बहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट

1
37
carasole

अहमदनगरच्या श्रीगोंद्यापासून वीस कोसांवर भीमा नदीच्या काठावर बहादूरगड हा किल्ला उभा आहे. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार बहादुरखान याने १६७२ साली पावसाळ्यात भीमा नदीच्या काठावर पेडगाव येथे छावणी टाकली. बहादूरखान हा औरंगजेबाचा दूधभाऊ. औरंगजेबाने त्याला सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले. त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिली होती. पेडगाव येथे वास्‍तव्‍यास असताना बहादुरखानाने तेथे भुईकोट किल्ला बांधून त्यास बहादुरगड असे नाव दिले. तो किल्ला चाळीसाहून अधिक वर्षांपर्यंत पुणे प्रांतातील मोगल सैन्याची युध्दसामुग्री साठवण्याचे मुख्य ठिकाण होते. बहादुरगड हे त्या किल्ल्याचे प्रचलित नाव. गॅझेटीअरमध्ये त्या किल्ल्याची नोंद ‘पेडगावचा भुईकोट’ अशी आहे.

बहादूरगडाबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादुरखानाच्या केलेल्या फजितीची कथा प्रसिद्ध आहे. बहादूरखानाने बहादूरगडामध्‍ये एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी गोळा केले असल्याची माहिती महाराजांच्या गुप्तहेरांनी आणली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरुन काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी बहादूरखानाची निवड केली.

शिवाजी महाराजांनी नऊ हजारांचे सैन्य बहादूरगडावरील खजिना लुटण्यासाठी पाठवले. त्या‍ सैन्याच्या दोन तुकड्या तयार करण्‍यात आल्या. एक दोन हजाराची तर दुसरी सात हजारांची. दोन हजारांच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता. तो सफल झाला. बहादूरखान लढाईसाठी तयारी करुन मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. मराठ्यांच्या तुकडीने माघार घेवून पळायला सुरवात केली. बहादूरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला. मराठ्यांनी बहादूरखानाला हुलकावणी देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकर-चाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेवून रायगडाकडे कूच केली.

पेडगाव हे निजामशाहीच्या काळात महत्त्वाचे केंद्र होते. तेथील किल्ल्यात निजामशाहीच्या खुणा दाखवणारा चांदबिबीचा महाल पाहता येतो. येथूनच बावन्न परगण्यांचा कारभार चालत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी सापडतात.

पेडगावात शिरल्यावर बहादुरगड किल्ल्याचे विखुरलेले अवशेष दिसतात. किल्ला आयताकृती आहे. त्याला दोन दरवाजे आहेत. त्यापैकी पहिला दरवाजा गावात आहे. त्याची अवस्था चांगली आहे. दुसरा दरवाजा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आहे. गावातील दरवाजाला भव्‍य कमान आहे. त्यातून आत शिरल्यावर मारुतीच्या पाच फूट उंच मूर्तीचे दर्शन होते. त्यासमोर भैरवनाथाचे मंदिर आहे. बहादुरगडाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे यादव काळात बांधलेल्या पाच मंदिरांचा समूह आहे. ती सर्व मंदिरे काळ्या पाषाणात कोरलेली आहेत. ती सर्व मंदिरे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. भैरवनाथाचे मंदिर त्यांच समूहापैकी एक आहे.

त्‍या मंदिराच्या समोर अनेक शिल्पाकृती विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यामध्ये काही वीरगळी आहेत, काही सतीच्या शिळा आहेत. मंदिराच्या समोर दगडी दीपमाळ आहे. मंदिराच्या पुढे तटबंदीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्‍त्‍यावरून पुढे जाताना वाटेत अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष पडलेले दिसतात. काही अवशेष झाडी झुडपांमध्ये दडलेले आहेत. वाटेने चालताना सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिर नजरेस पडतात. त्या मंदिरांपैकी लक्ष्मीनारायणाचे मंदिर साधारण ब-या अवस्थेत आहे. त्या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पाहण्याजोग्या आहेत. मंदिरात शिवलिंग आहे.  मंदिरांच्या समोर पडझड झालेले तिसरे मंदिर नजरेस पडते. त्याच्‍या मागील बाजूस किल्ल्याची तटबंदी आहे. किल्‍ल्‍याच्‍या दक्षिणेकडे असलेली ती तटबंदी भीमा नदीला समांतर आहे. तटबंदीमधे असलेले चांदबिबी महालाचे बांधकाम पाहण्यासारखे आहे. त्‍या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो.

भैरवनाथाच्‍या मंदिरांच्या एका बाजूला वाड्याचे अवशेष दिसतात. थोडे अंतर चालून गेल्यावर वाड्याच्या आत जाण्याचे प्रवेशव्दार लागते. तेथे औरंगजेबाचा रहाण्याचा वाडा होता. तो वाडा दोन मजली आहे. त्याला चुन्याचा गिलावा करण्यात आला आहे. त्याच्या आजुबाजुला काही छोट्या वाड्यांचे अवशेष दिसतात. वाड्याच्या प्रवेशव्दाराजवळ इतर वाड्यांचे चौथरे दिसतात. काही चौथ-यांवर अनेक शिल्पे पडलेली आहेत. त्यांच्या मागच्या बाजूस देवीचे मंदिर आहे. ते मंदिर प्रशस्त आहे. त्‍यात पावसाळा वगळता इतर ऋतूंमध्‍ये राहयाची सोय होते. बहादुरगड किल्ला फिरण्यास तीन तास पुरतात.

बहादूरगडापर्यंत पोचण्यागसाठी दोन-तीन मार्ग आहेत. पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव दौंड येथून गाडीरस्त्याने देऊळगाव पर्यंत आल्याोस पेडगाव गाठता येते. पेडगाव मधून नावेने भीमा तीराच्या पलीकडे पेडगावामधील बहादूरगडाला जावे लागते. दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगरकडून अथवा पुण्यातून श्रीगोंदे येथे पोचता येते.

– आशुतोष गोडबोले

Last Updated On 4th July 2017

About Post Author

1 COMMENT

  1. राज करेंगा मराठा
    राज करेंगा मराठा

Comments are closed.