मंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर

carasole

तुका म्हणे पाहा | शब्दचि हा देव
शब्दचि गौरव | पूजा करू ||

ग्रंथालय हे जणू अक्षरांचे मंदिरच हा प्रत्यय मंगळवेढ्याचे नागरिक गेल्या एकशेचाळीस वर्षांपासून घेत आहेत! अक्षरपुजेच्या साधनेचे कार्य ‘नगर वाचनालया’मार्फत चालते. त्याची स्थापना 12 जून 1875 रोजी ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावे झाली. इमारतीच्या बांधकामासाठी लोक वर्गणी आणि कर्ज काढून इमारत पूर्णत्वास नेत आहेत ही गोष्ट जेव्हा सांगलीच्या सरकारांना माहीत झाली तेव्हा त्यांनी त्या जागेला प्रत्यक्ष भेट दिली व सर्व कर्ज फेडले. त्यामुळे ग्रंथालयाचे नाव ‘श्रीमंत युवराज माधवराव वाचनालय’ असे झाले. संस्थाने खालसा झाल्यानंतर ‘नगर वाचनालय’ असे त्याचे नामकरण करण्यात आले.

ते ग्रंथागार मंगळवेढ्याच्या वाचनसंस्कृतीचा 1875 सालापासूनचा इतिहास बनले आहे. न.चि. केळकर यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांनी तेथे भेटी दिल्या. वाचनालयाची मालकी हक्काची दोन मजली भव्य इमारत आहे. त्यामध्ये कार्यालय, वाचकगृह, महिला व बालविभाग, कार्यक्रमासाठी सभागृह असे विभाग आहेत. त्याची नोंद ‘अ’ वर्गातील वाचनालय म्हणून झालेली आहे.

वाचनालयातील ग्रंथसंपदा वीस हजार इतकी असून पंचेचाळीस दुर्मीळ ग्रंथ, शंभर नियतकालिके आणि पाचशेअठरा सभासद संख्या आहे. नगरवाचनालयाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मंगळवेढ्यातील प्रतिष्ठित मंडळींनी भूषवली. त्यामध्ये शां.कु. किल्लेदार, बाळासाहेब किल्लेदार, शिवनारायण डोडीया, अॅड. जगन्नाथ पारखी, अॅड. रघुनाथ देशमुख, अॅड. वसंत करंदीकर तर ग्रंथपाल म्हणून मधुकर गुरव, पुरुषोत्तम पुराणिक यांनी सक्षमतेने काम पाहिले आहे. सांप्रतकाळी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत ज. रत्नपारकी, कार्यवाह रामचंद्र कुलकर्णी तर ग्रंथपाल म्हणून ज्ञानेश्वर कुलकर्णी हे काम पाहत आहेत. सन 2006-07 या वर्षात वाचनालयात महाराष्ट्र शासनाच्यावतीने शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतायु ग्रंथालय म्हणून विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

– इंद्रजीत घुले

About Post Author

3 COMMENTS

  1. आम्ही मंगळवेढेकर असल्याचा
    आम्ही मंगळवेढेकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. .

Comments are closed.