प्रबंधलेखनाची पद्धती – प्रबंधलेखकांना दिलासा

2
21
_Prabandha_Lekhan_1.jpg

मला मी बहिस्थ परीक्षक म्हणून पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधांवरून नजर फिरवताना बहुसंख्य प्रबंधांमध्ये संशोधन पद्धतीचा अभाव गेली अनेक वर्षें सातत्याने जाणवत होता; त्यामुळे शकुंतला क्षीरसागर यांचे ‘प्रबंधलेखनाची पद्धती’ हे पुस्तक पाहिल्यावर प्रथम दिलासा मिळाला. ते वाचल्यावर, मला त्यातील मार्गदर्शक सूचना पाळणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रबंध दर्जेदार निपजतील अशी खात्रीही वाटली. क्षीरसागर यांच्या या पुस्तकाआधी प्रबंधलेखन पद्धतीवर पुस्तके होती, लेखिकेने स्वत: तिच्या पुस्तकात तशा काही संदर्भांचा निर्देश केला आहे, तथापि प्रबंधविषयाच्या निवडीपासून प्रबंध सादर केल्यानंतर होणार्‍या मौखिकी परीक्षेपर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्याला ज्या ज्या प्रश्नांना सामोरे जावे लागते त्या सर्व प्रश्नांची उकल यथासांग करणारे आणि तरीही आटोपशीर असे हे बहुधा पहिले पुस्तक असावे.

लेखिका स्वत: संशोधक, उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुरस्काराने सन्मानित आणि पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयासारख्या प्रतिष्ठीत ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रस्तुत विषयातील अधिकार वादातीत आहे. पुस्तकात प्रबंधविषयाची निवड, त्याच्या अनुषंगाने करण्याचे वाचन, विषयवैविध्यानुसार बदलणारे अभ्यासविषयांचे तपशील, ग्रंथालयाचा उपयोग, ग्रंथांच्या नोंदी करण्याचे संकेत, अभ्याससाधनांचा यथायोग्य उपयोग, टिपणे करण्याच्या पद्धती यांसारख्या ठळक बाबींबरोबर प्रबंधाची अक्षरजुळणी, बांधणी आणि प्रस्तुती; तसेच, संदर्भ देण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती इत्यादी अनुषंगिक पण महत्त्वाच्या विषयांचीही सविस्तर चर्चा आहे. लेखिकेने वेळोवेळी केलेल्या बारीकसारीक सूचना पुस्तकाचे उपयुक्ततामूल्य वाढवताहेत. उदाहरणार्थ, त्यांनी स.गं. मालशे यांनी त्यांच्या पुस्तकात १९७५ साली सुचवलेल्या विषयांपैकी फारच थोड्या विषयांवर आजवर संशोधन झाले आहे असे सांगून विद्यार्थ्याने जुन्या पुस्तकांकडे दुर्लक्ष करता कामा नये असे सुचवले आहे. लेखिकेची प्रस्तुत विषयावरील प्रामाणिक निष्ठा आणि तळमळ पुस्तकाच्या पानोपानी प्रत्ययाला येते. लेखिकेने विषय निवडीसाठी ध्यानात घेण्याच्या बाबींमध्ये विद्यार्थ्याची क्षमता, विषयाची व्याप्ती, उपलब्ध साधनसामग्री; याबरोबरच, पुरेसा वेळ देण्याची गरज यांचा समावेश केला आहे. लेखिका आईच्या मायेने ग्रंथालयात येताना जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली आणायला कधी विसरू नये, कारण उपाशीपोटी वाचन होऊ शकत नाही असे सुचवते; तर संशोधनासंदर्भात मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ग्रंथकार ग्रंथावर स्वत:चे नाव घालतो तेव्हा त्याच्या पित्याचे नाव शोधण्याचा खटाटोप करून त्याची भर घालू नये अशी खबरदारी घेण्यास लावते. लेखिकेने पुस्तकभर संशोधनाच्या वाटेवर अडखळणार्‍यांना वाट दाखवण्याचे काम न थकता केले आहे. ज्यांना संशोधन कशाशी खातात हेही माहीत नाही अशा दूरस्थ, ग्रामीण भागातील चाचपडणार्‍या विद्यार्थ्याचे बोट धरून त्यांना दर्जेदार प्रबंध सादर करण्याकरता सज्ज करण्याची क्षमता या पुस्तकात आहे.

प्रबंधलेखनाची पद्धती (सुधारित आवृत्ती दुसरी)

लेखक : शकुंतला क्षीरसागर, प्रकाशक : युनिव्हर्सल प्रकाशन, पुणे २०१६.

किंमत : दीडशे रुपये

– सरोजा भाटे (०२०) २४२२६८५४

[भाषा आणि जीवन (पावसाळा) २०१६ वरून उद्धृत]

About Post Author

2 COMMENTS

  1. अशि पुसतके…
    अशि पुसतके
    यायला हावित welcome

Comments are closed.