माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद

10
355
carasole1

पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील? या डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला, पण खऱ्या विठ्ठलभक्ताला त्या वादात रस नाही. त्याच्यासाठी तो विठुराया फक्त देव नाही, तर मित्रही आहे. तो ‘प्रथम भेटी आलिंगन, मग वंदावे चरण’ या अभंगाप्रमाणे कायमच त्या मित्राची मनोमन गळाभेट घेत आला आहे. आणि ही गळाभेट जरी पंढरीला प्रत्यक्षात घेता येत नसली तरी माढ्याला मनसोक्त घेता येते, हे मात्र नक्की!

माढ्यातील विठ्ठलमंदिर फारसे गजबजलेले नाही; अगदी ऐंशीमधील ‘त्या’ वादानंतरही नाही. अगदी ते मंदिर त्याला मंदिर म्हणावे असेही नाही. धड घुमट नाही, की कळस नाही. त्याच्या चार बाजूंना मशिदीच्या मिनारासारखे बांधकाम आहे. पण मंदिरातील विठ्ठलमूर्ती प्राचीन, थेट पंढरपूरच्या विठ्ठलाशी नाते सांगणारी भासते -एकाकी, रेखीव, गूढ आणि तरीही रम्य…

सकाळचे सहा-साडेसहा वाजलेले असतात. माढ्यातील त्या विठ्ठल मंदिरात एकट्या पुजाऱ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. हळू आवाजात सुरू असलेला मंत्रोच्चारही आसपासच्या नीरव शांततेमुळे देऊळभर भरून राहिलेला. नुकत्याच संपलेल्या अभिषेकामुळे विठ्ठलाचे सावळेपण अधिकच उजळलेले. तेवढ्यात एक वयोवृद्ध बाई देवळात येते. थेट गाभाऱ्यात शिरते. विठ्ठलाच्या तोंडाला साखरेची वाटी लावते. लहान मुलाची दृष्ट काढावी तशी ती विठ्ठलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोटे उलटी करून स्वत:च्या कानशीलाजवळ कडकन मोडते… तिला त्या सावळ्या ध्यानात काय दिसले ठाऊक नाही, पण तो देव तिला सोवळ्याओवळ्याच्या पलीकडला वाटतो. आपल्या पोटच्या मुलासारखा. आईच्या मायेला मुलाहून अधिक जवळ ते काय. विठ्ठलाला पाहून त्या माऊलीला वात्सल्याचा पान्हा फुटावा यातच त्या देवाचे मोठेपण सामावलेले आहे.

कंठात गहिवर दाटून यावा असा तो प्रसंग समोर घडत असताना, ती बाई जे बोलली ते भल्याभल्या विचारवंतांनाही तोंडात बोटे घालायला लावेल असं. देवाची दृष्ट काढून ती माऊली आकाशाकडे हात करत बोलती झाली. ”हे ईठ्ठला, काय बी नको बघ तुज्याकडून, आता जसा भेटतोस तसाच रोज भेट म्हणजे झालं”. ‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा’ म्हणणारे तुकोबा याहून वेगळे काय म्हणत होते.

माढा. वीस-पंचवीस हजार वस्तीचे हे सोलापूर जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण. पण कुर्डुवाडीला रेल्वेचे जंक्शन झाले आणि माढ्याचे महत्त्व ओसरले. पण निंबाळकरांची जहागिरी असणाऱ्या माढ्यातील हे विठ्ठलमंदिर रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनाने अचानक प्रकाशात आले. ढेरे यांनी अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण देत हे मांडले आहे, की पंढरपुरात असलेली विठ्ठलमूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाही. पण मूळ मूर्तीर्ची जी लक्षणे सांगितली जातात तशी मूर्ती माढ्यात सापडते.

त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर एकच वादळ उठले. पंढरपूरच्या बडव्यांपासून अनेक भक्तमहात्म्यांनी त्या संशोधनाला विरोध केला. पुजाऱ्यांनी त्यांच्या पोथ्यांवरील धूळ झटकली, संशोधकांनी त्यांचे ग्रंथ पुन्हा एकदा बाहेर काढले. लेखावर लेख असा बौद्धिक वाद सुरू झाला. अनेक वर्षे सुरू असलेला तो वाद कालांतराने शांत झाला. पण विठ्ठलाच्या मूर्तीसमोर त्याच्याप्रमाणेच कंबरेवर हात घेऊन उभे राहिलेले प्रश्नचिन्ह कायम आहे.

स्कंदपुराणातील ‘पांडुरंगमहात्म्य’ या संस्कृत रचनेपासून ते संत सावता माळी यांच्या अभंगापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचे जे वर्णन सापडते, तशी मूर्ती पंढरपुरात नाही. हृदयस्थानावर कोरलेला कुटमंत्र हे त्या मूर्तीर्चे महत्त्वाचे वर्णन आहे. तशी मूर्ती माढा येथे आहे.

मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. ही मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे. ही सारी लक्षणे माढा येथील मूर्तीत पाहता येतात.

श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा: || श्री
वत्स

असा हा कुटमंत्र माढ्याच्या विठ्ठलाच्या छातीवर कोरलेला स्पष्टपणे पाहता येतो.

अफझलखानाने १६५९ मध्ये केलेल्‍या आक्रमणाच्या वेळी पंढरपूरची मूर्ती माढा येथे हलवली होती, अशीही पारंपरिक माहिती आहे. त्या साऱ्याचे शास्त्रीय विवेचन करत रा. चिं. ढेरे यांनी असे मांडले, की माढा येथील मूर्ती आद्यमूर्तीशी साम्य सांगते. पण अशीही शक्यता आहे, की माढ्यात पंढरपूरचा विठ्ठल येऊन गेला म्हणून माढावासीयांनी त्याची प्रतिमूर्ती स्थापन केली असेल.

ढेरे हे स्पष्ट करतात, की त्यामुळे पंढरपूरचे स्थानमहात्म्य कमी होत नाही, कारण भारतीय धर्मशास्त्रानुसार महत्त्व मूर्तीला नसून स्थानाला आहे, म्हणूनच काशीचा विश्वनाथ किंवा सौराष्ट्राच्या सोमनाथाची मूळ शिवलिंगे अस्तित्वात नसूनही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. हे वास्तव लक्षात घेऊन प्रत्येक पांडुरंगभक्ताने या संशोधनाकडे पाहिले पाहिजे. केवळ आणि केवळ अभ्यासातून पुढे आलेले सत्य मांडण्याचा ढेरे यांचा प्रयत्न आहे. त्यावर जर कोणी पुन्हा अभ्यास केला आणि त्याला वेगळे काही सापडले तर ते जाहीरपणे स्वीकारण्याची कबुलीही ढेरे त्यांच्या त्या संशोधन लेखात देतात.

ढेरे यांच्या संशोधनावर बरीच राळ उठली. काही धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. ‘विठ्ठलभक्तांच्या भावना दुखावणारे संशोधन’ अशी त्यावर टीका झाली. काहींनी तर त्यावर आक्षेपही नोंदवले. त्यात अशा पद्धतीने मूर्तीवर मंत्र असणे हे वैदिक नाही. तसेच, स्कंदपुराणावरच शंका व्यक्त करण्यात आली. त्याव्यतिरीक्त मूर्तीच्या विविध बाजूंवरही आक्षेप घेण्यात आले. पण ढेरे यांनी या त्यांच्या लेखांमधून आणि ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथामधून उत्तरही दिले आहे. पण तरीही आद्यमूर्तीचा वाद भावनांच्या वादळात हरवून गेला. तो ठोस उत्तरापर्यंत आला नाही हेच खरे.

वादाला सत्तावीस वर्षे उलटून गेली आहेत. ढेरेही वयोमानाने थकले आहेत. त्यांनी केलेले संशोधन अनेक अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना एका नव्या वाटेकडे बोट दाखवत उभे आहे, पण त्यांची परंपरा कायम ठेवत सत्याचा शोध घेणारे ते संशोधन पुढे चालू आहे असे ठोसपणे दिसत नाही. ‘त्या’ वादानंतर चंदभागेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. संशोधनाची माध्यमे बदलली आहेत, विज्ञान पुढे गेले आहे. नव्या साधनांचा उपयोग करून सत्यान्वेषी संशोधनाची पालखी नव्या खांद्यांवर विसावायला हवी.

वादात आणखी एक मुद्दा माढ्यातील देवळाचे पुजारी उत्कर्ष कुंभेजकर मांडतात. ते म्हणतात, की पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या आणि रुख्मिणीमातीच्या दगडात फरक जाणवतो. पण पंढरपूरच्या रुख्मिणीमातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठलमूर्तीचा दगड सारखा वाटतो. कदाचित ते शिल्पकलेच्या अभ्यासकांना स्पष्टपणे मांडता येईल. त्या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा.

कारण कितीही अप्रिय असली तरी ‘सत्याची कास’ धरणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अशा वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडले आहे, पचवली आहे. म्हणूनच ‘सन्याशाचे पोर’ म्हणून वाळीत टाकलेले ज्ञानेश्वर येथे ‘माऊली’ ठरतात आणि इंद्रायणीत पोथ्या बुडवूनही तुकाराम ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच ‘ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे’ म्हणणाऱ्या मराठी मनाने तरी विठ्ठलाचा हा अभ्यास अखंड सुरू ठेवायला हवा.

अखेर, देव हा मूर्तीत नाही हे वारकऱ्यांच्या भागवतधर्माचे सार आहे. म्हणूनच दगडाच्या त्या मूर्तीपेक्षा माणसातील देव भागवतधर्मात मोठा मानला गेला आहे. हजारो मैल चालून वारकरी जो पंढरीला जातो त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसावी ही आस नसते. त्याला आस असते ती पंढरीला जाण्याची, त्या प्रवासाची. कारण त्या वारीतील समाजजीवन त्याला समृद्ध करणारे असते. त्याच्यासाठी देवदर्शन ही फक्त औपचारिकता असते. ते प्रत्यक्षात झाले नाही तरी तो कळसाचे दर्शन घेऊन माघारी परततो. कारण त्याच्यासाठी विठ्ठल त्या दगडाच्या मूर्तीत नसून एकमेकांच्या अंतरात आहे. म्हणूनच एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटतो, तेव्हा त्याच्या पाया पडतो. माणसातच देव मानण्याची ती प्रथा मूर्तीचे गौणत्व स्पष्ट करत नाही का?

असे असताना, इतिहासाच्या पुराव्यावर विठ्ठल या देवतेचा अभ्यास करणे चुकीचे कसे ठरते? शेवटी, दैवते माणसाने माणसाच्या विकासासाठी घडवली आहेत. श्रीविठ्ठल हा तर मराठी भाषकांनी घडवलेला देव आहे. गेली आठशे वर्ष तो मराठी भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. ज्ञानेश्वरांपासून चोखा महारांपर्यंतचे त्याचे भक्त त्याच्या सर्वसमावेशकतेची साक्ष देत उभे आहेत. फक्त जातीपातींच्या भिंतीच नाहीत तर भारतातील शैववैष्णवांच्या वादावर पडदा टाकत ‘विष्णुसहित शिव’ म्हणून तो चंद्रभागेच्या काठी उभा ठाकतो. एकंदरीत विविध ज्ञानप्रज्ञांच्या प्रवाहांचा हा महासमन्वय फक्त भक्तांना नाही तर अभ्यासकांनाही कायम खुणावत राहिला आहे.

त्याचा अभ्यास फक्त मराठीजनांनी नाही तर भारतातील विविध भाषांमध्ये आणि अनेक विदेशी संशोधकांनी केला आहे, करत आहेत. तो मूळचा गवळी-धनगरांचा लोकदेव अवघ्या मराठी मनाची विठुमाऊली झाला. त्याला कधी सोवळ्याओवळ्याचे बंधन नव्हते, ना शोडषोपचाराची गरज. त्याच्या पूजेत ते सारे असले तरी ते मुळचे नाही. कारण ज्ञानेश्वरांपासून चोखोबांपर्यंतच्या संतांनी त्याच्या ओव्या गायल्या आहेत आणि त्याला शिव्याही घातल्या आहेत. ‘आहे असा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।। ‘ असे सांगत तुकारामांनी तर माणसातील देवापुढे या दगडाच्या देवाचे अस्तित्वच नाकारले आहे.

वारकरी संप्रदायाने मानलेल्या माणसाच्या देवत्त्वाची साक्ष माढ्यातील एका अनुभवात आली. पंढरीच्या वाटेवर असलेल्या माढ्यातील विठ्ठलाची ज्याला माहिती आहे. ते वाट वाकडी करून त्या देवळापर्यंत पोचतात. त्या दिवशी दुपारी असेच काही वारकरी देवळात आले होते. त्यातील एकाने हातातील दुधाची वाटी विठ्ठलमूर्तीपुढे ठेवली आणि मनोमन हात जोडले. त्यानंतर ती वाटी देवळातच वावरणाऱ्या एका लहानग्याच्या हातात ठेवून त्याने त्या मुलाच्या पायावर डोके ठेवले. अशा नमस्कारांना सरावला असल्यामुळे असेल कदाचित पण त्या मुलानेही त्या काकांना नमस्कार केला. उगी दगडाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा माणसाच्या अंतरीचा पांडुरंग सुखावण्याची त्याची ती कृती खूप काही शिकवून गेली.

त्या वारकऱ्यासाठी ती मूर्ती मूळमूर्ती आहे का नाही याच्याशी काहीच घेणेदेणे नव्हते. त्याला पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या त्या दुसऱ्या विठ्ठलाला भेटावेसे वाटले आणि तो आला एवढेच. तीच भावना घेऊन माढ्यातून परतायची वेळ झाली होती. ज्या पावलांची पूजा जन्मभर घडावी असे मागणे संतांपासून सर्वांनी मागितले, त्या पावलांवर डोके ठेवले. त्या क्षणी मनात आले, की कदाचित याच पावलांवर ज्ञानदेव, नामदेव, मुक्ताईपासून तुकाराम, निळोबांपर्यंतच्या संतांनी डोके ठेवले असेल. माणसाला जगायला याहून आणखी काय प्रेरणा हवी?

– नीलेश बने

(मूळ लेख ‘महाराष्‍ट्र टाईम्‍स’, 13 जुलै 2008)

About Post Author

10 COMMENTS

 1. KHUP CHAN MAHITI UPDATE KELI
  KHUP CHAN MAHITI UPDATE KELI AAHE MI MAHDEKAR APLA ABHARI AAHE

 2. आपल्या माहितीसाठी ! ढेरेंच्या
  आपल्या माहितीसाठी ! ढेरेंच्या ह्या तथाकथित संधोधानानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक ग हा खरे ह्यांनी ढेर्यांचा ग्रंथाचा प्रतिवाद मुदेदेसूद, ससंदर्भ आणि तर्कशुद्ध रीतीने अशा प्रकारे केला की शेवटी ढेरे स्वतःचा त्यांना म्हणाले “तात्या(खरे० अहो माझा नुसता कान धरला असता तरी मी माझे संशोधन मागे घेतले असते.”

 3. मा.ढेरे यांच्या संशोधनात
  मा.ढेरे यांच्या संशोधनात नक्कीच तथ्य असायला हवे.

 4. खुपच छान माहिती आहे
  खूप छान माहिती आहे.

 5. Aaj madhyatil Vithalbadal…
  Aaj madhyatil Vithalbadal samjale Nichit Darshnala Jain Mahitibaddal Atishay Manapasun Abhar.

 6. अध्यात्म, तत्वज्ञान आणि…
  अध्यात्म, तत्वज्ञान आणि शिल्पकला या विषयावर अधिक सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. खरा इतिहास नेहमीच समाजाला स्फूर्तिदायक आणि दिशादर्शक ठरतो.

 7. विजयनगर साम्राज्याची स्थापना…
  विजयनगर साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर तेथील विठ्ठल-भक्त राजांनी पंढरपुरातील मूळ मूर्ती राजधानी हंपी येथे नेऊन तेथे बांधलेल्या विशाल मंदिरात स्पथापन करण्यात आली !
  संत एकनाथांचे आजोबा भानुदासांनी महत्प्रयासाने ती मूर्ती तेथून परत पंढरपुरी आणली,हा मूर्ती-स्थलांतराचा आधीचा इतिहास आहे.

 8. मी खूप लहान असताना कुठेतरी…
  मी खूप लहान असताना कुठेतरी हा लेख वाचला होता, “खरा विठोबा कोणता -पंढरीचा कि माढयाचा ?
  आणि आज दि.14/01/2021ला पुन्हा एकदा वाचला. साधारण 35 वर्षापेक्षा जास्त काळ झाला.
  वादात पडण्याचे कारण नाही परंतु माढ्यातील विठ्ठल मंदिर प्रसिद्ध झाले ,त्याचा विकास झाला तर विठ्ठल भक्तांना आनंदच होईल

Comments are closed.