महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

0
47

महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे ; तसा तो शतकाच्या मध्यंतरानंतर एकत्र आलेल्या मराठी भाषकांच्या सांस्कृतिक उन्नयनाचा विचार करणार्‍या संस्था, शासन व लोक यांच्या परिशीलनासाठीही जरूरीचा आहे. सांस्कृतिक एकात्मतेचा विचार मनीमानसी मुरल्याशिवाय एकत्र काम करण्याची ऊर्मी जागी होत नाही. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांचा प्रथमच एकत्र एका राज्यात समावेश झाला. त्यांच्या प्रगतीचा विविध मार्गांनी विचार करत असताना मनोमिलनाचा तपशील लक्षात घेतला पाहिजे. सांस्कृतिक एकात्मतेच्या जागरासाठी ते जरुरीचे आहे.

१.

संपूर्ण महाराष्ट्राला डोळ्यांपुढे एकत्र ठेवून केलेल्या प्रयत्‍नांत रमेश अंधारे संपादित ‘मुद्रा महाराष्ट्राची’ हा प्रकल्प लक्षणीय आहे. अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित, ‘ग्रंथाली’ वितरीत साडेपाचशे पृष्ठांचा हा दस्तावेज महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. पंजाबराव देशमुख यांनी एकोणऐंशी वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा संस्थेच्या रूपाने महावृक्ष झाला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅ़ड. अरूण शेळके ‘अमृतमंथना’त म्हणतात, “पंजाबराव म्हणजे आमच्या शिवकुलाचे कुलपुरूष आणि कुलस्वामी. बहुजन समाजाच्या शिक्षकांनी ज्ञानसंपादन तर करावेच, पण ते समाजाच्या अखेरच्या व वंचित स्तरापर्यंत पोचवावे ही त्यांची सांस्कृतिक तळमळ होती. मंद होऊन विझत चाललेल्या आमच्या सांस्कृतिक प्रेरणा या ग्रंथाने प्रदीप्त व्हाव्यात यासाठी आमच्या प्रेरणांचे शक्तिस्थळ असणार्‍या भाऊसाहेबांच्या चरणसाक्षीने हा ग्रंथ जनताजनार्दनाला अर्पण करत आहोत.”

पंजाबराव देशमुख यांचे भारतीय स्तरावरील कार्य अद्वितीय आहे. त्यांनी भारतातील पहिल्या कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून तर जागतिक कृषी मेळाव्यापर्यंत घेतलेली गरुडझेप भारताच्या प्रगत कृषिजीवनाची साक्ष आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून तर त्यांनी भारतातील लोकविद्यापीठ उभे केले. अरुण शेळके यांनी व्यक्त केलेल्या भावना त्या कृतीशी सुसंवादी आहेत.

‘मुद्रा महाराष्ट्राची’ एकूण सहा भागांत आहे. साहित्य आणि संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञान, राजकीय आणि सामाजिक, शिक्षण आणि विज्ञान, कृषी आणि शिक्षण आणि डॉ. पंजाबराव देशमुखः जीवन व कार्य या सहा विभागांतून चाळीस लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. महाराष्ट्रातील प्रातिनिधिक अभ्यासक, संशोधक आणि विचारवंत यांची मादियाळी या निमित्ताने जमली आहे. जुने-नवे, प्राध्यापक-पत्रकार आणि न्यायमूर्ती-प्रशासक यामुळे एकत्र आले आहेत. चळवळीत सक्रिय असलेले आणि चळवळीसाठी वैचारिक भूमिका सिद्ध करणारे यात एकत्र दिसतात. विचारभिन्नता बाळगणारे लेखक एकत्र आणण्यात संपादकाचे कौशल्य आहे. महाराष्ट्रविषयक गेल्या शंभर वर्षात प्रकाशित ऐंशीवर ग्रंथांची यादी परिशिष्टात देऊन संपादकाने त्याचे मोल निश्चितच वेगळ्या उंचीवर नेले आहे.

संपादक, प्राचार्य रमेश अंधारे यांनी प्रवर्तन-प्रस्तावनेत लेखकांच्या विचारांचा समर्थ परामर्श घेतला आहे. ते म्हणतात, की “ ‘मुद्रा महाराष्ट्राची’ हा ग्रंथ आधुनिक महाराष्ट्राचा जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या कालपटावर मुखर होणारा चेहरा दाखवणारा आहे. वर्तमान राजकीय प्रश्न माध्यमांमुळे आपल्याला महत्त्वाचे वाटत असले, तरी शिक्षण, शेती, विज्ञान-तंत्रज्ञान, धर्म आणि साहित्य या सर्व अंगांनी जीवनाची समग्रता आकार घेते आणि त्यातूनच आपला जीवनाविषयीचा दृष्टिकोन संपृक्त होत जातो. आपली संस्कृती व साहित्य समृद्ध होत आहे. संस्कृतीच्या या सर्व जीवनांगांचे सूत्र या ग्रंथातल्या लेखांमधून गुंफण्याचा प्रयत्‍न केला आहे” संपादकाचा व्यापक, व्यवहार्य पण तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. महाराष्ट्रासमोर वैचारिक मंथनासाठी ग्रंथराज सादर झाल्याचे ‘मुद्रा महाराष्ट्राची’ यातून जाणवते.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेने हा ग्रंथराज सिद्ध करावा याला महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला पूर्व विदर्भातील नेत्यांपेक्षा पश्चिम विदर्भातील नेते अधिक अनुकूल होते. पु.का. देशमुख, डॉ.पंजाबराव देशमुख, बॅरिस्टर रामराव देशमुख व गोपाळराव खेडकर यांचे या संदर्भातील योगदान स्पष्ट आहे. स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी घेऊन कार्यरत काँग्रेसमधील तत्कालिन नेत्यांनी काँग्रेसश्रेष्ठींची मर्जी एकीकडे सांभाळली तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या एकीकृत स्थापनेला हातभार लावला.

२.

‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा लालजी पेंडसेलिखित ग्रंथ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रत्येक पान, इतिहासाची साक्ष देऊन आपल्यापुढे मोकळे करतो. डाव्या चळवळीत मुरलेले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घोळलेले लालजी घटनांचा तपशील देऊ लागले, की अनेक घटनांतील सत्यदर्शनाची दारे सताड मोकळी होतात. या, १९६५ साली प्रकाशित ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रा. एन. डी. पाटील यांच्या प्रस्तावनेने सार्थ झाली आहे. महाराष्ट्र राज्य संयुक्त होऊन भारताच्या नकाशावर साकार झाले, त्याचे श्रेय विरोधी पक्षांनी एकजुटीने दिलेला निडर व घणाघाती लढा याला असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील व तत्कालिन भारतातीलही संभ्रमित काँग्रेस त्यांच्या लेखनात आपल्याला दिसते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील बिनीचे नेते भाषावार राज्यरचना आणि महाराष्ट्राची स्थापना याबद्दल कमालीचे पूर्वग्रह बाळगून होते हे लालजींनी दाखवून दिले.

महाराष्ट्राचे पुराणपुरुष दत्तो वामन पोतदार यांचा ग्रंथाला लाभलेला पुरस्कार लक्षात घेतला पाहिजे. वर्तमानाचे साक्षेपी चिकित्सक डॉ. य.दि.फडके यांचा आचार्य -पीएच.डी.- पदवीचा प्रबंध याच विषयावर आहे. त्यांनी आठ खंडांत लिहिलेला ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ हा समकालीन राजकीय व सामाजिक जीवनाचे तरल व संशोधनमूल्य असलेला ग्रंथसमूह आहे. ‘महाराष्ट्राचे महामंथन’च्या आरंभी, महानुभाव ग्रंथातील महाराष्ट्राची परिसीमा व चळवळीतील हुतात्म्यांची यादी दिली आहे. ग्रंथाच्या वेष्टनावर हुतात्मा स्मारकाचे प्रेरक चित्र आहे. जवाहरलाल नेहरू यांची १९२८ व १९३१ सालची भाषावार राज्यरचनेसंबंधीची ग्रथित भूमिका व भारतरत्न महर्षी कर्वे यांची अखेरची इच्छा नमूद करण्यात औचित्य साधले आहे. ग्रंथाचे स्वरूप तीन भागांत आहेः १. प्रारंभिक,२. प्रचार व जनजागृती, आणि ३. लढापर्व.

एकात्म घटक राज्यांच्या कल्पनेचा उदय व विकास हा सुमारे तीस पृष्ठांचा मजकूर ब्रिटिश भारतातील हळुहळू विकसित प्रांतरचना आणि विकसित राज्यांची पार्श्वभूमी स्पष्ट करणारा आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चे व निदर्शने, मैदानी सभा, विधिमंडळातील व संसदेतील ठराव यांतून मुखरित लढा अतिशय तपशिलाने यामध्ये आला आहे. सभा-संमेलनांच्या रणांगणावरील ओजस्वी वाग्युद्धाबरोबर विधिमंडळ व संसद यांतील वादविवादाचे स्वरूप आणि त्यातील भिन्न राजकीय पक्षांची भूमिका व नेत्यांची कधी सौम्य, कधी निर्णायक तर कधी सतत बदललेली मते व पवित्रे लक्षात येतात, राजकीय पक्ष आणि मूर्धन्य नेत्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने उपलब्ध जिवंत साधने लोकशाहीतील अभ्यासकांना व विचारवंतांना वेळोवेळी सावध करणारी आहेत. पक्षोपपक्षांतील नेत्यांचे डावपेच, एकमेकांवर कुरघोडी करण्याची नेत्यांची हातघाई आणि पक्षीय अभिनिवेश यांचे साधार पण मनोज्ञ दर्शन घडते. सर्वत्र श्रेयासाठी सुरू असलेला आटापिटा दिसतो. श्रेयातील आटा म्हणजे कणिक कुणाची, पिटाई झाली कुणाची, पाणी कुणाचे, कणिक कुणाची तिंबली गेली याचा विस्तृत पट या ग्रंथात आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यांतील नेत्यांचे डावपेच व लढाऊ बाणा यांतून प्रादेशिक नेतृत्वाच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन उपलब्ध होते. संघर्षातील ठशांची मोजदाद करणारा महत्त्वाचा ग्रंथ म्हणून लोकवाङ्‌मय गृहाने दिलेली ही देणगी आहे. विजय मोहिते यांनी काढलेली नेत्यांची चित्रे चाहत्यांनी संग्रही ठेवावी एवढी अप्रतिम उतरली आहेत. स्वातंत्र्योत्तर दोन दशकांतील वृत्तपत्रांच्या धोरणाचे विश्वसनीय साधन म्हणूनही या ग्रंथाचा विचार केला पाहिजे.

३.

‘संयुक्त महाराष्ट्राचे महामंथन’ हा ग्रंथ जालना येथील अभ्यासक प्रा. भगवान काळे यांनी संपादित केला आहे. हा ग्रंथ म्हणजे, महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर लढ्यात सहभागी, लढ्याचे चिकित्सक अभ्यासक, महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास घेत प्राप्त उद्दिष्टांचा कठोर परामर्श घेणारे लेखक, पत्रकार, नेते व विचारवंत यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन व संपादन आहे. मराठवाड्यातील जालना येथील अभ्यासकाने केलेले हे अभिनंदनीय काम आहे. ग्रंथप्रकाशनासाठी प्राप्त मदतीचा उल्लेख करून भगवान काळे यांनी नामावली दिली आहे. मौलिक ऐतिहासिक संदर्भ म्हणून साधन उपलब्ध करून घेताना संपादकांना करावी लागलेली आर्थिक जुळवाजुळव सामाजिक कृपणतेची साक्ष असल्यामुळे विषण्ण करणारी आहे, तशी भगवान काळे यांच्या प्रामाणिक प्रयत्‍नांची ग्वाही देणारी आहे. यांतील लेख अभ्यासपूर्ण असून महाराष्ट्र समजून घेण्याच्या दृष्टीने उपयोगी आहेत.

यातील सारेच लेख वाचनीय आहेत. भिन्न नियतकालिकांत प्रकाशित लेख एकाच आशयाचा राग आळवणारे नाहीत. ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने, हा प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचा लेख… भाषावार प्रांतरचनेच्या संकल्पनेचा सकारात्मक आढावा यात असून कुरुंदकरांची मांडणी विश्लेषक आहे. भारताबाहेर असलेल्या देशांची उदाहरणे देत असताना, त्यांनी हैदराबाद संस्थानाचे उदाहरणही दिले आहे. संघराज्य आणि लोकशाही बळकट करण्यासाठी तत्त्वनिष्ठ वागणूक व मागासलेल्यांना अग्रहक्क देणारी आर्थिक न्यायाची कल्पना स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. ‘महानुभाव साहित्यातील महाराष्ट्र’ असा वेगळा लेख त्या विषयाचे अधिकारी अभ्यासक प्रा. रमेश आवलगावकर यांचा आहे. ‘महाराष्ट्राचे प्राचीन कलावैभव’ हा प्रभाकर देव यांचा व ‘महाराष्ट्राची कुळकथा’ हा अरुणचंद्र पाठक यांचा, हे संशोधमूल्य असलेले लेख आहेत. यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, जयंतराव टिळक व नानासाहेब गोरे यांचे लेख संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा मागोवा घेणारे आहेत. भा.ल.भोळे यांचा भाषावार प्रांतरचनेची फलश्रुती आणि मधुकर भावे यांचा ‘महाराष्ट्र होता कुठे आणि चालला कुठे?’ हे लेख संयुक्त महाराष्ट्राच्या घटितानंतरच्या वस्तुस्थितीची मीमांसा करणारे असल्यामुळे अंतर्मुख करणारे असे आहेत.

४.

प्रसिद्ध संशोधक व इतिहासपंडित सेतुमाधवराव पगडी यांचे सप्तखंडात्मक समग्र वाङ्‌मय नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यामुळे नऊ हजारावर मराठी-इंग्रजी पृष्ठांचा मजकूर अभ्यासकांना एकत्र उपलब्ध झाला आहे. हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेने हा प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केला. इंग्रजी, उर्दू, फारसी, मराठी, हिंदी आदी भाषा अवगत असलेले महापंडित पगडी यांचे लेखनरूप एकत्रित सादर करून, हैदराबादने आपले ऋणानुंबध कायम ठेवून महाराष्ट्राचे ऋण फेडले. पुणे येथील गो.बं.देगलूरकर, राजा दीक्षित, मुंबईचे अ.स.दळवी, सोलापूरचे प्रा. निशिकांत ठकार आणि हैदराबाद येथील उषा जोशी यांनी खंड संपादित केले आहेत. प्रा. द.पं.जोशी यांचे यासाठी अभिनंदन!

५.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात काही नियतकालिकांनी दर्जेदार अंक प्रकाशित केले आहेत. त्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘लोकराज्य’चा एप्रिल-मे २०१० चा अंक एकशेचौदा पृष्ठांचा काढला आहे. त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावर प्रकाश टाकणारे लेख आहेत. त्यानंतर पन्नास वर्षांतील शिक्षण, आरोग्य, रंगभूमी, चित्रपट, उद्योग, सहकार चळवळ, विज्ञानसंशोधन, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पंचायत राज्यव्यवस्था, आर्थिक प्रगती, पर्यटन, क्रीडा, साहित्य, वंचितांचे कल्याण व महिला सक्षमीकरण यासंबंधी जाणत्या अभ्यासकांनी लिहीले आहे. शासनाच्या अधिकृत मासिकातून ते प्रकाशित झाल्यामुळे महत्त्वाचे विद्यमान संदर्भसाधन उपलब्ध झाले आहे. ‘लोकराज्य’ केवळ वाचनीय नव्हे तर संग्राह्य असते.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी पर्वावर महाराष्ट्राच्या स्थितिगतीचा आलेख पुरेशा स्वरूपात अभिव्यक्त न झाल्याची टिका वृत्तपत्रांत आली असून ती अनाठायी आहे. विनोद राव, य.ह.पिटके, दा.रा. सामंत, ईश्वरराज माथूर यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी संयुक्त महाराष्ट्राच्या आरंभीच्या काळात तत्कालिन प्रसिद्धी संचालनालयास लाभले. अलिकडे लाभलेले अधिकारी त्या परंपरेत तसूभरही कमी नाहीत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय स्थापनेनंतर ग्रंथप्रकाशनाचे दायित्व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्यसाहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याकडे गेले आहे.

६.

पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शताब्दीनिमित्त ‘नवभारत’ मासिकाचा जुलैचा अंक प्रकाशित झाला आहे. त्याचेही स्वागत केले पाहिजे. मे-जूनचा सुवर्ण महाराष्ट्र विशेषांक हाही सरस प्रयत्न आहे. मुळात, प्रकाशित लेख राजहंस प्रकाशनाकडून उपलब्ध झाल्याचे संपादकीय निवेदन आहे. यांतील विषय नेमके व लेखक व्यासंगी आहेत. राजहंस प्रकाशनाने ‘नवभारत’ची झोळी भरून दिली. राजहंस प्रकाशनासारख्या मातब्बर व चौफेर दृष्टी असलेल्या प्रकाशनाने ग्रंथ प्रकाशनातून माघार घेतली काय? ते हा ग्रंथ करणार नाहीत का? साधनसामग्रीसंपन्न ‘राजहंस’ने हा प्रकल्प पुन्हा हाती घेऊन तडीस नेला पाहिजे. अशोक चौसाळकर, किशोर महाबळ, मेधा दुभाषी, सुधीर मोघे, विश्वास सहस्रबुद्धे, सुधीर नांदगावकर व करुणा गोखले हे सारे लेखक समर्थ आहेत. प्रकाशनाने व्यापक भूमिका घेऊन प्रा. गं.बा. सरदार संपादित ‘महाराष्ट्र जीवन: परंपरा, प्रगती आणि समस्या’ अशा द्विखंडात्मक ग्रंथाच्या धर्तीवर नवा ग्रंथ सिद्ध केला पाहिजे. त्यांच्या क्षमतेसाठी हे आव्हान नाही.

७.

पुणे येथील ‘साधना’ साप्ताहिकाने त्रेसष्टावा वर्धापन दिन विशेषांक १५ ऑगस्ट रोजी ‘विदर्भाला सुखी करा!’ असा काढला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन, १ मे १९६० रोजी केलेल्या पंतप्रधान पं. नेहरू यांच्या भाषणाची पार्श्वभूमी घेऊन कैफियत, कैवार व कोंडी अशा तीन भागांत हा अंक सिद्ध केला गेला आहे. त्याचे वर्णन संतुलित पण विचारप्रवर्तक प्रयत्न असेच करावे लागेल. वेगळी पार्श्वभूमी घेऊन मुंबई व मराठवाडा यांवर असेच अंक काढता येतील.

८.

महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सव सिंहावलोकन परिषदेचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्रातील व्यापक जनाधाराला विश्वासात घेत हा प्रयत्न सुरू आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली यांनी हा पुढाकार घेतला आहे. प्रा. डॉ. पी.बी. पाटील यांनी त्याचे आयोजन केले आहे. पहिली परिषद नाशिकला मार्चमध्ये, दुसरी सांगलीस जूनमध्ये, तिसरी औरंगाबाद येथे व चौथी धुळे जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झाली. परिषदेत सहभागी नेते तपस्वी असून त्यांचा हेतू महाराष्ट्राची एकात्मता दृढ करणारा आहे. अमरावती येथे अमरावती विभागाची तर चंद्रपूरला नागपूर विभागाची परिषद होईल. आयोजनाची मांडणी व स्वरूप नेमके आहे. अमरावती परिषद औचित्यपूर्ण आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस अमरावतीचा पाठिंबा मोठा असल्याची नोंद आहे. नागपूर विभागाची परिषद चंद्रपूरला घेण्यामुळे हा प्रयत्‍न अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्याबहुल क्षेत्रात येत असून ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे तिचे आमंत्रक आहेत. परिषदेच्या कामकाजाचे निव्व्ळ अहवाल असू नयेत तर निरपेक्ष निष्कर्ष व निःपक्ष मतप्रदर्शन यांचे लेणे लेवून मसुदा तयार होईल याची काळजी घेतली जाईल याची खात्री आहे.

– मदन धनकर
9881303414

Last Updated On – 1 May 2016

About Post Author

Previous articleअमराठी भारताचा वेध घेऊया
Next articleसुवर्णमहोत्सव संपला!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.