मरणाला सामोरे जाण्याची वेळ कोणती – ठरवता येईल?

0
35

इच्छामरणाचा कायदा आला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की त्यात खूप त्रुटी आहेत. मी कायद्यातील तपशिलांची चर्चा येथे करणार नाही. मला वेगळेच काही म्हणायचे आहे. मी चर्चा करणार आहे ती मनुष्याने केवळ शरीराने मरणाच्या जवळ जाण्याची तयारी केली तर काय करायचे याची नव्हे; तर मनुष्य एक व्यक्ती म्हणून जगली आणि त्याच्या व्यक्तित्वाचे महत्त्वाचे पैलू लयास जाऊ लागले तर ते कसे ओळखायचे? त्यानंतर मग शरीराची ओढ कशी तोडायची? मला मरणाला जवळ सहज कसे करता येईल याचा विचार होण्याची गरज वाटते. माझ्या त्या विचाराला चालना मिळाली मी जेव्हा बार्बरा एहानराइच ह्या अमेरिकन स्त्रीवादीची मुलाखत वाचली तेव्हा. तिचे नव्याने आलेले पुस्तक आहे, ‘नॅचरल कॉजेस’ (नैसर्गिक कारणे). त्यात ती म्हणते, की प्रत्येकाच्या आयुष्यात “असा एक काळ येतो, की वय झाले असो वा नसो, शरीर खंगले असो वा नसो, पण एखाद्या आजाराची चाहूल लागली, की त्याचे त्याला कळत जाते, “की त्याची जाण्याची वेळ आली आहे. तशा वेळी उगीच जीवन ओढत नेण्यात अर्थ नाही.” मला स्वत:कडे आणि आजूबाजूला पाहण्याची प्रेरणा त्या वाक्याने मिळाली.

इच्छामरणाचा कायदा अगदी फारच छोट्या कालावधीसंबंधी बोलतो. तेही व्यक्तीचा जेव्हा स्वत:वरील ताबा सुटलेला असतो, व्यक्ती दुसऱ्याच्या, निदान डॉक्टरांच्या ताब्यात असते त्या क्षणी काय करता येईल? किंबहुना, त्या क्षणाची तयारी आधी पत्र लिहून, दोन साक्षीदारांच्या सह्या घेऊन, त्याची कायदेशीर बाजू पक्की करून ठेवणे; म्हणजे मग नातेवाईक, आणि डॉक्टर यांच्यावर काही आरोप न येता, व्यक्तीची सुटका तिच्या इच्छेप्रमाणे या पृथ्वीतलावरून करता येईल याची खात्री करून ठेवण्याची परवानगी कायदा देतो. पण मी शारिरीक मरणाबद्दल बोलतच नाही. मी बोलत आहे ते एक व्यक्ती म्हणून जगण्यातील जिवंतपणा संपला, की अशी एक वेळ येते, की मग काही शारीरिक व्याधी निर्माण झाली तर ती किती गंभीरपणे घ्यावी, औषधे किती – वेगवेगळ्या परीक्षा किती करत बसावे, हे खाऊ नको की ते खाऊ नको अशी चिंता सारखी करत आयुष्य वाढवण्यासाठी उरी फुटायचे का याचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरते. त्या परिस्थितीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हा खरा प्रश्न आहे.

बार्बराला तो प्रश्न सतावू लागला जेव्हा तिला कॅन्सर झाला तेव्हा. तिला पंच्याहत्तराव्या वर्षीं डॉक्टर पुन्हा म्हणू लागले, की तपासण्या पुन्हा एकदा करून घ्या. वृद्धत्व आले, की तो आजार परत एखाद्या वेळी उफाळून येईल! दोन प्रकारचे ऑप्शन्स तिच्या समोर होते. एकतर सर्व प्रकारच्या परीक्षा करून घ्याव्या आणि काय काय जास्तीत जास्त उपाय उपलब्ध आहेत व ‘हेल्थ इन्सुरन्स कंपनी’ कशा कशाला परवानगी देते त्याप्रमांणे उपाय करून घ्यावे किंवा तात्पुरती उपाययोजना करून मरणाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. ती तिच्या आजुबाजूच्या मैत्रिणी, नातेवाईक यांना पाहत होती, की ते तशा परिस्थितीत अस्वस्थ होऊन, आणखी काही चांगली उपाययोजना आहे का यासाठी धडपडून प्रयत्न करत होते. तेवढेच नव्हे, तर त्यासाठी लागणारे डाएट करून आणि आयुष्यातील चांगलेचुंगले खाण्याच्या आनंदाला वंचित होऊन वाट पाहत होते, की त्यांचे आयुष्य आणखी किती लांबू शकते! अनेकजण अमरत्वाचे स्वप्न पाहत असतात. मुख्यत: अनेक जणांना अपूर्वाई वाटत असते, की तंत्रज्ञानामध्ये केवढी प्रचंड प्रगती झाली आहे आणि ते त्याचा फायदा घेऊन, त्यांच्या शरीरावरील नियंत्रण वाढवू शकतात! त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य निसर्गाच्या हातात पूर्वीसारखे का म्हणून द्यावे? बार्बराने वर्तमानपत्रातील शोकवार्ता हा स्तंभ पाहण्यास सुरुवात केली आणि तिच्या लक्षात आले, की अनेकांचे मृत्यू सर्वसाधारणपणे सत्तर वर्षें वयाच्या पुढे झालेले आहेत. तिचे स्वत:चे आईवडील सत्तरीच्या पुढेच गेले होते. त्याचा अर्थ विद्यमान काळात सर्वसाधारण आयुष्य हे सत्तर वर्षांच्या आसपास धरण्यास हरकत नाही. शेवटी मरणाला काही तरी कारण लागते आणि मरणाऱ्या माणसाचे नातेवाईक काही रोगांची नावे घेतात. पण खरे कारण, इम्युन सिस्टिम दुर्बळ झाली हेच असते. त्याचा अर्थ, तिने तिचा कॅन्सरसुद्धा तसाच निमित्तमात्र असणार असे तर्कशास्त्र लढवले.

बार्बराने पहिला उपाय अंमलात आणण्याचे ठरवले. तिला डॉक्टरांच्या खोलीत वाट बघत बसून कंटाळवाणा वेळ घालवणे अजिबात पसंत नव्हते. त्यापेक्षा तिचा आवडता उद्योग, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत कॉफी पिणे. विशेषत:, तिला तिचे आयुष्य लवकर संपत आले आहे असा इशारा आला असताना, तर अप्रूप जास्त वाटले. तिने डाएटच्या बाबतीतही निर्णय घेतला, की उगीच डाएटच्या नावाखाली बेचव खाण्याची गरज नाही. अन्न हे रसपूर्ण असले पाहिजे. तिला वाईनचा ग्लास किंवा ब्लडीमेरीचा ग्लास पिण्यास आवडतो आणि तो सोडण्याची तिची तयारी आयुष्य लांबवण्यासाठी नाही. तिला ’वेलनेस’ इण्डस्ट्रीचा राग येतो. सतत नवे नवे तंत्रज्ञान शोधायचे आणि मग वृद्धांना फोन करून ‘या वयात त्यांना हा त्रास व्हायची शक्यता आहे, तेव्हा त्यांना अमकी परीक्षा करून हवी आहे का, प्रत्यक्ष आजार सुरू होण्याआधी सर्व शक्यता तपासलेल्या बऱ्या’ असा सल्ला द्यायचा! विशेषत: अमेरिकेतील मध्यमवर्गाला किंवा उच्च मध्यमवर्गाला त्याची फार सवय झाली आहे. किंबहुना ते अशा हेल्थ क्लबचे सभासद असतात आणि ते सभासदत्व दागिन्यासारखे मिरवतात. ते त्यांची अमरत्वाची छुपी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते खूप पैसे खर्च करण्यास तयार असतात.

त्याचा अर्थ असा मात्र नाही, की व्यक्तीच्या रोजच्या जीवनात शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही करायचे नाही. बार्बरा एक गोष्ट कबूल करते, की ती 1970 च्या दशकामध्ये जी जिम्नॅशियमची क्रेझ आली होती त्यात ओढली गेली होती आणि तिला वजन समतोल ठेवण्यासाठी किंवा हृदयाचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी व्यायाम करणे आवडू लागले. अजूनही ती जिममध्ये जात असते- आयुष्य वाढावे म्हणून नाही तर शरीराला वळण मिळावे, शरीराची लवचीकता कायम राहवी म्हणून.

तिचे मनुष्यप्राण्याच्या शरीराविषयी भान वाढत गेले. ती स्वत: वैज्ञानिक (बायोलॉजिस्ट) होतीच. तिच्या मते शरीराविषयी जी जुनी कल्पना होती, ती म्हणजे शरीर एखाद्या कम्युनिस्ट हुकूमशहाने चालवल्यासारखे चालते. प्रत्येक पेशी तिचे तिचे कार्य आज्ञाधारकासारखे करत असते आणि त्याच्या बदल्यात तिला रक्तवाहिन्यांतून रक्ताचा पुरवठा होत असतो, पोषण होत असते. पण आता तिच्या लक्षात येऊ लागले होते, की पेशींमध्ये बंडखोर पेशी असतात. कॅन्सर म्हणजेच त्या बंडखोर पेशींनी केलेले बंडच होय. ती नास्तिक असल्यामुळे तिला माहिती होते, की मानवप्राणी हा या विश्वामध्ये एकटा राहत नाही. हे विश्व निर्जीव नाही. ते कृतिक्षम आहे. त्यामध्ये राहणाऱ्या अनेक प्राणिमात्रांकडून अनेक प्रकारच्या कृती होत असतात. कोणीही माणूस एकटा नाही आणि त्याच्या कृतींचे परिणामही या विश्वावर होत असतात. अशा सगळ्या वैचारिक पार्श्वभूमीवर ती म्हणते, की मृत्यू म्हणजे एखाद्या कृष्णविवरात किंवा अंतराळात उडी घेतल्यासारखे नाही, तर जीवनाचे जे कालचक्र चालू असते, जो जीवनोत्सव चालू असतो त्यामध्ये विरून जाण्यासारखे आहे. अशी एकदा वैचारिक बांधणी केली, की तिला वाटते, की मुलाबाळांना सांगणे सोपे जाईल, की दु:खद अंतकरणाने किंवा नैराश्याने नाही, तर अगदी सहज जाता जाता, आजार वाढला तर फारशी उपाय योजना करण्याच्या भानगडीत पडू नका –

मी माझी मैत्रीण न्यू यॉर्कमध्ये असताना, तिला भेटण्यास गेले होते. ती सोय टर्मिनली इल रोग्यांसाठी (म्हणजे इलाज न करता येण्याजोगे आजार – मरणाची वाट पाहत बसण्यासाठी आलेल्यांसाठी) होती. मैत्रिणीचा कॅन्सर उलटला होता आणि डॉक्टरांनी हात वर केले होते! आम्ही तिच्या मुलाबरोबर आणि तो त्याच्या मुलाबाळांबरोबर असे तेथे गेलो होतो. तेथे मुलांना मज्जाव नव्हता. उलट, आजीशी बोला, खेळा आणि आजीला आनंद झालेला पाहा यास उत्तेजन होते. मला असे कळले, की दु:ख फार असह्य झाले, तर तेथे मॉर्फिन दिले जाते. एका अर्थाने हळुहळू दिलेले विष. मरण समोर दिसत असताना, कुटुंबीयांची भेट ही केवढी आनंददायक गोष्ट असते हे तेव्हा मला जाणवले. दुसऱ्या दिवशी, ती गेल्याचेही कळले. भारतातही अशा सोयी उपलब्ध होत आहेत.

प्रश्न प्रत्यक्ष मरणाचा नाही; मरणाच्या मानसिक तयारीचा आहे. वय वाढले, शरीराला अनेक ठिकाणी टेकू देण्याची गरज भासू लागली, आयुष्यात घेतलेला वसा, ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण झाले आणि कोणत्या तरी आजारपणाने गाठले तर काय करायचे? स्वत:चे पैसे आहेत, मुलेबाळे खर्च करण्यास तयार आहेत, तंत्रज्ञान उपलब्ध आहे म्हणून आयुष्याची रेषा आणखी पुढे पुढे न्यावी का हा प्रश्न मला पडतो. तसे पाहिले तर, मीही दोन्ही गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या. का? तर मला हिंडताफिरता यावे, खेडोपाडी, पाण्याच्या प्रश्नावर, महिलांना जमिनीचे हक्क मिळावे या प्रश्नावर चाललेल्या चळवळीचा भाग म्हणून वावरता यावे यासाठी. तरीही एक वेळ येऊ शकेल, की माझे शरीर चांगले असेल, पण स्मृतिभ्रंश होईल, कदाचित अल्झायमर होईल. अशा ‘न ओळख’ अवस्थेत जगताना काय केले जावे हे मी आधीच लिहून ठेवू शकले तर? कायदा मरण्याची परवानगी नाकारतो. पण व्यक्ती म्हणून, मी आशा-आकांक्षा, ध्येयपूर्तीचा ध्यास नसलेली अशी जर मनाने मेलेली असेन, माझी मलाच ओळख पटत नसेन आणि मी दुसऱ्यांनाही ओळखत नसेन तर केवळ कर्तव्यपूर्ती म्हणून किंवा अपराधीपणाची भावना म्हणून माझ्या जवळच्या माणसांनी, मुलाबाळांनी मला घरामध्ये का म्हणून जगवावे? मला वाटते, इच्छामरणाचा कायदा त्याबद्दल काहीच सांगणार नाही. पण मनुष्य स्वत: आयुष्याच्या संधिकालात असे काही निर्णय घेऊन ते इच्छापत्र लिहू शकतो की नाही? मला अनेक कुटुंबे माहीत आहेत, की जेथे तशा व्यक्ती आहेत आणि त्यांची परवड होत आहे- तशा व्यक्ती कुटुंबांमध्ये असंतोष पसरवण्यासाठी कारण होत आहेत.

वाचकांना असे वाटेल, की बार्बराने उभा केलेला प्रश्न, मरणाला कधी सामोरे जायचे हा अधिकतर तत्त्वज्ञानावर आधारित प्रश्न आहे. तो प्रश्न आयुष्य वाढवण्यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाविषयी व त्याच्या संधिकालामधील वापराविषयीचा आहे; आणि मरणाची मानसिक तयारी कशी करावी याविषयीचा आहे आणि मी उभा करत आहे तो प्रश्न मेंदू कुचकामी झाल्यावर ते शरीर कचऱ्याच्या ढिगावर का फेकून देऊ नये असा आहे. गंमत म्हणजे ती अवस्था अशी असते, की तो प्रश्न त्या व्यक्तीच्या निर्णयाचा नसतो. व्यक्तीने कोठे राहवे? कसे राहवे? हे तिला ठरवता येत नाही. तो प्रश्न समाजाच्या वैज्ञानिक धारणेचा होऊन बसतो. तशा ओळख विसरलेल्या माणसाला त्याचे नातेवाईक समाज काय म्हणेल म्हणून सांभाळत बसतात. ज्यांना परवडत नाही तेसुद्धा रडतकुढत तशा माणसाला आश्रय देतात. एका बाजूला आयुष्यमान वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा तऱ्हेचे आजार! माणसाला माणूस म्हणून जगू न देणारे आजार वाढणार आहेत. अशा वेळी मला वाटते, की इच्छामरणासाठी कायद्याने ज्या सुविधा दिल्या आहेत, तशीच सोय जागतेपणी तशा पद्धतीचे पत्र किंवा फॉर्म भरून ठेवण्याची कायद्याने मागितली गेली पाहिजे. कायदा अशासाठी, की जे कोणी घरातून अशा आजारी माणसाला काढून बाहेर कोठेतरी सोय करतील तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही. अशा प्रकारचे पत्र लिहिण्यासाठी जी मानसिक तयारी लागते ती करण्यासाठी मला वाटते, की बार्बराची तात्त्विक भूमिका उपयोगी पडेल. जिवंतपणाने जगणे महत्त्वाचे; आयुष्य वाढवत राहणे हे उद्दिष्ट असू नये. म्हणूनच, केवळ मरणासन्न अवस्थेमध्ये व्हेण्टिलेटर काढावा की नाही हा निर्णय मर्यादित परिस्थितीचा विचार करतच घेतला जाऊ नये, तर स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर यासाठीही तशा प्रकारचा कायदा उपलब्ध व्हावा असे मला वाटते.

– छाया दातार

chhaya.datar1944@gmail.com

(ल्युसी रॉक हिने बार्बरा एहानराइच हीची मुलाखत 'गार्डियन' ह्या वृत्तपत्रासाठी घेतली होती. [8 एप्रिल, 2018] त्या मुलाखतीचा संदर्भ वरील लेखासाठी घेतला आहे. )

About Post Author