भुलाबाईचा उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृती

0
36
carasole

विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी असतो. भुलाबाईचा सण विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये उत्साहात साजरी केली जाते. माळी पौर्णिमा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून घराघरांतील लहान मुली व महिला सामूहिकपणे साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. महिन्याभराकरता ती तिच्या माहेरी येते ही कल्पना. तिचा हा सण गृहिणी ही भुलाबाईसोबत भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब महादेव श्री शंकर, लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती भुलाबाईचा उत्सव सखी पार्वती, शिवशंकर व गणपती यांचा म्हणून ओळखला जातो.

महिनाभर रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मुली एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीते म्हणतात. त्यानंतर भुलाबाईचा प्रसाद म्हणजेच खिरापत वाटली जाते. खिरापतीमध्ये रोज नवे प्रसाद असतात व ते बंद डब्यांतून आणले जातात. भुलाबाईंच्या पारंपरिक गाण्यानंतर सर्व मुलींमध्ये या डब्यांतील खिरापत ओळखण्याची स्पर्धा रंगते.

शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. भुलाबाई-भुलोजी-गणेश यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांड्यांना देवळाप्रमाणे मंडपीचा आकार देऊन त्यामध्ये स्थापना केली जाते. त्या मंडपीला‘माळी असे म्हणतात. जिराईत शेतकरी ज्वारीच्या ताटांची मंडपी करतात तर बागाईत शेतकरी ऊसाच्या पाच खोडांची मंडपी करतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मस्तकी ही माळी हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन ज्वारीच्या भरलेल्या कणसातील दाण्यांची पूजा करतात. तसेच भुलाबाई आणि भुलोजी यांच्या समोर विविध धान्यांची आरास करून त्या धान्याचीसुद्धा पूजा करतात. पूजा घराच्या अंगणात, कोजागरीच्या टिपूर चांदण्यात खुलून दिसते.

मुली व महिला स्वतः भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मातीच्या मूर्ती तयार करतात. त्याचबरोबर मातीचे दिवेही तयार करतात. पौर्णिमेला भुलाबाईला बत्तीस प्रकारच्या खिरापतींचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यामुळे घरातील अबालवृद्धांना खिरापतींची मेजवानीच मिळते! खिरापती जेवणामध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, हरभ-याची उसळ, विविध पौष्टिक पक्वान्ने आदींचा प्रामुख्‍याने समावेश असतो.

भुलाबाईची गाणी हा तर लोकगीतांचा अमूल्य ठेवा आहे. भुलाबाईच्या गाण्यांमधून यथार्थ लोकजीवन रेखाटलेले जाणवते.

भुलाबाईची गाणी केवळ मनोरंजक नसून ते अर्थपूर्ण लोकशिक्षण देणारे साहित्य आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा गोडवा त्या गाण्यांमधून जाणवतो.

सौ. मंदाकिनी अपशंकर

020 25535244

About Post Author