मटणाचे तुकडे आणि ब्राह्मणी मर्दानगी…

0
50

२०२० साली, स्वत:च स्वत:ला महासत्ता घोषित करू पाहणा-या देशातल्या उच्चशिक्षित तरुण पुरूषांची मानसिकता सानियाच्या लग्नाच्या निमित्तानं जगाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील, विशेषत: इंग्रजांकडून संघर्षातून स्वातंत्र्य मिळवल्याच्या गाथा गाणारा समाज आपल्या समाजातल्या स्त्रियांना किती दुय्यम मानतो हे जगाला दिसलं. भारतातली राष्ट्रीयत्वाची भावना, पितृसत्ताकतेमुळे देशाचं मोठं मानवी भांडवल (human capital) गमावावं लागेल या विचारातून आलेलं वैफल्य, बहुसंख्याक-अल्पसंख्याक राजकारणाचे अनेक पदर, शत्रूनं आपली पोरगी पळवल्यामुळे वाटणारी अपमानाची भावना, शिक्षित समाजात भारतीय राज्य-घटनेतल्या आधुनिक मूल्यांबाबत असणारा टोकाचा अनादर अशा अनेक गोष्टी सानियाच्या लग्नावरच्या प्रतिक्रियांनी दाखवून दिल्या.

मटणाचे तुकडे आणि ब्राह्मणी मर्दानगी…

– किशोर दरक

‘चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या तोंड कर इकडे’ हा उखाणा
एप्रिल २०१०च्या पहिल्या आठवड्यात इंटरनेटवर जोरदार फॉरवर्ड होत होता, असे आणखी उखाणे तयार करावेत या आवाहनासहित. निमित्त होतं प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाच्या शोएब मालिकसोबत झालेल्या लग्नाचं. टेनिससारख्या खेळात प्राविण्य दाखवून लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या एका मुस्लिम तरुणीनं भारताच्या ‘कट्टर’ शत्रुराष्ट्रातल्या एका क्रिकेटपटूशी लग्न करणं हे ‘भारतीयांना’ अमान्य होतं. भारतीयांना म्हणजे ज्यांच्या हातात वर्तमानपत्रं, दूरचित्रवाहिन्या, इंटरनेट इत्यादी माध्यमं आहेत त्या उच्चवर्णीय, ब्राह्मणी मानसिकतेच्या पुरूषांना. या लग्नाचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या –

चित्र - गिरीश कुलकर्णी१.सानिया देशद्रोही आहे. २. मुस्लिमांची निष्ठा पाकिस्तानशीच असणार. ३. सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्या. ४. सानिया अन् तत्सम मुले लफडेबाज असतात. ५. तिनं झहीर खान किंवा इरफान पठान किंवा महम्मद कैफ अशा भारतीय किक्रेटपटूशी लग्न करायला हवं होतं. ६. भारतात काही लायक तरुणांची कमतरता नाही. मग तिनं एका लफडेबाज पाकिस्तान्याशी लग्न का करावं? ७. सानिया आय.एस.आय.ची एजंट बनली अन् ‘आपोआप’ पाकिस्तानी झाली. त्यामुळे तिनं पाकिस्तानकडून खेळावं. ९. मुस्लिम पुरूष चार बायकांशी लग्न करून पंचवीस पोरं पैदा करतात.
( हम पांच, हमारे पचीस) त्यामुळे सानिया काही दिवसांतच खूप सारी ‘पोरं काढून’ स्वत:चा ‘फॉर्म’ अन् ‘फिगर’ घालवून भारतात परत येणार!

प्रसिद्ध झालेल्या प्रतिक्रिया साधारणत: या नऊ गटांत विभागता येतील. ( या प्रतिक्रिया मी अतिशय सौम्य करून लिहिल्यात. अनेकदा, लोकांनी सानियाच्या शरीराची साद्यंत वर्णनं करून प्रतिक्रिया दिल्या होत्या.) या नऊ गटांखेरीज क्वचित उमटलेली प्रतिक्रिया म्हणजे तिचा हा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे माध्यमांनी त्याची चर्चा करून तिचं महत्त्व वाढवू नये. ‘शोएब मलिकचं आधीचं तथाकथित लग्न, त्याचा तलाक, सानियाचा आधी झालेला साखरपुडा या सगळ्या गोष्टींनी मार्च-एप्रिलमध्ये जवळपास दोन आठवडे ‘ब्रेकिंग न्यूज’ची सोय पुरवली. किळसवाण्या, जळजळीत, हिस्त्र; क्वचितप्रसंगी सभ्य शब्दांत गलिच्छ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करणारे नव्वद टक्क्यांहून जास्त लोक पुरूष होते. हे सर्वजण ज्या माध्यमांमधून, ज्या ठिकाणांहून स्वत:चं मत व्यक्त करत होते ते पाहता हे सर्व उच्चशिक्षित, उच्चवर्गीय गटातले तरूण पुरूष होते असं म्हणता येईल.

सानिया मिर्झाच्या शोएब मालिकसोबत...२०२० साली, स्वत:च स्वत:ला महासत्ता घोषित करू पाहणा-या देशातल्या उच्चशिक्षित तरुण पुरूषांची मानसिकता सानियाच्या लग्नाच्या निमित्तानं जगाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील, विशेषत: इंग्रजांकडून संघर्षातून स्वातंत्र्य मिळवल्याच्या गाथा गाणारा समाज आपल्या समाजातल्या स्त्रियांना किती दुय्यम मानतो हे जगाला दिसलं. भारतातली राष्ट्रीयत्वाची भावना, पितृसत्ताकतेमुळे देशाचं मोठं मानवी भांडवल (human capital) गमावावं लागेल या विचारातून आलेलं वैफल्य, बहुसंख्याक-अल्पसंख्याक राजकारणाचे अनेक पदर, शत्रूनं आपली ‘पोरगी’ पळवल्यामुळे वाटणारी अपमानाची भावना, शिक्षित समाजात भारतीय राज्य-घटनेतल्या आधुनिक मूल्यांबाबत असणारा टोकाचा अनादर अशा अनेक गोष्टी सानियाच्या लग्नावरच्या प्रतिक्रियांनी दाखवून दिल्या. देशातली बहुविधता शिकवायला किंवा लोकशाहीसारखे आधुनिकतेचा पाया असणारं मूल्य शिकवायला स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षण कसं निरुपयोगी ठरलंय याचं एक उदाहरण म्हणूनदेखील या घटनेकडे पाहता येईल.

पाकिस्तानातल्या उच्चशिक्षितांनी ‘सानिया पाकिस्तानकडून खेळेल’ या आशेतून किंवा अटीतून या लग्नाचं संमिश्र स्वागत केलं. त्यातही ‘शत्रूची पोरगी पळवली’ हा आनंद लपत नाही. दोन्ही देशांतल्या सर्वसामान्य म्हणजे कष्टकरी गटातल्या, उत्पादक  वर्गातल्या लोकांना या लग्नाबद्दल काय वाटतं हे माध्यमांमधून कळू शकलं नाही. कारण जागतिकीकरणोत्तर जगात माध्यमं फक्त ‘मार्केट’धार्जिण्या क्रयशक्तीच्या तर्कानुसार काम करतात. विकता येण्याजोगी प्रत्येक गोष्ट विकायची अन् विकता न येण्याजोग्या सुख-दु:खासारख्या भावना ‘विक्रेय’ बनवून विकायच्या, लोकांना खरेदी करायला भाग पाडायच्या- त्यांची सवय लावायची हे ‘मार्केट’चं धोरण. उन्मुक्त मार्केट साध्या गोष्टींनादेखील कसं consumable बनवून विकतं हे सानियाच्या लग्नामुळे जगाला नव्यानं कळलं.

लेखाच्या सुरूवातीच्या उखाण्याकडे आपण पाहू. इंटरनेटवर फिरणा-या या उखाण्यातून हिंदूंचं मुस्लिमांबद्दलचं घोर अज्ञान दिसून येतं. शिवाय, त्या अज्ञानावर असणारी ब्राह्मणी विचारसरणीची पकड! चांदीच्या ताटात जिलेबीचे किंवा इतर कोणत्या मिठाईचे तुकडे असू शकले असते. पण मुस्लिमांच्या लग्नात अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मांसाहार. मांसाहार हा उच्चजातीय हिंदूंना निषिद्ध आहे अन् म्हणून तो अपवित्र आहे असा एक मोठा समज आहे. (ही सर्व मंडळी ‘दृश्य’ आधुनिकतेच्या नावाखाली हॉटेलमध्ये मनसोक्त मांसाहार करून वैदिक परंपरा जपतात अन् ‘आमच्या घरी नॉनव्हेज चालत नाही’ असा टेंभा मिरवतात.) ‘ओन्ली व्हेज’ हॉटेलचं भाषांतर निव्वळ\फक्त शाकाहारी असं न करता ‘शुद्ध शाकाहारी’ असं करून, परत त्याचं इंग्रजीमध्ये ‘प्युअर व्हेज’ असं भाषांतर करण्यामागे मांसाहार करणा-या, शोषक जातिपरंपरांमुळे मांसाहार करावा लागणा-या तमाम जाती-धर्मांना हीन लेखण्याचा हेतू असतो. सत्ता अन् संपत्ती हाताशी असलेला हा वर्ग वाटेल त्याला पवित्र किंवा अपवित्र ठरवू शकतो. सानियाच्या लग्नावर प्रतिक्रिया व्यक्त करणा-या सर्वांना मांसाहार कितीही चविष्ट वाटत असला तरी ‘नवरीनं नव-याला मटणाचा घास भरवणं’ ही क्रिया लग्नासारख्या पवित्र (?) कार्यक्रमात अपवित्र वाटते. म्हणून सानियासाठी ठेवणीतला उखाणा रचला जातो. शिवाय, लग्न कुणाचंही अन् कोणत्याही जमान्यातलं असलं तरी नवरीनं लाजत-मुरडत उखाणा घेऊन परंपरांचं वहन, रक्षण अन् पुनर्निर्मिती करावी अशी अपेक्षा असते. स्वत:ला अत्यंत आधुनिक म्हणवून घेऊन ultra modern gadgets बाळगणारे उच्चजातीय पुरूष जेव्हा स्वत:च्या लग्नाची जाहिरात देतात किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्वत: थ्रीपीस सूट घालून शेजारी बायकोनं पारंपरिक वेशातच उभं राहवं अशी अपेक्षा बाळगतात, तेव्हा पुरूषांमधलं आधुनिकीकरण कसं वरवरचं आहे ते दिसतं.

‘आम्हाला कपडे, वस्तू, जगण्याची साधनं… सगळी अगदी लेटेस्ट अन् आधुनिक हवीत. पण विचारसरणी मात्र पारंपरिक पुरुषसत्ताकतेची जपायचीय. ‘म्हणजेच भौतिक पातळीवर एकवीस किंवा जमलं तर बाविसाव्या शतकात पण वैचारिक पातळी मात्र मध्ययुगीन, अशा प्रकारची आधुनिकता आम्हाला हवी.

माध्यम इंटरनेटसारखं वापरलं तरी लग्नाबद्दलचा विचार उखाणे घेत घास भरवण्यावर संपणारा आहे. ही पद्धत टिकून राहिली तरच पुरुषांची सत्ता टिकणार, म्हणून आम्ही ‘आमच्या’ स्त्रियांना तर या बंधनात ठेवतोच; शिवाय, ‘त्यांच्या’ स्त्रियांसाठीदेखील अशीच बंधनं सर्जकतेचं उदाहरण म्हणून रचतो.

भारताची अस्मिता, राष्ट्रीयत्वाची भावना अन् त्यांना बसलेला धक्का हा या लग्नावरच्या प्रतिक्रियांचा अजून एक पैलू, भारतामध्ये मुस्लिमांचं, विशेषत: मुस्लिम स्त्रियाचं स्थान हे दुय्यम किंवा असमान नागरिकांचं आहे ( म्हणजे राज्यघटनेनं ते तसं मांडलं नाही तर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्राबल्यामुळे ते तसं बनलंय.) भारतीय बहुसंख्याकांच्या मनात ‘मुस्लिम’ या अल्पसंख्य समाजाविषयी जी भावना आहे तिचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर ‘संशय’ हाच शब्द योग्य ठरेल. पाश्चिमात्य माध्यमांच्या प्रभावामुळे सामाजिक सामान्यज्ञान म्हणून, शालेय पाठ्यपुस्तकांच्या प्रभावामुळे वैध ज्ञान म्हणून, तर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या सांस्कृतिक माध्यमांच्या प्रभावामुळे परकीय आक्रमणकर्त्यांविषयीचं ज्ञान म्हणून या देशातला बहुसंख्य समाज मुस्लिमांकडे संशयानं पाहायला शिकला. या संशयामुळे मुस्लिमांच्या मनात भारतीय राष्ट्रीयत्वाची भावनाच नसते असा समज सार्वत्रिक झाला. सानियाच्या लग्नाबाबत तिचा नवरा पाकिस्तानी असणं हे तिच्या देशद्रोहाचं अन् धर्मनिष्ठेचं लक्षण मानलं गेलं. जर ती खरी भारतीय असली तर तिनं शत्रुराष्ट्राच्या नागरिकाशी लग्न केलंच नसतं असं म्हणून लोकांनी तिच्या भारतीयत्वाबद्दल संशय व्यक्त केला. जेव्हा ती टेनिस कोर्टावर भारतीय म्हणून उतरते तेव्हा तिच्या विजयामध्ये भारताचा विजय पाहणारा समाज लग्नासारख्या तिच्या वैयक्तिक निर्णयामुळे भारताचा पराजय झाल्याचं मानतो, कारण ती नुसती मुस्लिम नाही तर ती एक स्त्री आहे. सानियाच्या जागी एखाद्या पुरुष खेळाडूनं पाकिस्तानच्या स्त्री खेळाडूशी लग्न केलं असतं तर आमचा हा विजय आहे या भावनेतून कदाचित त्याचं स्वागत झालं असतं!

प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्रा. उमा चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार, ‘लग्नानंतर स्त्रीवर तिच्या नव-याचा अधिकार असतो. लग्नाआधी बापाची मालमत्ता असलेली स्त्री लग्नानंतर नव-याची मालमत्ता होते; हा विचार ब्राम्हणी पुरूषसत्ताकतेच्या माध्यमातून जातींची पुनर्निर्मिती करण्याचा अन् वंशाचं पावित्र्य टिकवून ठेवण्याचा पाया आहे’. हे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिकतेचं नियंत्रण करणं हा पुरुषांच्या डावपेचांचा भाग बनतो. आपल्या समाजातली स्त्री जेव्हा शत्रूकडून पळवली जाते तेव्हा तिच्या लैंगिकतेवर अन् पुनरुत्पादनावर शत्रुपक्षातल्या पुरुषांचं नियंत्रण प्रस्थापित होतं हे ब्राह्मणी मानसिकतेचा पुरुष जाणून असतो. कारण त्यानं स्वत:च्या समाजातल्या स्त्रियांनादेखील अशाच नियंत्रणाखाली ठेवलंलं असतं. हे नियंत्रणं फक्त शिक्षेतून नव्हे तर स्त्रियांच्या कौतुकातून, स्त्रियांच्या विशिष्ट प्रकारच्या वागण्याला समाजमान्यता देऊन, पातिव्रत्याचं भरमसाठ उदात्तीकरण करून प्रस्थापित केलं जातं. पितृसत्ताकता टिकवून ठेवण्याचे हे मार्ग अनेकदा स्त्रियांच्या विचारसरणीला इतकी गुंगी आणणारे असतात, की त्यादेखील पितृसत्ताकता कधी विनातक्रार तर कधी अस्फुट विरोध करुन सहज स्वीकारतात.

सानियाकडे भारतीय समाजानं आपलं मोठं मानवी भांडवल म्हणून पाहिलं अन् तिच्या लग्नामुळे आपल्या शत्रूनं आपलं हे भांडवल हिरावून घेतल्याची भावना बळावली. तिचं लग्न झाल्यामुळे तिच्या पुनरुत्पादनावर नव्हे तर उत्पादकतेवरदेखील तिच्या नव-याचं नियंत्रण प्रस्थापित होणार हे आपण गृहित धरलं, कारण स्त्रियांना जसं स्वत:च्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याचं स्वातंत्र्य नाही; तसंच ते स्वत:च्या उत्पादकतेबद्दल किंवा मालमत्तेबद्दलदेखील नाही. पितृसत्ताकतेचं हे आणखी एक सूत्र आपल्या समाजमनात चांगलं मुरलंय. म्हणून उच्चजातीय ब्राह्मणी मानसिकतेचा पुरूष सानियाच्या लग्नाला भारतीयांचा पराजय मानतो.

‘सानिया पाकिस्तानी झाली. त्यामुळे तिचा खेळ आता पाकिस्तानसाठी असणार’ असं म्हणणारा भारतीयांचा  मोठा गट सध्या अमेरिकेत राहतो. ‘ग्रीन कार्ड’ मिळवणं ही आयुष्यातली ‘ultimate achievement’ वाटणारा हा वर्ग, त्याचे स्वत:चे श्रम अन् कौशल्य या दोन्ही गोष्टी अमेरिकेसारख्या प्रगत देशांना ‘अर्पण’ करताना, भारतात अन् अमेरिकेत कौतुकाचा धनी होतो. ‘ इतकी वर्षें देशानं पोसल्यावर आपली उत्पादकता आपण दुस-या देशासाठी खर्ची करतो याबद्दल अजिबात खंत न वाटणारा हा वर्ग निस्सीम राष्ट्रभक्त म्हणून मिरवतो. भारताचा नागरिक म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन अमेरिकेत भारतीय किंवा मराठी बाण्याचे झेंडे गाडणारा हा वर्ग सानियाला लग्नासारख्या खाजगी गोष्टीचं देखील स्वातंत्र्य नाकारतो, कारण ती स्त्री असल्यामुळे तिच्या शरीरावर, बुद्धिमत्तेवर, कौशल्यावर, उत्पादकतेवर अन् पुनरुत्पादनावर तिच्या नव-याचं नियंत्रण असणं ‘साहजिकच’ आहे असं या वर्गाला वाटत असतं.

अनेकांनी सानियानं युनूस पठाण किंवा महम्मद कैफसारख्या भारतीय खेळाडूसोबत लग्न करायला हवं होतं, असं प्रतिक्रिया म्हणून सुचवलं. एखाद्या हिंदू खेळाडूचं नाव कुणी चुकूनही सुचवलं नाही. कारण सोपं आहे यातून जातिधर्मांच्या रक्ताची सरमिसळ टाळता येईल. मुस्लिम ‘ब्याद’  हिदू घरात पाठवावी लागणार नाही अन् देशाची ‘संपत्ती’ देशातच राहील.

सोनिया गांधी यांनी १९९८ साली काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला. त्यांना ‘इटालीयन ख्रिश्चन’ म्हणून हिणवणा-या हिटलरच्या भारतीय अवतारांपासून त्यांच्या विदेशीपणाच्या मुद्यावर काँग्रेस फोडणा-या ‘जाणत्या राजा’पर्यंत सर्व नेत्यांना ज्या वर्गातून मोठा पाठिंबा मिळाला तोच वर्ग सानियाच्या लग्नामुळे आपोआप पाकिस्तानी बनतोय. सोनिया गांधी जर लग्नानंतर इतकी वर्षें भारतात राहूनदेखील भारतीय होऊ शकत नसतील तर लग्नानंतर दुबई किंवा लंडनमध्ये स्थायिक होण्याची भाषा करणारी सानिया ताबडतोब अन् ‘आपोआप’ पाकिस्तानी कशी काय होते.? सानिया आमच्या शत्रूशी लग्न करून तिच्यावर सत्ता गाजवण्याची आमची संधी हिरावून घेते तर सोनिया आमच्यावर सत्ता गाजवण्याची भीती आम्हाला वाटते. स्त्री सत्ताधारी असू शकत नाही हे सूत्र आम्हाला आमच्या ब्राह्मणी पुरुषसत्ताकतेनं सांगितलं. म्हणून आम्ही सानियाला पाकिस्तानी बनवून हाकलून देतो अन् सोनियाला भारतीय बनण्यापासून रोखतो.

भारतासह जगातले अनेक देश आपल्या शाळांमधून, अभ्यासक्रमांमधून नागरिकत्वाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. भारतीय शिक्षणाचं उद्दिष्ट चिकित्सक विचार करणारे नागारिक तयार करणं हे १९५२ पासून आहे. पण गेल्या काही वर्षांतला पोकळ माध्यमांचा सर्वदूर प्रसार, धर्म-भाषा-जात व या सर्व मुद्यांवरच्या मूलतत्ववादी संघटनांना मिळणारा वाढता पाठिंबा यांचा विचार करता भारतात नागरिकत्त्वाच्या शिक्षणात चिकित्सा कधी नव्हती हे दिसून येते. नागरिकत्वाच्या या शिक्षणाला बेबंद राष्ट्रवादाची, निर्बुध्द देशभक्तीची जोड मिळाल्यामुळे अन् टोकदार राष्ट्रवादी अस्मितांमुळे पाकिस्तानचा धिक्कार हे भारतीयत्वाचं मोजमाप बनलं. पाकिस्तानचा धिक्कार, निषेध जितका तीव्र तितकी ती व्यक्ती जास्त राष्ट्रभक्त असा समज देशात सगळीकडे आढळतो. या पार्श्वभूमीवर सानियानं देशाचं नाक कापल्याची भावना तिच्या लग्नावरच्या प्रतिक्रियांमध्ये आढळते. नागरिकत्वाचं चुकीचं शिक्षण अन् मानवतेच्या शिक्षणाचा अभाव, यांमुळे ‘आपल्या’ माणसांनी जगात सगळीकडे राज्य गाजवावं असं वाटणारा समाज जन्मानं भारताबाहेरच्या लोकांना भारतात मानाचं स्थान मिळालं की अस्वस्थ होतो. भारतीय वंशाचा बॉबी जिंदाल अमेरिकेच्या एखाद्या प्रांताचा गव्हर्नर होऊ घातला किंवा भारतीय वंशाची सुनिता विल्यम्स् अंतराळात गेली की भारतात उत्सवांना उधाण येतं. (खरं तर, सुनिताची आई भारतीय नाही, वडील आहेत. त्यामुळे ती मिश्रवंशाची ठरावी. पण वंशनिश्चिती बाप करतो हा आपला पक्का समज!)  याउलट, भारतीय लोकांनी निवडून दिलेल्या सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधानपदावर बसण्याची शक्यता निर्माण झाली की सुषमा स्वराजसारखे ‘ पातिव्रत्याचे पुतळे ’ टक्कल करून घेण्याची भाषा बोलून लोकशाहीविषयीचा अनादर व्यक्त करतात. अमेरिकेत जन्मून मराठीचा ‘म’ देखील न जाणणा-या मराठी भाषक आईबापांच्या मुलांनी त्यांच्या अमेरिकन शाळेत मिळवलेल्या एखाद्या छोट्याशा बक्षीसाचं ‘कौतुक मराठीचा झेंडा अटकेपार ’ अशा शब्दांत करणा-या मराठी माध्यमांना भोपाळ हत्याकांडाच्या खटल्यात ( याला काही लोक वायुगळती किंवा दुर्घटना म्हणतात )  शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश असणा-या विजय गोखले नामक उच्चजातीय उच्चपदस्थाच्या ‘मराठी’पणाबद्दल चकार शब्दही काढावा असं वाटत नाही, याचं कारण आपल्याकडचं नागरिकत्वाचं चुकीचं शिक्षण हेच आहे. स्वत:च्या स्वातंत्र्याबद्दल काही प्रमाणात जागरूक करणारं हे शिक्षण इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करायला शिकवत नाही. म्हणून सानियाच्या लग्नासारख्या घटनांवर बेताल प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे देशभक्ती सिद्ध होते असं लोक मानू लागतात.

सानिया मिर्झा कुणी साधी मुलगी नाही. ती एका उच्चभ्रू मुस्लिम घरातली, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली प्रसिद्ध खेळाडू आहे. ती ‘ पब्लिक पर्सनॅलिटी ’ असल्यामुळे तिचं अभिजनत्व खाजगी नाही तर सार्वजनिक, दृश्य स्वरूपाचं आहे.  ‘तिच्या खेळाला आम्ही मनापासून दाद दिली होती. त्यामुळे तिच्या लग्नावर टीका करण्याचा हक्क आम्हाला आहे ’ असं मानणारा एक वर्ग आहे. मात्र तिच्या खेळाबद्दल जेव्हा कौतुक व्यक्त केलं जायचं तेव्हा तिचं भारतीय असणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. पण बायकोच्या जात-धर्मावर नव-याचं नियंत्रण मान्य करणा-या परंपरेला आम्ही बायकोच्या नागरिकत्वासारख्या आधुनिक ओळखीवर देखील लादतो.

भारत-पाकिस्तान दरम्यान अनेक जणांची लग्नं (पाकिस्तानी मुलगी भारतीय मुलगा किंवा पाकिस्तानी मुलगा भारतीय मुलगी.) अव्याहतपणे चालू आहेत. त्यांत बहुसंख्य मुस्लिम लोक आहेत, पण त्या लग्नांविषयी आपण काही बोलत नाही. कारण ती लग्नं सर्वसामान्यांमधील असतात. त्या लोकांची परिस्थिती जवळपास सत्ताहीनतेची असते. कारण ते खालच्या वर्गातले असतात अन् दुसरे म्हणजे ते मुस्लिम असतात. क्वचित प्रसंगी अशी लग्नं दोन्ही देशांमधल्या अभिजनांमध्ये होतात. पण त्यांचं अभिजनत्व खाजगी असतं. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य-बहुसंख्य राजकारणाचे अन् सत्तासमीकरणांचे सगळे कंगोरे इथे लागू होतात. देशाच्या राज्यघटनेनं मुस्लिमांसारख्या देशद्रोह्यांना देखील हिंदूसारखे अधिकार बहाल केले असल्याचा सल आमच्या ब्राह्मणी विचारसरणीच्या मनाला बोचत राहतो. शिवाय, सानियासारख्या अभिजनवर्गीय मुलीचं लग्न आपण कितीही आटापिटा केला तरी रोखू शकत नाही. हा रोष मनात खदखदतो. म्हणून आमच्या हातातल्या सर्व माध्यमांमधून आम्ही सानियाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावण्यापासून तिच्या नागरिकत्वाकडे संशयानं पाहण्यापर्यंतचे सगळे प्रकार वापरून आमचा हिडीस निषेध व्यक्त करतो.

मुस्लिमांच्या ‘हम पॉंच हमारे पचीस’ या धोरणामुळे सानिया लवकरच सर्वस्व गमावून,चार-दोन पोरं घेऊन परत येईल अशी शापवजा भविष्यवाणी अनेकांनी व्यक्त केली. हम पॉंच हमारे पचीस ही घोषणादेखील हिंदूंच्या सामाजिक सामान्यज्ञानाचा भाग बनली. अशा बिनडोक घोषणांवर मनापासून विश्वास ठेवून आपण आपलंच हसं करून घेतो हे मात्र लोकांना कळत नाही. साधा विचार केला तर या घोषणेमागचा तर्कदुष्टपणा अन् राजकारण लक्षात येईल. मुस्लिम पुरुषांनी हिंदू स्त्रियांशी लग्न करण्याचं प्रमाण जवळपास शून्य टक्के आहे. स्त्री-पुरुष लोकसंख्येचं प्रमाण अगदी पन्नास-पन्नास टक्के मानलं( खरं तर! स्त्रियांची संख्या कमी आहे) तरी एका मुस्लिम पुरुषानं चार मुस्लिम स्त्रियांशी केली तर तीन मुस्लिम पुरुष अविवाहित राहणार. त्यामुळे हम पॉच-हमारे पचीस ही घोषणा फैलावण्यामागे वस्तुस्थिती नसून हिंदू पुरुषांच्या मर्दानगीला आलेलं वैफल्य आहे. मुस्लिम पुरुषाला उपभोगायला चार स्त्रिया मिळू शकतात, हिंदूंना मात्र एकच स्त्री उपभोगण्याचा अधिकार आहे या समजातून आलेलं नैराश्य अशा बिनबुडाच्या घोषणांना जन्म देतं.

मध्ययुगीन सरंजामी काळातला ‘नर’ ब्राम्हणी मानसिकतेच्या पुरुषांच्या देहात आजही वास्तव्य करून आहे. लोकशाही,सामाजिक न्याय अशा आधुनिक मूल्यांचे बुरखे या पुरुषांना लोकलाजेस्तव पांघरावे लागतात.पण आतल्या मध्ययुगीन नरामुळे मुस्लिम पुरुषांना जास्त प्रमाणात मिळू शकणा-या स्त्रीनामक उपभोग्य वस्तूचं आकर्षण ते लपवू शकत नाहीत. ‘स्वतःचा मर्दपणा सिध्द करण्याची जितकी संधी मुस्लिम पुरुषांना मिळू शकते तितकी संधी आम्हाला मिळू शकत नाही’ हे मुख्य दुखणं आहे. अर्थात याला जनगणनेचा आधार आहे.

विवाहविषयक कायद्यांमधल्या फरकांमुळे स्वतःला ‘कमी’ मर्द समजणा-या, मुस्लिम पुरुषांबद्दल तीव्र लैंगिक ऊर्जाव्देषाच्या भावनेनं ग्रासलेल्या, उच्चजातीय मानसिकतेच्या हिंदू पुरुषांना सानियाच्या लग्नानं आयतं कोलीत मिळवून दिलं. तिच्या लग्नाचा निषेध करून ते ब्राम्हणी पुरुषसत्ताक मूल्यं तर जोपासतातच; शिवाय, मुस्लिम पुरुषांच्या मर्दानगीचा पराभव झाल्याचा आनंद व्यक्त करतात. सानियाच्या ताटात मटणाचेच तुकडे वाढून शोएबला मरतुकडा म्हणण्यामागे ब्राम्हणी मर्दानगीचा विजय झाल्याचं तर्क(ट) शास्त्रदेखील आहे!

आभारः प्रा.राणू जैन, टाटा इस्न्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई
      माधुरी दीक्षित,
पेमराज सारडा कॉलेज, अहमदनगर.

किशोर दरक

भ्रमणध्वनी : 9423586351

kishore_darak@yahoo.com

किशोर दरक हे शिक्षणशास्त्र विषयातील एम.ए. आहेत. ते गणित शिक्षक म्हणून व्यवसाय करतात; आठवी-नववीच्या मुलांना गणित शिकवतात. त्याशिवाय मुख्यत: शिक्षण विषयावर नियतकालिकांतून लेखन करतात. त्यांचा हा लेख ‘अन्वीक्षण’मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला आहे. तेथून तो साभार पुन:प्रसिद्ध करत आहोत.

About Post Author

Previous articleअद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….
Next articleसारेच अविवेकी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.