मराठी भाषकांना त्यांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला की ते कृतकृत्य होऊन जातील, असा सुखवाद सध्या महाराष्ट्र देशी साद घालत आहे ! अभिजाततेचा हा प्रश्न नेमका काय आहे? ‘अभिजात भाषा’ हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्याकरता भाषेचे वैशिष्ट्य सिद्ध करण्यास हवे. ते वैशिष्ट्य सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले आहेत. त्यानुसार-
- भाषा प्राचीन असावी आणि त्यात श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे.
- त्या भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- त्या भाषेला भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.
हे चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार, तो दर्जा तामिळ आणि संस्कृत या दोन भाषांना प्रारंभी, म्हणजे 2004 मध्ये मिळाला. त्यानंतर तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतातील अधिकृत चौदा भाषांपैकी एवढ्या सहा भाषांना ते स्थान लाभले आहे. ते मराठी भाषेलाही मिळावे यासाठी गेली काही वर्षे मराठी विचारवंतांची व कार्यकर्त्यांची ओरड चालू आहे.
मुळात, भाषेला अभिजात दर्जा वगैरे देणे, त्यासाठी निकष ठरवणे हेच अनैसर्गिक आहे. त्यातून उपरोल्लेखित निकष भाषिक अभ्यासाच्या विसंगत आहेत, वादग्रस्तही आहेत. भाषाविज्ञान हे आधुनिक शास्त्र तशा प्रकारच्या श्रेणिबद्धतेला थारा देत नाही. कोणत्याही भाषेचे मूळ प्रयोजन हे संवाद साधणे आणि व्यक्तीने तिचे मत व्यक्त करणे, हे असते. भाषेच्या त्या प्राथमिक गरजपूर्तीनंतर, तो विशिष्ट समाज स्थिरावल्यावर, मग त्यात साहित्याची निर्मिती होते, ज्ञानाचा प्रसार होतो.
भाषिक परिसर विकासण्याची किंवा संकोचण्याची कारणे विविध सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक घटनांमध्ये सामावलेली असतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी मोठा दुष्काळ पडल्यावर, सामाजिक अशांतता निर्माण झाल्यावर मोठा मनुष्यसमूह स्थलांतर करतो आणि दुसऱ्या अपरिचित ठिकाणी जाऊन स्थायिक होतो. बंगालमधील अकराव्या-बाराव्या शतकांतील मोठ्या दुष्काळानंतर हजारो कुटुंबे महाराष्ट्रात, विशेषत: कोकण आणि गोव्यात स्थायिक झाली. ज्यू समाज महाराष्ट्रात – कोकणात अडीच हजार वर्षांपूर्वी आणि पारशी समाज गुजराथमध्ये हजार वर्षांपूर्वी स्थायिक झाला. काश्मीरमधील हिंदू जम्मूत अथवा दिल्लीत 1990 नंतर स्थायिक झाले. मराठी भाषक समाज मराठ्यांच्या लढवय्या स्वभावामुळे अखंड भारतभर; अगदी कराचीपासून कन्याकुमारीपर्यंत ठिकठिकाणी स्थायिक झालेला आहे. भाषिक समाजाचे एकजिनसीपण अशा विविध कारणांमुळे नष्ट होते. त्याचा अन्य भाषकांशी सहवास-संवाद वाढतो आणि त्यातून एका वेगळ्याच भाषिक संस्कृतीचा जन्म होतो. मराठी हस्तलिखिते दक्षिणेकडे – तंजावर, मद्रास इत्यादी ठिकाणी आढळतात.
भाषेचा जन्म नेमका कधी झाला या प्रश्नाचे उत्तर देणे ब्रह्मदेवाला पण शक्य नाही ! कारण, भाषा ही काही माणसासारखी जैविक एकक नाही. त्यामुळे एका विशिष्ट भाषेपासून एखादी भाषा अमुक वर्षी अस्तित्वात आली हे कोणीही सांगू शकत नाही. त्यासाठी विविध उपपत्ती मांडाव्या लागतात आणि सगळ्या मर्यादित अर्थाने खऱ्या (अथवा खोट्या) असतात. त्यामुळे भाषेचे विशिष्ट वय असावे हा दुसरा निकष अगदीच सर्वसामान्य स्वरूपाचा आहे.
भाषेला भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे हा तिसरा निकष. भाषा ही सामाजिक वस्तू असल्याने ते स्वयंभूपण कधीही सिद्ध करता येणार नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शेजारपाजारच्या भाषिक समाजाचा-संस्कृतीचा ठसा नकळत भाषेवर उमटलेला असतो. भोज राजाच्या दरबारात एकपाठीपासून सातपाठीपर्यंत विद्वानांची फौज उभी असल्याने तो ज्याप्रमाणे प्रत्येक काव्याला ‘ते तर जुनेच काव्य आहे’ असे सांगू शकत होता, त्याप्रमाणे भारतातील नव्हे, तर जगातील प्रत्येक भाषा एकमेकांच्या प्रभावात असते. त्यातच महाराष्ट्राच्या भारतातील भौगोलिक मध्यवर्ती स्थानामुळे मराठी भाषेवर कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी अशा अनेकविध भाषांचा संस्कार झालेला आहे. त्यामुळे भाषेचे स्वयंभूपण एका मर्यादेतच शक्य असते.
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा, हा चौथा निकष तर एकदमच पोकळ आणि मोघम आहे. सातवाहनकालीन ‘गाथासप्तशती’मधील कोणतीही ओवी (गाथा) आधुनिक मराठी ओवीशी आणि भाषेशी अजिबात जुळत नाही आणि जुळते, अशा दोन्ही सिद्धता मांडता येतात. त्यामुळे भाषेचे प्राचीनत्व आणि आधुनिक रूप यांचे नाते कसे जोडावे हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळेच मग तो निकष पूर्ण करण्यासाठी ओढून-ताणून ‘गाथासप्तशती’ या सामान्यत: इसवी सन चौथ्या-पाचव्या शतकांतील संकलित ग्रंथातील ‘महाराष्ट्री प्राकृत’ ही भाषा हेच मराठीचे आद्यरूप होय, असे सिद्ध करण्याचा खटाटोप केला जात आहे. त्यातील विसंगती म्हणजे ते नाते जोडण्यासाठी संस्कृतचाच आधार घ्यावा लागतो ! त्याशिवाय त्या ओव्या कळता कळत नाहीत. उदाहरणार्थ, अवलंबिअ-माण-परम्मुहीऍ एंतस्स माणिणि ! पिअस्स । पुट्ठ-पुलउग्गमो तुह कहेइ संमुहटिठ्अं हिअअं॥1:87॥ (हे मानिनी ! प्रियकर आल्याबरोबर, तू क्रोधाने पाठ फिरवलीस; परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे असे दाखवतात). (vishwakosh.marathi.gov.in/22235/)
उपरोक्त गाथेचा अर्थ लावण्यासाठी आधार संस्कृतचा घ्यावा लागतो, म्हणजेच या महाराष्ट्री प्राकृताचा आणि मराठीचा सांधा थेट जोडता येत नाही. त्यासाठी संस्कृतचा संदर्भ आवश्यक ठरतो. तसेच, एक समांतर उदाहरण ‘मिसळपाव’ या संकेतस्थळावर मिळते. तेथे प्रचेतस नामक कोणा व्यक्तीने पुण्याजवळ मावळ तालुक्यातील बेडसे लेण्यातील इसवी सन सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा प्राकृत भाषेतील शिलालेख ठेवला आहे.
भाषा-प्राकृत संस्कृत रूप
सिधं धेनुकाकडे वायवस सिद्धम्।धेनुकाकटे वास्तव्यस्य
हालकियस कुडुबिकस उसभ हालिकीयस्य कुटाम्बकस्य ऋषभ-
णकस कुडुबिणिय सिअगुत णकस्य कुटुम्बिन्या: श्रीयगुप्ति –
णिकाय देयधमं लेणं सह पुते निकाया देयधर्मो लयनम् सह पुत्रे
ण णंद गहपतिणा सहोण नंद गृहपतिना सहो ॥
मराठी अर्थ : सिद्धी असो, धेनुकाकट येथे वास्तव्य करणारी ऋषभणक याची पत्नी श्रीयगुप्ती हिने घरमालक असलेला पुत्र नंद याच्यासह दान दिलेले हे लेणे. आता हा शिलालेख मराठीपेक्षा संस्कृत भाषेला खूप जवळचा आहे हे तर दिसतच आहे. (www.misalpav.com/node/23896)
बाराव्या शतकातील महानुभाव वाङ्मयाचे उदाहरण पाहा – ‘नरींद्रबासां भेटि: अनुसरणः नरेंद्र कवि: साल कवि: नृसिंह कवि’ हे तिघे भाऊ: नृसिंह कविन नलोपाख्यान केले: साल कविन रामायण केले: ते आपुलाले रामदेवरायापुढां म्हणितले: तेथ नरेंद्र कवि बैसले होते: (ते त्यांना म्हणाले) यैसा द्वारकेचा रामहाठु वर्णितेती तरी तुमचेया पापा पुरश्चरण होते: ऐसे रायांदेखतां निभर्षिले: या लीळेतील सर्व शब्दांचा अर्थ कळत नाही. पण, मराठीच बोलतोय इतपत तरी समजते. कुवलयमालेत मराठी बोलल्याचा उल्लेख ‘दिण्हले, गहिल्ले’ असा आहे, तो समजून घेता येऊ शकतो. पण, महाराष्ट्री प्राकृताला ते इतके लागू पडत नाही. तो लेण्यांतील शिलालेख असो किंवा गाथासप्तशतीतील कविता असो. (www.misalpav.com/comment/459431comment-459431)
ज्ञानेश्वरीतील (1290) कोणतीही एक ओवी निवडावी आणि कोणाही मराठी माणसाला ऐकवावी. त्याला त्या ओवीचा अर्थ सांगता येत नाही. परंतु महानुभाव साहित्य किंवा ज्ञानेश्वरी यातील मराठी भाषेचा आधुनिक मराठी भाषेशी अनुबंध लावता येतो, मात्र तसा तो गाथा सप्तशती, बेंडसा लेण्यांतील शिलालेख यांतील मराठी भाषेचा आधुनिक भाषेशी अनुबंध लावणे म्हणजे वडाची साल पिंपळाला नेऊन लावण्याप्रमाणे होते.
केंद्र सरकारने जेव्हा तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तेव्हाची, 2004 मधील भारतातील राजकीय स्थिती लक्षात घ्यावी. द्रमुक या तामिळनाडूतील महत्त्वाच्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्यावर तत्कालीन काँग्रेस सरकार तरले होते. तामिळ भाषक त्यांच्या भाषेविषयी जागरूक असल्याने त्यांनी त्यांच्या भाषेच्या विकासाच्या नावाने केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी एक योजना आखली आणि ती पाठिंब्याच्या बळावर यशस्वी केली. कोणतीही मागणी नसताना, कोणतीही योजना आखलेली नसताना, भाषिक संशोधनाचा कोणताही आधार नसताना, त्यांनी त्यांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून घेतला आणि केंद्र सरकारकडून विशिष्ट निधी मिळवला. (दरवर्षी अंदाजे पाच ते वीस कोटी). त्या निधीतून तेथे केंद्र सरकारने एक संस्था सुरू केली (www.CICT.in). प्राचीन तामिळ भाषेच्या विकासाचे प्रकल्प त्यात सुरू केले गेले आहेत. तो निधी नवीन पिढीला ती जुनी भाषा शिकवणे, त्या भाषेतील विविध साहित्यकृती आधुनिक रूपात रूपांतरित करणे इत्यादी कारणांसाठी खर्च करावा लागतो. कन्नड भाषेच्या तशा केंद्राला प्रस्तुत लेखकाने 2018 मध्ये भेट दिली. ते केंद्र म्हैसूर येथील ‘भारतीय भाषा संस्थान’ या केंद्र सरकारच्या संस्थेत सुरू होते. त्यांना त्या आर्थिक वर्षात दीड कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता आणि त्यांचेदेखील त्या निधीमधून जुन्या कन्नड भाषेचे प्रशिक्षण वगैरेंसारखे उपक्रम सुरू होते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर जो निधी महाराष्ट्राला मिळणार त्याबद्दल तर महाराष्ट्रात पाचशे कोटी वगैरे सारखे, तोंडाला फेस आणणारे आकडे तोंडावर फेकले जात आहेत ! वस्तुस्थिती तशी नाही. भाषेच्या अभिजात दर्ज्यामुळे मराठीची भाषिक प्रतिष्ठा वाढेल, मराठी शाळा बळकट होतील, त्यांना भरपूर अनुदान मिळेल, मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी रोजगार निर्मिती होईल, वाचन संस्कृतीचा विकास होईल, बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी यांना पाठबळ मिळेल, मराठीच्या बावन्न बोलींचे संशोधन मार्गी लागेल, श्रेष्ठ मराठी ग्रंथ रास्त किंमतीत उपलब्ध करून देता येतील… अशा अनेक उपक्रमांना अभिजाततेमुळे बळकटी येईल असे मुद्दे मराठीप्रेमी मंडळी मांडतात. मात्र, अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही शासकीय व्यवहारात त्या उपक्रमांना काडीचीही किंमत मिळत नाही हे तामिळ व कन्नड या दोन प्रमुख भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतरच्या परिस्थितीवरून कळून येईल.
वास्तविक, सर्व मराठीप्रेमींनी अभिजात दर्जा वगैरे देऊन भाषा-भाषांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या तामिळ नीतीच्या विरोधात ठामपणे उभे राहण्यास हवे आणि तिकडे, केंद्र सरकारने भारतातील सर्वच भाषांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना बळ देण्यास हवे. अनेक जण भाषाप्रेमापोटी भाषेसाठी काही ना काही करत आहेत आणि करू इच्छितातही. त्या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणि अशा समानधर्मी लोकांना एकत्र आणून भाषिक विकासाच्या विविध उपक्रमांना चालना दिली गेली पाहिजे. अन्य भाषांत चाललेला एखादा चांगला उपक्रम स्वभाषेत कसा राबवता येईल, यासाठी एका समान व्यासपीठाची निर्मिती करावी. म्हैसूरमध्ये भारतीय भाषांच्या विकासासाठी स्थापन झालेली ‘भारतीय भाषा संस्थान’ ही संस्था रडतखडत सुरू राहते आणि त्याच वेळेस हैदराबाद येथे सुरू झालेली इंग्रजी आणि अन्य परदेशी भाषांच्या विकासासाठी स्थापन झालेली संस्था मात्र एका मोठ्या विद्यापीठाचे रूप धारण करते, हा विरोधाभास दूर होण्यास हवा. त्यासाठी भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रयत्न करण्यास हवेत.
मराठी भाषा दिन – 2022 च्या निमित्ताने मराठी जनांनी काही गोष्टी चांगल्या लक्षात घ्याव्या –
- अभिजात वगैरे दर्जा मिळणे यामुळे भाषेचे रूप, अवस्था बदलणार नाही.
- अभिजात दर्जा मिळाला तर भाषेच्या विकासासाठी जो काही निधी मिळेल, त्यातून जास्तीत जास्त वीस-पंचवीस लोकांना रोजगार मिळतील आणि प्राचीन मराठी भाषेचा अभ्यास करण्याचे उपक्रम सुरू होतील.
- अभिजात दर्जा मिळाल्यावर पाचशे कोटी वगैरे निधी मिळणार नाही.
- अभिजात दर्जा मिळाल्यावर भाषेसाठी, भाषकांसाठी कोणतेही उपक्रम राबवता येत नाहीत.
- अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी शाळा सक्षम करण्यासाठी अनुदान मिळणार नाही.
या गैरसमजुती दूर केल्यावर मग स्वभाषा सुदृढ करण्यासाठी काय काय करावे लागेल याचीही खूणगाठ मनाशी बांधावी –
- भाषा विकसित करण्याची असेल तर भाषा सर्व माध्यमांवर प्रभावी पद्धतीने मांडत राहण्यास हवी.
- तंत्रज्ञान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भाषा सर्व प्रकारच्या तांत्रिक आविष्कारात वापरली जाईल यासाठी दक्ष असावे.
- मराठीचे संगणकीय मुद्रितशोधक यंत्र तयार होण्यास हवे.
- बोललेले लिहिणारे आणि लिहिलेले बोलणारे मराठी संगणकीय साधन तयार व्हावे.
- ‘विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशावर प्रत्येक मराठी माणसाने दरवर्षी किमान एक तरी नोंद लिहावी किंवा भाषांतरित करावी.
- उत्तमोत्तम मराठी साहित्यकृती सर्व भारतीय आणि जागतिक भाषांत भाषांतरित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.
- भाषा सर्वत्र विनासंकोच, विना अडथळा वापरता येण्याइतपत तिचा विकास होण्यास हवा, असा ध्यास धरण्यास हवा.
- सर्व प्रकारचा कुशल संगणकीय व्यवहार मराठी भाषेतून व्हावा. तशी मुक्तस्रोत साधने निर्माण व्हावीत.
- भारतीय भाषांत एकमेकांच्या भाषिक आणि साहित्यिक कृती यांची चर्चा करणे, समजून घेणे, भाषांतर करणे, असे उपक्रम वाढीस लागणे.
- इस्रायली लोकांनी ज्याप्रमाणे प्राणपणाने त्यांची ‘हिब्रू’ भाषा जगवली, विकसित केली आणि सर्व व्यवहार त्याच भाषेत होतील यांची काळजी घेतली, तशी मराठी लोकांनी घ्यावी. प्रत्येक मराठी माणसाने त्यासाठी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ हे पुस्तक नक्की वाचावे.
अभिजात दर्जा मिळवण्याच्या मागे न लागता भाषेचे उपयोजन अधिक चांगल्या गुणवत्तेचे करण्यावर भर दिला तर मराठी भाषेचे अनेक प्रश्न सुटतील आणि मराठी माणूस खऱ्या अर्थाने अभिजात होईल !
– आनन्द काटीकर 9421610704 anand.katikar.marathi@gmail.com
————————————————————————————————————————-