फक्त कवितांचे ग्रंथालय!

0
46

     अंबाजोगाई ही आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी. येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ- विवेकसिंधू. त्यानंतर मराठी कविता-ग्रंथांचा अखंड प्रवाह सुरू झाला. गेल्या साडेनऊशे वर्षांत त्या प्रवाहाचे रुपांतर महानदीसारखे विशाल झाले आहे. या प्रदीर्घ काळात हजारो कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्या सर्वांना गोळा करून मुकुंदराजांच्या परिसरात मांडायची योजना आखली गेली आहे. मराठी कवितेच्या संदर्भासाठी अंबाजोगाई येथील 'कविता ग्रंथालया'कडे लोकांनी निर्देश करावा, मराठी कवितेच्या अभ्यासकांना एके ठिकाणी सर्व कविता-ग्रंथ उपलब्ध व्हावेत, असा संयोजकांचा मानस आहे.

     मराठवाडा साहित्य परिषदेची अंबाजोगाईची शाखा आणि अंबाजोगाईचा पत्रकार संघ यांनी मुकुंदराजांच्या गावात, अंबाजोगाई येथे मराठी कवितांचे ग्रंथालय व्हावे असा संकल्प २७ फेब्रुवारी २०१० रोजी 'मराठी दिना'च्या निमित्ताने केला.

     या उपक्रमाचे संयोजक अमर हबीब यांनी सांगितले, की या उपक्रमाची सुरुवात या वर्षी मुकुंदराज यात्रेच्या वेळेस (डिसेंबर 2010) मराठी कवितासंग्रहांचे प्रदर्शन भरवून करणार आहोत. किमान एक हजार मराठी कवितासंग्रह या प्रदर्शनात मांडावेत असा आम्ही विचार केला होता, मात्र पहिल्या दोनच महिन्यांत एक हजाराहून जास्त कवितासंग्रह गोळा झाले. आता आम्ही पाच हजारांचे लक्ष्य ठरवले आहे.

     ते म्हणाले, की मी माझ्या जवळचे सुमारे 130 कवितासंग्रह या ग्रंथालयासाठी अर्पण केले. त्यापाठोपाठ नागपूर व लातूरहून कवितासंग्रह प्राप्त झाले. पुणे, मुंबई, सोलापूर येथूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. अंबाजोगाईकरांचा ओघ सुरूच आहे. महाराष्ट्रभरातील अनेक कवींनी त्यांचे कवितासंग्रह पाठवले आहेत.

     हबीब म्हणाले, की कोणाही कवीचा (जुना असो की नवा) कवितासंग्रह संग्रहालयात ठेवण्यासाठी चालेल. मात्र तो मराठी भाषेतलाच असावा. जुने, दुर्मीळ कवितासंग्रह असल्यास अधिक उत्तम. कवींनी स्वत:चे कवितासंग्रह द्यावेतच; शिवाय, त्यांनी आपल्याकडे असलेले दुसरे कवितासंग्रहही द्यावेत अशी विनंती आहे.

संपर्क –
अमर हबीब,
परिसर प्रकाशन, अंबर हाऊसिंग सोसायटी,
अंबाजोगाई, जि.बीड. -431517
भ्रमणध्वनी ९४२२९३१९८६
इमेल : habib.amar@gmail.com

About Post Author