवरासायनिक बदल का होतात, केव्हा होतात याचा शोध घेण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये झाले आहेत, चालू आहेत. त्या प्रयत्नांतून preventive (प्रतिबंधात्मक) व curative (आजार पूर्ण बरे करणारे उपचार) औषधोपचार हाती लागले नसले तरी आजार जवळजवळ शंभर टक्के नियंत्रणाखाली ठेवता येईल अशी प्रभावी औषधयोजना उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांच्या नियमित वापराने आजाराची लक्षणे ताब्यात ठेवता येतात. परंतु, व्याधीची सामाजिक व भावनिक गुंतागुंत लक्षात घेता केवळ औषधोपचाराने काम पूर्ण होणार नाही, तर रूग्णाचे कुटुंबीय आणि आजुबाजूचा समाज यांना त्यात हातभार लावावा लागेल.

रूग्णाने स्वतः आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रथम आजार स्वीकारला पाहिजे. त्यांना मनापासून, कोणाच्या तरी मदतीची गरज आहे असे वाटले पाहिजे. तरच ते मनोविकारतज्ज्ञाकडे जाऊन औषधोपचार सुरू करतील. औषधोपचारांमुळे रूग्णामध्ये झालेल्या रासायनिक बदलांवर उपचार होतो, पण आजाराच्या काळामध्ये त्याच्या वर्तनावर (behaviour), संवादकौशल्यांवर (communication skills), परस्पर संबंधांवर जो विपरीत परिणाम झालेला असतो त्यासाठी त्याला गरज असते ती समुपदेशनाची (counselling). त्याला मन मोकळे करून बोलण्यासाठी गरज असते ती त्याचे अनुभव शेअर करण्याची. रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना ते स्वमदत गटामध्ये (self help group) करता येते. अशा सहकार्यामुळे रुग्णाच्या वर्तनात बदल घडू शकतो. त्यासाठी कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आवश्यक असतोच. त्यांनी कसे वागावे, कसे वागू नये असे काही (dos and don’ts) संकेत पाळायला हवेत. रूग्णाविषयीच्या त्यांच्या अपेक्षा कमी करायला हव्यात. रुग्णाच्या वागण्यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणे गरजेचे असते. सतत अपराधी भावना बाळगणे किंवा रूग्णाला दोष देत बसणे या गोष्टींतून बाहेर यायला हवे. जास्त अपेक्षा ठवून खंत करत बसणे चुकीचे ठरेल, कारण तशा अपेक्षांचे रूग्णाला आणि पालकांनाही फार मोठे ओझे सहन करावे लागते आणि ते पेलण्याची शक्ती दोघांचीही संपलेली असते.

मानसिक आजार साधारणपणे पौगंडावस्थेत बाहेर पडतो. व्यक्तीमध्ये गंभीर मानसिक आजाराचा कल (tendency) अनुवंशिकतेने येतो आणि सर्वसाधारणपणे वय वर्षें पंधरा ते पंचवीस या काळात आजाराची लक्षणे दिसावी लागतात. त्या काळात घडणारी एखादी धक्कादायक घटना, उदा. – परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचा मृत्यू इत्यादी – मुळात असलेल्या आजाराला चालना देते. ते निमित्त होते व आजार व्यक्त होतो. सभोवतालच्यांना वाटते, की ती धक्कादायक घटनाच त्याच्या आजारपणास कारणीभूत आहे. प्रत्यक्षात मात्र तसे नसते. आजाराविषयी समाजात असलेल्या अनेक गैरसमजुतींपैकी तीही एक गैरसमजूत आहे.

मानसिक आजारांविषयीचे अज्ञान दूर करणे आवश्यक आहे, पण ते तितकेच अवघडही आहे. त्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ जोन व्हर्बोनिक म्हणतात, की ‘मानसिक आजारांपेक्षा त्याविषयी असलेले चुकीचे दृष्टिकोन दूर करणे अधिक कठीण आहे.’ हा विचार आपल्या सर्वांना अंतर्मुख करायला लावणारा आहे.

– नीलिमा बापट

About Post Author

3 COMMENTS

  1. मी स्वतः बायपोलार डिप्रेशन चा
    मी स्वतः बायपोलार डिप्रेशन चा शिकार होतो। परंतू होमिओपॅथी मुळे पूर्णतः बाहेर पडलो। 3 वर्षे औषध घ्यावे लागले।
    94220 30422

  2. Very nice and very useful
    Very nice and very useful article for the parents who may observe the first symptom in their children, This article will motivate the parents to take a right action.

Comments are closed.