बाब अगदीच साधी!

0
26

चीनमध्ये जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधल्याचे वृत्त पुण्यातल्या दोन वर्तमानपत्रांत अगदी ठळक़पणे आले. मोठ्या फोटोसकट. दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांत या पुलाचे तपशील मात्र अगदी वेगवेगळे आहेत! एका ठिकाणी म्हटले, हां पूल छत्तीस किलोमीटर लांब आहे तर … – संजय भास्कर जोशी बाब अगदीच साधी आहे. त्यात ना काही राजकीय ना आर्थिक ना सामाजिक. ना काही सनसनाटी!

चीनमध्ये जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधल्याचे वृत्त पुण्यातल्या दोन वर्तमानपत्रांत अगदी ठळक़पणे आले. मोठ्या फोटोसकट. दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांत या पुलाचे तपशील मात्र अगदी वेगवेगळे आहेत! एका ठिकाणी म्हटले, हां पूल छत्तीस किलोमीटर लांब आहे तर दुसर्‍या ठिकाणी याच पुलाची लांबी बेचाळीस किलोमीटर दिली आहे. एका ठिकाणी याचा खर्च २.३ अब्ज डॉलर दिलाय तर एका ठिकाणी ५५.५ अब्ज पौंड! म्हणजे कितीपट फरक, ते बघा! खरे तर, बाब अगदी साधीच आहे. सहज ध्यानात आली इतकेच. हेच इतर बाबतींत होत असेल ना? माहितीच्या अचुकतेबाबत आग्रह कोण अन कधी धरणार? माहितीचा अधिकार मान्य झाला आहे अगदी कायद्याने. पण माहितीच्या अचुकतेचे काय? चीनमधला पूल सहा किलोमीटर कमी किंवा जास्त असल्याने आपल्या आयुष्यात काय फरक पडणार? त्याचा खर्च बारा हजार कोटी काय अन एक लक्ष वीस हजार कोटी काय….! एखादा आर्थिक घोटाळा दीड लाख कोटी काय आणि पावणेदोन लाख कोटी काय? आपल्या आयुष्यात काय फरक पडणार? बातम्या, माहिती, तपशील… विश्वासार्हता अपेक्षितच करायची नाही असे ठरवले तर सारेच सोप्पे, नाही का? एकदा बातमी येते, की महाराष्ट्राने कधीच घरातल्या गॅसवरचा कर माफ़ केला होता आणि किमती बंगालपेक्षा कमी होत्या. दुसर्‍यांदा बातमी नेमकी उलट येते. बातमी आणि मते यांत फरक असतो ना? वृत्तपत्रावर टीप लिहावी: या वर्तमानपत्रातील बातम्या आणि मतांची जबाबदारी संपादकावर नाही. कुणीच कशाचीच जबाबदारी ना स्वीकारणे सर्वोत्तम.
अर्थात सुरवातीलाच म्हटले ना, बाब अगदीच किरकोळ आहे!

संजय भास्कर जोशी
०९८२२००३४११
इमेल – sanjaybhaskarj@gmail.com

About Post Author

Previous articleअनेपिक्षित –अफलातून!
Next articleऋतुसंहार
संजय भास्‍कर जोशी हे संजय भास्कर जोशी हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. जोशी हे मूळचे एक उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी. त्‍यांनी अनेक वर्षे मोठ्या पदावर कामे केली. ते आयडिया कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट असताना वयाच्या 43 व्या वर्षी त्‍यांनी पूर्णवेळ वाचन आणि लेखन करण्‍याकरता नोकरी सोडली. जोशी यांची 'नचिकेताचे उपाख्यान', 'रेणुका मृणालची उपाख्याने',' श्रावणसोहळा' या कादंबर्‍या, 'स्वप्नस्थ' आणि 'काळजातीला खोल घाव' हे कथासंग्रह, तसेच, 'आहे कॉर्पोरेट तरी' हे आत्मचरित्रपर पुस्तक अशी साहित्‍यसंपदा आहे. त्यांच्‍या लेखनाला दोन वेळा राज्य सरकारचा पुरस्‍कार प्राप्‍तझाला आहे. त्‍यांनी जे.डी सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीचा अनुवाद केला असून अंतर्नाद, अनुभव, ललित, म टा , लोकसत्ता वगैरे नियतकालिकात विपुल समीक्षा लेखन केले आहे. वाचन आणि वाचनसंस्कृती यांच्या वृद्धीसाठी ते अनेक प्रकल्प चालवत असतात. साधना साप्ताहिकात त्यांची 'संजय उवाच' व 'पडद्यावरचे विश्वभान' ही सदरे लोकप्रिय झाली. लेखकाचा दूरध्वनी 9822003411