भुडकी म्हणजे विहीर

0
52
_BhudkiMhanje_Vihir_1_0.jpg

शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराच्या मागे वर्तक बाग आहे. तेथे भुडकीचे अवशेष आहेत. भुडकी म्हणजे विहिरी. महाराष्ट्रात विहिरीचे बरेच प्रकार आणि त्यानुसार नावे आहेत. अरुंद आणि खोल विहिरीला कूप असे म्हणतात. लांबट विहिरीला दीर्घिका म्हणतात. तिला पायऱ्या केल्या, की तिला वापी म्हणतात. वापी मोठ्या होत गेल्या, की त्यांना नंदा, भ्रदा, जया, विजया अशी नावे येतात. मोठ्या विहिरीला बारव असेही नाव आढळते तर अरूंद, खोल विहिरीला आड असेही नाव प्रचलित आहे. पायऱ्या असलेली विहीर पूर्व-पश्चिम लांब असावी. दक्षिण-उत्तर असल्यास वाऱ्याने लाटा निर्माण होऊन कालांतराने विहिरीचे बांधकाम ढासळू शकते. पायऱ्या बांधताना दर चार पायऱ्यांमध्ये एक पायरी मोठी बांधावी म्हणजे पाणी घेऊन वर येणे सोपे जाते. असे विहिरीच्या बांधकामसंदर्भातील नोंदींमध्ये आढळते. त्यातील भुडकी म्हणजे नदीच्या काठाशी बांधलेली विहीर, बहुतांश ज्यात पाणी आणून टाकावे लागते. वर्तक बागेतील ती भुडकी म्हणजे मूळची ओंकारेश्वराच्या बागेतील विहीर होय. पेशव्यांनी इसवी सन 1738 मध्ये ओंकारेश्वर मंदिर बांधून पूर्ण केले आणि कालांतराने त्याच्या फुलांसाठी बागेची जागा नेमून दिली. दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदीनुसार ती बाग साधारणत: चार एकर होती आणि तेव्हा त्यात वांगी, निंबोळ्या, पेरू, फुलझाडे आदी लावले होते.

(महाराष्ट्र टाइम्स, 18 मे 2017वरून उद्धृत)

– मंदार लवाटे

About Post Author

Previous articleडॉ. विनोद इंगळहळीकर यांची विविधगुणी मात्रा
Next articleगौतम गवईची कारखानदारी
मंदार लवाटे हे पुण्याचे रहिवासी आहेत. लवाटे 1999पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी कागदपत्रांवर संशोधन करीत आहेत. त्यांनी मे 2008पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडीचे अध्यापन वर्ग सुरु केले. त्यांनी आता पर्यंत मोडी लिपीचे 37 वर्ग घेतले आहेत. त्यांचे विविध वृत्तपत्रांतून इतिहास, संस्कृती या विषयांवरील चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी लिहिलेली पुणे कृष्णधवल, पुण्यातील गणपती मंदिरे, पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव 121 वर्षाचा, सोपी मोडी पत्रे (सहसंपादिका - भास्वती सोमण) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9823079087