माझा हळद कोपरा

2
985

विद्या घाणेकरमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) गोष्टी सांगत. मलाही आमच्या छोट्याशा बागेत काही लावावे, ते वाढताना पाहण्यातला आनंद घ्यावा असे वाटत असे. माझ्या मिस्टरांचे निसर्गप्रेम अगदी पुस्तकी. त्यांचे साहित्यातील निसर्गवर्णने, बागांची वर्णने असले वाचून भागत असे. ते स्वत: मातीत हात घालायला तयार नसत. माझ्या मामेसासऱ्यांना (माधव सावरकर, पाभर) आपल्या भाच्याचा हा स्वभाव पूर्ण माहितीचा. ते माझा आणि आईंचा (सासुबाईंचा) उत्साह बघून मला म्हणाले, “विद्या, मी तुला हळद, कणगरे यांचे बी आणून देतो. पहिल्यांदा लावूनपण देतो. मग तू कर काय ती तुझी शेती.”

आणि खरोखरच, माधवमामा पाभऱ्याहून हळदीचे, कणगरांचे कंद घेऊन आले. आम्ही आमच्या जागेतील एक कोपरा हळद लागवडीसाठी निवडला. दहा बाय दहा फुटांचे क्षेत्र आणि आम्ही पाभऱ्यातील हळदीचे कंद त्या जागी एका मे महिन्याच्या शेवटी लावले. मामा मला म्हणाले होते, “निसर्ग त्याचे काम बरोबर करत असतो. तू काही काळजी करू नको. मी पुढच्या वर्षी तुझ्या घरची हळद बघायला येतो” मी स्वत: लावलेली हळद, कणगरे प्रत्यक्ष पीक येण्याच्या आधीच मला दिसू लागली!

कोकणातील मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मला वाटू लागले, की जमिनीखालचे हळदीचे कंद कुजून जाणार. एवढ्या पावसात कुठली रोपे वर यायला. आम्हाला हळद सांगलीहून येते व तेथेच ती पिकते एवढेच माहीत. पण मामांवरही विश्वास होता. त्यामुळे वाट बघायचे ठरवले. दोन-तीन आठवड्यांत इवली-इवली हिरवी पाने दिसू लागली आणि हायसे वाटले. मग मला मधे मधे हळदीच्या वाफ्याकडे जाऊन बघण्याचा छंदच लागला. श्रावणात पाने आणखी मोठी, तजेलदार दिसू लागली. ती हलणारी पाने स्वयंपाकघराच्या दारातून बघितली, की एकदम छान वाटायचे. हळदीच्या पानांचा उपयोग करून पातोळे करतात. उकडीचे मोदक मोदकपात्रात त्या पानावर ठेवून करतात, काही लोक ती पाने लोणी काढतानाही त्यात घालतात वगैरे ऐकीव माहिती होती. पण आमचे सगळे घाणेकर जिभेपेक्षा अधिक तिखट नाकाचे आणि त्यांना कोणालाही हळदीच्या पानांचा, त्यांच्या मते ‘उग्र वास’ आवडत नाही असे जाहीर झाल्यामुळे मी काही ते प्रयोग केले नाहीत. पण एक-दोन शेजाऱ्यांनी ती पाने पातोळ्यासाठी नेली आणि त्यांनी मला चवीला म्हणून पातोळे आणून दिले. मला ते खूप आवडले. हळदीची पाने संपूर्ण पावसाळा आणि दिवाळीपर्यंत तकतकीत हिरवी दिसत होती. मला त्या काळात हळद कधी काढायची याची जाम उत्सुकता लागली होती. पण आई म्हणाल्या, “पौष संपल्यावर मग ती काढुया. तोपर्यंत ते कंद छान तयार होतील.”

हळद चिरत असताना (डावीकडून) विद्या यांच्‍या सासूबाई, विद्या घाणेकर आणि निर्मलाबघता बघता पानांचा हिरवा रंग जाऊन ती पिवळी झाली. ती हळुहळू वाळून खाली पडू लागली आणि अखेर, पौष संपल्यावर सासुबाईंच्या मते हळद काढायला योग्य वेळ झाली. आमची कामवाली बाई निर्मला शेतीवाली. आम्ही तिला मदतीला घेऊन ती हळद खणून काढली. आवळलेल्या मुठीची बोटे दिसतात तसे ते कंद बाहेर काढताना मजा आली. नळाखाली ते धरल्यावर त्यांच्यावरची माती निघून गेली आणि त्यांचा छान  कोवळा रंग दिसू लागला. मग ती हळदीची बोटे हाताने तोडली. काही कंद पुढच्या वर्षीच्या बियाण्यासाठी ठेवले आणि हळद विळीवर चिरायला घेतली. सगळी हळद चिरून होईपर्यंत माझे हात, विळीचे पाते सगळे पिवळेजर्द होऊन गेले आणि कोवळ्या हळदीचा घमघमाट सगळीकडे सुटला. हळदीचे छोटे छोटे काप उन्हात वाळवत ठेवले; चांगले वाळल्यावर चाळून घेतले आणि मिक्सरला लावले. त्यानंतर मिक्सरचे झाकण उघडल्यावर हळदीचा वास दरवळला तो त्या वर्षांतील सर्वोत्तम सुगंध होता. मी पेरलेली हळद इतक्या सुरेख रुपात माझ्या हाती आली ही कल्पनाच सुखावणारी होती. बाजारातून आणली जाणारी हळद आमच्या हळदीपेक्षा किती कमी दर्जाची असते, हे कळून आले. पुढचे काही दिवस फोडणीत हळद टाकताना ही ‘आमची हळद’ ही भावना सुखावत असे.

माधवमामा आल्यावर त्यांना मुद्दाम ‘ही बघा, मी केलेली हळद’ असे म्हणून थोडी हळद डबी भरून मामींसाठी पाठवली. ‘अगं, आमच्या घरी ना आम्ही हळद करतो. काय मस्त होते.’ असे माहेरी मिरवून झाले. तोपर्यंत पुन्हा मे महिना संपत आला. पावसाची सुरुवात जवळ आली. मी, सासुबाई आणि निर्मला पुन्हा आमच्या हळदीच्या कोपऱ्याकडे वळलो आणि कंद जमिनीत लावले. आता, आम्ही दरवर्षी हळदीघाटीची ती लढाई करत असतो. आमच्या निर्मलाबाईंनी काही कंद त्यांच्याही घरी लावले. गेल्या वर्षी तर त्यांच्याकडे तीन किलो हळद झाली! आमचा दहा बाय दहाचा हळद कोपरा नेहमीचा झाला आहे. स्वयंपाकात, औषधासाठी आमच्या घरची हळद वापरण्यातील अभिमान आणि आनंद पुन्हा दरवर्षी हळद लावण्यातील, त्याची हिरवी पाने डोलताना बघण्यातील आणि नवी हळद चिरताना पिवळेजर्द होण्यातील उत्साह जिवंत ठेवतो.

विद्या घाणेकर
‘ऐसपैस’, नाडकर्णी नगर, कलमठ,
पो. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२,
९४२१२६४३००, (०२३६७) २३२५५३
pragh21@yahoo.co.in

About Post Author

2 COMMENTS

  1. सर्व विषयानची उत्तम माहीती.
    सर्व विषयानची उत्तम माहीती.

Comments are closed.