भेट हितकरांची

0
27

– आशुतोष गोडबोले

     अपर्णा महाजन यांच्‍या पन्‍नासाव्‍या वाढदिवशी घरापासून नऊ किलोमिटरवर असलेल्‍या मैत्रबनपर्यंत चालत जाण्‍याचा कार्यक्रम आखला. याला त्‍यांचे पती विदुर महाजन यांनी कल्‍पकतेची जोड दिली आणि अपर्णा यांना या वाटेत भेटत गेली आयुष्‍याच्‍या विविध टप्‍प्‍यांवर भेटलेली माणसं…


– आशुतोष गोडबोले 

     अपर्णा महाजन तळेगावला ‘हार्मनी’ नावाच्या घरात राहतात आणि चाकणच्या कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवतात. त्यांच्या घरापासून नऊ किलोमीटर अंतरावर, त्यांनी व त्यांचे पतिराज विदुर महाजन यांनी ‘मैत्रबन’ नावाचा परिसर विकसित करू घातला आहे. त्यासाठी ‘मैत्रबन’ ट्रस्ट निर्माण केला आहे. त्यांच्या मुलाचे नाव मैत्रेय. तो तरुणपणी, कॉलेजात शिकत असताना, पाच वर्षांपूर्वी मोटार सायकलचा अपघात होऊन जागच्या जागी मरण पावला. पतिपत्नी त्या आघातामधून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांतील एक भाग म्हणजे ‘मैत्रबन’ परिसर.

     अपर्णा महाजन ८ जूनला पन्नास वर्षांच्या झाल्या, तेव्हा त्यांनी अभिनव बेत आखला. त्यांनी ठरवले, की त्या दिवशी सकाळी आपले घर ते ‘मैत्रबन’ हे नऊ किलोमीटरचे अंतर चालत जायचे. सोबत म्हणून, त्यांनी पुण्याच्या आपल्या वकील बहिणीला, नीलिमा म्हैसूर यांना बोलावून घेतले.

     अपर्णा यांचे उत्साही कल्पक पतिराज विदुर महाजन यांनी तो ‘क्लू’ घेतला आणि मनोमन वेगळा बेत आखला, कन्या नेहाचे सहकार्य घेतले. अपर्णाच्या नऊ किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये, वेगवेगळ्या टप्प्यांवर तिला आयुष्यात जसजशी माणसे भेटत गेली त्या क्रमाने त्यांना बोलावायचे आणि पदयात्रेच्या रस्त्यावर ‘इष्ट’ ठिकाणी उभे करून ठेवायचे. ती माणसे अपर्णास ‘विश’ करतील व तेथून पुढे यात्रेत सामील होतील. मग दहीवडीचे बालपणीचे खेळगडी जयराम बोराटे तिला प्रथम भेटले, ते आता डॉक्टर आहेत. त्यानंतर कॉलेजमध्ये तिला इंग्रजी शिकवणारे प्रा. अरुण भागवत भेटले, मग जीवनसाथी विदुर भेटला, मग कन्या नेहा जीवनात आली, मैत्रीण (कॉलेजच्या ग्रंथपाल) वैजयंती गोखले आल्या, मैत्रेयचे मित्र- धवल्या, मया आले, मैत्रेयच्या मृत्यूचे दु:ख शेअर करताना एकात्म झालेले जप्तीवाले पतिपत्नी आणि शशी स्वामी आले (त्यांनाही पुत्रवियोगाचे मोठे दु:ख आहे) आणि शेवटी, तळेगावचे इंजिनीयर (पण स्टेशनरी दुकान चालवणारे) राजू कुमठेकर आले. त्यांच्या बरोबरीने मैत्रयचे तळेगावातील साथी अबुल्ला वगैरे होतेच.

     ‘मैत्रबन’मध्ये वीस-पंचवीस जणांचा मेळावा आपोआप घडून आला. त्यांतील प्रत्येक भेट अपर्णाला धक्का देत गेली. सर्वात शेवटी ‘मैत्रबन’ची व्यवस्था पाहणारे जोडपे सतीश व सुनीती यांनी पुष्पगुच्छ देऊन अपर्णाचे परिसरात स्वागत केले.

     वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच वेगळी होती, तीमध्ये हृद्यता होती, उचित शोकात्म हुरहुर होती आणि दु:खावर मात करून सफल जीवन जगण्याचा खंबीर निर्धार होता. उपस्थित सर्वांच्या हस्ते ‘मैत्रबन’ परिसरात मोग-याची झाडे लावली गेली व बरेचसे शुभचिंतक आपापल्या उद्योगास पांगले.

     अपर्णाने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त आपल्या संगीतप्रेमी इष्टमित्रांना बोलावून दिवसभराचे सप्रात्यक्षिक चर्चासत्र योजले होते! अशा नॉव्हेल कल्पनांनी महाजन मंडळी वाढदिवस साजरे करत असतात.

     अपर्णा महाजन यांनी त्यांच्या वाढदिवशी आलेल्या पाहुण्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून ट्रायबल फ्लूट दिल्या. मग पाहुण्यांना तोच छंद लागला. तेव्हा जमलेले सारे स्नेही  मैदानात उतरले आणि त्यांनी बास-या हवेत मोकळेपणाने फिरवून एकच नाद सुरू केला. त्या ‘कवायती’ला वळण लावण्याचा असफल प्रयत्न विदुर महाजन यांनी केला.

– 9822559775 – <vidurmahajan@gmail.com>,

अपर्णा महाजन – 9822059678. 

{jcomments on}

About Post Author

Previous articleपाबळचा विज्ञानाश्रम
Next article‘अलिप्त नग्नता’ बोचते!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.