बांद्रयाचं आकर्षण

0
32

बांद्रा स्कूल आँफ आर्टमधला मित्र ‘जेजे’त आला.त्याला बांद्रयाचं फार कौतुक. मोठामोठया चित्रकारांची सीस्केप पाहिलेली.समुद्राचं चित्र सगळयात वेगानं काढावं लागतं. ब्रशच्या काही फटका-यांतच ते झालं पाहिजे असा संकेत. वाटायचं, आपल्यालाही वॉटर कलर करता आलं पाहिजे. मग काय, पाण्याची बाटली, ब्रश, हॅंडमेड पेपरचं पॅड वगैरे जामानिम्यासह समुद्रकिना-यावर सीस्केप काढायला मी आणि मित्र जायचो. त्याचं प्रभुत्व जलरंगापेक्षा पेस्टलवर. अर्थात चित्रंही चांगली काढायचा. माझ्या चित्रात हौशीपलीकडे काही दम नव्हता. पण बांद्रा-खारदांडा या परिसरावर भरपूर प्रेम. मुळात बारा वर्षे खाडीत डुंबल्यानं पोफळी, नारळी, नद्या, समुद्र हे जिवाभावाचे सखे. खास मित्र! मुंबई सुटली. बांद्राही सुटलं. तरी अधूनमधून तिथं चक्कर व्हायचीच. अलिकडे, पुन्हा सगळं बांद्रा पायी भटकायचं ठरवलं. स्टेशनात उतरून चालत सुटलो.

ब्रांदा स्टेशन वीज नसताना उजेड मिळवण्यासाठी छपरात खिडक्या ठेवत. त्या गरजेतून अशी इमारत तयार होते. असं प्रेमात पडावंसं वाटणारं स्टेशन माझ्या पाहण्यात नाही.

भटकत भटकत थेट माउंटमेरीपर्यंत गेलो.खांद्यावर कॅमेरा लटकलेला असतोच.

माउंटमेरी चर्चशेजारी विविध वाद्यांसह समूहगान ऐकत बसलो. कोणी आक्षेप घेतला नाही. शिस्तीत चाललं होतं. चर्च आणि मशिदीत तासनतास कसे जातात ते कळत नाही. ब-हाणपुर, मांडवगड, चंपानेर, खंबातच्या जुम्मा मशिदीत त्यांचे खांब-घुमट पाहात बसावंसं वाटतं. कधी कधी त्या निर्मनुष्य असतात, मग काय विचारायलाच नको.


महानगरातल्या लोकांना विशाल अवकाशात एकटयानंच बसायची संधी फार क्वचित मिळते.सारखी आजुबाजूला माणसं असतात.इच्छा नसली तर महागाई आंदोलनं, भाषेचं सार्वजनिक प्रेम, आपले कोण-परके कोण अशा क्षुद्र गोष्टींवर चर्चा करावी लागते. एकानं वाचलेलं दुस-याला सांगायचं. त्यानंही ते वाचलेलं असतं. सगळयांकडे तीच माहिती आणि त्याच माहितीचा काथ्याकूट! एकटं बसायला पुरातन चर्च,मशीद किंवा भाज्याचं लेणं स्वर्गवत असतं!

अगदी विश्वाचा गहन विचार  नाही केला तरी खूप व्यक्ती डोळयांसमोर येतात. दर्यावर्दींचं कौतुक वाटतं. सेंट थॉमस, सेंट इग्नीटस, वास्को द गामा अशी किती मर्द माणसं असतील! अगदी संताजी-धनाजींसारखे निर्भीड. कुठलाच रस्ता माहीत नसताना जहाज समुद्रातून हाकायचं. माहीत नसलेल्या किना-यावर पोचायचं. धारिष्ट्यवानांचं कौतुक वाटतं. आपला विचार दुस-याच्या गळी उतरवायचा. सध्यातरी काय, तेच करण्याची धडपड चालू असते. पिरॅमिड, आयफेल टॉवर, थ्री गॉर्ज धरण बांधायची कल्पना करणारे.प्रत्यक्षात तसं करून दाखवणारे डोळयांसमोर येऊन उभे ठाकतात.

बाजूच्या चित्रात: कालीकतच्या कप्पाडबीचवरील  वास्को द गामाचे स्मारक. माझ्या हाती कारभार असता तर मोठं भव्य स्मारक बनवलं असतं आणि त्या दर्यावर्दीला सलाम ठोकला असता.

इंग्रजांनी मुंबईचा विकास करण्याआधी पोर्तुगीजांनी बांद्रा निवडलं. तिथं 1575 पासूनची चर्च आणि कॉन्व्हेंट आहेत. चर्चची आणि शाळांची विशाल आवारं आहेत. डिजिटल कॅमेरा असला की रोल भरा, संपला की नवा आणायला धावा ही भानगड नसते. नुसतं शूट करत जायचं. आपण त्यांतलं चांगलं-वाईट पाखडत बसायला मोकळे असतो.

भारतातल्या सर्व महानगरांत जाऊन या. सगळयांना कळतं पण वळत नाही.मुंबईला कळतं आणि वळतंसुध्दा. वरची पाटी बोलकी आहे. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत शहाणी आणि समजुतदार माणसं बरीच आहेत. म्हणून चिंता नाही. अशा सविस्तर माहिती देणा-या संगमरवरी पाट्या इमारतींवर लावल्या आहेत.

बांद्रा आता समुद्रकिनारीसुध्दा गजबजलं असलं तरी त्या त्या स्मारकात अजून आहे तसं वातावरण आहे.पण बदलतंय हे नक्की. फ्लाय ओव्हरची हौस पुरी होत असताना, बांद्रयात ‘स्कायवॉक’ अथवा ‘आकाशवाटा’ बांधायला सुरूवात झालीय.

नव्या उभ्या होत असलेल्या चकचकीत 'आकाशवाटा'लगेच संक्रांतदेवीची आठवण झाली. तिचे असे काहीसे वर्णन असते. बान्द्रादेवीची भुजा दोन योजने असून ती कलानगरपर्यंत पोचली आहे. भुजेचे रूप पिवळयाधम्मक अजगरासारखे आहे. दुसरी भुजा तीन योजने लांब असून ती रजतासारखी चकाकत आहे. तिचा तिसरा हात वरळीपर्यंत पोचतो. चौथ्या हाताचे बोट तिने बांद्रा टर्मिनसकडे केलेले आहे. ती देवी क्रूर असून सामान्यांना क्लेशदायक आहे. तिचे वारनाव सागरसेतू अथवा सीलिंक असून  नक्षत्रनाव दांडा आहे. तो दांडा ती मुंबईला छळणा-यांच्या टाळक्यात केव्हाही घालण्याचा संभव आहे. त्यांनी कसलाही जप केला तरी तो फळाला येणार नाही.

वांद्रयाच्या आकाशवाटेवर जायला त्रेचाळीस पाय-या चढाव्या लागतात.आकाशवाटेची रस्त्यापासूनची उंची चोवीस फूट आहे. म्हणजे दोन मजले. त्याचे उद्धाटन 24 जून 2008 रोजी झाले. आजवर त्यावरून किती लोक चालले त्यासंबंधी कळले नाही. पण काही उत्साही त्याचा सकाळी जॉगिंगसाठी उपयोग करतात असे ऐकिवात आहे. मोटारींच्या वाटेत  पादचारी आडवे येतात, म्हणून स्काय वॉक बनवले आहेत. मुंबई श्रीमंतांसाठी आहे हे खरं.

अजगरी आकाशवाटेवरून चालत जाताना दिसणा-या काही अवस्था..


तेवीस फूट उंचीवरून दिसणारं बांद्रा. समुद्राकाठचं आणि स्टेशनजवळचं बांद्रा यांत कितीतरी फरक आहे!

आणखी काही वर्षांनी सुबक बांद्रा स्टेशनचा संपूर्ण फोटो काढता येणार नाही

प्रकाश पेठे
भ्रमणध्वनी : 094277 86823
prakashpethe@gmail.com


About Post Author

Previous articleकोटी- कोटी मोलाची !
Next articleसमस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.