मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था

1
44
chaturvarnya_hp

(नांदेडचे राजेश मुखेडकर हे तरुण शिकले एम.ए.पर्यंत, मराठी घेऊन; पण व्यवसाय करतात बांधकाम उद्योगात. त्यांना मराठी भाषा व संस्कृती याबद्दल आस्था आहे. तसेच या संदर्भात ग्रामीण भागात काय गोची होते याची जाणीव आहे. त्याच भावनेने त्यांनी ‘मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था’ हा त्यांचा लेख इंटरनेट माध्यमातून प्रसृत केला. तो ‘थिंक महाराष्ट्र’च्या पाहण्यात आला. तोच आपल्या वेबपोर्टलच्या माध्यमातून मराठी भाषा विभागात प्रसृत करत आहोत. येथे त्यांच्या मूळ लेखातील दोन-तीन परिच्छेद उदधृत केले आहेत. मूळ लेख पीडीएफ स्वरूपात अपलोड केला आहे. त्यासोबत साहित्य महामंडळाचे नियमदेखील आहेत. जिज्ञासूंना मूळ लेख वाचून त्यावर टिकाटिप्पणी करता येईल. ‘थिंक महाराष्ट्र’चे व्यासपीठ त्यासाठी खुले आहे. राजेशची मुख्य तक्रार अशी आहे, की शुद्धलेखनाच्या जाचक व विसंगत नियमांमुळे ग्रामीण भागातील नवशिक्षित तरुण मराठीत लिहिण्यापासून बुजतात; एवढेच नव्हे तर त्यांच्यामध्ये न्युनगंड तयार होतो. येथे उदधृत केले आहेत ते राजेशच्या मूळ लेखातील चार उतारे. – संपादक)

……..तत्सम, तदभव, देशी, परभाषी हे मराठी भाषेतील चार प्रकार नव्हे तर चार वर्ण आहेत. कारण त्यांतील तत्सम वगळता अन्य शब्दांना जे नियम लागू होतात त्यांतील बहुसंख्य तत्सम म्हणजे संस्कृतमधून आलेल्या शब्दांना लागू होत नाहीत. एक प्रकारे मराठी भाषेतील ही चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. जे नियम तदभव, देशी व परभाषी शब्दांना लागू होतात ते तत्सम शब्दांना का लागू होत नाहीत किंवा लागू केले गेले नाहीत, हे अनाकलनीय आहे. अन्य तीन वर्णांना लागू होणारे शुद्धलेखनाचे नियम तत्सम शब्दांनाही लागू केले तर मराठी भाषेतील क्लिष्टता दूर होऊ शकते.

………‘संगीत’ व ‘जमीन’ या दोन शब्दांची सामान्यरूपे अनुक्रमे ‘संगीतात, संगीताचे, संगीताला’ व ‘जमिनीत, जमिनीचे, जमिनीला’ अशी होतात. ‘संगीत’ हा तत्सम शब्द असल्याने त्याची सामान्यरूपे होताना दीर्घोपान्त्य अक्षर दीर्घच राहते; परंतु ‘जमीन’ हा तत्समेतर शब्द असल्याने त्याची सामान्यरूपे होताना दीर्घोपान्त्य अक्षर र्‍हस्व होते.

आता, सर्वसामान्यांना तत्सम व तत्समेतर शब्द कळावेत कसे? म्हणजेच शुद्ध मराठी लिहिण्यासाठी आधी संस्कृत शिकणे गरजेचे आहे!

…….शुद्ध मराठी लिहिणे सोपे नाही, कारण, अनेक नियम संदिग्ध व अर्थ पुरेसा स्पष्ट न होणारे आहेत. एक नियम म्हणतो, की अकारान्त मराठी शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ ठेवावे. येथे मराठी म्हणजे तदभव, देशी व परभाषी हे तीन तत्समेतर वर्ण आहेत हे लक्षात घ्यावे. तर दुसरा नियम म्हणतो, की जोडाक्षरापूर्वीचे अक्षर र्‍हस्व लिहावे. आता नुकताच गाजलेला ‘विकिलिक्स’ हा परभाषी शब्द पाहू. अ-कारान्त असल्यामुळे तो ‘विकिलीक्स’ असा दीर्घोपान्त्य लिहावा, की ‘क्स’ हे जोडाक्षर असल्यामुळे र्‍हस्वोपान्त्य म्हणजे ‘विकिलिक्स’ असा लिहावा?

…….मराठी भाषेत आज अनेक लेखनदोष शिरले आहेत. चुकीचे शब्दप्रयोग, चुकीची वाक्यरचना, चुकीचे मुद्रण यांमुळे शुद्ध व नियमांना अनुसरून असलेले लेखन दृष्टीस पडणे दुर्मीळ झाले आहे. मराठी साहित्य महामंडळाचे नियम सदोष आहेत, त्यात संदिग्धता आहे, वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळा न्याय आहे व त्यामुळे लिहिणार्‍याच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे, ही बाब जरी खरी असली तरी त्यात दुरुस्ती होईपर्यंत ते काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

कायद्यातही अनेक त्रुटी आहेत, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे मोकाट फिरतात. बेफाम वाहन चालवून निरपराध नागरिकांचा जीव घेणारा तासा-दोन तासांत जामिनावर सुटतो; परंतु त्याला इलाज नाही. त्यासाठी कायदे कठोर करण्याची गरज आहे. तोपर्यंत पोलीस व न्यायालयेही काही करू शकणार नाहीत. पण याचा अर्थ सध्याच्या कायद्यांचे पालन करू नये असा होत नाही.

भाषेचेही तसेच आहे. सध्याचे नियम सदोष आहेत व त्यांत दुरुस्तीची गरज आहे. पण जोपर्यंत त्यांत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत तरी आहेत तेच नियम कसोशीने पाळण्याची गरज आहे.

राजेश मुखेडकर
9405933756, 09890153700,
debadwar.rajesh@gmail.com 

Last Updated On – 16th Nov 2016

About Post Author

1 COMMENT

  1. अभ्यास पुर्ण लेखन आणी आपले…
    अभ्यास पुर्ण लेखन आणी आपले धन्यवाद.

Comments are closed.