बलुतंची चाळिशी आणि ग्रंथालीची सार्थकता

_Daya_Pawar_3.jpg

एखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. ‘बलुतं’ या आत्मकथनाला हे भाग्य मिळाले आणि त्यानिमित्ताने ‘ग्रंथाली’ला एक वेगळी सार्थकता लाभली आहे.

‘ग्रंथाली’ला चव्वेचाळीस वर्षें झाली. सुरुवातीच्या सात-आठ प्रकाशनांनंतर ‘ग्रंथाली’च्या हाती दया पवार यांचे ‘बलुतं’ लाभले. दया पवार हे ज्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीतून आले होते, त्यांच्या साहित्याची वाट तोपर्यंत मराठी साहित्य प्रांतात पडली नव्हती. आत्मकथनाचा हा बाजही मराठी साहित्यविश्वाला पूर्णपणे नवा होता. त्यातील अनुभव, त्याचा शोध आणि व्यक्त होण्याची असोशी त्यावेळच्या मराठी सारस्वताला पूर्णपणे अनोळखी होती. ‘ग्रंथाली’ वाचक चळवळ जो नवा प्रवाह साहित्यविश्वामध्ये रुजवू पाहत होती, मराठी साहित्यविश्वाला जे जाणवून देण्याचा प्रयत्न करत होती, ‘बलुतं’ हे त्याचेच प्रातिनिधिक रूप होते. ‘ग्रंथाली’ने ‘बलुतं’मुळे समीक्षेचे नवे दालन खुले होईल असेही पाहिले आणि हे पुस्तक खेड्यापाड्यांत सर्वसामान्यांच्या हातात जाईल यासाठी परिश्रम घेतले.

‘बलुतं’ गाजणार होतेच. तसे ते गाजले. पण, तेवढ्या गाजण्याने ही प्रक्रिया थांबणार नव्हती. त्यामुळे पाठोपाठ ‘उपरा’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं गोठणं’, ‘आभरान’, ‘कार्यकर्ता’, ‘उचल्या’, ‘आयदान’, ‘अक्करमाश्या’ आले… ही यादी आता बरीच मोठी आहे. या साऱ्या यादीचा उगम ‘बलुतं’ आहे. म्हणून ‘बलुतं’ची चाळिशी साजरी एका वेगळ्या अंगाने-ढंगाने, रंगाने सांस्कृतिक माहोलात कार्यक्रमाद्वारे करण्याचे ठरवले.

‘ग्रंथाली’ने यानिमित्त ‘बलुतं’च्याच नावाने उपेक्षित समाजघटकातून येणाऱ्या लेखकाच्या आत्मकथनासाठी पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार केवळ ‘ग्रंथाली’च्या प्रकाशनांसाठी किंवा लेखकांसाठी नाही, तर हा पुरस्कार देताना पूर्णपणे तटस्थता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी साधल्या जाव्यात म्हणून येत्या पाच वर्षांसाठी हा पुरस्कार ठरवण्याची जबाबदारी आम्ही ‘दया पवार प्रतिष्ठान’वरच सोपवली आहे. यावर्षीच्या पहिल्या पुरस्कर्तीची निवड तर झाली आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने तेही श्रेय आम्ही घेऊ इच्छित नाही. मराठी साहित्याने गेल्या चाळीस वर्षांत आशय आणि भाषा या दोन्ही अंगांनी बराच प्रवास केला आहे. तो प्रवास निरंतर असतो. तो कोणी थांबवू शकत नाही. आपण सगळे त्याचे साक्षीदार व्हायचे असते. नव्या प्रवाहांना, नव्या उर्मीना योग्य वेळी पाठबळ द्यायचे असते, सुपीक जमीन उपलब्ध करून द्यायची असते. ‘ग्रंथाली’च्या चाळीस वर्षांपूर्वीच्या विश्वस्तांनी ते केले. त्याला मान्यता आज आपण सगळे देत आहोत. ‘ग्रंथाली’चे विद्यमान विश्वस्त मंडळही त्याच उर्मीने आणि त्याच जबाबदारीने साहित्यव्यवहाराकडे पाहत आहे.

– सुदेश हिंगलासपूरकर (विश्वस्त, ग्रंथाली)

About Post Author

Previous articleदया पवार यांच्या बलुतंची चाळिशी!
Next articleडॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य
सुदेश हिंगलासपूरकर हे 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे संचालक. ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून 'ग्रंथाली' वाचक चळवळीशी जोडले गेले. त्यांनी दिनकर गांगल यांच्यानंतर 'ग्रंथाली' वाचक चळवळीचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळले. सध्या ते संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत अाहेत. त्यांनी 'ग्रंथाली'ची पुस्तके, शब्द रुची हे मासिक किंवा इतर कार्यक्रम कल्पकतेने घडवले. लोकसंग्रह हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष अाहे. हिंगलासपूरकर यांनी महाराष्ट्र अाणि महाराष्ट्राबाहेर दोन हजारांहून अधिक पुस्तक प्रदर्शने भरवली अाहेत. ते चंद्रपूर येथे १९७८ साली अायोजित केलेल्या साहित्य संमेलनापासून अाजपर्यंतच्या सर्व साहित्य संमेलनात सहभागी राहिले अाहेत. त्यांनी 'ग्रंथाली'च्या माध्यमातून महाराष्ट्रात शंभराहून अधिक ग्रंथयात्रा काढल्या अाहेत. त्यांनी दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त 'गांगल ७०, ग्रंथाली ३५' या पुस्तकाचे संपादन व निर्मिती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली 'ग्रंथाली'ने भारतातील अाणि भारताबाहेरील लेखकांची शेकडो पुस्तके प्रकाशित केली. हिंगलासपूरकर यांना उत्कृष्ट कल्पनेचा 'म.टा. सन्मान' पुरस्कार (२००६), संत रोहिदास सामाजिक न्याय पुरस्कार (२००८), उत्कृष्ट संपादनासाठीचा 'अाशिर्वाद पुरस्कार' (२०११) इत्यादी सन्मान लाभले अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 9869398934