बिनकवचकुंडलाचा कर्ण – श्रीपाद हळबे

0
53
halbe

श्रीपाद रामचंद्र हळबेश्रीपाद रामचंद्र हळबे हे कंपनी कायद्यातले, भारतामधले एक निष्णात वकील आहेत; अध्यापनही करतात. त्यांना अर्थकारण, क्रिकेट, साहित्य , संगीत , राजकारण, खोखो, नाटक , शिक्षणसंस्था, खेळांचं  प्रशासन-आयोजन, शेती, वृक्षारोपण अशासारखे अनेक अभ्यासविषय व छंद जरी असले, तरी त्यांचा प्रमुख छंद पदरमोड करणे हाच आहे.

तरी बरं, दुनियादारी नीट बघितलेली आजी त्यांच्या कानीकपाळी सतत ओरडत होती, ‘‘श्रीपाद, लग्न कर बाबा. अरे, स्वतःचा संसार केला नाही, तर मग जगाचा संसार करत बसावा लागतो.’’ या हट्टी माणसानं आजीचंदेखील ऐकलं नाही, तिच्यावर जरी त्याचं सर्वाधिक प्रेम होतं तरीही! घरातले हे असले सल्ले न ऐकणार्‍या शूर वीरांची देशाला आज खूप मोठी गरज आहे, असं मला वाटतं. आणि याबद्दल समाजात नक्‍कीच सहमती होईल.

हळब्यांना स्वतःची टर उडवायला आवडते. तो बराचसा अहिंसक खेळ असतो. त्यांच्याच अविवाहित पंथातल्या एखाद्या जुन्या मित्राचा भोज्जा शिवून हळबे पूर्वी सांगत असत – ‘‘याची माझी तुलना नाही. हा मोठा माणूस आहे. यानं तत्त्व म्हणून लग्न केलं नाही. माझं मात्र, झालं नाही बुवा!’’

चाळीस वर्षांपूर्वीचे वधुपिते तर नक्की त्यावेळी रांगेत उभे राहिले असतील. मुलगा चांगला सहा फूट दोन इंच उंचीचा. शिवाय हाडापेरानं मोठा. उच्चशिक्षित. पूर्ण निर्व्यसनी. चष्मा नाही (अजूनही). मंगळाचं तेवढं माहीत नाही. बेळगाव जिल्‍हयात बुगटे अलूर गावी वडिलोपार्जित चाळीस-पन्नास एकर जमीन. दोन बहिणींना एकुलता एक भाऊ. वडील लहानपणी गेल्याने, स्वतःच्या पायावर कष्टानंच उभा राहिलेला. दक्षिण मुंबईत चांगलं घर, इत्यादी.

पण ते होणं नव्हतं. अहोरात्र, स्वकष्टानं मिळवलेली पुंजी केवळ समाजासाठी खर्च करण्यासाठी झपाटलेले वेडे पीर, संसारबंधनात अडकावून, त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह समाजासाठी न सांडवण्याचा दुष्टपणा करणं, कदाचित नियतीला मंजूर नसावं!

त्यामुळे बर्‍याच लहानथोर संस्थांचा संसार चालवण्यासाठी, स्वतःजवळ असणारा कमी वेळ, प्रसंगी या संस्थांमधला भ्रष्टाचार वा अनियमितता याविरुध्द एकांडी शिलेदारी करण्यासाठी डोसक्यात साठवलेला मुबलक चक्रमपणा, अन् स्वतःच्या खिशाला सतत टोचणारा पैसा, अशी आयुधं घेऊन हा माणूस वादळ होऊन घोंघावत असतो. केवळ गमतिखातर वा मनमानीसाठी जर बडी धेंडं एखाद्या संस्थेत शिरली असतील तर श्रीपाद हळबे म्हणजे त्यांच्या दाढेत अडकलेलं सुपारीचं खांड असतं. धड चुंबाचुंबी करता येत नाही. अन् दातांतून बाहेरही काढता येत नाही. कुणाची पाठीवर थाप पडलीच तर चोरून, पुसटशी! हा हत्यार म्हणून रोज अनेकांना हवा असतो, पण विजयादशमीच्या दिवशी वाट्याला पूजा येईल, याची खात्री नाही.

संस्था जर एखाद्या उद्योग-घराण्याचा विश्वस्त निधी असेल, तर तिथं पुराणपुरूषाला नेकीची कदर असते. अन् पुढची पिढी जर जमीन न सापडलेल्या पारंबीसारखी वेडीवाकडी वाढत, वार्‍यावर हेलकावणारी नसेल, तर तिच्याही डोळ्यांत आदर ओथंबत असतो. हळबे दोन्ही प्रकारच्या संस्थांत रमतात.

हळबे हे काही उद्योगसमुहांचे कंपनी-कायदेविषयक सल्लागार आहेत. ते देशभर केसेस लढत असतात. उच्च दर्जाचं व्यावसायिक कौशल्य आणि सचोटीनं त्यांच्या पायाला ही भिंगरी बांधली आहे.

…‘परवा-तेरवा बंगळूर, नंतर कानपूर, मग लगेच चेन्नई, एक दिवस दिल्ली, तसंच रोहतक. मग मी मुंबईत दोन दिवस आहे. तेव्हा पक्कं भेटू यात’.

‘नंतर तीन दिवस कोरिया, मुंबईत परत आलो की लगेच शेतावर बुगटे अलुरला. लोकांचे पगार लांबणीवर पडायला नकोत हो. येताना वांगी अन् तो नवीन वाणाचा केलेला तांदूळ आणायचाय, शेतावर केलेला. अमुक मित्राच्या घरी आवडला होता. नंतर पाच दिवस न्यू यॉर्क! आल्यावर लगेच वर्धा मेडिकल कॉलेजची मीटिंग! शेतावरच्या घरात तो टीव्ही लावायचा राहूनच गेलाय. तिथल्या स्टाफची कुचंबणा होते…’

एखाद्या महिन्याची कार्यक्रमपत्रिका हळबे जर स्वतःशी अशी जर पुटपुटत असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

हळबे मुंबई क्रिकेट असोसिएशन चे गेली अनेक वर्षं पदाधिकारी आहेत. त्यामुळे मुंबईत क्रिकेट सामना आयोजनासाठीची त्यांची धावपळ वधुपित्याच्या तारांबळीहून कमी नसते. हळबेकाका मित्रमंडळींच्या मुलाबाळांत खूप लोकप्रिय आहेत, याची कारणं आता विस्तारानं सांगायला नकोत. अर्थात क्रिकेटव्यतिरिक्तही कारणं आहेतच की! कुठल्या मुलाला चॉकलेटचा कुठला ब्रँड आवडतो, हे युरोपातून येताना किंवा ड्रायफ्रुटच्या अरबी चिक्कीचा कुठला प्रकार कुणाच्या हातात द्यायचाय, याबाबत हळबेकाकांची स्मरणशक्ती तीव्र असते. अगदी त्या मुलांच्या आई-बापांपेक्षादेखील! शिवाय, सततच्या विमानप्रवासामुळं साचलेले पॉइंट्सही कुणाला प्रवासासाठी द्यायचे असतात.

हा माणूस लहानथोरांना काहीना काही वाटप सतत करत असतो. पण याच्या अंगावर तर मला कधी कवचकुंडलं दिसली नाहीत. कदाचित बिनकवचकुंडलंवाला असावा.

ग्रामीण भागात काम करणार्‍या हळब्यांच्या एखाद्या मित्राला वाटत असतं, की संपूर्ण क्रांती अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. आता मात्र आपण जर विधानसभेला उभे राहिलो नाही, तर ती कदापि होणार नाही. निवडणुकीचा खर्च हळबे करतात. प्रत्यक्षात त्याचं डिपॉझिट जातं, पण ‘कर्णा’ ला खेद नाही, राग तर नाहीच.

हळब्यांच्यापुढं कधी एखादा दिवाळी अंक काढणारा फाटका मित्र बसलेला असतो. अपराधी भावनेनं हळबे म्हणतात – ‘सेठ, माफ करा. पंचवीस हजाराच्या जाहिराती देईन म्हणालो होतो मी. पण दहा हजाराच्याच देऊ शकलो. हे उरलेले पंधरा हजार रूपये घ्या. सॉरी बॉस!’

याचकाला सेठ म्हणायची ही पध्दत, महाभारत युध्दात देवेंद्र रांगेत उभा राहिल्यापासून या मंडळींनी सुरू केली की काय, हे कळायला काहीच मार्ग नाही.

हळबे वर्ध्याच्या महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालया चे एक संचालक आहेत. गांधी किंवा खादी हा काही त्यांचा हळवा कोपरा नाही, पण ते कॉलेज अत्याधुनिक करणं आणि त्याची ग्रामीण वैद्यकीय सेवा प्रगल्भ करणं, हे झपाटलेपण त्यांच्यात आहे.

हे सगळं कमी आहे, म्हणून हळब्यांनी गावाकडे उंचावरल्या दुर्गम डोंगरपठारावरच्या आपल्या दुर्लक्षित शेतजमिनीची सुधारणा हाती घेतली आहे. एक तर कुणब्याचं डोकं अन् बामनाचं शेत पूर्वी कधी पिकत नसे. पण काय करता? कलियुग आलंय ना! …हळब्यांनी स्वखर्चानं लांबलचक रस्ता बांधला. शेततळं घेतलं. वीज आणली. वेगळ्या वाणाची अत्याधुनिक पिकं घेतलीच. पण सध्या काम चालू आहे ते वेद आणि प्राचीन संस्कृत वाङ्मयामध्ये उल्लेख आलेले वृक्ष लावण्याचं. जेणेकरून पुढे सहलीसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना त्यांचा उपयोग व्हावा. एरवी वृक्षराजी- संवर्धनासाठी दहा हजार रोपं लावून झाली आहेत. वंशविस्तार न करणार्‍या, कुटुंबाच्या एकुलत्या एक वारसानं, दहा हजार वृक्ष मायेनं वाढवले आहेत. जुनी श्रध्दा आहे – वृक्ष पुत्रासमान! उंच डोंगरपठारावरच्या शेतावर वाहणारा वारा वाया जातोय, म्हणून हळब्यांना आता तिथं लावायचीय पवनचक्की . हा वेडा माणूस हे सर्व कुणासाठी करून ठेवतोय?

बॉलिवूड, कॉर्पोरेट्स आणि विशेषतः राजकारणामधली मंडळी अपूर्ण वाढीच्या आपल्या पिलावळींसाठी काय काय करताना दिसतात आपल्याला! पण रखरखीत वाळवंटात वार्‍याची अशी एखादी झुळूकही येते!!

नाव – श्रीपाद रामचंद्र हळबे
व्यवसाय – कंपनी सेक्रेटरी
पत्ता – एस.आर. हळबे असोशिएट्स, 407 मेकर भवन नं III, 21 न्यू मरीन लाइन्स, मुंबई- 400 020
शिक्षण – एम.कॉम(ऑ), ग्रॅड सीडब्लुए, एमसीएम, एलएल.एम., डिप्लोमा इन सिस्टम मॅनेजमेंट (जे.बी.इन्स्टिट्यूट), एम.कॉम..(मुंबई विद्यापीठ ) आणि ऑल इंडिया फायनल एक्झामिनेशन ऑफ कंपनी सेक्रेटरीज या दोन्ही परीक्षांत सर्वप्रथम.
व्यवसाय – 1973 ते 1984 नोकरी. त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय. आजारी कंपन्यांचे विलिनीकरण, कंपन्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नातील सहभाग, परकीय कंपन्यांचे सहकार्य, तसे करारमदार व एफआयपीबी कागदपत्रे. करविषयक व तत्सम आर्थिक बाबींसंबधात उच्च व सर्वोच्च न्यायलयातील अनेक दाव्यांमध्ये लढत अशा प्रकारची कामे हाताळली.
अध्यापन मुंबई विद्यापीठ , व्यवस्थापन संस्था आणि आय.सी.एस.आय .मध्ये वीस वर्षे नियमित अध्यापन
लेखन ‘बिझनेस स्टँडर्ड’ या इंग्रजी दैनिकात आणि ‘दिनांक’ या मराठी साप्ताहिकात बराच काळपर्यंत नियमित स्तंभलेखन.
चर्चासत्रे – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स यांनी योजलेल्या चर्चासत्रांत कंपनी कायदा, ग्राहक संरक्षण आणि अँटीट्रस्ट कायदा या संबंधातील विविध पोटविषयांवर निबंधवाचन.
संचालकपदे – अनेक पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या संचालकपदी नेमणूक.

1.हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी लि.
2.ब्लॅक अँड डेकर बजाज लि.
3.केसी इंडस्ट्रीज लि. सरकारतर्फे नेमणुका
4.बँक ऑफ इंडिया वर 2001 ते 2004 पर्यंत संचालक
5.’व्हिजन 2020’ या विषयावरील प्लॅनिंग कमिशनच्या समितीचे सदस्य

इतर हौसेच्या गोष्टी:
1.मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या व्यवस्थापकीय समितीचे सभासद
2.बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाच्या अर्थपुरवठा उपसमितीचे माजी सभासद
3.ढाका येथील 1998च्या एकदिवशीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेच्या संयोजनात इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सीलतर्फे सहभाग
4.कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कारभारी मंडळाचे सभासद. ही सोसायटी वर्ध्याचे मेडिकल कॉलेज व सातशे खाटांचे रुग्णालय चालवते.
5.स.का.पाटील यांनी स्थापन केलेल्या बृहद भारतीय समाजाचे टणीस मानार्थ चिटणीत
6.महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागात कार्यरत असलेल्या जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट या सार्वजनिक संस्थेचे विश्वस्त

प्रतापथोरात
pratapthorat1@gmail.com 
9870108345

श्रीपादहळबे
srhalbe@gmail.com 

(022)22035399 / 98205 14988

About Post Author