मांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची यात्रा

0
28

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील मांगरूळ गावात पर्वतरांगांच्या कुशीत, अगदी उंच डोंगरावर श्रीचिंचेश्वर देवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ तर मागील बाजूस वठलेला वटवृक्ष आहे. शिवाय बाजूला दाट वनराईही आहे. मंदिरापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी वारणा नदी आहे. ग्रामस्थ आणि चिंचेश्वराच्या भक्तांनी मिळून उंच टेकडीवर असलेल्या त्‍या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या गाभा-यात चिंचेश्वराची मूर्ती आहे. आजही त्‍या देवाची आख्यायिका लोक मोठ्या भक्तिभावाने सांगतात.

श्रीचिंचेश्वर हे मूळचे कर्नाटकातील दैवत. त्यास शिकार करण्याची खूप आवड होती. ते त्‍यांचे सैन्य घेऊन शिकारीच्या शोधात वाकुर्डे गावातील डोंगरावर आले. तिथे श्रीदेवी जुगाईमातेची व त्यांची भेट झाली. चिंचेश्वरांचे प्रेम जुगाईवर बसले व त्यांनी दस-याच्या शुभमुहूर्तावर जुगाईमातेसोबत विवाह केला. ते तेथून त्‍यांच्‍या गावी माघारी निघाले असता, श्रीचिंचेश्वरांना त्यांची बहीण भागाईभक्तीण भेटली. तिने चिंचेश्वरांना घरी येण्यास आग्रह केला. चिंचेश्वरांनी बहिणीच्या आग्रहाला मान देऊन येण्याचे कबूल केले. परंतु देवाने अट घातली की, जोपर्यंत आम्ही घरात येत नाही, तोपर्यंत तू मागे वळून पाहायचे नाहीस. बहिणीने ते कबूल केले व ती चिंचेश्वराच्या पुढे चालू लागली. वाटेत चालत असताना भागाईभक्तीणीला वाटले, की आपला भाऊ पाठून येतोय की नाही ते पाहावे, म्हणून तिने मागे वळून पाहिले. त्याच वेळी ज्या ठिकाणी भागाईभक्तीणीने मागे वळून पाहिले त्या ठिकाणी चिंचेश्वर स्थायिक झाले. त्या जागी चिंचेश्वराचे मंदिर उदयास आले. अशी ती आख्यायिका. दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मांगरूळ गावचे ग्रामस्थ चिंचेश्वराला पालखीत बसवून वाकुर्डेच्या डोंगरावर घेऊन जातात व जुगाईमातेचे चिंचेश्वराबरोबर लग्न लावून पालखी परत गावात आणतात.

मांगरुळ गावच्‍या श्रीचिंचेश्‍वराच्‍या यात्रेसाठी माघारणी (माहेरवाशिणी), परिसरातील लोक आणि इचलकरंजी, तडवळे परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सर्व जाती-धर्मातील लोकांचा एकोपा त्‍या यात्रेत दिसून येतो. यात्रेच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून बैलगाडीतून आंबील (ताकाची कढी) देवाला नेली जाते. अशा शंभर ते दीडशे बैलगाड्या सजवून, बँड आणि लेझीमच्या तालावर भाविक निघतात. तो बैलगाड्यांचा कार्यक्रम दुपारपर्यंत चालतो. त्यानंतर भाविक देवाचे दर्शन घेतात. तेथेच दगडाच्या चुलीवर नैवेद्य बनवला जातो.

यात्रेच्या पहिल्या रात्री मानाच्या सासनकाठ्या नाचवत भाविक निघतात. यात सर्वप्रथम मोरेवाडी येथील पवारांची सासनकाठी, खवरे यांची सासनकाठी आणि कुंभारांची सासनकाठी अशा मानाच्या सासनकाठ्यांची भेट घडवून आणली जाते. त्‍यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल आणि खोब-याची उधळण, त्‍या जोडीला ‘चिंचेश्वराच्या नावानं चांगभलंऽऽऽ..’ अशा गजरात ती मिरवणूक पहाटेपर्यंत चालते.

दुसऱ्या दिवशी गावातील पेहेलवान त्‍यांच्‍या तालमीतील आखाड्यात महादेवाची पिंड आणि हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. दुपारी भव्य मैदानात कुस्त्यांचा फड रंगतो. त्‍या कुस्त्यांसाठी मुंबईसह कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणांहून पेहेलवान हजेरी लावतात. त्‍या कुस्त्या दोन ते तीन तास चालतात. त्‍यावेळी ५० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या लावल्या जातात.

– संदीप पवार

Last Updated On – 24th August 2016

About Post Author