प्रितालीची दौ़ड सायकलवर!

0
42
p4

निडी हे रोह्याजवळचे खेडेगाव, पण त्या गावाचे नाव देशपातळीवर गाजत आहे, ते प्रिताली शिंदेमुळे. मुलगी शिकली प्रगती झाली हे इथे खरे ठरले! ती रविकांत व रंजिता शिंदे यांची कन्या. तिने प्रगतीची पावले टाकण्यास आठवीपासूनच सुरुवात केली व ती सायकलमुळे-वेगवान गतीमुळे ध्येयमंदिराकडे जात राहिली. प्रिताली सध्या बालेवाडी(पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे फर्स्ट इयर बी.कॉम. करत आहे. तिचे पहिले ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण निडी येथे झाले. ती पाचवीपासून मेढे या गावी शाळेत येत असे. निडीपासून मेढे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून वडिलांनी तिला सायकल घेऊन दिली. तिचे सायकलने येणे-जाणे रोज सुरू झाले. ती नववीपर्यंत हायस्कूलमध्ये होती. चार वर्षांत सायकलची गरज हा तिचा हळुहळू छंद व मग ध्येय बनले.

मेढा हायस्कूलच्या शिक्षकांनी तसेच प्रकाश पानसरे या तिच्या मार्गदर्शकांनी तिच्यातले गुण ओळखून तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. शाळेत जाताना उशीर होऊ नये यासाठी प्रिताली वेगाने सायकल चालवत असे. ते पाहून ही मुलगी सायकलिंगमध्‍ये प्राविण्‍य मिळवू शकेल असा विश्‍वास पानसरेसरांना वाटला. त्‍यांनी त्याबाबत तिच्‍या आईवडिलांशी चर्चा केली आणि पानसरेसरांकडे प्रितालीचे प्रशिक्षण सुरू झाले. ध्येय ही जीवनाची गरज आहे हे आकलन झाल्यावर तिने ध्येयाची अर्धी मजल मारली असे पानसरे म्हणतात.

प्रितालीचे वडील रविकांत दत्‍ताराम शिंदे हे कलरकेम कंपनीत हेल्‍पर म्‍हणून काम करतात. ते म्‍हणतात, की पानसरेसर नसते तर प्रितालीत दडलेले गुण आम्‍हास दिसलेच नसते. प्रितालीला विविध स्‍पर्धांसाठी पाठवणे तिच्‍या शाळा व्‍यवस्‍थापनास शक्‍य नव्‍हते. त्‍यामुळे शाळेतून वर्गणी काढून प्रितालीला स्‍पर्धांमध्‍ये पाठवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. मात्र प्रितालीच्‍या वडिलांनी पुढाकार घेत तिचा सर्व खर्च स्‍वतः करण्‍याची जबाबदारी उचलली.

सायकलपटू प्रिताली रविकांत शिंदे पदकांसहत्‍यानंतर प्रितालीने मागे वळून पाहिले नाही. तिने जिल्‍हा पातळीवरील स्‍पर्धेत धावण्यात व सायकलिंगमध्ये प्रथम श्रेणीत क्रमांक पटकावला. पाठोपाठ नवव्‍या इयत्‍तेत असताना राज्‍यात आणि दहावीत असताना राष्‍ट्रीय स्‍तरावरील स्‍पर्धांमध्‍ये प्रथम क्रमांक मिळवला. तिची प्रगती पाहून सरकारी क्रीडा खात्याने तिच्या पुढील शिक्षणास्तव व सायकलिंगचे प्रशिक्षण उच्च पातळीवर देण्यासाठी तिची निवड केली. त्यामुळे ती क्रीडासंकुल, बालेवाडी येथे हजर झाली. प्रिताली सकाळी पाच वाजता उठते. त्‍यानंतर साडेसातपर्यंत सायकलिंगचा सराव, सकाळी दहा ते दुपारी तीन कॉलेज, त्‍यानंतर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पुन्‍हा सराव आणि रात्री जेवणानंतर नऊ वाजता अभ्‍यास, असा प्रितालीचा दिनक्रम आहे.

एवढ्या लहान वयात आपल्या गावापासून, आई-वडिलांपासून, मित्र-मैत्रिणींपासून दूर जाणे! प्रितालीला वाटते, की तीच आपली परीक्षा होती! तिला त्या एकटेपणाची आठवण झाली तरी अजून तिच्या अंगावर काटा येतो. मात्र कुटुंबाचा सातत्‍याने मिळणारा पाठिंबा तिला आधार देत राहिला. प्रितालीचे आजोबा दत्‍ताराम शिंदे, वडील रविकांत शिंदे, आई रंजिता शिंदे, भाऊ सागर आणि धाकटी बहीण दिपिका शिंदे असा प्रितालीचा परिवार आहे.

मार्गदर्शक प्रकाश पानसरे सोबत प्रितालीप्रितालीचे आजोबा दत्ताराम ह्यांची शेती आहे व मासे मारणे यावर त्यांचा संसार चालतो. त्यांनी ब्रासवर्कही सुरू केले. कोळी समाज हा प्रेमळ, मायाळू तितकाच कणखर, निर्भय, धाडसी आणि त्वरित निर्णय घेणारा. त्यांचे जीवन समुद्राशी, लाटांशी, वार्‍याशी झुंजताना संघर्षमय होणे साहजिक आहे. तो वारसा प्रितालीलाही लाभला आहे. तिने सायकलिंगचा ध्यास घेतला, त्याच सुमारास तिचा व कुटुंबीयांचा उत्साह वाढवणारी घटना म्हणजे ‘जाणता राजा’तर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नामदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे आदी मंडळींच्या हस्ते तिचा सत्कारसोहळा आयोजित केला गेला. ती तारीख होती १० नोव्हेंबर २००८. ‘प्रिताली ही केवळ जिल्ह्याची अथवा राज्याची र्कीर्ती, वैभव नसून, देशाची संपत्ती आहे’ असे उद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.

खरोखरीच, प्रिताली नव्या जिद्दीने, चैतन्याने राज्यापलीकडेही सायकलिंग स्पर्धेसाठी सहभागी होत गेली. तिचे देशपातळीवर नाव झाले. ती कर्नाटकात, तसेच हरियाणात गेली. गाव-शहर वेगळे, भाषेतही बदल, माणसे अनोळखी, तरीही तिच्या सहभागात तोच ठामपणा, आत्मविश्वास असे. तिचे पहिले मार्गदर्शक मेढ्याचे प्रकाश पानसरे व दुसरे संतोष पानसरे (मुंबई) हे होत. दोघांचीही सायकलची दुकाने आहेत. संतोष पानसरे हे स्वत: देशपातळीवर पदके प्राप्त केलेले प्रसिद्ध सायकलपटू आहेत. त्यांचा वाटा तिच्या सर्व यशात आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलाचाही तिच्या यशात सिंहाचा वाटा आहे. तिने हॉकी, स्विमिंग (पोहणे) इत्यादी स्पर्धांतही सहभाग घेतला आहे. जानेवारी 2012 मध्‍ये अमृतसर येथे झालेल्‍या ‘सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’च्‍या चौपन्‍नाव्‍या स्‍पर्धेत प्रितालीने खेळाचे उत्‍कृष्‍ट प्रदर्शन करत एकोणीस वर्षीय वयोगटाच्‍या संघ पातळीवर सुवर्णपदक तर वैयक्‍तिक पातळीवर रौप्‍यपदक मिळवले. आतापर्यंत, प्रितालीने एकूण बावीस पुरस्‍कार मिळवले आहेत.

विविध स्‍पर्धांमध्‍ये भाग घेणा-या प्रितालीला आपली स्‍वतःची सायकल असावी अशी इच्‍छा झाली. सायकलिंगच्‍या स्‍पर्धेत वापरण्‍यात येणा-या या सायकलची किंमत होती पंच्‍याऐंशी हजार रूपये. मात्र प्रितालीच्‍या वडिलांनी कर्ज काढून पैसे गोळा केले आणि आपल्‍या मुलीची इच्‍छा पूर्ण केली. सहा महिन्‍यांपूर्वी ही सायकल मद्रासवरून मागवण्‍यात आली. या कामी संतोष पानसरे यांनी सहकार्य केले. आपले कुटुंबीय आणि पानसरे सरांचा पाठिंबा प्रितालीला फार मोलाचा वाटतो.

शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील माजी कोच मिलिंद झोडगे, तसेच राजेंद्र सोनी व लिलाधर शेट्टी यांचे मार्गदर्शन तिला लाभत आहे. प्रितालीला जागतिक पातळीवर सायकल स्पर्धेत सहभागी होऊन मेडल जिंकण्याची आकांक्षा आहे.

कोळीलोक मासे पकडण्यास जातात. पाण्यात गळ टाकतात, जेव्हा मासा गळाला लागतो तेव्हाच त्वरित हळूच पण झटकन तो गळ वर उचलावा लागतो, नाहीतर गळाला लागलेला मासा गळ सोडून किंवा गळ घेऊन जायची शक्यता असते. संधीची ही व्याख्या प्रितालीस तिच्या आजोबांनी, दत्तारामांनी सांगितली असावी असे तिच्या जीवनक्रमातून जाणवते.

प्रिताली रविकांत शिंदे हिस प्राप्त झालेली सन्मानचिन्हे व गौरवचिन्हे

प्रितालीला मिळालेले पुरस्‍कार १. महामॅरेथॉन, १७ डिसेंबर २००६ – शरदचंद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त – द्वितीय क्रमांक (मुलींमध्ये)

२. ९ ते १४ नोव्हेंबर २००८, अवधुत तटकरे मित्र मंडळ –  रोहा, ‘जाणता राजा’ तर्फे सत्कार.

३. २७ जानेवारी २००८, कोसबाई देवी मित्र मंडळ, निडी (रोहा) स्मृती चिन्ह.

४. २००९ बारामती मंडळ, पुणे आयोजित अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त – राष्ट्रीय सायकल स्पर्धा- तृतीय क्रमांक

५. २०१०-२०११ राज्यस्तरीय रोडरेस सायकलिंग (शालेय) स्पर्धा – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव – द्वितीय क्रमांक.

६. २० फेब्रुवारी २०११, रायगड प्रेस क्लब – सन्मानपत्र

७. A.S.C २०११ इको सायकलोथॉन – जागतिक पर्यावरण दिन राज्यस्तरीय सायकल स्पर्धा (महिला गट)- द्वितीय क्रमांक, गौरव चिन्ह

ना.रा.पराडकर – मु.पो. मेढे, ता. रोहा, जिल्हा रायगड,

भ्रमणध्वनी : 9272677916, दूरध्‍वनी – 0219-4258086, इमेल – nrparadkar9@gmai.com

{jcomments on}

About Post Author