‘बालगंधर्व’ आणि ‘नटरंग’ (Balgandharva And Natrang)

– दिनकर गांगल

     ‘बालगंधर्व’ चित्रपट लोकांना खूप आवडण्‍याचे एकमेव कारण सुबोध भावे हा आहे. ‘बालगंधर्व’ हे गेल्या शतकातले ‘फिनॉमिनॉन’ होते. तो भाव चित्रपटातून व्यक्त होत नाही. जे पडद्यावर दिसते ते जुने वैभव आणि प्रेक्षक नॉस्टॅल्जिक होत त्यामध्ये रमून जातात. दिग्‍दर्शक रवी जाधव यांचा या आधीचा ‘नटरंग’ सिनेमा बघितला तेव्हा अशीच फसगत झाली होती. अतुल कुलकर्णी यांची अप्रतिम भूमिका आणि अजय-अतुल यांची मनाची पकड घेणारी नव्या धर्तीची लावणी वगळली तर तो चित्रपटही ‘बालगंधर्व’प्रमाणेच अत्यंत मामुली होता.

– दिनकर गांगल

     ‘बालगंधर्व’ चित्रपट लोकांना खूप आवडला आहे, त्याचे एकमेव कारण सुबोध भावे हा आहे. त्याचे स्त्रीरूपातील मोहक मुद्राभाव आणि देहडौल बहुधा ‘बालगंधर्वां’च्या स्त्रीभूमिकांपेक्षाही चांगले वठले आहेत. त्यामुळे खुद्द ‘बालगंधर्वां’नी त्या काळात जसे प्रेक्षकांना खुळावले होते ती मोहिनी सुबोध भावेच्या ‘बालगंधर्वां’नी प्रेक्षकांवर टाकली आहे. त्यांतल्या बहुसंख्य प्रेक्षकांनी ‘बालगंधर्व’ नावाचा महिमा ऐकला व वाचला आहे. त्यांनी मूळ बालगंधर्वांना पाहिले-ऐकलेले नाही.

 

     सुबोधनंतर क्रम लावायचे तर दहाच्या पट्टीवर एकनंतर सातव्या वगैरे क्रमांकावर निर्माते नितीन देसाई येतात. त्यांनी पडद्यावर जी श्रीमंती दाखवली आहे त्यामुळेही प्रेक्षक फिदा आहेत. ते वैभव ‘बालगंधर्वां’च्या महिम्याशी मिळतेजुळते असल्याने भावे यांच्या भूमिकेच्या जोडीला खुलून दिसते. किंबहुना भावे यांना त्यामुळे उत्तम मखर लाभते. त्यानंतर येतात संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार व गायक आनंद भाटे. त्यांनी ‘बालगंधर्वां’ची गायकी यथार्थ पेश केली आहे असा अभिप्राय अमरेंद्र धनेश्वरसारख्या संगीत समीक्षकाने नि:संदेह दिला आहे.

 

     त्यापुढे ‘बालगंधर्व’ चित्रपटाचे उणेपण सुरू होते आणि ते स्वाभाविक आहे, कारण या श्रेयनामावलीत दिग्दर्शक रवी जाधव यांचे नाव कोठे येत नाही आणि दिग्दर्शकाविना चित्रपट पोरकाच म्हणायचा! कारण ‘बालगंधर्व’ हा चित्रपटसंज्ञेला पात्रच ठरत नाही. जे पडद्यावर दिसते ते जुने वैभव आणि प्रेक्षक नॉस्टॅल्जिक होत त्यामध्ये रमून जातात.

 

     प्रभात चित्र मंडळ, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि सिनेकट्टा यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटावर चर्चा घडवून आणली तेव्हा नितीन देसाई व कौशल इनामदार यांच्या बोलण्यात ‘बालगंधर्वां’बाबत बरेच संशोधन केल्याचे उल्लेख आले, परंतु ते चित्रपटात जाणवत नाही. ‘बालगंधर्व’ हे गेल्या शतकातले ‘फिनॉमिनॉन’ होते. तो भाव चित्रपटातून व्यक्त होत नाही. चित्रपट त्यांच्या जीवनातील घटना नोंदत जातो. भाबडे प्रेक्षक त्यावर खूष आहेत. तो आनंद त्यांना लखलाभ. त्यांना दिग्दर्शक हा चित्रपटाचा कर्ता असतो हे ज्या दिवशी कळेल तो सुदिन! चित्रपट ‘बालगंधर्व’ व गोहरबाई यांच्या नात्याचा खुलासा न करता संपून जातो.

 

     कमलाकर नाडकर्णी यांनी ‘लोकसत्ते’च्या रविवार पुरवणीत चित्रपटाचा योग्य समाचार घेतला आहे. त्यामध्ये रवी जाधव यांच्या दिग्दर्शकीय समजुतीतील उणेपणाचा उल्लेख आहे. पण तो पुरेसा ठासून मांडला गेला नाही. ‘बालगंधर्व’ हे भावे-देसाई-इनामदार यांचे जेवढे यश आहे तेवढे जाधव यांचे अपयश आहे.

 

     सुषमा बर्वे यांनी चर्चेनंतरच्या गप्पांत, त्यापुढे जाऊन सांगितले, की जाधव यांचा या आधीचा ‘नटरंग’ सिनेमा बघितला तेव्हा अशीच फसगत झाली होती. अतुल कुलकर्णी यांची अप्रतिम भूमिका आणि अजय-अतुल यांची मनाची पकड घेणारी नव्या धर्तीची लावणी वगळली तर तो चित्रपटही ‘बालगंधर्व’प्रमाणेच अत्यंत मामुली होता. आनंद यादव यांच्या मूळ कादंबरीला तर तो न्याय देत नाहीच! जाधव यांनी दिग्दर्शनाचे शिक्षण कोठे घेतले ते माहीत नाही, परंतु त्यांना दिग्दर्शनकौशल्य जाणून घेण्याची गरज आहे. प्रसंगाला प्रसंग जोडणे म्हणजे चित्रपट नव्हे हे त्यांनी समजून घ्यावे.

– दिनकर गांगल – info@thinkmaharashtra.com   

About Post Author