महाळुंगचे श्री यमाई देवीचे मंदिर

श्री यमाई देवी हे हेमाडपंथी मंदिर असून ते प्राचीन काळातील असल्याचे तेथील निवासी हरीशंकर गुरव यांनी सांगितले. देवीचे ठिकाण अकलूज आणि श्रीपूर मार्गावर असून अकलूजपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे. यमाई देवी ही पार्वतीचा अवतार आहे असे मानले जाते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या देवीनंतर या देवीला मान आहे असे तेथील लोक सांगतात, कारण तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या देवीचे दर्शन घ्यावे लागते. मगच भक्ताच्या दर्शनाला महत्त्व प्राप्त होते असे बोलले जाते. देवस्थानचा परिसर वन्य पशू–वानरांनी फुलला आहे. ते वानरांचे कायमचे स्थान आहे. देवीची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला तीन दिवस चालते. देवीची विशेष पूजाअर्चा नवरात्राचे नऊ दिवस केली जाते.

मंदिराच्या अवतीभोवती प्राचीन काळातील पुरातन साहित्य आणि इतिहास आहे. मंदिर परिसरात एक बारव आहे. त्याभोवती दगडी बांधकाम असून त्या परिसरात शांत आणि निरोगी वातावरण जाणवते.

– विठ्ठल आहेरवाडी

About Post Author