माणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध

आम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण-दहिवडी तालुक्यातील कुळकजाई या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशेपासष्ट किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा व कृष्णा या नद्यांची उपनदी आहे. ती सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहते. माण नदीच्या परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. एकशेपासष्ट किलोमीटरच्या अंतरात असणारी गावे, मनुष्य-प्राणी, पशू, पक्षी, निसर्ग, शेती आणि पर्यावरण यांचा समतोल माण नदीवर अवलंबून आहे. माण नदीच्या अस्तित्वावर आम्हीच संकट आणले आहे. त्यामुळे माणदेशावर वारंवार येणारी संकटे ही अस्मानी आणि सुलतानी, अशा दोन्ही प्रकारची आहेत.

माणनदी तीस-पस्तीस वर्षापूर्वीची आणि आजची यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. सौभाग्यालंकारानी नटलेली पूर्वीची माणगंगा वैधव्य आल्यासारखी भासते. तिचे कार्यही पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. माणगंगा रुष्ट का झाली? याचा शोध घेण्याचा ध्यास होता, म्हणूनच माणगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत पायी भ्रमण केले. त्यामध्ये काही अभ्यासक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.

माणगंगा कुळकजाई गावाशेजारील सीतामाईच्या डोंगरदरीत उगम पावते. उगमस्थळी डोंगराच्या पोटातून वाहणारे पाणी, उंच डोंगर, दुस-या  बाजूला खोल दरी, उंच झाडांनी नटलेला परिसर, त्या ठिकाणी असणारी पुरातन मंदिरे यांमुळे नदीचे उगमस्थान कसे असावे याचे नैसर्गिक रूप त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्या परिसरात उंच डोंगररांगा, खोल द-या, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, औषधी वनस्पती आहेत. त्या ठिकाणचे पावित्र्य आणि निसर्गरम्यता अबाधित असल्याचे दिसून आले.

माणगंगेच्या उगमस्थळाचा परिसर पूर्वी दंडकारण्य म्हणून संबोधला जात होता. डोंगरमाथ्यावर व डोंगरउतारावर मोठमोठी झाडे होती. त्यामुळे त्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी डोंगराच्या पोटात मुरून डोंगराच्या पायथ्यातून पाझरणारे पाणी माणगंगेत येते. पाण्याचा प्रवाह दिर्घकाळ टिकून राहत होता. डोंगरभागांत वृक्षवेली न राहिल्यामुळे डोंगरात पाणी न मुरता ते वरच्या वर वाहून जाते.

मात्र उगमस्थळापासून तीस किलोमीटरपर्यंत वृक्षवेली सुरक्षित आहेत. परंतु त्याखाली संपूर्ण नदीक्षेत्रात पर्यावरणाला उपयुक्त अशी झाडे कुठेच राहिली नाहीत. त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे. नदीकाठी दोन्ही बाजूंला असणा-या वृक्षवेलीही नष्ट झाल्या.

१. वृक्ष लागवड – डोंगर माथ्यावरचे, उतारावरचे व नदीकाठचे मोठे वृक्ष जेंव्हा पावसाळ्यापूर्वीच्या किंवा पावसाळ्या अगोदर सुटणा-या  वादळाने हलतात. तेव्हा त्या वृक्षाची जमिनीतील मुळे हलतात व जमिनीच्या पोटात पोकळी निर्माण होते. त्यामुळे डोंगरमाथ्यावर, डोंगर उतारावर व नदीकाठच्या परिसरात पावसाचे पाणी मुरते, झाडे नष्ट झाल्यामुळे माणनदीच्या परिसरात सध्या पाणी मुरत नाही. त्यासाठी वृक्ष लागवड करणे हा एकमेव चांगला उपाय असून डोंगरमाथ्यावर व उतारावर विविध प्रकारची वृक्षलागवड करणे व नदीकाठावर लिंब, चिंच, करंज अशा जातींची झाडे लागण करावी. जेणेकरुन साताठ वर्षानंतर त्या झाडापासून मिळणा-या बियांपासून रोजगार उपलब्ध होऊ शकेल. ते काम लोकसहभागातून तसेच नदीकाठच्या शेतक-याकडून स्वयंस्फूर्तीने केले पाहिजे. नदीकाठच्या पात्रातील काटेरी बाभळी व उपद्रवी वनस्पती पूर्णपणे काढाव्यात. नदीपात्रात ओघळलेला गाळ नदीपात्राच्या काठावर भरून घ्यावा व नदीकाठच्या उतारावर चिंच, करंज आणि काठाच्या माथ्यावर लिंबाची झाडे लावावीत.

२. को. प. बंधारे – माण नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंतच्या एकशेपासष्ट किलोमीटरमध्ये नदीपात्रात चौतीस को. प. बंधारे बांधले आहेत. ते भौगोलिक व तांत्रिक दृष्ट्या चुकीचे आहेत. कारण माण नदी ही अतिउताराने वाहणारी नदी आहे. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असतो. खळखळून पाणी वाहत असल्याने माण नदीत तयार होणारी वाळू गुणवत्तापूर्ण आहे व त्या वाळूमध्ये भूपृष्ठाखाली पाणी साठवून धरण्याची क्षमता जास्त आहे. परंतु त्या दोन्ही प्रक्रिया बंधा-यामुळे नामशेष झाल्या आहेत. अतिउतारामुळे बंधा-याच्या दरवाज्यावर जास्तीचा दाब पडतो व दोन दरवाज्यातील पॅकिंग टिकत नसल्याने बंधा-यात पाणी साठले तरी गळती मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच, त्या बंधा-यात पाणीसाठ्याऐवजी माणकट मातीचे थरावर थर चढल्याने त्यावर काटेरी झुडपे व उपद्रवी वनस्पती वाढून बंधा-याच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. तसेच, नदीपात्रातून आसपास जाणारे पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहेत.

नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी वेगाने नदीपात्राकडे येत असल्याने सुरुवातीच्या पावसात नदीपात्राकडे माणकट चुनखडी मातीचा गाळ जास्त प्रमाणात वाहून येतो. बंधा-यामुळे प्रत्येक ठिकाणी गाळ साठून राहिला आहे. तेव्हा अति उताराच्या नदीवर को. प. बंधारे हानिकारकच ठरले आहेत. माणदेशात पावसाची अनियमितता असल्यामुळे सुरुवातीपासून पडणारे पावसाचे पाणी बंधा-यात साठून राहवे म्हणून शासकीय यंत्रणेद्वारा किंवा स्थानिक गावांच्या आग्रहाखातर बंधा-याचे  दरवाजे नियमबाह्य व अवेळी बसवले जातात ही दुसरी चूक केली जाते. त्यामुळे पहिल्या पावसात मोठ्या प्रमाणात येणारा माणकट मिश्रीत गाळ बंधा-यात थांबतो. त्याचे थरावर थर बसून काँक्रिट प्रमाणे नदीचा भूभाग घट्ट होतो व वरचे पाणी वाहून जाते. गाळ वाहून जावा किंवा अतिपाण्याचा धोका होऊ नये त्याकरता बंधा-याच्या मध्यभागीच्या सहा ते आठ गाळ्यांत यांत्रिक पद्धतीने उघडणारे साखळी दरवाजे बसवण्याची आणि काढण्याची सोय करायला हवी. त्यामुळे गाळ साठण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, बंधा-याच्या पाणीसाठा क्षेत्रातील गाळ काढणे आणि झाडे-झुडपे काढून टाकणे यासाठी शासनाने कसलीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे बंधा-यातील नदीपात्रात दरवर्षी गाळ साठत चालला आहे. त्यावर झाडा-झुडपांचे प्रमाण वाढत चालले आहे. गाळाने नदीपात्र भरल्याने व नदीच्या पृष्ठभागावर त्याचे थर घट्ट झाल्यामुळे भूगर्भातून इतरत्र जाणारे पाण्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. त्यामुळे नदीपरिसरात असणा-या विहिरी, बोअरवेल, आड कोरडे पडू लागले आहेत. बंधारा बांधला जात असताना जो अपेक्षित किंवा निर्धारित पाणीसाठा कागदोपत्री नमूद केला गेलेला आहे, त्याप्रमाणे पाणीसाठा होऊ शकतो का? त्याकरता प्रत्येक बंधा-याचा सर्व्हे होण्याची गरज आहे व पाणीसाठ्याची तफावत निदर्शनास आणली गेली पाहिजे.

प्रत्येक बंधा-याची पाणीसाठा क्षमता ७० ते ८० एम.सी.एफ.टी. आहे. परंतु सर्वच बंधा-याच्या पाणीसाठ्याची क्षमता पन्नास टक्क्यांवर आली आहे. त्या सर्व बंधा-यात पूर्वलक्ष्यी क्षमतेने पाणीसाठा करायचा असेल तर माण नदीवरील सर्व बंधा-यातील गाळ काढला गेला पाहिजे. पात्रातील झाडझुडपे काढून नदीपात्र स्वच्छ केले गेले पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी साठवा आणि पाण्याचे स्त्रोत जिवित करा या योजनेअंतर्गत नवी योजना राबवण्या अगोदर पाणीसाठ्यासाठी जुन्या ज्या योजना तयार केल्या आहेत त्या सुदृढ व सक्षम केल्या गेल्या पाहिजेत. नवीन योजनेवर होणा-या  खर्चापेक्षा कमी खर्चात हे पाणीसाठे सक्षम होऊ शकतील.

दीडशे फूट लांब, दीडशे फूट रुंद व दहा फूट खोल या मापदंडाच्या शेततळ्याची पाणीसाठवण क्षमता एक कोटी लिटर असते. त्याकरता शासन साडेपाच लाख रुपये अनुदान देते व त्यावर तीन-चार शेतक-याच्या एका पिकाला पाणी मिळू शकते. एका शेततळ्याइतकीच रक्कम एका को. प. बंधार्यांतील गाळ व झाडेझुडपे काढण्यासाठी खर्च केला तर ऐंशी (एम. सी. एफ. टी.) म्हणजे दोनशेअठ्ठावीस कोटी लिटर पाणीसाठा क्षमतेचा बंधारा गाळाने भरल्यामुळे निम्म्या साठ्यावर म्हणजे एकशेचौदा कोटी लिटर पाणीसाठा कमी झाला आहे. तोच बंधारा स्वच्छ केला तर एका शेततळ्याच्या खर्चात एकशेचौदा कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. आजुबाजूच्या विहिरी, बोअर वेल , आड यांमध्ये पाण्याचे स्त्रोत सुरू होतील व हजारो शेतक-याना पाण्याची उपलब्धता होऊ शकेल याचा विचार होणे आवश्यक आहे.

फुलेनगरवाडीचा १८९३ साली बांधलेला भूमिगत बंधारा वैशिष्ट्यपूर्ण वाटला. इंग्रज काळात दगडचुन्यामध्ये नदीपात्राच्या पृष्ठभागावर थोडा उंच, भक्कम बांधकाम असलेला तो बंधारा आहे. नदीला पाणी भिंतीच्या उंचीइतके आले, की जादा होणारे पाणी जाण्यासाठी पश्चिंम बाजूला चेंबर बांधला आहे व त्यापुढे सात किलोमीटर अंतराचा समपातळी कालवा काढलेला असून नदीमध्ये जोपर्यंत त्या प्रमाणात पाणी वाहत राहील तोवर त्या कालव्याद्वारे पाण्याचा प्रवाह राहून शेवटी, त्या पाण्याच्या साठ्यासाठी पिंगळी तलाव बांधला गेला आहे. केवळ नैसर्गिक व भौगोलिक रचनेवर कमी खर्चात नदीचे पाणी तलावात साठवण्याची सोय केली गेली आहे. नदीला प्रमाणापेक्षाही जास्त पाणी आले तर त्या बंधा-यावरच्या भिंतीवरून कसलाही धोका न होता मूळ नदीपात्रात पाणी पडते. वास्तविक, माण नदीवर भौगोलिक परिस्थितीवर आधारित असे बंधारे बांधणे आवश्यक आहे.

३. वाळू बचाव – माणगंगा वाचवायची असेल तर त्या नदीने स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि मानवी वस्तीच्या उपयुक्ततेसाठी शेकडो वर्षांपासून तयार केलेली नदीपात्रातील वाळू वाचवली पाहिजे. माणनदीच्या पात्राचा काही ठिकाणचा भाग सोडला तर वीस ते तीस फूट खोलीपर्यंत वाळू आहे. केवळ नदीकाठच्या जागरुक नागरिकांमुळे ती वाळू आणि ते नदीपात्र सुरक्षित राहिले आहे. वाळूच्या थरांमुळे पात्रातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व जमिनीखालचा पाणीसाठा सुरक्षित राहून आजुबाजूला पाण्याचे श्रोत मंदगतीने चालू राहतात. जमिनीखालील तापमान मर्यादेत राहते. नदीकाठच्या झाडांना त्याचा उपयोग होतो. वाळूतस्करी करणे म्हणजे गुन्हा आणि निसर्गावर हल्ला केल्याचे पाप आहे. त्याबाबत लोकप्रबोधन झाले पाहिजे. स्थानिक बांधकामासाठी लागणारी वाळू नदीपात्रातच चाळून उपयुक्त तेवढी वाळू न्यावी. निरुपयोगी असणारी वाळू नदीपात्रातच सोडावी. अन्यथा वाळूचोरी, विक्री, तस्करी यांवर कडक बंधने घालावीत.

४. नद्यांतील अतिक्रमणे – नदीशेजारच्या शेतक-यानी दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे करून नदीपात्र संपुष्टात आणले आहे. नदीकाठावरील शेतक-याची शेती नदीच्या पाण्यावर व नदीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. शेतक-यानी स्वत:हून नदीपात्रातील अतिक्रमण काढून ते खुले केले पाहिजे. त्यासाठी शासन स्तरावर कारवाई करणे आवश्यक आहे. नदीपात्र सुरक्षित राहिले तर पाणीसाठ्यात वाढ होऊ शकेल!

५. नदीच्या दुतर्फा वृक्ष लागवड – नदीचे पात्र खुले करून पात्रातील व दोन्ही बाजूंची उपद्रवी झाडेझुडपे काढून टाकून नदीपात्रात ओघळलेली गाळमाती दोन्हीकडील काठांवर भरून, दोन्ही काठांवर चिंच, करंज, लिंब अशा झाडांची लागवड करून त्या झाडांचे संगोपन काठावर शेती असणार्याव शेतक-यावर तीन वर्षांपर्यंत सोपवले पाहिजे. त्या शेतक-याना तीन वर्षे प्रतिझाड वार्षिक वृक्षसंगोपन अनुदान दिले पाहिजे. तीन वर्षांच्या झाडांना रंगाचे पट्टे मारुन शासकीय निशाणी केली गेली पाहिजे. त्यामध्ये एकशेपासष्ट किलोमीटरच्या माणगंगेचे दोन्ही तीर, अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या कोरडा नदीचे तीर, सत्तावीस किलोमीटरच्या अफ्रुका नदीचे आणि बावीस किलोमीटरच्या बेलवन नदीचे दोन्ही तीर मोजले तर साडेपाचशे किलोमीटरमध्ये चांगल्या प्रकारे वृक्षलागवड व संगोपन होऊ शकेल.

ओढ्या-नाल्यांवर सिमेंट बंधारे –
वृक्षलागवडीचा उपक्रम जर एक/दोन वर्षे राबवला गेला तरी ते वृक्ष मोठे होऊन पूर्वीप्रमाणे डोंगरात पाणी मुरवण्याकरता दहा-बारा वर्षांचा कालावधी जावा लागेल. तोपर्यंतच्या कालावधीसाठी नदीच्या मूळ पात्राला बाधा न आणता माणगंगेला ज्या-ज्या ठिकाणी ओढे, नाले मिळतात त्यावर सिमेंट बंधारे बांधून, शिरपूर पद्धतीने आतील माती साईटला भरून सिमेंट बंधा-याच्या तळभागात पन्नास-पन्नास फुटी बोअर ब्लास्ट केले तर जमिनीच्या अंतर्भागात पाणी जाऊन त्याचा नदीपात्रात पाझर चालू राहील. माणगंगेला मिळणा-या ओढे-नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधणे आवश्यक आहे.

६. चंदनाची झाडे – नद्यांच्या परिसरात पक्ष्यांच्या विष्टेतून पडणा-या बियांपासून चंदनाची झाडे आपोआप उगवतात व आपोआप मोठी होतात आणि त्यामध्ये सुगंधी गाभा तयार झाला की चंदनाच्या झाडाची दर वर्षी लाखो रुपयांची तस्करी होते. त्याबाबत कधी कोणी तक्रार केल्याचे किंवा त्याची चौकशी झाल्याचे कधी ऐकिवात नाही. ते शासनाचे मोठे नुकसान आहे. त्यासाठी चंदनाची खरेदी-विक्री खुली करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

७. उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन – पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जमिनीखालील पाणीसाठे कमी झाले आहेत. रासायनिक खते वापरल्याने माती निर्जीव होत चालली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा आदी योजनांद्वारा अनेक उपाय सुरू आहेत. परंतु ते निष्प्रभ ठरत आहेत आणि राज्यभर दुष्काळाची भीषणता वाढत चालली आहे. दुष्काळाची भीषणता वाढण्यामध्ये गेल्या आठ-दहा वर्षात आणखी एका उपद्रवी वनस्पतीची भर पडत चालली आहे, ती म्हणजे नद्या, नाले, ओढे, तलाव, गावतळी, कॅनॉलशेजारील पाणी पाझराचा परिसर, विहिरीपासून वाहणारे दंड इत्यादींसह ज्या ज्या ठिकाणी पाणीसाठयाच्या जागा आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी एक विषारी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. ती पाणी शोषून घेणारी, मातीला निर्जीव करणारी, शेळ्या-मेंढ्यांसह कोणतेही जनावर तोंड लावत नसणारी अशी आहे. पाणस्थळ परिसरात ती वाढलेली दिसून येते. पसरट पाने असणारी, फिक्कट गुलाबी पांढरी फुले येणारी, पोकळ खोडे वाढणारी ती वनस्पती… पण तिच्या पोकळ खोडाचा तुकडा पडला तरी त्यातून नवनिर्मिती होते. खोडेही जमिनीवर पसरतात. खोडाला फांद्या वाढतात, काड्या पोकळ असूनही लवकर वाळत नाहीत. जमिनीत केसाळ मुळ्यांचे आळेच तयार करतात. वनस्पती पूर्ण पाण्यात बुडली तर इतर वनस्पतींप्रमाणे कुजत नाही किंवा कितीही दिवस पाणी नसले तरी ती मरत नाही. मातीतील ओलावा शोषून घेते व पानांचा आकार मोठा असल्याने हवेतील आर्द्रताही शोषून घेते. त्यामुळे ती वनस्पती जमिनीवरील, जमिनीतील व हवेतील पाणी कमी करण्याचे काम करत असते. वनस्पतीचा ‘सरपण’ म्हणून वापर केला तर त्यातून निघणारा धूर दुर्गंधीयुक्त व विषारी असतो. त्यामुळे वनस्पती मानवप्राण्यासाठी घातक आणि पाण्यासाठी व पर्यावरणासाठी मारक आहे. त्या वनस्पतीला वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात  असावे. माणदेशी भागात तिला शोक समिंदर या नावाने ओळखतात. शेतक-यानी तिच्या दुर्गुणांवर आधारित ते नाव दिले असावे. वनस्पतीचे वेळीच निर्मूलन नाही केले तर एके वेळी समुद्रालाही शोक करायला लावेल अशी उपद्रवी वनस्पती आहे. तिच्या मुळाशी साप, विंचू, सरडा, पाल असे कोणते सरपटणारे प्राणीसुद्धा थांबत नाहीत.

८. नदीपात्रात सोडले जाणारे घाणपाणी –

अ. नदीकाठावरील गावे उंचवट्यावर वसलेली आहेत. गावांचा उतार नदीकडे असतो. गावात वापरले जाणारे सांडपाणी गटारांद्वारे नदीपात्राकडे सोडले जाते. त्यामुळे नदीपात्राचे पाणी दूषित होते. त्यापेक्षा गावातून नदीपात्राकडे जाणा-या गटारीच्या बाहेरील बाजूने ओळीने दहा-दहा फुटांवर शोषखड्डे पाडावेत व गटारीतून वाहणारे पाणी विभागून प्रत्येक शोष खड्यात सोडावे. दोन शोषखड्यांमधील मोकळ्या जागेत वृक्षलागवड करावी. त्यामुळे नदीकडे जाणारे घाण पाणी थांबेल व वाया जाणा-या पाण्यावर झाडे चांगली येतील.

ब. दस-याच्या वा इतर सणांच्या वेळी घरे, गाव स्वच्छ करताना निघणारी घाण, निरुपयोगी साहित्य, जुने कपडे, कागद अशा वस्तू नदीपात्रात टाकल्या जातात. त्यामुळे नदीपात्र घाण होते. त्यापासून ग्रामस्थांना, महिलांना परावृत्त केले पाहिजे.

क. बहुतांशी गावांमध्ये, विशेषत: नदीकाठच्या गावांमध्ये कोणाचेही निधन झाले तर त्याचे रक्षाविसर्जन नदीपात्रात केले जाते. त्याऐवजी स्वत:च्या शेतात खड्डा काढून रक्षा विसर्जित केली आणि त्यावर समाधी न बांधता चांगले फळझाड लावून, त्या झाडाची पूजा करून संगोपन केले, तर पूर्वजांची वर्षानुवर्षे गोड आठवण राहील. त्यासाठीही प्रबोधन केले गेले पाहिजे.

. नदीपात्र स्वच्छ व पवित्र ठेवणे – नदीकाठी असणा-या  गावांतील पूर्वजांनी मंदिरासाठी जागा निवडताना नदीकाठची जागा निवडून देवदेवतांची प्रतिष्ठापना केली. कारण गावपरिसराचे व विशेषत: नदीपात्राचे पावित्र्य राहवे ही त्यापाठीमागची संकल्पना लक्षात घेतली गेली पाहिजे. अनेक ठिकाणी नदीपात्राचा वापर हागंदारीसारखा होतो हेही गावोगावच्या नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे.

संपूर्ण कार्यात शासन, समाज यांचा सहभाग लाभला पाहिजे, कारण त्या कामाची व्याप्ती मोठी आहे. एकटे शासन किंवा एखादी सामाजिक संघटना ते काम करू शकणार नाही. त्याकरता नदीकाठच्या प्रत्येक गावात नदी सुरक्षा समिती स्थापन केली पाहिजे. प्रत्येक गावची समिती त्या/त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयाशी संलग्न असली पाहिजे. त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने, आवडीने कार्य करणारे ग्रामस्थ असले पाहिजेत. तरच पुढच्या दहा-पंधरा वर्षात नद्यांचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. माणगंगेला पूर्वरूप प्राप्त झाले तर पुढच्या पिढ्यांना माणगंगेचा आशीर्वाद निश्चिदत लाभेल.

वैजिनाथ घोंगडे

Last Updated On 25 April 2018

About Post Author

Previous articleपुलगम टेक्स्टाइल – सोलापूरची शान
Next articleसमृद्धी रणदिवे – वंडर गर्ल
वैजिनाथ जगन्नाथ घोंगडे हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी. ते गेल्‍या वीस वर्षांपासून वृत्‍तपत्र क्षेत्रात कार्यरत असून ' माणदेश वैभव' या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. ते गेल्‍या बारा वर्षांपासून नदीकाठी वृक्षांची लागवड करून त्‍यांचे संवर्धन करण्‍याचं काम करतात. त्‍यांनी 2010 साली माणगंगा नदीपात्रातून १६५ किलोमीटरचे अंतर पायी कापून नदीपरिक्रमा व अभ्यासदौरा पूर्ण केला. त्‍यानंतर त्‍यांनी नदीची दुरवस्था व विकासाचे उपाय यावर अहवाल तयार करुन सादर केला. त्‍यांचे माणगंगेच्या व्यथा आणि उपाय यांवरील लेखन असलेले 'परिक्रमा माणगंगेची' हे पुस्‍तक प्रकाशित झाले आहे. घोंगडे यांनी २०१२-१३ आणि २०१३-१४ या काळात त्‍यांचे राहते गाव, वाढेगाव येथे महात्‍मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी काम करत काही समाजपयोगी उपक्रम राबवले. त्‍यांनी त्‍यातून गावाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त करुन दिला. जलतज्ञ मा. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत माणगंगेच्या उगमस्थळापासून वैजिनाथ घोंगडे यांच्या हस्ते माणगंगेच्या पुनर्जीवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल आहे. त्‍यांनी 2010 साली सोलापूर जिल्ह्यात लोकसहभागातून माणगंगा स्वच्छता अभियान राबवले. त्‍यांनी २०१५ मध्ये माणगंगेची दुसरी परिक्रमा केली. त्यामध्ये माण नदीला मिळणारे ओढे, त्यांची लांबी, त्यावर बांधलेले सिमेंट ना. बं. व अपेक्षीत सिमेंट ना. बं. याबाबतची माहिती संकलीत केली असून त्याचा अहवाल सातारा, सांगली व सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना देण्याचे काम सुरु आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांनी नदीकाठच्या निवडक ठिकाणी वृक्षारोपण, पर्यावरण, नदीस्वच्छता याबाबत जनजागृतीचे काम सुरु आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420093599