मराठीतील ‘साडे’ शब्दांची यादी

0
58

१. साडेतीन शहाणे :- पेशवाईत सखारामबापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजीराव चोरघडे; तसेच, नाना फडणीस हे चौघे सरदार ‘साडेतीन शहाणे’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांपैकी पहिले तिघे हे युध्द कौशल्यात तसेच मुत्सद्दीपणात असे पूर्ण शहाणे होते; तर नाना फडणीस हे युद्धकौशल्य अजिबात नसलेले परंतु प्रचंड मुत्सद्दी आणि कौटिल्य नीतीचा उपयोग करण्यात मशहूर असे सरदार होते. म्हणून त्यांना अर्धे शहाणे म्हणत. असे हे चौघे सरदार साडेतीन शहाणे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी पेशवाइला फार चांगली साथ दिली.

२. साडेसाती :- माणसाच्या जन्मराशीपासून १२, १ व २ या राशीत शनी असला म्हणजे त्या तीन राशीतून मार्गक्रमण करण्यास शनीला लागणारा काळ त्या माणसाला कष्टाचा जातो असे म्हणतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला शनीला अडीच वर्षे लागतात, हे लक्षात घेतले तर बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या या तीन राशींत शनी साडेसात वर्षे असतो. म्हणून त्या काळाला साडेसाती असे म्हणतात.

३. साडेतीन मुहूर्त :- दसरा, दिवाळीची प्रतिपदा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाडवा ) हे तीन पूर्ण मुहूर्त आणि अक्षय्य तृतीयेचा अर्धा मुहूर्त असे मिळून साडेतीन मुहूर्त, ते कोणतेही कार्य करायला उत्कृष्ट असे समजतात. साडेतीन मुहूर्तांच्या तिथींना मग ताराबल, चंद्रबळ, शुभअशुभ वेळ असे काही पाहावे लागत नाही.

४. साडेपंधरे :- उत्तम प्रतीचे सोने असेल तर त्याला साडेपंधरे असे संबोधतात.

५. साडेभावार्थी  :- मानभावी माणसाला अथवा ढोंगी साधूला साडेभावार्थी  म्हणतात.

६. साडेतीन पोशाख :- पूर्वी दरबारात कित्येक मोठाल्या अधिकाऱ्यांना एक पागोटे, एक शेला, पायजमा किंवा झगा याच्यासाठी महामुदी नावाच्या उंची वस्त्राचा तुकडा व पटक्यासाठी किनखापाचे अर्धे ठाण मिळून साडेतीन वस्त्रे देण्याचा रिवाज असे. त्याला साडेतीन पोशाख असे म्हणतात.

संकलक :  शंभुनाथ दामोदर गानू

About Post Author

Previous articleघट्टकुटी प्रभात न्याय
Next articleकर्णबधिरांसाठी – व्‍हॉईस आफ व्‍हॉईसलेस
शंभूनाथ दामोदर गानू यांचा जन्‍म 1948 चा. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत मंडळात 'डेप्‍युटी चीफ इंजिनीअर' या पदावर पस्‍तीस वर्षे कार्यरत होते. ते 2006 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी सुनिल गावस्‍कर यांच्‍यावरील छोटेखानी पुस्‍तकासोबत 'माझ्यासारखा मीच', 'कल्‍पवृक्ष आशिदाचा' अशा चरित्रग्रंथांचे लेखन केले आहे. त्‍यांनी शब्‍दांगण आणि उद्योगश्री या मासिकांतून लिखाण केले आहे. त्‍यांचा आकाशवाणी मुंबईवर मुलाखतकार म्‍हणून तर दूरदर्शनवरील किलबिल या मालिकेत कवी अणि संगीतकार म्‍हणून सहभाग होता. पुस्‍तकांच्‍या मुद्रितशोधनासोबत त्‍यांनी 'रविवार लोकसत्‍ता' मध्‍ये सतत सोळा वर्षे शब्‍दकोड्यांची रचना केली.