मराठीप्रेमी पालक महासंमेलन 2020 (Parents for the Cause of Marathi)

1
35

मराठी शाळा हा विषय एकूणच आपल्या समाजाच्या स्मरणकक्षेत कितीसा आहे हा प्रश्नच आहे पण मराठी शाळा जगल्या पाहिजेत, या धारणेतून धडपडणार्‍या कार्यकर्त्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही.

समाजात मराठी शाळांच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने गेली पंधरा वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर त्यांचे काम सुरू ठेवले आहे. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांवरील परिषदा-चर्चा-परिसंवाद, मराठी शाळांच्या मान्यतांच्या संदर्भातील आंदोलने, बृहनआराखड्यात बसणाऱ्या राज्यभरातील ग्रामीण भागातील शाळांच्या मान्यता अशा विविध अंगांनी ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने काम सुरू ठेवले. मराठी शाळांकडे समाजाने आणि राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली असताना ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या या सातत्यपूर्ण कामाला वेगळे महत्त्व आहे. ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’ची नावीन्यपूर्ण संकल्पना केंद्र गेल्या तीन वर्षांपासून राबवत आहे. मुंबईत डी.एस.हायस्कूल (सायन), महाराष्ट्र विद्यालय (गोरेगाव), आर. एम. भट (परेल) येथे यापूर्वीची पालक महासंमेलने आयोजित करण्यात आली होती. दरवर्षीच्या पालक महासंमेलनाची वैशिष्ट्ये वेगवेगळी राहिली. प्रयोगशील शाळांची दालने, ग्रंथदालने, अभ्यासपूर्ण सत्रे, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अभ्यासकांची उपस्थिती या सर्वांसकट आयोजित केलेली ही संमेलने पालकांच्या चांगलीच स्मरणात राहिलेली आहेत.

यावर्षी कोरोना काळातील आव्हाने लक्षात घेता संमेलनाची संकल्पना पुढे नेणे कठीण होते. त्यामुळे डिजिटल माध्यमातून संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरले. कोणतेही मोठे प्रायोजकत्व, राजकीय पक्षांचा पाठिंबा इत्यादींपलीकडे जाऊन मराठी अभ्यास केंद्राने समविचारी संस्था, शाळा आणि माणसांशी जोडून घेतले. किंबहुना याच पाठबळावर केंद्राने सर्व पालक महासंमेलने यशस्वी केली. यंदाही 18 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या संमेलनाचे उद्घाटन माध्यमकर्मी मंदार फणसे यांच्या हस्ते होत आहे.

 

18 डिसेंबर रोजी चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन सत्रात मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमीतदेखील सहभागी होणार आहेत. 19 डिसेंबर रोजी दुसरे सत्र चार ते सात या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे, त्या सत्राचा विषय ‘आम्ही मुलांकरता मराठी शाळा का निवडली?’ हा असून त्या सत्रात दीपाली केळकर (वृत्तनिवेदक), जागृती गावकर (अॅडव्होकेट), मयुरेश गद्रे (अनुवादक, ग्रंथप्रेमी), गायत्री गणेश (शिक्षक, सृजनआनंद), राजश्री देशपांडे (मनोविकार तज्ज्ञ) सहभागी होत आहेत. त्यानंतरचे सत्र महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मराठी शाळांत शिकून विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या यशवंतांचे आहे. त्यात अमेय राऊत (प्रयोगशील उद्योजक), सिद्धार्थ भंडारे (उपजिल्हाधिकारी, अहमदनगर), नम्रता भिंगार्डे (पाणी फाउंडेशन), रचना पोतदार (समुपदेशक, प्राध्यापक), अतुल गुरव (डिजिटल विश्व) आणि डॉ.सुप्रिया देवरे (स्त्रीरोगतज्ज्ञ) सहभागी होत आहेत.

 

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी मराठी शाळांच्यादृष्टीने दोन अत्यंत महत्वाची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले चार वाजताचे सत्र – ‘मराठीतून गणित-विज्ञान: सद्यस्थिती आणि आव्हाने’ त्या सत्रामध्ये झी मराठी पुरस्कार विजेत्या नाशिक आनंदनिकेतन शाळेच्या विनोदिनी काळगी, जयंत जोशी (कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद), हेमंत लागवणकर (विज्ञानप्रसारक, शैक्षणिक सल्लागार) आणि सलील बेडकिहाळ (कॅनडा) हे वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

 

त्याच दिवशीच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला गेला आहे. मराठी शाळांतील कला-क्रीडा शिक्षण या विषयावरील सत्रात रंगकर्मी आणि बाल रंगभूमीशी निगडित राजू तुलालवार, चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण, संगीतकार मनोहर म्हात्रे आणि क्रीडाप्रशिक्षक रेणू निशाणे इत्यादी मान्यवर सहभागी होत आहेत.

या संमेलनाचा समारोप 21 तारखेला होणार असून ऑस्ट्रेलियात मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेले प्रसाद पाटील यांची पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

– डॉ. वीणा सानेकर 98193 58456 veenasanekar2018@gmail.com

वीणा सानेकर या क.जे.सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आणि मराठी विभागप्रमुख आहेत. त्यांनी श्याम मनोहर यांच्या साहित्याचा अभ्यास पी एचडीच्या प्रबंधातून मांडला आहे. त्या विविध नियतकालिकांत लेखन करतात. त्या ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ या मासिकाच्या कार्यकारी संपादक, ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या उपाध्यक्ष, मराठी पालक महासंघाच्या अध्यक्ष आणि ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’च्या समन्वयक आहेत.

————————————————————————————————————

 

 

——————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. मराठी प्रेमी पालक महासंमेलनास हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here