मराठी भाषा आणि तिचा भाषिक समाज

0
64
_MarathiBhasha_1.jpg

मराठी भाषेचे प्रमाणभाषा म्हणून जे रूप ओळखले जाते; ती मूळची पुणेरी बोली होय. ती बोली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व यांमुळे ‘प्रमाणभाषा’ या मान्यतेपर्यंत पोचली. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक दृष्टीने कोकण, मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे विभाग मानले जातात. मराठीचे ‘प्रमाण’ म्हणून मान्यता मिळालेले रूप व्यवहारात त्या सर्व विभागांमध्ये सर्वत्र वापरले जात नाही. ते व्यापक व्यवहारात म्हणजेच शासकीय आणि कार्यालयीन कामकाज, लेखन, प्रकाशन आणि इतर माध्यमांमध्ये वापरले जाते. दैनंदिन व्यवहारात अस्तित्व असते ते तिच्या बोलींचे. मराठीची बोलीरूपे अनेक अस्तित्वात आहेत. किंबहुना, बोलीची तीच गंमत आहे. एका प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलींमध्ये त्या प्रदेशातील सामाजिक-भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार भेद आढळतात. बोलीचा सूक्ष्म विचार केल्यास, बोलीरूप प्रत्येक व्यक्तिगणिकही भिन्न असल्याचे दिसून येते. प्रमाणभाषा ही कधीकाळी बोलीच असते. मराठी भाषेची ‘कोकणी’ ही बोली आज साहित्य अकादमीने स्वतंत्र भाषा म्हणून मान्य केली आहे. कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी यांसारख्या मराठीच्या प्रमुख बोलींच्या प्रत्येकीच्या उपबोली आहेत. बोली निर्माण होण्याची कारणे अनेक असतात. बोली प्रमाणभाषेला नवनव्या शब्दांचे भांडार पुरवत असतात. बोली ही प्रमाणभाषेपेक्षा अधिक परिवर्तनशील असते. ती समाजातील बदल नैसर्गिकपणे स्वीकारते.

मराठी भाषेची प्रमाणभाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपाची लिपी आणि सत्तर टक्के शब्द संस्कृत भाषेपासून उत्क्रांत झालेल्या भाषांच्या परंपरेतील आहेत. मराठी भाषेने इंग्रजीसारख्या परकीय भाषेसह कन्नड, तमीळ, तेलगू या द्रविडी, तर वेळोवेळी झालेल्या स्वाऱ्यांमुळे फार्सी, उर्दू व शेजारी राज्यांतील हिंदी, गुजराती या भाषांतून शब्दांच्या बाबतीत ऋण मुक्त हस्ते घेतलेले आहे. मराठीच्या बोली प्रांत, जाती, धर्म, व्यवसाय यांनुसार अनेक पाहण्यास मिळतात.

मराठीशिवाय अन्य भाषा बोलणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. अनेक परभाषिक समूह महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. उलट, मराठी व समाज बाहेरही गेले आहेत. गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू इत्यादी राज्यांमधून; त्याचबरोबर मॉरिशस, अमेरिका यांसारख्या विदेशांमध्ये स्थिरस्थावर असलेला मराठी समाजही मराठी भाषिकांची सांस्कृतिक केंद्रे आहेत. मराठी भाषा बोलणारे समूह मातृभाषा म्हणून मराठी भाषा व संस्कृती यांचे जतन वर्षानुवर्षें करत असतात.

मात्र अशा मराठी भाषिकांच्या सर्व समूहांना ‘मराठी भाषिक समाज’ म्हणणे अशक्य आहे. भाषिक समाजाची संकल्पना त्यापेक्षा व्यापक आहे. विशिष्ट भाषिक समाज ठरवणे हे समाजभाषाविज्ञानाचे उद्दिष्ट आहे. काही अभ्यासकांनी भाषिक समाजाची संकल्पना आणि उदाहरणे दिलेली आहेत. रमेश वरखेडे यांनी, “ज्या समाजात भाषिक प्रयोग आणि भाषा आकलन यात सुसंवादित्व व परस्परमेळ असतो, त्या समाजाला ‘भाषिक समाज’ (Speech Community) म्हणतात” असे म्हटले आहे; तर लीला गोविलकर यांनी त्या संकल्पनेपेक्षा थोडी विस्तारित संकल्पना सांगितली आहे. “मराठी समाज म्हणजे संज्ञापनासाठी मराठीचा उपयोग करणारा सर्व जातिजमातींचा समुदाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पसरलेला छोटामोठा, प्रादेशिक, व्यावसायिक समाजगट हा मराठी समाज म्हणून समजावा लागतो. त्याशिवाय मराठी मातृभाषा असणारा समाज, मग तो प्रत्यक्ष महाराष्ट्रात असो किंवा व्यवसायशिक्षणाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कोठेही वावरत असो, तो मराठी भाषक समाज म्हणून ओळखला जातो. व्यवसाय-शिक्षणादीच्या निमित्ताने, ज्याला महाराष्ट्रात राहवे लागल्याने, मराठी या प्रादेशिक भाषेचा स्वीकार करावा लागला आहे अशा माणसांचा समाजही ‘मराठी’ समजावा लागतो. मातृभाषा मराठी असलेल्या व महाराष्ट्रात राहणाऱ्या समाजावर हिंदी, गुजराती, पंजाबी, इंग्रजी, कन्नड इत्यादी भाषांतील संज्ञापनाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे तसा प्रभावित व संकरित समाजही त्या संकल्पनेत समाविष्ट होतो.” रमेश धोंगडे वेगळा विचार मांडतात. ते लिहितात, “भाषेवरून भाषिक समाज ठरवणे व समाजावरून भाषा ठरवणे यात गोल गोल फिरण्याचा दोष आहे.” कोणतीही भाषा व्यक्ती वापरत असते; समाज नव्हे आणि भाषा एका व्यक्तीप्रमाणे दुसरी व्यक्ती वापरत नाही. अशा एका भाषेपासून भिन्न भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना एकाच भाषिक समाजामध्ये समाविष्ट करणे अशास्त्रीय आहे. धोंगडे हे मराठी भाषिक समाजाविषयी तीन मुद्यांध्ये विस्ताराने लिहितात:

१.   प्रत्येक भाषेला एक भाषिक समाज असतो. त्या भाषिक समाजातील लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या समाजभाषेद्वारा संपर्क साधतात. त्या दृष्टिकोनामध्ये समान भाषेद्वारा संपर्क साधणे हे महत्त्वाचे आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, बेळगाव, नांदेड, औरंगाबाद, मुबई, रत्नागिरी वगैरे ठिकाणांचे लोक एकमेकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मराठीमध्ये संपर्क साधतात. म्हणून ते एका मराठी भाषिक समाजात मोडतात. पण तंजावरमधील मराठी भाषकांचा या लोकांशी संपर्क नसेल तर ते या समाजाचे घटक होत नाहीत. अहमदाबादमध्ये स्थायिक झालेल्या मराठी भाषकांचा त्या समाजाशी संपर्क नसेल, तर तेही त्या समाजाचे घटक होत नाहीत. उलट, पुण्या-मुंबईच्या कुटुंबातील अनेक तरुण-तरुणी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई, मस्कत येथे स्थायिक झाले असूनही त्यांचा संपर्क महाराष्ट्रातील त्यांच्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी, मित्र-मैत्रिणींशी आहे. म्हणून त्यांना मराठी भाषिक समाजाचे घटक मानावे लागेल.

२.   एक भाषा किंवा अनेक भाषा वापरणारे लोक जर एकमेकांशी संपर्क सतत ठेवत असतील तर तो समाजही भाषिक समाज मानावा लागेल. “या दृष्टिकोनात समान भाषेचा आग्रह नाही. मात्र एकमेकांशी नित्य व्यवहार असण्याचा आग्रह आहे. मुंबईमध्ये गुजराती भाषक, मराठी भाषक, हिंदी भाषक, तमीळ आणि मल्याळी भाषक एकमेकांशी देवाणघेवाण करत असतात. त्या सर्वांना एकाच भाषिक समाजाचे घटक मानावे लागेल. त्यांना फारतर मराठी भाषिक समाज असे म्हणता येणार नाही, पण त्यांना मुंबईचा भाषिक समाज असे म्हणता येईल.

३.   भाषिक समाजाला एक भाषा असणे आवश्यक नाही. सामाजिक व्यवहारात समान मानकांचा वापर, सामाजिक औचित्याच्या समान कल्पना, ज्ञानाची समान क्षेत्रे, जगाविषयी समान दृष्टिकोन आणि समान संभाषणपद्धत यांवरून भाषिक समाज ठरतो.”

वरखेडे यांनी सांगितलेला समाजातील भाषिक प्रयोग आणि भाषाआकलन यांमधील सुसंवादित्व आणि परस्परमेळ हा मुद्दा धोंगडे यांच्या विवेचनाला पुष्टी देणारा आहे. कारण केवळ व्यक्तींच्या समुहाला समाज म्हटले जात नाही. एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा समाज एक ठरवला जात नाही; तर त्या व्यक्तींच्यामध्ये असणारा परस्परसंबंध तपासून पाहून त्यांना एका समाजाचे घटक ठरवले जाते.

मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या विविध प्रदेशांमध्ये भाषेचे स्वरूप निरनिराळी रूपे घेताना दिसते. ती बोलीरूपे प्रमाण मराठीपेक्षा भिन्न भिन्न रूपांत आढळतात. तंजावर, बडोदा यांसारख्या ठिकाणी तर भाषा खूपच बदललेली आहे. बेळगावसारख्या ठिकाणी ‘तरुण भारत’ हे वर्तमानपत्र प्रमाण मराठीमधून प्रसिद्ध होते. परंतु तेथील मराठी समाज कानडी वळणाची मराठी बोलतो. बृहन्महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील मराठीचा अभ्यास हा संशोधनाचा स्वतंत्र विषय ठरावा इतकी भाषिक विविधता तेथे आढळते. या संदर्भात गीता सप्रे यांचे तेथील मराठी भाषिकांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. त्यांच्या निरीक्षणावरून महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषेची स्थिती सहज लक्षात येते. त्या लिहितात, “मध्यप्रदेशाची मराठी बोलीभाषा अत्यंत बिघडलेली आहे. मध्यप्रदेशीय मराठी भाषेला महाराष्ट्रातील लोक ‘खिचडी भाषा’ म्हणून हसतात, नावे ठेवतात. जर शुद्ध भाषा हाच निकष लावण्याचे ठरवले तर मध्यप्रदेशातील कोणत्याच व्यक्तीची भाषा शुद्ध नसते हे कबूल. मध्यप्रदेशीय मराठी माणूस ‘आम्ही जाऊन राह्यलोय’, ‘करून राह्यलोय’ टाईप हिंदी वळणाचे मराठी बोलतो. पण कहर म्हणजे, अगदी नव्या पिढीला मराठी भाषा फारशी येतच नाही. आजकालच्या तरुण मुलांमुलींचे बोलणे ऐकले तर ती भयंकर भाषा ऐकून पुणेरी लोकांना मूर्च्छा येईल.” यांच्या निरीक्षणातील विधानांत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्याचे वाटत असले तरी, त्या निरीक्षणामुळे भाषेच्या स्वरूपावर वास्तव प्रकाश पडतो. लेखिका या निरीक्षणाबरोबर तेथील लोकांच्या बोलीची काही उदाहरणे देते. “मावशी, मी सोचतच होते तुझ्याकडे येण्याचं”,“बाबा मला पिटतील नं”,“अशेच सीधे जा अन् मग नुक्कडवर डाव्या गल्लीत मुरकून जा” या बोलीरूपांवर हिंदीचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

प्रमाण मराठीपासून भौगोलिक दृष्ट्या लांब पडलेले लोक भिन्नभाषिक असतात. त्यामुळे त्यांची भाषा बदलतच राहणार. बदलाची ती प्रक्रिया नैसर्गिक आहे. अशा प्रदेशांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षणाची सोय नसते. मराठी पुस्तकांची उपलब्धता नसते. मराठी वर्तमानपत्रे मिळत नाहीत. एकूणच, त्यांना मराठी वातावरण मिळत नाही. महाराष्ट्रापासून लांब असलेल्या त्या समाजाला स्पर्धात्मक युगामध्ये नोकरी-व्यवसायासाठी मराठी भाषेवर अवलंबून राहणे शक्य नाही. महाराष्ट्रातील पुणे, नागपूरसह बेळगाव, गोवा या ठिकाणीदेखील त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. व्यावसायिक गरज म्हणून बहुतांश मराठी भाषिक हिंदी-इंग्रजी माध्यमांतून शिक्षण घेतात. त्यामुळे मराठीचे रूप बदलत आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसह अशा सर्व प्रदेशांतील लोक वेगवेगळ्या कारणांनी परस्परांच्या संपर्कात असतात. त्या सर्वांमध्ये परस्पर व्यवहार सुरू असतो. तशा सतत संपर्कात असलेल्या मराठी भाषकांचा एक भाषिक समाज कल्पिता येतो.

(मूळ प्रसिद्धी – भाषा आणि जीवन, पुणे)  

– नंदकुमार मोरे

About Post Author