मनोरंजनाचे कल्पनादारिद्र्य

0
14

प्रत्येक क्षेत्रात 'मनोरंजन' घुसखोरी करतंय आणि 'मनोरंजन' म्हणजे काय व त्यात काय काय समाविष्ट होतं, हे ठरवणारे लोक दुर्दैवाने कल्पनादारिद्र्याच्या रेषेखालचे आहेत. त्यांच्या गरिबीविषयी केवळ कणव करण्याखेरीज आणि हताशपणे पाहत राहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही, असं वाटत राहतं.

टीव्हीवरचे कोणत्याही पुरस्कारांचे कार्यक्रम, इतर सोहळे साजरे होतात ते कार्यक्रम पाहिले की हे तीव्रतेने जाणवत राहतं. तेच कॉपीपेस्ट करून बाकी सरसकट क्षेत्रांमध्ये वापरणं गेली काही वर्षं सुरू झालं आहे. तेच चेहरे, तेच कवायतवजा नाच, तीच गाणी, तेच केविलवाणे विनोद, तीच हास्यास्पद निवेदनं आणि तोच बेगडीपणा अंर्तबाह्य भरून राहिलेला.

नाट्य, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्येही आता हे कॉपीपेस्टिंग वाढत चाललं आहे.

मी विद्यार्थी असताना नांदेडला जे साहित्यसंमेलन झालं होतं, त्यात एक शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होता आणि एक बहिणाबाई चौधरींच्या गीतांचा. त्यानंतरच्या संमेलनापासून गणितं वेगानं बदलत गेली. यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे हिशेब आज जाहीर झालेत, ते वाचताना 'मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा खर्च' हा आकडा रोचक आहे.

अभिनयाच्या क्षेत्रातल्या लोकांकडून वृत्तपत्रांमध्ये 'कॉलम' लिहून घेणं वाढल्यापासून आता हेच लोक 'लेखक-कवी' आहेत आणि लेखनाचा दर्जा तो हाच, असा समज वाढत चाललाय. संमेलनांमध्ये या 'लेखकांचा' एखादा तरी परिसंवाद असतोच आणि लोक तो 'बघायला' येतात. आणि मीडियाला खुश करण्यासाठी पत्रकार-संपादकांचा समावेश देखील मुबलक दिसतो. प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या सेलिब्रेटीला बोलावणं आवश्यक वाटतंय. ही केवळ घसरण नव्हे, तर हे सपाटीकरण आहे.

आजची दुसरी बातमी काल ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने शासनाचे जो सोहळा आयोजित केला त्याची. त्यातही गायक-अभिनेते यांचा भरणा होता. किशोर कदम हा दोन्ही क्षेत्रांतला म्हणून अपवाद. नेमाडे आणि मोरे हे दोनच साहित्यिक व्यासपीठावर होते आणि नेमाडेंच्या भाषणालाही कार्यक्रमात स्थान नव्हतं, त्यांचं जुनं रेकॉर्डेड भाषण ते हयात व उपस्थित असताना दाखवण्याचं काहीएक कारण नव्हतं. हे बिनडोकपणे आखलेले कार्यक्रम नेमके कोण आखतं, हेही पाहायला हवं. कार्यक्रमात अभिवाचन, कवितांचं सादरीकरण हा एक भाग होता हे नशीबच… पण संपूर्ण कार्यक्रम असाच असावा हा विचारांचा आळस आणि कल्पनांचा दुष्काळ कशासाठी? इतका अमाप खर्च करून काहीतरी वरवरचं, उथळ का साजरं करायचं?

व्याख्यानंही मनोरंजक हवीत, काव्यवाचनं मनोरंजक हवीत… तिथं टाळ्या-वाहवा यांची दाटी झाली पाहिजे… असं वाटणं हे कशाचं निदर्शक आहे? बुद्धिरंजन नावाचा एक प्रकार असतो, याची जाणीव शब्दशः 'संपुष्टात' आलीये… आणि हा सगळा खळखळाट निमूटपणे पाहत राहण्यावाचून गत्यंतर राहिलं नाहीये.

– कविता महाजन

About Post Author

Previous articleकुंडलिकचे मोहोरदार तबलाबोल!
Next articleअप्पासाहेब बाबर – डोंगरगावचा विकास
कविता महाजन या प्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री आहेत. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या 'प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय' येथे झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयात एम.ए. ची पदवी मिळवली आहे. त्‍यांनी ब्र आणि भिन्‍न यांसारख्‍या पुस्‍तकांमधून भोवतालच्‍या सामाजिक वास्‍तवाचा वेध घेतला आहे. त्‍यांच्‍या कवितांमधूनही त्‍यांनी सामाजिक वास्‍तव अधोरेखित करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांना 2008 साली कवयित्री बहिणाबाई पुरस्कारासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तर 2011 साली 'रजई' या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार लाभला. त्‍यांनी 'कुहू' ही कादंबरी मल्टिमिडीया फॉर्ममध्‍ये लिहून आगळावेगळा प्रयोग केला. त्‍या कादंबरीसाठी त्‍यांनी त्रेचाळीस तैलचित्रे काढली. तथापी कविता महाजन यांचे कार्यक्षेत्र साहित्‍यापुरते मर्यादीत नाही. त्‍यांची सामाजिक कार्यकर्ता आणि चित्रकार अशीही ओळख तयार झाली आहे. लेखकाचा दूरध्वनी 98923520272