महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने…

1
40
_MaharashatraDinachya_Nimittane_3.jpg

मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंनी बनवलेल्या तळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकावर घासून आणि बांबूतली हवा बाहेर पडून त्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनीदेखील हा स्वरबद्ध असावा ही त्यांची सौंदर्यसंवेदनाशीलता. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूतला हा एक.

एकीकडे मी बोलणे ऐकत होतो खरा. पण माझे डोळे जपानी संस्कृतीच्या एका वेगळ्या तेजस्वी पैलूवरून हालत नव्हते. सफाईचे काम करणाऱ्या एका मध्यमवयीन स्त्रीवर ते  खिळले होते. पॉलिशलेल्या बांबूवर जमलेला प्रत्येक धुळीचा कण ती हातातल्या सफाईवस्त्राने पुसत होती. मग जरा दूर जाऊन बदलत्या प्रकाशकोनात दुसरा एकादा कण दिसतो का ते बघत होती. दिसल्यास तो टिपत होती. एकाद्या धनुर्धारीच्या चेहऱ्यावर लक्ष्यवेध करण्यापूर्वी जी एकाग्रता दिसते तशीच एकाग्रता तिच्या चेहऱ्यावर होती.

ती प्रौढा काम बरोबर करते की नाही हे पहाणारा ‘मुकादम’ नव्हता. जपानी संस्कृतीत मुकादमाची आवश्यकता नाही. प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी हाच प्रत्येकाचा मुकादम. बाहेरून होणाऱ्या टीकेपेक्षा आत्मपरीक्षणातून येणारी टीका ही अधिक तीक्ष्ण असते. इतकी की आत्ममूल्य गमावलेली व्यक्ती अगदी विसाव्या शतकातही आपल्या हाताने आपले पोट चिरून आत्महत्या करीत असे.

महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन आली. स्वाभिमानाची आली. पण त्याबरोबर आत्मपरीक्षणाचे कठोर व्रत आले नाही. मराठी भाषेच्या ‘अभिमाना’च्या छद्मरोमांचकारी ऐतिहासिक-नाटकछाप-वक्तव्यांवर कोट्यावधी रूपये कमावल्यावर आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठवताना अस्मिता आड आली नाही.

आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही. कारण ‘तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हा लाडका खेळ रोजरोज खेळत तळ्यामळ्यात करता आले नसते. प्रथम दोषारोपाचे बोट स्वत:कडे रोखावे लागले असते.

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करताना “बाबांनो, आपल्या फलकांवर लिहीलेल्या भाषेतून मराठीच्या अंगावरची फाटकी साडी फेडू नका. निदान लाज झाकण्यापुरती चिंधी तरी राहू द्या.” असे सांगायची गरज वाटली नाही. कोटी कोटी मुजऱ्यांखाली सारे झाकले जाते. ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ सूक्ष्मदर्शकाखाली मोठे करताना स्वत:च्या अनुयायांच्या आंधळ्या डोळ्यातली मुसळे अदृश्य करण्याची जादू हे आमचे अस्सल मराठी मातीतले मायाजाल.

आमच्या संस्कृतीची आणि इतिहासाची तीच दशा. या महाराष्ट्रात विवेकसिंधुकार मुकुंदराजापासून, अखिल भारतीय प्राकृतातले पहिले वास्तववादी गद्य लिहीणाऱ्या महानुभावांपासून व रसाळ काव्य लिहीणाऱ्या संतांपासून आजचे भाऊ पाध्ये, अरूण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांच्यासारखे किती महान साहित्यिक झालेत. त्यांची नांवेसुद्धा आज किती जणांना माहीत आहेत. हरी नारायण आपट्यांच्या कादंबऱ्यांचा संच बाजारात मिळू शकत नाही कारण तो अस्तित्वातच नाही. शांता गोखल्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या ग्रंथाच्या उत्तम इंग्रजी भाषांतरानंतर परदेशवासी ‘मराठमोळ्यां’ना निदान ते वाचता येण्याची सोय झाली.

पश्चिम बंगाल सरकारने प्रकाशित केलेला बंकिमबाबूंच्या समग्र वाङ्मयाचा उत्तम कागदावर छापलेला शिवलेल्या बांधणीचा ग्रंथ शंभर रूपयात मिळतो. नामदेवाचे अभंग वाचण्याकरता शेवटी शिखांचा आदिग्रंथच वाचावा लागेल अशी आमची परिस्थिती. आमच्या महान साहित्यिकांचे कार्यमूल्यमापन करणारे ग्रंथ जाऊ द्या पण जंत्री करणारे कोशही आम्ही निर्माण केले नाहीत.

आमच्या छंदांची, वृत्तांची आणि भाषेच्या नादमाधुर्याचा खजिना ठरेल अशा नमुन्यांची शेवटशेवटची पुस्तके माधवराव पटवर्धनांची आणि ना. ग. जोशींची. विश्वविद्यालयात गुरूदेवांच्या खुर्च्यांवर बसणाऱ्या लघुदेवांना आणि नर्मदेतल्या शाळिग्रामांना त्यांची नांवे जरी सांगता आली तरी तोंडात बोट घालायची वेळ आली आहे.

मुंबई शहरात प्रत्येक वास्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हा एका मोठ्या बहारदार टिंगलीचा विषय झाला आहे. परवापरवाच एका प्रसिद्ध लेखकाने आपल्या मुंबई प्रवासाचे ‘‘मी छ. शि. म. टर्मिनलवर उतरलो. तेथून थेट छ. शि. म. वस्तुसंग्रहालयात गेलो. वाटेत मला छ. शि. म. टर्मिनल हे रेल्वे स्टेशन लागले’’ असे वर्णन केल्यावर पोरापासून थोरापर्यंत सर्वजण पोट धरधरून हंसले. ते महाराजांना नव्हेत तर ज्यांना एका नावापलिकडे महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही किंवा तो माहीत करून घेणे किफायतशीर ठरणार नाही अशी भावना असलेल्या राज्यकर्त्या सोंगांना हंसले. कापडी किल्ल्यांचा सुकाळ आहे; मग नावांचा दुष्काळ का?

आम्ही आमच्या साहित्याचे ते न वाचता किती गुण गातो! आमचे शासन तर साहित्यसंमेलनाला किती लाखांची कोटींची मदत करते! काय त्या मेजवान्या! ग्रांथिक साहित्याचे कार्यक्रम गुप्त ठेवून पाघळणारा मुखरस आवरत आवरत पाकसाहित्यावर अग्रलेख लिहीतात आमचे पत्रकार. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घामाच्या मोहरा उधळणारे काय ते समारंभ, काय ते समृद्धीमहामार्ग, काय त्या लावण्या, काय त्या अप्सरा, काय ते विश्वामित्र, काय ते हत्ती, काय ते घोडे आणि काय ती गाढवे. शापित गंधर्वांच्या भाषणांचे काय वर्णन करू! अहो जणू काही दुसऱ्या बाजींचा सुखचैनीचा काळ परत आला की हो!  पेशवाई बरे का, शुद्ध पेशवाई! वा, वा, वा बावन्न खणी, अहो बावन्न खणी.

महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा सर्वोत्कृष्ट इतिहास म्हणजे वि. ल. भावे लिखित ‘महाराष्ट्र सारस्वत’. आमच्या अस्मितावाल्या, स्वाभिमानवाल्या त्याची आज उत्तम स्थितीतली एक प्रत जो विकत मिळवील त्याला राज्यसरकार भालाशेलापागोटेही बहाल करू शकेल. कारण हे बक्षीस घेण्याकरता कोणी माईचा लाल येणारच नाही.

खरे भाषाप्रेम पहायचे असेल तर जरा शेजारी एका मुस्लिम देशात डोकवा. बंगाली भाषेसाठी युद्ध करणाऱ्या आणि लाखो प्राण गमावलेल्या दरिद्री बांगला देशातला विवर्तनमूलक (etymological) शब्दकोश पहा. तो उत्तम कागदावर छापला आहे. बांधणी शिलाईची आणि पक्की. त्याच्या रंगातूनच शोनार बांगला जाणवतो. पहिल्या भागाच्या मुखपृष्ठात शामला मातीचा रंग सामावलेला आहे, दुसऱ्यात नद्यांच्या पाण्याचा आणि निरभ्र आकाशाचा निळासांवळा आणि तिसऱ्या मुखपृष्ठात तरूलतातृणपल्लवांच्या अंगकांतीचा हिरवा रंग आहे. प्रत्येक खंडावर सोनेरी कमानीत एक लहानसे सूर्यफूल. भाषेवरचे प्रेम नि:शब्द रंगातही तरंगते आहे.

इंग्रजी माध्यमातल्या वाघांच्या नातवंडांना ‘मी वाघीणीचे दुध प्यालो’ असे आपल्या इंग्रजीबद्दल म्हणता येईल का? नाही हो, ते तर ग्लॅक्सोचे दुध पितात. धड मराठी धड इंग्रजी न बोलता न येणाऱ्या खेचरभाषिकांच्या वाणीतून उर्दुसारखी संपन्न मिश्रभाषा होऊ शकेल हेही शक्य वाटत नाही. मग त्यांना इंग्रजी तरी येते का? तर त्यात रूश्दी, अमिताव घोष, अरूंधती रॉय, अमर्त्य सेन यांच्या तोडीचे वाङ्मयीन किंवा वैचारिक इंग्रजी लिहीणारा एक तरी मराठी महाभाग उपजला आहे का?

अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या डरकाळ्या फोडून छप्पन्न इंची पुठ्ठ्याची पोकळ छाती ठोकता येते. पण तिच्यातून ‘बकुलफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’सारखे शब्द निघणार नाहीत. त्या पिंजऱ्यातल्या करूणाविरहित दगडी हृदयाचे भावदारिद्र्य हीच आमची स्वाभिमानसंपत्ती. अशा दगडी हृदयांवरचे राज्य हेच आमचे हृदयसाम्राज्य.

गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला ज्या शब्दमाळा वाहिल्या आहेत त्यात त्याला ‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा’ म्हटलेच आहे. पण त्यांच्या मृत्युनंतर महाराष्ट्रात काही नवीन गुण निर्माण झाले आहेत. स्वभाषेचे आणि आपल्या भावेतिहासाविषयीचे अज्ञान आणि त्याची न वाटणारी लाज हे ते नवे कोरेकरकरीत गुण.

‘अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या निलाजऱ्या दगडांच्या देशा’

– अरुण खोपकर

arunkhopkar@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. विचारसरणीमुक्त विचार.
    विचारसरणीमुक्त विचार.

Comments are closed.