महाराष्ट्र – मराठी भाषा

0
153

मराठी भाषा बोलणा-या बहुभाषिक प्रदेशांचे 1 मे 1960 रोजी एकत्रीकरण झाले आणि आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. महाराष्ट्र इंग्रजांच्या आमदानीत तीन भागांत विभागला गेला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश हे मुंबई राज्य किंवा मुंबई इलाख्यात समाविष्ट होते. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाला जोडलेला व निजामाच्या अधिपत्याखाली होता. विदर्भ हा मध्यभारताचा भाग होता.

भारत 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र झाला तरी हे प्रदेश इंग्रजांच्या आमदानीत असलेल्या व्यवस्थेप्रमाणे ठेवले गेले होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर हे तिन्ही मराठी बहुभाषिक प्रदेश एकत्र येणे अपरिहार्य होते.

भारताइतका बहुभाषिक देश जगात क्वचितच असेल! त्यामुळे इथे स्वातंत्र्याची चाहूल लागल्यावर, भाषिक आधारावर विविध राज्यांची निर्मिती होणे हे स्वाभाविक होते. तसे प्रयत्न 1947 च्या पूर्वीपासून देशभर सुरू झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासातले 1946 साल हे महत्त्वाचे वर्ष आहे. त्या साली बेळगाव इथे भरलेल्या तिसाव्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र हा विषय प्रथम आला!

कांदबरीकार आणि पत्रकार ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसावे मराठी साहित्य संमेलन भरले होते. आचार्य अत्रे यांनी या साहित्य संमेलनात खुल्या अधिवेशनात संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने तजवीज करण्याबाबतचा प्रस्ताव 12 मे 1946 रोजी मांडला!

क्हाड, मराठवाडा आणि गोमंतक या तीन प्रदेशांत मिळून नव्वद लाख लोक मराठी बोलणारे आहेत, या मुद्याकडे माडखोलकरांनी श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी हे तिन्ही मराठी बहुभाषिक प्रदेश व अन्य तसे विभाग यांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी, सर्व पक्षांच्या – जातींच्या आणि धर्मांच्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरणाचा प्रयत्न केला पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात यावी व महाराष्ट्र स्थापनेची चळवळ सुरू करावी अशा आशयाचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला. अत्रे म्हणाले, ”संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न हा मराठी भाषिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. केवळ ह्या एका मुद्यासाठी हे साहित्य संमेलन भरले होते असे नमूद झाले तरी महाराष्ट्राच्या इतिहासात हे संमेलन अमर होईल यात शंका नाही.”

आचार्य अत्रे यांनी वर्तवलेले भविष्य कालांतराने खरे ठरले. संयुक्त महाराष्ट्राचा विचार मात्र 1946 सालाच्या पूर्वीपासून रुजू पाहत होता.

लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी जाहीर केली. भारतातल्या विविध प्रदेशांत दुही माजवण्याच्या व ‘डिव्हाइड अँण्ड रुल’ या इंग्रज राजनीतीतील, तो महत्त्वाचा टप्पा होता. बंगाली भाषिकांनी केलेल्या आंदोलनानंतर, ती फाळणी 1911 साली रद्द करण्यात आली. जर ब्रिटिशांचा तो डाव यशस्वी झाला असता तर तो प्रयोग भारतात अन्यत्र राबवला गेला असता. त्यामुळे बंगाली भाषिकांचे आंदोलन हा भारतातल्या अन्य भाषिकांसाठी आदर्श धडा ठरला. आपण सगळे एकभाषिक एकत्र आलो तर केवढी मोठी ताकद निर्माण होऊ शकते याची जाणीव अन्य भाषिकांना होऊ लागली व एकच भाषा बोलणा-यांच्या एकत्रीकरणाचे विचार तत्कालीन विचारवंत व समाजधुरीण ह्यांच्या मनात रुजले.

बंगाली भाषिकांच्या आंदोलनाबद्दल लिहिताना ‘भाषा व राष्ट्रीयत्व’ या लेखात न.चिं.केळकर म्हणतात, ”मराठी भाषा बोलणा-यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी.”

अर्थातच मराठी भाषिकांच्या मनात असे विचार आले तरी फाळणीचा उद्देश मराठी भाषिकांच्या मनात नसल्याचेही तात्यासाहेब केळकरांनी त्याच लेखात नमूद केले आहे.

साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे महाराष्ट्रातले मोठे व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांनी
मांडलेला विचार मराठी भाषिक उचलून धरणार हे उघड होते. विदर्भातले ज्येष्ठ नेते बापुजी अणे यांनी अमरावती इथे ‘मराठा’ या विषयावर बोलताना, न.चिं.केळकर यांच्या आधी, 1906 साली असेच विचार मांडलेले आढळतात. अणे म्हणाले, ”महाराष्ट्र हे एक राष्ट्र आहे आणि भारताच्या संस्कृतीत काही विशिष्ट त-हेचा भाग महाराष्ट्रीयांनी पार पाडावा असा ईश्वरी संकेत आहे. महाराष्ट्र हा पंचधा विभक्त झाला आहे. तो पुन्हा एक झाला पाहिजे. मी महाराष्ट्रीय आहे हा विचार आणि भावना प्रत्येकाच्या अंत:करणात उद्भुत झाली पाहिजे. ह्या विचारांत प्रांतिकत्व नसून राष्ट्रीयत्व आहे.”

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अचंबित करणारे जे प्रकार दिसून येतात त्यात बापुजी अणे यांचे भाष्य मुद्दाम नमूद करावे लागेल.

गंमतीदार विसंगती अशी, की 1906 साली हे विधान करणारे व ‘नाग विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादणारे बापुजी अणे, पुढे संयुक्त महाराष्ट्राचे कट्टर विरोधक आणि स्वतंत्र नागविदर्भाच्या सवत्यासुभ्याचे प्रणेते झाले!

About Post Author