प्रतीकदर्शन – कमळ

कमळज्याची नाळ जलात असून खूप खोलवर पसरलेली आहे, ज्याचा सुवास कित्येक कोस पसरला आहे, ज्याचा देठ टणक असून मुख अतिशय कोमल आहे, जो मित्ररूपी आश्रय देतो, ज्याच्याकडे गुणसंग्रह आहे आणि जो दोषांचा धिक्कार करतो अशा रक्तवर्णी, सुंदर कोमल, पाण्यात जन्मलेल्या कमलपुष्पात श्रीलक्ष्मीचा वास असतो – अशा आशयाचा संस्कृत श्लोक आहे.

नालस्य प्रसरो जलेष्वपि कृतावासस्य कोशेरुचिर्दण्डे

कर्कशता मुखे ऽ तिमृदुता मित्रे महान्प्रश्रय:!

आमूलं गुणसंग्रह व्यसनिता द्वेषश्च दोषाकरे

यस्यैषा स्थितीरम्बयुजस्य वसतियुक्तैवत्तत्र श्रिय:

भारतीय संस्कृतीतील विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला अग्रस्थान आहे आणि म्हणूनच कमळाला भारताचे ‘राष्ट्रीय फूल’ अशी मान्यता मिळाली आहे. कमळाला पद्म, नलिन, सारस, पुष्कर, तामरस, अरविंद, शतपत्र, राजीव अशी अनेक नावे आहेत.

ऋग्वेदात कमळाच्या पुंडरीक (श्वेतकमळ) आणि पुष्कर (नीलकमळ) अशा दोन जातींचा उल्लेख आढळतो. त्याशिवाय ज्या कमळाचा वर्ण तांबडा आहे त्याला ‘कोकनदं’ असे नाव आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात कमलमालेचा उल्लेख आहे तर पंचविंश ब्राह्मणात कमळाची उत्पत्ती नक्षत्रांच्या सामुहिक तेजातून झाली आणि कमळ हे सर्व देवतांचे आवडते पुष्प असल्याचे म्हटले आहे. भगवान श्रीकृष्णानी कमळाला जीवनाचा आदर्श मानून भगवद्गीतेत कमळाविषयी म्हटले आहे –

जो आसक्तीरहित ब्रह्मार्पण वृत्तीने कर्मे करतो तो चिखल आणि पाणी यांत असूनही त्यांपासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापकर्मांपासून अलिप्त राहतो.

‘ब्रह्मण्याध्याय कर्मणि सज्जं त्यक्त्वा करोतिय: !

लिप्यते न स पापे! पद्मपत्रमिवाम्भसा !!’

अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. कमळ प्रपंचात राहूनही प्रपंचातील सुखदु:खापासून, मायामोहापासून मुक्त राहण्याची जीवनदृष्टी देते.

कमळ शतदल किंवा सहस्रदल असते. कमळाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात :

दळचिया सहस्रवरी ! फांको आपुलिया परी

परी नाहीं दुसरी! भास कमळीं ! अमृतानुभव : 7:139

कमळ

कमळ सहस्र पाकळ्यांनी उमलून येते. त्या उमलून आलेल्या कमळाचा अप्रतिम सुगंध सर्वत्र पसरतो. त्या उमलून आलेल्या सर्व पाकळ्या ह्या त्या उमललेल्या कमळाचा सर्वांगांनी बहरलेला भाग असतात.

श्रीविष्णूच्या हातातील कमळ हे परम तत्वाचे प्रतीक आहे म्हणून भगवंताची पूजा करताना, परमेश्वरी तत्त्वाची पूजा बांधताना कमळ अर्पण केले जाते. परमेश्वर अनंत रूपांतून प्रगट झाला आहे हे कमळाच्या प्रतीकातून प्रगट होते.

ज्ञानदेवांनी चंद्रविकासी आणि सूर्यविकासी कमळांचे संदर्भ ज्ञानेश्वरीत दिले आहेत. कमळ हा शब्द ज्ञानेश्वरीत सुवास, कोमलता, सौंदर्य इत्यादी गुणदर्शक म्हणून आला आहे. त्यांनी कमळासंबंधीचा दृष्टांत देताना म्हटले आहे, की आणि पाणी हो कां भलते तुकें ! परि ते जिणौनि पद्म फांके !!

तळ्यातील पाणी किती का खोल असेना त्या पाण्याला भेदून कमळ पाण्यावर उमलून येते.

चिखलातून उमललेले कमळ हे निरपेक्ष जीवन जगण्याची प्रेरणा देते. अवतीभोवती कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्यावर मात करून मनुष्याने त्याचे  जीवन घडवायचे असते आणि इतरांनाही आनंद द्यायचा असतो असा संदेश कमळ देते.

कमळाची दृष्टी नेहमी सूर्याकडे असते. सूर्यप्रकाश हेच कमळाचे जीवन आहे. ते सूर्योदयाला उमलते आणि सूर्यास्ताला मावळते. कमळाची ही सूर्यभक्ती आगळीवेगळी आहे. चिखलात राहून, उर्ध्वदृष्टी ठेवून सूर्योपासना करणारे कमळ हे अनन्यभक्तीचे प्रतीक आहे. कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि समर्पित जीवनाचे दर्शन होय. ब्रह्मदेव कमलासन आहे, श्रीविष्णू कमलहस्त आहे, लक्ष्मी कमळजा आहे.

कलमपुष्पाचे दान केल्याने पुढील जन्म वैभवशाली मिळतो. श्रीविष्णू आणि लक्ष्मी यांना कमलपुष्प वाहिल्याने शुभ आणि मंगलदायक घटना घडतात. कमळांची रांगोळी काढल्याने घरात लक्ष्मी येते. कमळ हे स्त्रीतत्त्व असून जीवनोत्पादक आहे. कमळ म्हणजे भूमी, योनी आणि चिच्छक्ती, कमल म्हणजे शोभा, वैभव, आरोग्य, दीर्घायुष्य आणि कीर्ती. कमळ म्हणजे शाश्वत जीवन, अमृत, शुचित्व आणि शुद्ध ज्ञान. कमळ म्हणजे संस्कृतीचे सार होय .

प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली
९९२०५१३८६६
(मूळ लेखावरून संक्षिप्त)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.