मंडई विद्यापीठ!

1
45
mandaisepiaweb_288_f

कोणत्याही वास्तूकडे आणि वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वपूर्ण असते. महात्मा फुले मंडईच्या बाबतीतही हेच लागू पडते. मंडई परिसराची सध्याची अवस्था पाहिली तर अतिक्रमणांचा चक्रव्यूह, वाहतुकीचा धुरळा आणि स्थानिक रहिवाशांना साता जन्मीचे पाप असेच वाटण्याची शक्यता आहे! वरकरणी, हे सत्य आहे असे वाटले तरी आम्ही आयुष्याची पन्नास वर्षे, त्याच मंडईच्या परिसरात, अंगण समजून वावरलो आहोत, वाढलो आहेत. वर्तमान अनुभवताना आमच्या मनात इतिहासाच्या अनेक सुखद स्मृती आहेत. माझ्या पिढीने अनुभवलेला काळ, त्यापूर्वीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्यकाळ यांचा फुले मंडईच्या बाबतीत विचार केला तर वास्तूचा दिमाख तोच आहे, काळ सव्वाशे वर्षे पुढे सरकला आहे, तरीही व्यापाराचे हे केंद्र, आपला ‘मंडई विद्यापीठ’ हा लौकिक राखून आहे.
 

सहजपणे, मी माझ्या मुलाला ‘गुगल ’वर फुले मंडई सर्च करण्यास सांगितले. त्याने काही सेकंदांत ‘बर्डस आय व्ह्यु’ ने आठ पाकळ्यांच्या मंडईचे दर्शन घडवले. एरवी, रस्त्यावरून दिसणारी मंडई आणि वरून दिसणारे त्या वास्तूचे रूप किती वेगवेगळे वाटले! आजुबाजूच्या इमारती तर अगदी छोट्या, चौकोनी ठिपक्यांसारख्या दिसत होत्या. मी तो सर्व परिसर पूर्वी कसा दिसत असेल, त्यामधे भविष्यात आणखी काय बदल होतील याचाच विचार करू लागलो.
 

मानवी संस्कृतीचा विकास हा नद्यांच्या आश्रयाने झाला. पुण्यनगरीसुध्दा मुळा-मुठेकाठी बहरली. गावाचा, शहराचा परीघ जसा विस्तारत गेला तशी पूर्वी, कसब्यात असलेली छोटी मंडई, शनिवारवाड्याच्या पटांगणात, नंतर फुले मंडई आणि काही वर्षांपूर्वी मार्केट यार्ड येथे स्थलांतरित होत गेली. फुले मंडई ही पूर्वी रे मार्केट नावाने परिचित होती. त्या वास्तूच्या आधी, तो परिसर शेत-जमिनीचा आणि काळे वावर म्हणून परिचित होता. त्या वावरामधे चार मोठ्या विहिरी होत्या. सध्या महिलांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेजवळ स्मशानभूमी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. आंबील ओढा त्याच परिसरातून पुढे जाऊन नदीला जोडला गेला होता. तांबडी जोगेश्वरी ही गावाच्या वेशीबाहेरची देवता होती.
 

म्युनिसिपालटीने काळ्या वावरामधे जेव्हा मंडई बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा महात्मा फुले यांनी त्याला विरोध केला, कारण तो खर्च शिक्षणासाठी प्राधान्याने व्हावा, असे त्यांचे मत होते. त्यांच्या पश्चात, त्याच मंडईचे नाव बदलून, महात्मा फुले मंडई असे झाले! म्युनिसिपालिटीच्या ठरावानंतर 1882 मधे मंडईचे बांधकाम सुरू होऊन 5 ऑक्टोबर 1886 रोजी वास्तूचे उदघाटन झाले. वास्तुवैभव ठरलेल्या मंडईची रचना w.m.ducat यांनी कागदावर उतरवली, तर प्रत्यक्ष बांधकाम वासुदेव कानिटकर यांनी पूर्णत्वास नेले. ब्रिटिशांनी आपल्या देशामधे बांधलेल्या बहुतेक सर्व वास्तूंची गुणवैशिष्ट्ये मंडईमधेसुध्दा दिसतात. भव्यता, दगडी भिंती, भव्य कमानी, मुक्त हवा आणि मुबलक सूर्यप्रकाश, भविष्यकालीन वापराचा विचार अशी सर्व गुणवैशिष्ट्ये रे मार्केटमधे होती. विस्तार होताना, पुणे मनपाने त्या मंडईशेजारीच नवी बैठी मंडई 1968 साली सुरू केली. नवी जागासुद्धा अपुरी पडल्याने मंडईतील घाऊक बाजार 1978 मधे मार्केट यार्ड परिसरात स्थलांतरित करण्यात आला. आशियातील भव्य बाजार असा गवगवा झालेली ही वास्तू चाळीस लाख लोकवस्तीच्या पुण्याला अपुरी पडत आहे.
 

महात्मा फुले मंडईतील भाजीबाजाराबरोबर, परिसरातील बाजारपेठही वैशिष्ट्यपूर्णतेने विकसित होत होती. आर्यन, मिनर्व्हा आणि ग्लोब (सध्याचे श्रीनाथ) ही सिनेमागृहे, भाजीपाल्याच्या विक्री आणि वाहतुकीसाठी पूरक असा बांबू-टोपल्यांचा उद्योग (बुरूडगल्ली), पूजेच्या साहित्यासाठी अत्तर गल्ली, टांगातळ, विड्यांच्या पानांसाठी उभारलेल्या शेड्स, कुंभारगल्ली असे सर्व काही कालांतराने विकसित झाले. या व्यतिरिक्त, सणावारानुसार फळे, फुले आणि वस्तू घेऊन, खेड्यापाड्यांतून येणार्‍या विक्रेत्यांमुळे वेळोवेळी बाजारपेठेचे रूप पालटू लागले.
 

अनेकजण व्यापारउदिमाच्या निमित्ताने, या परिसरात स्थिरस्थावर होऊ लागले. कष्टकरी, व्यापारी, दलाल, खरेदीदार असे सर्वजण, जातिधर्मापलीकडे जाऊन, या परिसरात गुण्यागोविंदाने नांदू लागले. या परिसराने जातीय तणावांच्या काळात, नेहमीच, सामाजिक समरसतेचे दर्शन घडवले आहे. 1966चा अपवाद. त्यावेळी अनवधानाने घडलेल्या घटनेचे कारण होऊन त्यास एकदम हिंदू-मुसलमान दंगलीचे स्वरूप लाभले. पण तो प्रकार क्षुल्लकच होता. व्यापाराबरोबर सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेचे भान, रोजगाराचे साधन पुरवताना, या मंडईने कार्यकर्त्यांचासुद्धा पिंड जोपासला आहे. त्यामुळेच, काकासाहेब गाडगीळांनी ‘मंडई विद्यापीठ’ ही संज्ञा प्रचलित केली. या विद्यापीठात घडलेल्या अनेकांनी, विविध क्षेत्रांत, स्थानिक तसेच देशपातळीवरसुद्धा लौकिक प्राप्त केला आहे.
 

टिळक पुतळ्याची स्थापना महात्मा फुले मंडईच्या उत्तरेस, वास्तूलगत 1924 साली करण्यात आली. मेघडंबरी आणि सुशोभित परिसर यामुळे, मंडईचे वास्तुवैभव आणखी बहरले. फुले मंडईच्या आतील बाजुस, मध्यभागी पूर्वी विष्णुशास्त्री चिपळुणकरांचा अर्धपुतळा होता. टिळक पुतळ्याच्या स्थापनेनंतर, त्याच परिसरात अनेक राजकीय पक्षांच्या सभा, आंदोलने, चळवळी यांची मुहूर्तमेढ रोवण्याची किंवा शुभारंभ करण्याची प्रथा सुरू झाली, ती आजतागायत कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, 1945 साली पंडित नेहरू , महात्मा गांधी आणि खान अब्दुल गफारखान यांची सभा येथेच झाली होती. त्यावेळी पं. नेहरू हे सभास्थानी घोड्यावरून आले होते अशी आठवण माजी महापौर आणि अखिल मंडई मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव थोरात यांनी सांगितली. गोवामुक्ती आंदोलन, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील आचार्य अत्रे यांच्या गाजलेल्या सभा याच वास्तूने पाहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोहिते-पाटील, बाळासाहेब ठाकरे ; एवढेच काय दादा कोंडके यांची हाऊसफुल्ल सभा येथेच झाली आहे! कामगार संघटनांचे लढे, असंघटितांचे धरणे आणि उपेक्षितांच्या मागण्या यांसाठी सुध्दा वेळोवेळी हीच वास्तू आधार आणि साक्षीदार अशी चावडी ठरली आहे.
 

जी संस्कृती फुले मंडईच्या परिसरात विकसित झाली, त्यामधे 1972 च्या दुष्काळात स्थापन झालेल्या ‘झुणकाभाकर’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुष्काळामधे, मंडईने अनेकांना रोजगार दिला तर ‘झुणका भाकर केंद्रा’ने केवळ पन्नास पैशांमधे, श्रमिकांच्या पोटापाण्याची काळजी वाहिली. पुण्यातील शाळा-कॉलेजांचे विद्यार्थी, त्या काळात येथे सेवा रूजू करत होते. मी काही श्रमिकांचे विवाहसुद्धा झुणका भाकर केंद्रामध्ये पार पडल्याचे पाहिले आहे. ‘झुणका भाकर’समोरील पटांगण हे तर लोककलाकारांचे अंगण होते. मदारी, गारूडी, बंगाली जादुगार, कसरतपटू; एवढेच काय पण उत्तरप्रदेशातील बहुरूप्यांनीसुद्धा येथे हजेरी लावलेली आहे. पाणवठ्यावर जसे पशुपक्षी जमावेत अशीच ही परिस्थिती होती.
 

फुले मंडईतील मार्केट उपाहारगृह हे प्रथमपासूनच कार्यकर्त्यांचे हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. रामेश्वर हॉटेलच्या बाहेर अनेक वर्षे राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार यांचा कट्टा होता. मनमोकळ्या गप्पा आणि माहितीची देवाणघेवाण यांचे हा कट्टा म्हणजे उत्स्फूर्तपणे फुलणारे केंद्र होते. या हॉटेलला नसलेला दरवाजा हे त्याचे भूषण होते. मिसळ आणि वाटाणा उसळीचा तर्ररीयुक्त वास ही तेथील खासियत होती.
 

फुले मंडई परिसराचा लेखाजोखा मांडताना शारदा-गजाननाच्या मूर्तीचा, मंडळाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. ते केवळ श्रद्धास्थान नाही, प्रेरणास्थान आहे. लोकमान्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या मंडळातील असंख्य कार्यकर्त्यांनी, घराण्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मोठे सार्वजनिक योगदान केले आहे! देशावर वा समाजावर आलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी मंडई मंडळ हे सहकार्याचा हात देण्यासाठी सदैव पुढे राहिले आहे. मंडळाची पेशवाई थाटातील शारदा-गजाननाची विलोभनीय मूर्ती हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि उत्सवाचे भूषण आहे.
 

पुणे शहराचा विकास चोहो बाजूंनी होत आहे. उपनगरांमध्ये नवनवी विक्रीकेंद्रे, आलिशान मॉल्स उभे राहत आहेत, भाजीपाल्याचे तयार पॅक उपलब्ध होत आहेत, मग या मंडईचे भवितव्य काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. उत्तर एकच आहे, हातात पिशवी घेऊन या परिसरात मनसोक्त भटकंती करा. इथल्या पावला-पावलावर आणि कानाकोपर्‍यात इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतील, त्या जाणून घ्या. इथे केवळ व्यापार नाही, माणुसकी जपणारी संस्कृतीसुद्धा आहे. म्हणूनच ही मंडई ‘विद्यापीठ’ आहे.
 

आनंद सराफ – भ्रमणध्वनी: 9822861303

पत्‍ता – 101, शुक्रवार पेठ, पुणे 411002

About Post Author

1 COMMENT

  1. महात्मा फुले मंडई चे…
    महात्मा फुले मंडई चे पूर्वीचे नाव “रे मार्केट” होते.

Comments are closed.