भारतीय कृषिअर्थशास्त्राचे प्रणेते पी.सी. पाटील

1
118
-panduranga-patil-krushi

पांडुरंग चिमणाजी पाटील हे महाराष्ट्रातील ख्यातनाम कृषितज्ज्ञ. ते जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक; तसेच, पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य. त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात महत्त्वाचे कार्य केलेले आहे. ते पी. सी. पाटील या नावाने ओळखले जात. त्यांचा जन्म 19 जून 1877 रोजी साळशी  (तालुका शाहुवाडी, जिल्हा कोल्हापूर) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे गाव वडगाव. तेथून पाच मैलांच्या अंतरावर असलेल्या सरूडच्या शाळेत त्यांचे चौथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये घेतले. ते मॅट्रिक 1899 साली झाले. शाहू महाराजांनी त्यांना बोलावून घेऊन कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते शाहू महाराजांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या मराठा बोर्डिंगमध्ये राहिले. ते त्या बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी, महाराजांचे त्यांच्यावर विशेष लक्ष होते. त्यांनी पीईची परीक्षा पास झाल्यावर पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. ते शेतकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 1905 साली झाले. त्यानंतर त्यांची त्याच कृषी महाविद्यालयामध्ये कृषिक्षेत्र अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. डेक्कन विभागाचे कृषी निरीक्षक म्हणून 1908 साली नेमणूक झाल्यावर, त्यांनी शेतीच्या नव्या अवजारांच्या व शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचारकार्यास प्रारंभ केला; शेतकऱ्यांची पारंपरिक मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला; शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयी जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांनी यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवण्याची अभिनव कल्पना सुरू केली व लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्याचा लोकांवर परिणाम होत गेला. त्यामुळे शेतकी खात्याकडे मोठ्या प्रमाणावर लोखंडी नांगरांची मागणी होऊ लागली. शेतकऱ्यांना शेतीविषयक साधने, अवजारे, आधुनिक बी-बियाणे, खते वगैरे एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू केले. त्यांनी लोखंडी नांगर व इतर औत यांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन, त्यांत आवश्यक त्या सुधारणा सुचवून व त्याप्रमाणे किर्लोस्कर आदि कारखान्यांकडून सुधारित औते तयार करवून घेऊन त्यांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार केला. त्यांनी ऊस शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवले. त्यांनी ‘रुंद सरीची मांजरी पद्धत’ ही ऊसाच्या लागवडीची नवी पद्धत शोधून काढली. तीच पद्धत अजून वापरात आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर किफायतशीरपणे गूळ तयार करण्यासाठी यांत्रिक चरकांचा व एकत्रित असलेल्या अनेक चुलाणांचा वापर सुरू केला. बेलापूर येथील साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. ब्रिटिश राजवटीतील सरकारने त्यांना ‘अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन इन युरोप, इंग्लंड अँड आयर्लंड’ या विषयांचा अभ्यास करण्यासाठी 1912 साली परदेशात पाठवले. त्यांनी त्या अभ्यासदौऱ्यात इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, इजिप्त, डेन्मार्क, हॉलंड इत्यादी देशांना भेटी देऊन तेथील शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान वगैरेंची माहिती घेतली.

-panduranga-patilत्यांची नेमणूक 1914 साली कृषी विषयाचे प्राध्यापक म्हणून झाली. त्यांनी कृषिविषयक अर्थशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी 1921 साली वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी, अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी अमेरिकेतील शेतीचाही अभ्यास मोकळ्या वेळात केला. त्यांनतर त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयाचा अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात अभ्यास करून एम एस्सी ही पदवी 1922 साली संपादन केली. ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादूर हा किताब 1924 मध्ये दिला. त्यांनी परतीच्या प्रवासात जपानला हाँगकाँग, जावा आदी ठिकाणी भेटी देऊन तेथील शेतीची माहिती घेतली. 

हे ही लेख वाचा – 
      विठ्ठलराव विखे पाटील – सहकाराचे प्रणेते (Vitthalrao Vikhe Patil)
ऋणानुबंध मालतीबाई बेडेकर यांचा (Maltibai Bedekar)
        स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक (Smrutichitre – Laxmibai Tilak)

 

त्यांची निवड कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य म्हणून 1925 साली झाली. त्याच वर्षी, पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात आली व त्या विषयाचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यांनी कृषी महाविद्यालयाला कृषी संशोधन संस्थेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांचे शेतीशास्त्राचे ज्ञान, अनुभव, अभ्यास व निरीक्षणे यांच्या आधारे भारतीय शेती व शेतकऱ्यांच्या सुधारणेसाठी अनेक प्रयोग केले. शेतकी कॉलेजच्या फार्मवर संशोधन केले. सरकारमार्फत विविध प्रकल्प राबवले. शेतीमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठोस प्रयत्न केले. ते ब्रिटिश राजवटीतील सरकारी सेवेतून निवृत्त 1932 साली झाले. त्या नंतर त्यांनी ग्वाल्हेर संस्थानात कृषी, सहकार व विकास यांच्या पाहणीसाठी नेमलेल्या आयोगावर काम केले. त्यांनी भारत सरकार, मुंबई सरकार व कोल्हापूर संस्थान यांतील अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले. ते मुंबई विद्यापीठाचे फेलो व काही वर्षें विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. त्यांनी 1933 साली ‘प्रिन्सिपल्स अँड ग्राक्टिस ऑफ फार्म कॉस्टिंग’ हा नऊशेएकवीस पृष्ठांचा कृषी अर्थशास्त्रविषयक विस्तृत प्रबंध मुंबई विद्यापीठास सादर केला. त्या प्रबंधाचे परीक्षण आयर्लंड, स्वित्झर्लंड व अमेरिका या देशांतील तीन परीक्षकांनी केले. त्यांना मुंबई विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी व सुवर्णपदक सन्मानदर्शक दिले. त्यांनी शेतकीचे अर्थशास्त्र या विषयाचे महत्त्व मुंबई सरकार व मुंबई विद्यापीठ यांस पटवून दिले. त्याचा परिणाम म्हणजे मुंबई विद्यापीठाने त्या विषयासाठी एक स्वतंत्र आचार्यपद निर्माण केले व पी.सी. पाटील यांनाच ते स्वीकारण्याची विनंती केली. त्यांनी कृषी अर्थशास्त्रीय संशोधनावर आधारित चार-पाच पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्याशिवाय त्यांनी ‘क्रॉप्स ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, विथ देअर जिऑग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स’ (1921), ‘फूड प्रॉब्लेम ऑफ इंडिया इन जनरल अँड कोल्हापूर स्टेट इन पर्टिक्युलर’ (1948), ‘रिजनल सर्व्हे ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस, इंडिया’, कोल्हापूर (1948) इत्यादी ग्रंथही लिहिले. त्यांनी त्यांचे विविध क्षेत्रांतील अनुभव ‘माझ्या आठवणी’ (1964) या आत्मचरित्रपर ग्रंथात विशद केले आहेत. शेती समाजाचे मूलभूत चिंतन, प्रागतिक दृष्टीच्या समाजशास्त्रज्ञाची प्रगल्भ आणि परिणत जीवनदृष्टी त्यामधून आविष्कृत झाली आहे. वि.द. घाटे यांनी त्या आत्मचरित्रास ‘साष्टांग प्रणिपातपूर्वक’ अशा लिहिलेल्या प्रस्तावनेत ‘पाटीलसाहेब महाराष्ट्रातील शेतकी खात्याचे, शेतकी शिक्षण क्षेत्राचे व प्रयोगांचे एक ठळक पायाचे दगड आहेत’ असे म्हटले आहे. पाटील यांना एकशेएक वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. 

-book-pandurangapatilत्यांच्या आत्मचरित्रास समाजशास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्व आहे. त्यामध्ये एकोणिसाव्या शतकाची अखेरची काही वर्षें व विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काही दशकांचा स्मृतिरूप इतिहास अत्यंत बारकाईने नोंदला गेला आहे. शाहुवाडी, पन्हाळा परिसरातील डोंगर मुलखाचे, झाड-झाडोऱ्याचे, निसर्गरम्य प्रदेशाचे अत्यंत सजीव अशी वर्णने आत्मचरित्रात आहेत. महाराष्ट्रीय समाज इतिहासातील रोचक अशी माहिती त्यामध्ये आली आहे. त्याकाळी खेड्यातील लोक नाचणीची भाकर व आमटी आहारात घेत. प्रवासात तळलेल्या सजुऱ्या व झुणका-चपात्या नेत. बकऱ्याची किंमत तीन किंवा चार रुपये असे. वाहतुकीसाठी बैलगाडी, बैल व घोडे वापरत. दिव्यासाठी एरंडेल तेल वापरत. खेड्यात घुंगुरकाठी घेऊन पोस्टमन पायी टपाल पोचवत. परदेशातून पत्र येण्यास पाच आठवडे वेळ लागे. कोल्हापुरात पहिली बायसिकल 1893 साली आली. राजाराम कॉलेजात केवळ दोन मुली1900 साली होत्या. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यालगत शंभर रुपये एकराने जमीन मिळे. अशी समाजशास्त्रीय स्वरूपाची महत्त्वाची माहिती आत्मचरित्रात आहे. त्याचबरोबर जुन्या महाराष्ट्रातील गावरहाटी, जाती-जातीतील परस्पर संबंध, देशमुख-पाटीलकी, महसूल पद्धती, बलुतेदारी, रयत, भाऊबंदकी, लहानांचे खेळ, शेतीजीवनासंबंधीची माहिती आत्मचरित्रात आहे. परदेशातील शेतकरी जीवन, कुटुंबजीवन व सामाजिक जीवन यांची तौलनिक दृष्टीने माहिती आत्मचरित्रात आहे. तसेच, महाराष्ट्रातील शेतीसंबंधीचे कार्य व चिंतनही आहे. विविध प्रदेशांतील जमिनीचा स्तर, पर्जन्यमान, पिके, धान्य उत्पादन, शेतीस्थितीत झालेली परिवर्तने, सुधारणांची माहिती त्यामध्ये आहेत.

त्यांनी मराठा समाजाची संघटना व्हावी व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता सातत्याने प्रयत्न केले. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध सत्यशोधक समाज, शिवाजी मराठा सोसायटी, डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था इत्यादी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी होते. 

त्यांनी मुंबई सरकारने नेमलेल्या मूलोद्योग शिक्षण समितीवर काम केले. त्यांनी मूलोद्योग शिक्षणातील शेतीच्या शिक्षणाचे महत्त्व आवर्जून प्रतिपादन केले आहे. त्यांच्या शताब्दीनंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोल्हापूर येथे त्यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सन्माननीय डी लिट. ही पदवी खास समारंभपूर्वक अर्पण केली. ते कोल्हापूर येथे मृत्यू पावले. त्यांचे थोरले पुत्र मेजर जनरल शंकरराव थोरात यांनी भारतीय लष्करात बहुमोल कामगिरी केलेली आहे. 
– नितेश शिंदे (संकलित)

About Post Author

1 COMMENT

  1. उत्तम लेख. पां.चि.पाटील…
    उत्तम लेख. पां.चि.पाटील यांचे आत्मचरित्र अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहे.

Comments are closed.