ब्रम्हगिरी – गोदावरीचे उगमस्‍थान

9
43
carasole

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडून आणि इगतपूरीच्या उत्तरे दिशेने सह्याद्रीची त्र्यंबक डोंगररांग गेली आहे. ती रांग दोन भागात विभागली गेली आहे. पूर्वेकडील रांगेला कळसुबाईची रांग म्हणतात. त्यात कळसुबाई, अलंग, कुलंग, अवंढ-पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडील रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरीहर, ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग या डोंगररांगेतून जात असे. त्‍या मार्गाच्‍या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता. ब्रम्‍हगिरीचा किल्ला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले ‘त्र्यंबकेश्वर’ किंवा ‘त्रिंबक’ या नावाने प्रसिद्ध आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रम्‍हगिरीच्‍या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी नदी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते. त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर गौतम ऋषींनी शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी केली. त्‍यास गंगा मात्र राजी नव्हती. तेव्हा शंकराने त्‍याच्‍या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमाचे गोहत्येचे पाप निवारण करून गाईलाही सजीव केले. म्हणून त्‍या नदीचे नाव गोदावरी असे पडले. सिंहस्थ काळात जेव्हा गुरू सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व देवदेवता, नद्या, सरोवरे, तीर्थ गोदावरीत वास करतात अशी धारणा आहे. त्यामुळे सिंहस्थात गोदावरी नदीला जास्त महत्त्व आहे.

किल्‍ल्‍याचे नाव ब्रम्हगिरी कसे पडले, यामागे सुद्धा आख्यायिका आहे. एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले, की पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही. तेव्हा त्या दोघांनी ठरवले, की ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली. ब्रम्हाने सांगितले, की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला, की तू भूतलावर पर्वत होऊन राहशील. शिवाने रागाचा आवेग ओसरल्यावर शाप मागे घेतला आणि भूतलावर पर्वताचे रूप घेतले. त्याचे नाव ब्रम्हगिरी.

त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची इ.स. १२७१ – १३०८ या काळात राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून तो अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजानने हा परिसर जिंकण्‍यासाठी आठ हजारांचे घोडदळ पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. इ.स १७१६ मध्ये शाहूने मोगलांकडे किल्ल्याची मागणी केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून तो किल्‍ला घेतला. पुढे १८१८ पर्यंत ब्रम्‍हगिरी किल्‍ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

ब्रम्हगिरी किल्ला अडीच हजार फूट उंच असून त्‍यांची समुद्रसपाटीपासूनची उंची 4248 फूट एवढी आहे. तो गिरिदूर्ग प्रकारातील किल्‍ला आहे. किल्‍ल्‍यावर चढण्‍यासाठी पायथ्‍यापासून पाय-या आणि पाऊलवाट असा मिश्र रस्‍ता आहे. पाय-या चढत असताना कोरीवकाम केलेल्‍या दोन मूर्ती नजरेस पडतात. ब्रम्‍ह‍गिरीचा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजा डोंगराच्‍या कपारीत लपलेला आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. गुहेत चार-पाच जणांना राहता येईल एवढी जागा आहे. तेथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोचल्यावर दक्षिण भागात तलाव आहे. गडाच्या पश्चिम भागात बुरूज आहे. बुरूजाच्या जवळ पाण्याचे टाके आहे. ब्रम्हगिरीचा माथा म्हणजे प्रशस्त पठार आहे. तिथून एक वाट डावीकडे सिद्धगुंफेकडे जाते. त्‍या ठिकाणी कड्यात खोदलेली गुहा आहे. गुहेत उतरण्यासाठी शिडी लावलेली आहे. गुहेच्या वरच्या भागावर घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. त्‍यापुढे पाय-यांची वाट दुभंगते. प्रथम लागणा-या उजवीकडच्या वाटेला वळाल्‍यानंतर गंगा गोदावरी मंदिराजवळ पोचता येतो. त्‍या ठिकाणीच गोदावरी नदीच्या उगमाचे स्थान आहे. त्‍यानंतर डावीकडच्या वाटेला वळाल्‍यास जटा मंदिराजवळ पोचता येतो. त्‍या ठिकाणी शंकराने जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली असे मानले जाते.

गडाच्या सर्वोच्च माथ्यावर तलाव आहे. गडमाथा फिरण्यास दोन तास पुरतात. याशिवाय किल्ल्यावर काही प्राचीन वाड्यांचे अवशेष आहेत. गडमाथ्यावरून मांगीतुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप, कळसुबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. ब्रम्‍हगिरीचा प्रदक्षिणामार्ग वीस ते बावीस किलोमीटरचा आहे.

किल्ल्यावर जाण्याचा मार्ग त्र्यंबकेश्वर गावातून जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून पुढे गंगाद्वाराकडे चालत जायचे. गंगाद्वाराकडे जाणा-या पाय-या जिथे सुरू होतात. तिथून डावीकडे एक पायवाट दिसते, त्या वाटेने चालत जायचे. ती वाट पुढे दुस-या पाय-यांच्या वाटेला जाऊन मिळते. एक तास पाय-या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पहिल्या द्वारापाशी येऊन पोहोचतो. पुढे कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने दरवाजापर्यंत पोचता येते. मंदिरापासून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो. त्र्यंबकेश्‍वर गावात जेवण्‍याची आणि राहण्‍यासाठी सोय उपलब्ध आहे.

(छायाचित्रे ‘ट्रेकक्षितिज डॉट कॉम’वरून साभार)

About Post Author

9 COMMENTS

  1. खूप छान व जास्तीत जास्त
    खूप छान व जास्तीत जास्त तपशीलवार अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे
    धन्यवाद

  2. खुप सुंदर माहीती दिलेली आहे.
    खुप सुंदर माहीती दिलेली आहे. धन्यवाद..

  3. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

  4. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

  5. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

  6. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

  7. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

  8. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

  9. मी ब्रम्हगिरी पर्वत चालत…
    मी ब्रम्हगिरी पर्वत चालत जाऊन आलो आहे. आपल्या या सुंदर माहितीने मी पुन्हा एकदा जाऊन याव अस वाटत .खूपच छान सुंदर शब्द नाहीत . धन्यवाद ?

Comments are closed.