बी एम एम चे अधिवेशन : सोहळा अस्तित्वाचा

0
285

उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बी एम एम). ती संस्था दर दोन वर्षांनी एखाद्या सबळ मंडळाला यजमानपद देऊन अधिवेशन म्हणजे सर्व मराठी मंडळांचे संमेलन घडवून आणते. तो सोहळा यावर्षी न्यू जर्सी येथील ‘मराठी विश्व’ या संयोजक संस्थेच्या वतीने साजरा होत आहे. प्रशांत कोल्हटकर हे अधिवेशनाचे निमंत्रक आहेत…

अमेरिकेतील बी एम एम च्या विसाव्या अधिवेशनास (ऑगस्ट 2022) ‘सोहळा अस्तित्वाचा’ असे अन्वर्थक नाव देण्यात आले आहे. तो सोहळा दर दोन वर्षांनी होत असतो. तो कोरोनामुळे एक वर्ष उशिरा, म्हणजे तीन वर्षांनी 2022 सालावर आला! सारे जग कोरोनामुळे जीवनमरणाच्या अनुभवातून दीडदोन वर्षे गेले. त्यातून मानवी अस्तित्व टिकले- अबाधित राहिले, म्हणून 2022 या वर्षाचा ‘सोहळा अस्तित्वाचा’ झाला! संमेलनाच्या तारखा 11 ते 14 ऑगस्ट अशा आहेत. त्याही दर वेळी 4 जुलैच्या म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या आसपास असत, कारण तो मोठ्या सुट्टीचा काळ असे, हवाही उत्तम. कोरोनामुळे सारेच अनिश्चित होत गेले, तशा बी एम एमच्या तारखाही मागेपुढे झाल्या.

कोविडच्या काळात डॉक्टर मंडळींनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी मेहनत केली, समाजसेवकांनी नागरिकांना मदत केली; तसेच, लोकही कोरोनाशी लढून त्यांचे अस्तित्व टिकवून राहिले. बी एम एम ने अधिवेशनाच्या घोषवाक्यासाठी ‘Celebration of Life’ ही संकल्पना ठेवून त्या आशयाच्या मराठी नावांसाठी जगभरातून सूचना मागवल्या होत्या. त्यातून ‘सोहळा अस्तित्वाचा’ हे घोषवाक्य निवडण्यात आले आहे. अधिवेशन मूळ शार्लेट (नॉर्थ कॅरोलिना) येथे 2021 मध्ये होणार होते, पण ती जागाही मधील काळात बदलली. बी एम एम कमिटीने पुनश्च हरी ओम करताना अधिवेशनाची जागा व यजमान संस्था बदलली आहे. संमेलन ‘अटलांटिक सिटी कन्व्हेन्शन सेंटर’ येथे योजले आहे. अटलांटिक सिटी हे समुद्रकिनारा असलेले रम्य शहर आहे. ते लास वेगासनंतरचे ‘कॅसिनो’ स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ते नेवार्क विमानतळापासून दोन तासांवर आहे. तो सोहळा न्यू जर्सी येथील ‘मराठी विश्व’ या संयोजक संस्थेच्या वतीने साजरा होत आहे. ‘मराठी विश्व’ हे महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठे म्हणजे जास्तीत जास्त सभासद असलेले मंडळ आहे. त्या मंडळाला चाळीस वर्षे झाली आहेत. त्या मंडळाच्या कमिटीवरील काही सदस्यांनी बी एम एम चे अध्यक्षपदही भूषवले आहे. प्रशांत कोल्हटकर हे बी एम एम 2022 सालच्या अधिवेशनाचे निमंत्रक (कन्व्हेनर) आहेत. ते ‘मराठी विश्व’च्या कार्यकारिणीत गेली दहा-बारा वर्षे आहेत.

प्रशांत कोल्हटकर हे 2016 साली ‘मराठी विश्व’च्या संचालक मंडळावर निवडले गेले. ते 2017-18 मध्ये सेक्रेटरी होते आणि 2018-19 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ‘मराठी विश्व’ला चाळीस वर्षे झाल्याबद्दल भव्य सोहळा 6-7 एप्रिल 2019 रोजी करण्यात आला. तेव्हा प्रशांत कोल्हटकर ‘मराठी विश्व’च्या अध्यक्षपदी होते. त्यांनी महाराष्ट्र मंडळांच्या समारंभांना साधारण पन्नाशीच्या पुढील लोक येतात हे पाहून तरुण वर्ग व लहान मुले मराठी भाषा-संस्कृतीकडे कसे आकृष्ट होतील यासाठी उपक्रम चालवले; ‘वसंतोत्सव’ या कार्यक्रमात काही चांगले बदल करून मुलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेतले. त्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणून अडीचशे मुले गेली काही वर्षे सहभागी होत आहेत. त्यांनी कम्युनिटी सेंटरचे नूतनीकरण करून घेतले.

प्रशांत कोल्हटकर हे पत्नी वर्षा आणि दोन मुले यांच्यासह न्यू जर्सी येथे 1997 पासून राहत आहेत. प्रशांत हे वीस वर्षांपासून फायनान्स आयटी प्रोफेशनल आहेत. त्यांनी विविध बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये काम केलेले आहे आणि त्यांना प्रकल्पांचे व्यवस्थापन व ते कार्यान्वित (Commision) करण्याचा व्यापक अनुभव आहे. प्रशांत हे न्यू जर्सीच्या मराठी विश्वशी बारा वर्षांपासून जोडलेले आहेत. त्यांचे संघटन कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन न्यू जर्सीच्या ‘मराठी विश्व’ची प्रेरक शक्ती आहे.

कोल्हटकर म्हणाले, की बी एम एम चे अधिवेशन यापूर्वी आमच्याकडे, 1987 साली न्यू जर्सीमध्ये झाले होते. तो योग पस्तीस वर्षांनी पुन्हा आला आहे. बी एम एम च्या अध्यक्ष, शिकागोच्या विद्या जोशी यांच्याकडे संमेलनाचे एकूण नेतृत्व आहे. आमच्या प्रत्येक कमिटीमध्ये कुशल लोक आहेत आणि आमची कार्यपद्धत विकेंद्रित असते. कमिट्या त्यांचे निर्णय स्वतः घेऊन संमेलनाला सुंदर रूप आणतील याची मला खात्री आहे. एकूण तीस समित्या आहेत आणि त्यांचे काम गेले वर्षभर सुरू आहे.

‘मराठी विश्व’ने विश्व नाट्य संमेलन किंवा आणखी काही संमेलनेही या पूर्वी आयोजित केली आहेत. परंतु बी एम एम संमेलनाचा आवाका खूप मोठा असतो. त्या संमेलनात उत्तर अमेरिकेतील सर्वसाधारण मराठी प्रेमी मोठ्या संख्येने येत असतात. सुमारे पाच हजार लोक उपस्थित असतात. वेगवेगळ्या मंडळांचे सभासद, देशोदेशीचे सन्माननीय पाहुणे असतातच. उद्घाटन समारंभ, अनेक चर्चासत्रे, नाटके, संगीताचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तररंग अशी कार्यक्रमांची रेलचेल असते. कार्यक्रम वेगवेगळ्या सभागृहांत एकाच वेळी होत असतात.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हेदेखील पाहुणे म्हणून येत आहेत. मेगा सुपर स्टार, गायक व संगीतकार शंकर महादेवन यांची उपस्थिती हे या अधिवेशनाचे खास आकर्षण आहे. तसेच मराठीतील जानेमाने कलाकार सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, प्रशांत दामले, वर्षा उसगावकर आणि मुक्ता बर्वे हेदेखील अधिवेशनास उपस्थित असणार आहेत.

पुण्याचे उद्योगपती आनंद देशपांडे (पर्सिस्टंट सिस्टिम्स) आणि श्रीकांत दातार (हार्वर्ड बिझनेस स्कूल) हे उद्योजकांच्या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे आहेत. चर्चासत्रानंतरच्या डिनरसाठी ‘चौपाटी थिम’ आहे. ते त्या सत्राचे आकर्षण आहे. जेवण हा संस्कृतीचा भाग आणि उद्योग हा व्यवहाराचा/प्रगतीचा/उत्कर्षाचा भाग. त्यांची अशी सांगड या चर्चासत्रानिमित्ताने साधली आहे. त्याच निमित्ताने होणाऱ्या मनोरंजनपर संगीतसभेत महाराष्ट्रातील अनिरुद्ध जोशी आणि प्रियांका बर्वे गाणी सादर करणार आहेत. त्या कार्यक्रमासाठीसुद्धा दीड ते दोन हजारांची उपस्थिती लाभण्याची अपेक्षा आहे.

प्रशांत कोल्हटकर म्हणाले, की “महाराष्ट्रातील विविध पद्धतींचे जेवण हे एकूण संमेलनाचेही आकर्षण असणार आहे. कोकणी, वऱ्हाडी, अस्सल कोल्हापुरीपारंपरिक पुणेरी असे भोजन वैविध्य त्यात आहे. त्यातील ‘इको’ व्यवस्था ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ने सांभाळली आहे.

शैक्षणिक विचारमंथन ही संमेलनातील एक मोठी थीम आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील विद्यापीठांतील कुलगुरू व काही मान्यवर संमेलनस्थळी आठवडाभर आधी येऊन राहणार आहेत. त्यांच्या भेटी फिलाडेल्फिया, न्यू जर्सी येथील नामांकित विद्यापीठांना योजल्या आहेत. त्यांना शिक्षणातील नवीन प्रवाह, नवीन टेक्नॉलॉजी यांची माहिती आणि त्यानुरूप चर्चासत्रे व्हावीत असा विचार त्यामागे आहे. स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्रॅम अधिक उत्तम कसा करता येईल यावरही विचार होईल. उलट, संमेलनास उपस्थित असलेल्या अमेरिकन तरुणांसाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये कोणत्या संधी आहेत याचीही चर्चा होईल.

अनेक मराठी शाळा बी एम एम च्या छत्राखाली अमेरिकेत कार्यरत आहेत. त्या शाळांतील चाळीस विद्यार्थ्यांचा मराठी भाषेतील उत्तम कार्यक्रम सादर होणार आहे. त्यात नाटक, समूहगान असे घटक बसवले आहेत.

कार्यक्रमाच्या आयोजनात कार्यरत समित्यांमध्ये जवळजवळ सत्तर टक्के स्त्रिया आहेत ही गोष्ट प्रशांत कोल्हटकर यांनी आवर्जून सांगितली. ते म्हणाले, की आमचे संमेलन ‘नारीशक्ती’वर उभे राहिले आहे, असे आम्ही म्हणतो. बी एम एम च्या अध्यक्ष विद्या जोशी या स्वत:च एक धडाडीच्या नारी आहेत आणि त्या यशस्वीपणे कारभार पुढे नेत आहेत.

प्रशांत कोल्हटकर prashant.kolhatkar@bmm2022.org

– मेघना साने 9892 151344 meghanasane@gmail.com

———————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here