महेंद्र प्रताप हीदेखील हाथरसचीच ओळख (Freedom Fighter Mahendra Pratap Also Hails From Hathras)

3
81

काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे. ते कारण दुःखद आहे. परंतु हाथरसमध्येच महेंद्र प्रताप सिंग हे थोर स्वातंत्र्यसैनिक जन्माला आले होते. घटना अशी घडली, की मी इंटरनेटवर जुनी पुस्तके शोधत असतो. त्यामध्ये मला राजा महेंद्र प्रताप यांचे एक पुस्तक आढळले. ते आत्मचरित्र आहे – My life story. रास बिहारी बोस या बंगाली क्रांतिकारकाबाबतचा एक लेख अमेरिकेतील सीएनएनमध्ये छापून आलेला माझ्या वाचण्यात आला. तो वाचल्यावर त्यांच्याबद्दल कुतूहल वाढले. म्हणून अधिक शोध सुरु केला तेव्हा राजा महेंद्र प्रताप यांच्याबद्दल काही संदर्भ मिळाले. म्हणून शोध सुरु केला असता माय लाईफ स्टोरी हे पुस्तक नजरेसमोर आले. 

 

माय लाईफ स्टोरी हे पुस्तक दोन खंडांत आहे. त्यात आयुष्याची हकिगत जन्मापासून कालानुक्रमे सांगितलेली नाही. आठवणी पुढेमागे – पुन्हा पुढे येत राहतात. आत्मकथन संगती लागण्यास थोडे कठीण आहे. पुस्तकाची मूळ आवृत्ती 1947 साली प्रकाशित झाली. तिचे प्रकाशक कोण ते ठाऊक नाही. दुसरी आवृत्ती Originals – An Imprint Of Low Price Publications या संस्थेने 2004 साली प्रकाशित केली आहे. तिचे संपादन डॉवीर सिंग यांनी केले आहे. पण वाचावे असे निश्चित आहे. कारण महेंद्र प्रताप सिंग यांनी सुभाषबाबूंच्या आधी हिंदुस्तानचे सरकार हिंदुस्थानबाहेर स्थापन केले होते!

 

          महेंद्र प्रताप 1886 साली जन्मले. ते मूळचे मुरसाण या हाथरस जवळच्या संस्थानातील. त्यांचे मूळ नाव खरक सिंग. हाथरस संस्थानच्या राजाला मुलगा नव्हता, म्हणून त्यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव महेंद्र प्रताप ठेवले. त्यांचे आठव्या वर्षी नियमित शिक्षण शाळेत सुरु झाले. त्यांना घरी हिंदी आणि उर्दू भाषांचे शिक्षक शिकवण्यास येत असत. त्यांचे लग्न पंजाबमधील जिंद या छोट्या संस्थानच्या राजकन्येबरोबर 1902 साली झाले. त्यांनी पदवीधर होण्यापूर्वीच 1907 मध्ये शिक्षणाला रामराम ठोकला. ते त्याच वर्षी पत्नीसह जगाच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी त्या आधी 1905-1907 या तीन वर्षांत संपूर्ण भारत बघितला होता. ते कोलकाता येथे भरलेल्या 1906 सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनाला, सासऱ्यांचा विरोध पत्करून गेले होते. ते त्यानंतर स्वदेशीचे पुरस्कर्ते बनले. ते जगाच्या दौऱ्यात नायगरा धबधबा बघण्यास जात असताना, एका कस्टम अधिकाऱ्याने त्यांना म्हटले, की तुम्ही हिंदू तत्त्वज्ञान श्रेष्ठ म्हणता, पण ते तुम्हाला गुलाम होण्यापासून वाचवू शकले नाही. 

तो बिंदू महेंद्र प्रताप यांच्या जीवनातील महत्वाचा क्षण ठरला. त्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे कॉलेज 1909 साली काढले. त्यांनी स्वत सुरु केलेल्या कॉलेजमध्ये काय सुधारणा करता येतील हे पाहण्यासाठी ब्रिटनमधील औदयोगिक शहरे प्रामुख्याने बघितली. त्यांनी कॉलेजसाठी इमारत बांधण्यास जागा आणि नित्य खर्चासाठी पाच गावांचे उत्पन्न लावून दिले. त्यांनी आफ्रिकेत जाऊन गांधीजींना मदत करण्याची तयारी दर्शवली. परंतु त्यावेळी गोखले यांनी त्यांना परावृत्त केले. 

         

 

महेंद्र प्रताप यांनी ब्रिटनची सत्ता परकीय देशांतील सत्ताधाऱ्यांच्या मदतीने उलथून पाडावी असा महत्त्वाकांक्षी उद्देश ठेवून 1914 सालच्या डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान सोडला. त्यांनी त्या दौऱ्यात अनेकांच्या भेटी घेतल्या – त्यात जर्मनीच्या कैसर विल्यम्स यांचाही समावेश होता. त्यांनी वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी अफगाणिस्तानात Provisional Government Of India स्थापन केले. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस जे सरकार स्थापन करेल त्यात ते हंगामी सरकार विलीन करायचे असा कार्यक्रम आखला होता. त्यानंतर ते सर्व जगभर फिरून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत राहिले. ते रशियात ट्रॉट्स्की यांनाही भेटले; जपानलाही गेले. त्यांची पत्नी 1925 साली निधन पावली. त्यांना ती बातमी एका वर्षाने समजली. तरीही ते हिंदुस्तानात परतले नाहीत. त्यांना परत येण्यासाठी 1946 हे साल उजाडावे लागले.  स्वतंत्र भारतात, राजा महेंद्र प्रताप यांनी 1957 साली लोकसभेची निवडणूक मथुरा मतदारसंघातून लढवली आणि ती जिंकली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी अटलबिहारी वाजपेयी हे एक होते. वाजपेयींना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. सर्वात नवल वाटेल ते या गोष्टीचे, की महेंद्र प्रताप यांचे नामांकन शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकासाठी 1932 साली झाले होते!

 

 रामचंद्र वझे  9820946547vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी ‘बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंसस्‍त्रीअनुष्‍टुभरुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ‘महाराष्‍ट्र टाईम्‍स‘ आणि ‘लोकसत्ता‘ या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

——————————————————————————————————————-

 

About Post Author

3 COMMENTS

  1. श्री वझे सरांचा हा लेख माहितीपर आहेच.तसेच शोध ,संदर्भ ,माहिती आणि देशासाठी कार्य काल अधोरेखित करत जाणे चिंतनशील वाटले.

  2. महेंद्र प्रताप यांच्या बद्दल मोजक्या शब्दांत दिलेली उत्तम माहिती.लेख आवडला!Provisional Government Of India या बद्दल सविस्तर माहिती द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here