महाराष्‍ट्रातील आगळीवेगळी शिवमंदिरे

1
176
carasole

महाराष्‍ट्रातील शिवशंकराची मंदिरे गावोगावी आढळतात. शिवमंदिरांसोबत वास्‍तूकला आणि शिल्‍पकला यांचा झालेला संगम जागोजागी आढळतो. नाशिकचे त्र्यंबकेश्‍वराचे शिवमंदिर हे त्‍याचे प्रसिद्ध उदाहरण. महाराष्‍ट्राच्‍या गावागावांमध्‍ये तशी अज्ञात शिवमंदिरे अनेक आहेत. त्‍यापैकी काहींची ही ओळख…

1)  खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर – शिल्पकृतींचा साक्षात्कार – कोल्हापूरनजीकचे खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे भारतातील श्रद्धा व शिल्प संस्कृतीचा उत्तम नमूना आहे. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्य शास्त्र अशा बहुअंगी विषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात बघायला मिळतात… – लेख वाचा

2) उस्‍मानाबादचे माणकेश्‍वर मंदिर – उस्मानाबाद जिल्ह्याच्या बार्शी – भूम रस्त्यावरील माणकेश्‍वर गावचे ‘माणकेश्‍वरा’चे, अर्थात शंकराचे मंदिर त्‍याच्‍या शिल्‍पकलेसाठी आणि शेजारी वसलेल्या सटवाई देवीसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्‍या गर्भगृहाच्या मध्यभागी सुंदर असे शिवलिंग असून ते आठ फूट खोल गाभाऱ्यात आहे. शिवाजी महाराजांना पकडण्‍यासाठी अफझलखान महाराष्‍ट्रावर स्‍वारी करून आला. वाटेत त्‍याने अनेक हिंदू मंदिरे उध्‍वस्‍त केली. माणकेश्‍वरचे मंदिर त्या मंदिरांपैकी एक होते, असे स्‍थानिकांचे मानणे आहे… – लेख वाचा

3) वाडेश्‍वरोदय – कोकणातील प्राचीन देवस्‍थान – ‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाचे प्राचीन देवस्‍थान कोकणात रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील गुहागर येथे आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचे ते भव्य मंदिर पुरातन आहे. वाडेश्वर हा अनेक कुटुंबांचे कुलदैवत मानला जातो. मुख्य शिवमंदिर मधोमध असून चार कोपऱ्यांत सूर्य, गणपती, दुर्गादेवी आणि लक्ष्मीनारायण यांची मंदिरे आहेत. मंदिराच्या समोर नंदीचे गंडकी शिळेचे भव्य शिल्प आहे. नंदी ऐटबाज आहे. त्याच्या गळ्यातील घंटा, घुंगूरमाळा सजीव वाटतात. तो कोणत्याही क्षणी उठून चालू लागेल अशी सचेतनता त्या पाषाणात कलाकाराने ओतली आहे… – लेख वाचा

4) निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर – विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. विमलेश्‍वराच्‍या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी, तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते…
– लेख वाचा

5) अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर – पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर भुलेश्वर येथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेले शंकराचे प्राचीन मंदिर आहे. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्‍येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर इ.स. 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असे मानले जाते. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्‍वरच्‍या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते. ते मंदिर दौलतमंगल या किल्‍ल्‍यामध्ये सामावलेले आहे. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा तेथे जास्त रेखीव आहेत… – लेख वाचा

6) झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर – यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली. तसेच, एक सुंदर माणकेश्वर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. झोडगे येथील मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. मंदिराचे शिखर पाहिले, की रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिराची आठवण होते. त्या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला मुद्दाम पाहण्याजोगी आहे. एका देवकोष्ठात असलेली अंधकासुरवधाची शिवप्रतिमा निव्वळ देखणी आहे. त्यासोबतच मंदिराच्या बाह्यांगावर विविध वादक, दर्पणा, नूपुरपादिका अशा सुरसुंदरी, भैरव यांचे केलेले अंकन, शिखरावर असलेले कीर्तिमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहेत... – लेख वाचा

6) कोकणचे श्रीक्षेत्र कुणकेश्‍वर – सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. स्वयंभू पाषाणातून कोरलेले ते प्राचीन मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ असून गर्द वनराई, डोंगर, शुभ्र वाळू व अथांग अरबी समुद्र यांनी वेढलेला आहे. मंदिराचे बांधकाम द्राविडीयन पद्धतीचे आहे. कुणकेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. त्याच्या डोक्यावर सर्परूपी मुकुट आहे. शिवलिंगावर दूध व पाणी यांचा अभिषेक केला जातो. कुणकेश्वराचा राज्याभिषेक शके ५५ मध्ये शंभू छत्रपतींनी (करवीरकर) केला असल्‍याचे म्‍हटले जाते. त्‍यांनी कान्होजी आंग्रे यांस कुणकेश्वराच्या देवस्थानाच्या बाबतीत काही भानगडी असल्यास त्या दूर करून त्यावर लक्ष ठेवावा म्हणून हुकूम केला होता. गॅझेटिअरमधील उता-यात सन १६८० मध्ये कोल्हापूरच्या राजाने मंदिर दुरूस्त केल्याचा उल्लेख आहे… – लेख वाचा

About Post Author

1 COMMENT

  1. मंदिराची माहिती हवी आहे
    मंदिराची माहिती हवी आहे

Comments are closed.