प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर!

0
125

जे कानाला गोड वाटते आणि हृदयाला भिडते ते चांगले संगीत अशी स्पष्ट आणि साधीसरळ व्याख्या संगीताची करता येईल. जगातील सगळेच संगीत तसे मधुर व भूरळ घालणारे, पण भारतीय शास्त्रीय संगीताला कुठेच तोड नाही. भारतीय संगीतातील लावणी, गजल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत यांचा थाट काही वेगळाच…

मला तर गाणे ‘कळणं’ म्हणजे काय ते समजतच नाही. लहानपणी एखाद्याचे शास्त्रीय संगीत आवडले नाही, की काहीजण म्हणायचे, ‘तुला गाणं कळत नाही.’ ते ऐकून मला भारी राग यायचा. गाणे म्हणजे काय गणित आहे का? जे कानाला गोड वाटते आणि हृदयाला भिडते ते चांगले गाणे अशी माझी स्पष्ट आणि साधी व्याख्या होती. कोठलेही संगीत मनाला भावले, भिडले की ते संगीत मी ऐकत गेलो आणि तेच मला ग्रेट वाटत गेले. त्याचमुळे मग लावणी, गजल, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत यांचेही नंबर लागले. मी कर्नाटक संगीतही खूपच ऐकले. विशेषतः लालगुडी जयरामन, यू.श्रीनिवास, बालमुरली कृष्णन, बालचंदर वगैरे अनेक. तसाच एक काळ फक्त मोझार्ट, बीथोवेन, बाख आणि चेकॉव्हस्की यांच्यात गेला. मोझार्ट हा वयाच्या नवव्या वर्षापासून जगाला अनेक शतके मोहून टाकणारे संगीत रचतो काय; बीथोवेन हा बहिरा असताना जगप्रसिद्ध संगीतरचना करतो काय, ते सगळे अजब विश्व आहे! मला त्याही संगीतातील व्याकरण फारसे कळले नाही; पण त्यातील वातावरण मला फारच मोहिनी घालते. मला त्यातील पियानो, व्हायोलीन आणि फ्लूट यांचे वाजवणे, त्यांचे सूर आणि मिश्रण फार आवडते! मला आठवते, की मी अॅमस्टरडॅमला एकदा एका ब्राझीलियन रेस्टॉरंटमध्ये जेवण्यास गेलो होतो, तेव्हा ब्राझीलचे संगीत ऐकण्यास मिळाले. मग तेथीलही संगीत जमवण्यास सुरुवात केली. असेच एकदा लंडनला आमच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर्सना घेऊन एका चिनी रेस्टॉरंटमध्ये गेलो असताना, तेथे चिनी संगीत ऐकण्यास मिळाले. मला ते संगीत खूप आवडले. मग त्या हॉटेलवाल्याने माझा पत्ता घेऊन मला त्याची कॅसेट चक्क पाठवून दिली. गमतीची गोष्ट अशी जाणवली, की जवळजवळ सगळे चिनी पारंपरिक संगीत भारतीय ‘भूप’ रागाच्या जवळपास आहे. त्यानंतर सॅनफ्रान्सिस्कोतील एका चिनी मित्राकडे बसून रात्री बराच काळ चिनी संगीत ऐकून टेप करून घेतले!

मग मी भराभर जगातील वेगवेगळ्या देशांतील संगीत ऐकण्याचा आणि जमवण्याचा सपाटाच सुरू केला. मी युरोप, जपान, अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया येथील ज्या-ज्या देशात जायचो; तेथील संगीत मग मी जमवत असे. गंमत म्हणजे न्यू यॉर्कच्या मॅनहॅटनमधील रस्त्यांवरील दुकानात लॅटिन अमेरिका, आफ्रिका येथील संगीत मुबलक प्रमाणात मिळते. तेथे ऐकून खरेदी करण्यासही मजा येई. ते ऐकताना त्या-त्या देशातील संस्कृतीची, इतिहासाची आठवण येते आणि मग तो सर्वंकष अनुभवाचाच एक भाग होऊन बसतो.

 मी युरोपात आणि अमेरिकेत असताना, मला जॅझ आणि ब्लूज खूप ऐकण्यास मिळाले. जॅझ या शब्दातच लैंगिकता आहे असे म्हटले जाते. काही जण जॅझ म्हणजे ‘टू हॅव सेक्स’ अशीही व्याख्या करतात. ते संगीत एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जन्माला आले. न्यू ऑरलिन्समध्ये जन्मलेले ते संगीत झपाट्याने न्यू यॉर्कमधील हार्लेममध्ये आणि शिकागोला पोचले. जॅझ आणि ब्लूज यांनी अमेरिकेला 1920 आणि 1930 च्या दशकात तर चक्क नाचवले होते. ती परंपरा लुई आर्मस्ट्राँग आणि नंतर माईल्स डेव्हिस यांनी पुढे नेली. ब्लूज हे तर कृष्णवर्णीय लोकगीते आणि कामाच्या ठिकाणी निर्माण झालेले संगीत होते. त्यात आफ्रिकन कृष्णवर्णीयांचा गुलामगिरीचा आक्रोश होता. त्यात आध्यात्मिक भावनाही डोकावायची. युरोप-अमेरिकेत मला चिक्कार जॅझ आणि ब्लूज ऐकण्यास मिळाले. तसेच, इतरही प्रकारचे पॉप व रॉक संगीत ऐकता येत असे. मी अमेरिकेत असताना, मला मायकेल जॅक्सनच्याही दोनेक कार्यक्रमांना हजर राहता आले. त्याची स्टेजवरील विजेच्या वेगाने पळण्याची चपळता बघण्यासारखी असे.

एकूण काय, तर मला जगातील सगळे संगीत आवडते. अतिशय कर्कश्श ‘मेटल’ किंवा तत्सम गोंगाटाचे संगीत वगळले तर मी कशातही रमतो. पण मला मनापासून काय आवडते असे विचारले तर, भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत व हिंदी-मराठी सिने-भावगीते. पण जर तुझे प्रेम कशावर आहे असे कोणी विचारले, तर मात्र ते भारतीय शास्त्रीय संगीतावर असेच उत्तर मी देईन. त्याशिवाय मी राहूच शकत नाही, हे खरं!

– अच्युत गोडबोले 98200 30600 achyut.godbole@gmail.com

(विद्याव्रती, दिवाळी 2016 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here