‘प्रबोधना’चा वसा

0
24

‘प्रबोधना’चा वसा

– श्रीकांत टिळक

नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या  मागण्यांच्या पूर्ततेसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणा-या संस्था-संघटनांची महाराष्ट्रात वानवा नाही. मात्र नागरिकांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करुन देणा-या, आपला न्याय आपणच मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रवृत्त करणा-या आणि समाजात घडणा-या घटनांबाबत डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसणा-या किंवा अपु-या माहितीच्या आधारे निव्वळ तोंडपाटीलकी करणा-यांना सारासार विचार करून सुयोग्य भूमिका ठामपणे घेण्यासाठी प्रवृत्त करणा-या संस्था विरळा! अशा प्रकारे, प्रबोधनाचा वसा घेऊन जाणीव जागृतीचे काम करणारी पुण्यातली एक संस्था-‘प्रबोधन, पुणे’!
विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे मिलिंद  काची यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ‘प्रबोधन, पुणे’ची स्थापना झाली. आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दुस-या कुणावर तरी अवलंबून राहण्याऐवजी  आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांबाबत आपणच पुढे होण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने ‘प्रबोधन’ची स्थापना करण्यात आली;” असे काची सांगतात.

सामान्य माणसाला संघर्षप्रवण आणि कार्यप्रवृत्त होण्यासाठी आवश्यकता असते ती आत्मविश्वासाची! तो निर्माण होण्यासाठी आपण जे काम करायचे त्या कामाविषयी; ज्या प्रश्नासाठी संघर्ष करायचा त्या प्रश्नाविषयी सम्यक आकलन होणे आवश्यक आहे. हे आकलन करून देण्यासाठी ‘प्रबोधन’च्या वतीने वेगवेगळ्या सामाजिक विषयांबाबत, तात्कालिक समस्यांबाबत सर्वंकष माहिती, व्याख्याने, माहितीपत्रके, पुस्तिका या माध्यमातून प्रसृत केली जातात. ‘प्रबोधन’च्या वतीने विशिष्ट भूमिकेचा प्रचार, प्रसार करण्याऐवजी त्या त्या विषयाशी संबंधित जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे लोकांनी विचार करावा; विविध स्रोतातून आणखी माहिती जमा करावी; आणि सारासार विचारानंतर आपले मत, भूमिका निश्चित करावी व त्या दिशेने कार्यरत व्हावे अशी अपेक्षा असते. हे उद्दिष्ट सध्याच्या माहितीच्या महास्फोटाच्या काळात फार महत्त्वाचे आहे.

पुण्यात वाहतुकीच्या बिकट समस्येवर मार्ग काढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘जलद बस वाहतूक योजना’(बीआरटी) प्रायोगिक तत्त्वावर सुरू  करण्यात आली. सुरुवातीच्याच टप्प्यात या योजनेच्या अंमलबजावणीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, मुख्यत: सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गावर झालेले अपघात, यामुळे जनमत या योजनेच्या विरूद्ध बनले. या पार्श्वभूमीवर ‘बीआरटी’ची योजना; ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर त्याद्वारे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी गती, क्षमता आणि वारंवारता; याचबरोबर योजनेच्या नियोजनातील त्रुटी, पादचा-यांना सुविधेचा अभाव अशा सर्व बाबींचा काटेकोर आढावा घेणारे माहितीपत्रक  ‘प्रबोधन’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले. या माहितीपत्रकात ‘नागरिकांनी  काय करावे’ आणि ‘प्रशासनाकडून अपेक्षा’ अशा दोन्ही बाबींचा ठळक उल्लेख करण्यात आला.

देशात; विशेषत: पुण्यात ‘स्वाईन फ्लू ‘चे थैमान सुरू असताना या अचानक उद्भवलेल्या नवीन रोगाबद्दल रोज नवीन अफवा उठत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या मनातले भीतीचे सावट गडद होत गेले. अशा वेळी, ‘प्रबोधन’ने स्वाईन फ्लूचा इतिहास, शास्त्रीय माहिती, लक्षणे, प्राथमिक अवस्थेत तातडीने करायचे उपचार; संसर्ग टाळण्यासाठी घ्यायची काळजी, संसर्ग झाला तर रुग्णाने आणि कुटुंबीयांनी घ्यायची काळजी अशी सविस्तर माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली आणि शहर व उपनगरात मोफत वितरीत केली. या पुस्तिकेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पुण्याजवळच्या जिल्ह्यांबरोबर नाशिक-नागपूरपर्यंत प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संस्थांनी या पुस्तिकेच्या प्रती काढून त्यांचे आपापल्या भागात वितरण केले.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या गंभीर समस्येबाबत मार्गदर्शक पुस्तिकेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महिलांसाठी काम करणा-या आमदार डॉ. नीलम गो-हे, सामाजिक क्षेत्रात ‘एकला चालो रे’ या पद्धतीने काम करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची व्याख्याने ‘प्रबोधन’ने शाळा -महाविद्यालयांमध्ये आयोजित केली. युवतींसाठी विशेष ‘हेल्पलाईन’ सुरू केली. नैराश्यग्रस्त अवस्थेत आत्महत्येचा टोकाचा विचार मनात आल्याक्षणी समुपदेशनाद्वारे सकारात्मक विचार संक्रमित करण्यापासून ते प्रसंगी रोड-रोमिओंना चोप देण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य या ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते.
‘प्रबोधन’चा मुख्य भर विधायकतेवर असल्याने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य
करणा-या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘प्रबोधन’च्या तर्फे दरवर्षी ‘प्रबोधन जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येतात. शिल्पकार डी. एस. खटावकर, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, डोळ्यांच्या आरोग्याबाबत कार्य करणारे डॉ. मोहन परांजपे अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव ‘प्रबोधन’ने केला आहे.

पुण्यात जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी जनजागृती करण्यासाठी ‘दहशतवाद ही विकृती आहे. तिला कोणत्याही जाती-धर्माशी जोडू नका’ हे ब्रीद घेउन संस्थेने उपक्रम आयोजित केले. सामाजिक एकसंधतेसाठी काम करणारे डॉ. मिलिंद भोई आणि संरक्षणविषयक अभ्यासक मेहेंदळे यांच्या, दहशतवादाचे अंतरंग उलगडणा-या व्याख्यानमालेला पुणेकरांनी; विशेषत: युवकवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समाजाच्या सर्व स्तरांतल्या घटकांमध्ये सामाजिकतेचे सम्यक भान निर्माण करून, त्यांना कार्यप्रवण करण्याचे दीर्घकालीन मात्र परिणामकारक उद्दिष्ट ठेवून काम करणारी ‘प्रबोधन; पुणे’ ही संस्था आहे. विशिष्ट राजकीय, सामाजिक विचाराचा प्रचार, प्रसार करण्याऐवजी प्रबोधनाद्वारे जबाबदार नागरिक घडवण्याची प्रेरणा घेतलेल्या अशा संस्था महाराष्ट्राच्या काना-कोप-यांत उभ्या राहिल्या तर राज्याचे नाव सार्थक व्हायला वेळ लागणार नाही.

श्रीकांत टिळक

भ्रमणध्वनी : 8087867950

ईमेल: tilakshree@gmail.com

About Post Author

Previous articleमाझी मराठी अस्मितेची कल्पना : उदार, सर्वसमावेशक
Next articleमुस्लिम महिला मंत्री :
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.