प्रज्ञा गोखले- वारीच्या लयीत दंग! (Pradnya Gokhale – On Pandharichi Wari)

 

मुलुंडच्या (मुंबई) प्रज्ञा गोखले यांना विठ्ठलाचे आणि वारीचे जणू वेड लागले आहे!गोखले त्या भक्तिभावनेतच दंग असतात. त्यांनी 1992-93सालापासून नित्यनेमाने आषाढी वारी केली आहे.सध्या,त्या प्रकृतीमुळे प्रत्यक्ष वारी करत नाहीत, पण त्यांच्या कार्यक्रमांतून आणि सादरीकरणांतून त्या त्यांच्या मनातील विठुमाऊलीचे दर्शन सर्वांना घडवत असतात.यावर्षी तर कोरोनामुळे सर्वांचीच वारी चुकत आहे. गोखले म्हणतात, की गेल्या तीस वर्षांत माझी वारी कधी चुकली, परंतु आळंदीचे प्रस्थान कधी चुकले नाही. तेथेही कोरोनामुळे जाता आले नाही. ती हुरहुर मोठी आहे. मन हळहळते, पण मग वारीत दरदिवशी होतात तसे काकडआरतीपासून संध्याकाळच्या आरतीपर्यंतचे कार्यक्रम मी मनाने करत राहते. मनानेच पाऊले पंढरीच्या दिशेने पडतराहतात!
        प्रज्ञा गोखले यांचे माहेर (बापट) डोंबिवलीचे. त्यांचे आई-बाबा, दोघेही भाजपच्या राजकीय विचारधारेने प्रभावित होते. आई व प्रज्ञा, दोघींनी आणीबाणीत सत्याग्रह केला, म्हणून त्यांना तुरुंगवास झाला होता.प्रज्ञा गोखले कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या. त्या बीकॉमझाल्या. त्या म्हणाल्या, की त्या काळात नोकरी मिळावी म्हणून पोटभरू कॉमर्स विषय घेतले जात. गोखले यांना मुंबई महानगरपालिकेत ॲसेसमेंट विभागात नोकरी मिळालीही. त्यांनी ती वीस वर्षे केली व स्वेच्छानिवृत्ती घेतली.दरम्यानत्यांचे बँक अधिकारी गिरीश गोखले यांच्याशी लग्न झाले होते. त्यांनीकॉलेजमध्ये असतानाच, 1993 साली भाषेच्या प्रेमापोटी मराठीत एमए केले. त्या वेळी ज्ञानेश्वरी, दासबोध, चांगदेव पासष्टी असे ग्रंथ त्यांच्या वाचनात आले आणि ‘नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी। एक तरी ओवी अनुभवावी।’ या उक्तीप्रमाणे एकदा तरी वारी अनुभवावी अशा इच्छेने त्यांच्या मनात उचल घेतली. त्यांनी आरंभी वाळवंटातील कार्तिकी वारी केली. त्या म्हणाल्या, की मी 1992ला कार्तिकी एकादशीला पंढरीच्या वाळवंटातील कीर्तन सोहळा अनुभवला. ती वारीही खूप आनंददायी असते. तेथे थंडीच्या दिवसांत हवा छान असते. वर चांदण्यांनी खचाखच भरलेले आकाश, बाजूला चंद्रभागेच्या शीतल प्रवाहाची झुळझुळ आणि आसमंतात भरलेला विठ्ठलनामाचा उद्घोष! तेव्हा मी गळ्यात तुळशीमाळ वगैरे काही घालणार नाही असे ठरवून गेले होते. पण वाळवंटातील पहिले कीर्तन ऐकले…आणि मी ओक्साबोक्शी रडू लागले. माझ्यातील काहीतरी उन्मळून बाहेर येत आहे असे वाटत होते. परंतु अश्रूंचा तोपूर दुःखातून आलेला नव्हता…कोठल्यातरी ऋणानुबंधातून मिळालेल्या अनाकलनीय, अनिर्वचनीय आनंदातूनउद्भवला होता. त्या दिवशी, त्या क्षणी मी गळ्यात तुळशीमाळ घालण्याचे ठरवले आणि मी वारकरी झाले!
        प्रज्ञा गोखले यांच्या तेव्हाच लक्षात आले, की त्यांचे वारीवेड वारशातून आले आहे. त्या शाळेत असताना मे महिन्याच्या सुट्टीत दीड-दोन महिने पुण्याला आत्याकडे राहत. आत्याच्या घरी (दादा वैद्य) वारी परंपरा होती. आळंदीची दिंडी पुण्याच्या आप्पा बळवंत चौकात जून महिन्यात येई, तोवर त्यांचेपुण्यात थांबणे होई.गोखले म्हणतात,”मग बाबा आम्हा मुलींना घेऊन डोंबिवलीला परतत. खरे तर, माझ्याबरोबर माझ्या बहिणी असत, पण वारीचे ते खूळ माझ्यातच का रुजले गेले याला तर्कबुद्धीचे कारण नाही. मी तो आत्याच्या घरचा वारसा चालवते अशीच माझी भावना झाली आहे. कोणत्याही घराण्यातील वारीची परंपरा खंडित होत नाही हेच खरे.”
        प्रज्ञा गोखले यांनी सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे विठुमाऊलीचे याचि देही याचि डोळा दर्शन1995 सालीगुरूपौर्णिमेच्या दिवशीघेतले. दरम्यान त्यांची एक आषाढ पायवारी होऊन गेली होती. निजरूप दाखवा होया गाण्यात विठ्ठल जसा वेगवेगळी रूपे घेऊन धुरातून प्रकट होतो, अगदी तसाच धुपाने भरलेल्या गाभाऱ्यातला तोविठ्ठल त्यांना दिसला. पांडुरंगाची ती धुरातील अस्पष्ट आकृती पाहून तृप्त झाले, परंतु त्या विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेने त्यांच्या मनात घरकेले. ती त्यांच्याशी बोलू लागली आणि सांगू लागली, की पुंडलिकाने जीवीट पांडुरंगाकडे भिरकावली, ती वीट नाही तर तो जीवनातला वीट आहे. जीवनाविषयीचे नैराश्य आहे. जर तुम्ही तुमच्या मनातला हा वीट काढून टाकला, तर त्या विटेवर तुमच्या मनातला विठ्ठल कायम उभा राहून सदोदित तुमच्या पाठीशी उभा राहील. त्या वारीनंतर त्यांना विठ्ठलाच्या पायाखालची वीट साद घालू लागली आणि तेथेच ‘ऐका दगडाची गोष्ट’ ह्या त्यांनी पुढे सादर केलेल्या कथन कार्यक्रमाचे बीज रुजले गेले.

 

विद्यार्थिदशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसारख्या चळवळीत काम केल्यामुळे,गोखले यांना भाषणे, निवेदने करण्याची सवय होती. त्यात त्यांचे मराठी लेखन एमएच्या अभ्यासक्रमात विजया राजाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले होते. ज्ञानेश्वर ‘माऊली’ व अन्य संत यांचे अभंग-ओव्या, बाबा महाराज सातारकर यांचा लाभलेला विशेष आशीर्वाद यांमुळे गोखले यांचे लेखन संस्कारशीलतेकडे झुकले. त्यातूनच त्यांचे विविध कार्यक्रमही साकार झाले.‘ऐका दगडाची गोष्ट’ हा त्यातीलच एक कार्यक्रम. दगड माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत त्याचा सोबती कसा होऊन राहतो, याची कहाणी त्या कार्यक्रमात आहे. ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या अभिवाचन स्पर्धेत त्या कथनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिवाचनाचा पुरस्कार मिळाला. त्यांनीत्या कथनाचे पाचशेपन्नासपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत.
        त्यांनी संत मीराबाईंच्या पदांचे ज्ञानेश्वरांच्या अभंगांशी आणि संत एकनाथांच्या गौळणींशी असलेले साम्य लक्षात घेऊन ‘भाववेडी मीरा’ हा गीत व नृत्य कार्यक्रमही सादर केला आहे. ‘भाववेडी मीरा’चे सादरीकरण चितोडमधील मीरा मंदिरात, वर्धा येथील गीताई मंदिरात, द्वारकाधीश मंदिरातही झाले आहे. त्यांनी ‘हरिपाठ- शोध आणि बोध’, ‘गुण गाईन आवडी’, ‘राधा ही बावरी’ ‘पसायदान- अलौकिक मागणे’ यांसारखे कार्यक्रम माऊली आणि संतमांदियाळीतील इतर संत यांच्या वाङ्मयावर रचलेले आहेत.संतवाङ्मयातील उपदेश हा कालातीत आहे व आजच्या काळात तो अंमलात आणणे किती गरजेचे आहे हे त्यांच्या सादरीकरणांमधून जाणवते.त्यांचे मुख्यत: महाराष्ट्रात, पण भारतभरही एक हजाराहून अधिक कार्यक्रम सादर झाले आहेत. ते सगळे खाजगी संपर्कातून, माध्यमांमधून जाहिराती न करता! त्यांचे शांता शेळके, ना.धों महानोर, अरुणा ढेरे आणि बहिणाबाई चौधरी हे कवी विशेष लाडके. गोखले यांनी त्यांच्यासंबंधीही कार्यक्रम केले आहेत.‘शब्दब्रम्हाचा हुंकार’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांनी ‘साक्षात्कार’ या कवितेत त्यांच्या पहिल्या आषाढी वारीचे वर्णन असे केले आहे,चल अचल असे नादावले | सुरावटीवर जड-चैतन्य डोलले | सत्य भासही अस्फुट सारे| लयीत एका दंग… प्रज्ञा गोखले यांचा मूड वारीच्या लयीत दंग असाचसतत असतो.       
   

त्यांचे कार्यक्रम लॉकडाऊनच्या काळात ‘झूम’ मीटिंगसारख्या माध्यमांतूनही चालू आहेत. पण त्यांच्या हृदयस्थ धागा असतो वारीचा. तीहीकोरोना वर्षात (2020) चुकणार अशी वेळ आली तेव्हा त्यांना शक्कल सुचली -मनाने वारी करण्याची. त्यांनी वारी जशी पुढे जाईल तसे दर दिवसाच्या वेळापत्रकानुसार वर्णन लिहिणे सुरू केले. ते ध्वनिमुद्रित केले आणि व्हॉट्सअॅपवर ब्रॉडकास्ट केले. ते श्रवण म्हणजे गोखले यांच्या परिचयातील चाळीस घरांमधील ठेवा होऊन गेला आहे. त्यातून पुढे फॉरवर्ड घडत आहेत असेहीगोखले यांच्या ध्यानी आले आहे. त्यांच्या ध्यानीमनी वारी आहे.त्या म्हणतात,वारीचा सोहळा रद्द करावा लागला ही इष्टापत्ती मानून”आपण जे दिशाहीन आणि अर्थहीन धावत होतो ते थांबून थोडा आत्मशोध घ्यावा हाच बोध या एकांतवासाचा आहे. संतांनी शरीराला ‘देह-गाव’ मानले आहे. त्यातील अंतस्थ परमेश्वराला शोधण्याची ही वेळ आहे; तेव्हा मनातील वाटेवर पाऊल टाकून आपल्यातल्या विठुमाऊलीचे दर्शन घेऊन, आगळीवेगळी अंतर्वारी करू या!
रश्मी किर्लोस्कर 9892663191 
rashmikirloskar53@gmail.com
रश्मी किर्लोस्कर ही मुलुंडच्या वि.ग.वझेमहाविद्यालयात मराठी विषय घेऊन पदवीच्या अंतिम वर्षासशिकत आहे. तिने इ-पुस्तकांचे डीटीपी केले आहे. ती भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. तिला वाचन आणि नृत्यासोबत गायनाची व कीबोर्ड वादनाची आवड आहे.
————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here