पोथरे येथील शनेश्वर मठाचे गूढ!

2
372

सोलापूर जिल्ह्यातील मौजे पोथरे हे गाव करमाळ्यापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. ते गाव करमाळा-जामखेड व पुढे बीड असा प्रवास करताना रस्त्याच्या पश्चिमेकडे वसलेले दिसते. गावात प्रवेश करताना शनेश्वर देवस्थानाची लोखंडी कमान दृष्टीस पडते. पुढे, थोड्या अंतरावर पुरातन वास्तू दिसून येते. ती वास्तू शनेश्वर मठ या नावाने ओळखली जाते. मोठमोठ्या दगडांतून साकारलेली ती वास्तू भक्तांचे, पर्यटकांचे, प्रवाशांचे लक्ष खिळवून ठेवते. वास्तू कधी बांधली गेली त्याबाबत निश्चित माहिती नाही.

मौजे पोथरे हे गाव कान्होळा नदीच्या काठावर वसलेले आहे. कान्होळा नदी गावातून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पुढे, ती नदी सीना नदीला जाऊन मिळते. तेथे दोन नद्यांचा संगम झाल्यामुळे त्याला संगोबा असे संबोधले गेले आहे. त्या ठिकाणी पुरातन शिवालय आहे. कान्होळा नदीच्या वरील भागात मांगी गावात 1952 साली धरण बांधले गेल्याने नदीच्या प्रवाहाला काही प्रमाणात अटकाव निर्माण झाला आहे. तरीही नदी पावसाळ्यात वाहत राहते. शनेश्वराचा मठ म्हणजे एक छोटा किल्लाच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे शनिदेवाचे गाव भारताच्या नकाशावर झळकले, प्रसिद्ध झाले. त्या गावात शनेश्वर मंदिराच्या ठिकाणी दगडी शिळा आहे; परंतु पोथरे गावातील शनेश्वर यांच्या मठात अखंड अशी शनेश्वराची पुरातन मूर्ती आहे. मठ ही स्वतंत्रपणे देखणी वास्तू आहे. तो मठ नदीच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्या गावात नदीकाठी बांधला गेला असावा. मठाचे मुख्य द्वार अथवा दिंडी दरवाजा हा उत्तरेकडे, नदीच्या दिशेने तोंड करून उभा आहे. त्याची पडझड झाली आहे. घोटीव दगडातून बनवलेली मठाची सुंदर वेस पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. त्या वेशीमधून आत जाण्यासाठी मुख्य द्वार होते. द्वाराच्या आतील बाजूंस दोन्ही हातांना पहारेकऱ्यांना बसण्यासाठी छोट्या देवडी आहेत. नदीवर जाण्यासाठी त्याच दरवाज्याचा उपयोग केला जात असे. मोठ्या प्रवेशद्वाराची पडझड झाली आहे. त्यामुळे मठात ये-जा करण्यासाठी पूर्वेकडील प्रवेशद्वाराचा उपयोग केला जातो. त्या प्रवेशद्वारासमोर प्रवेशद्वाराच्या दिशेने तोंड करून उभे राहिले, की उजव्या हाताला पाण्याची मोठी बारव आहे. त्या बारवेत छोटेसे मंदिर असून त्यात शनेश्वराची पाषाणाची मूर्ती आहे. ती मूर्ती अखंड असून, मूर्तीच्या हातात आयुधे दिसून येतात. जगाच्या पाठीवर शनेश्वरांची जी साडेतीन पीठे समजली जातात त्यांपैकी एक अखंड पीठ पोथरे येथे आहे. शनेश्वराच्या मूर्तीपर्यंत पोचण्यासाठी बारवेत उतरावे लागते. दगडी पायरी वाटा आहेत. बारवेत प्रवेश तीन ठिकाणांवरून करता येतो अथवा बारवेत उतरता येते. बारवेला कायमस्वरूपी पाणी असते; परंतु अलिकडच्या काही वर्षांमध्ये निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित झालेले आहे.

बारवेतच एक गोमुख आहे. त्या गोमुखातून बारवेत पाणी बाहेरून कोठून तरी येते असे बोलले जाते. त्याबाबत काही आख्यायिका आहेत. बारवेत काही ओवर्‍याही दृष्टीस पडतात. बारवेतील पाणी पूर्वी नजीकच्या इनामी जमिनीसाठी वापरले जात होते. बारवेच्या लगत असणाऱ्या ओवर्‍यांमध्ये नगारखाना आहे. नगारखान्यात काळानुरूप काही बदल झाले. बारवेवर पूर्वी बैलांच्या मोटा हाकल्या जात असाव्यात, कारण बारवेवर विहिरीसारखे थारोळे; तसेच, दगडाचे पाट उपलब्ध होते. ते थारोळे पंचांनी काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धाराच्या कामांमध्ये काढून टाकले. तरीही तेथे थारोळ्याच्या दगडी शिळा, वडवानाचे लांब आखीव-रेखीव दगड बाकी राहिले आहेत. जीर्णोद्धारामध्ये बारवेचे काम चांगल्या पद्धतीने झाले; परंतु पुरातन ठेवा असलेल्या बारवेचे वेगळ्या दृष्टीने नुकसानही झाले. संपूर्ण बारव किंवा वास्तू ही मोठमोठ्या उभ्या-आडव्या दगडांमध्ये बांधली गेली आहे. बारवेत एक शिलालेख आहे. बारवेत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.

बारवेतील एका गुप्त भुयारातून मठात प्रवेश करता येतो किंवा मठातूनही गुप्त मार्गाने शनेश्वराचे दर्शन घेण्यासाठी बारवेत प्रवेश करता येतो. मठाच्या आत प्रवेश केल्यानंतर मोठा सभामंडप दिसून येतो. मठातील प्रांगणात दोन होमकुंडही दिसतात. मठाच्या बांधणीबरोबर ते होमकुंड; तसेच, सभामंडपही बांधला गेला आहे. मठ दगडात दगड गुंफून बांधला गेल्याचे दिसून येते. मठाच्या उभारणीसाठी घाण्याचा चुना व पांढरी माती आणि उत्तम प्रतीचा दगड वापरण्यात आलेला आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला जी दगडी भिंत आहे त्या भिंतीला तीन खिडक्या उपलब्ध आहेत. सूर्योदयाची कोवळी किरणे त्या नक्षीदार दगडी खिडक्यांतून आतील बाजूस असलेल्या प्रचंड दगडी महालातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर पडत असतात. मठाचे बांधकाम करणाऱ्या पूर्वजांनी तशा पद्धतीची रचना जाणीवपूर्वक केलेली आहे. त्यावरून त्यांची कलात्मक दृष्टी दिसून येते. अन्नपूर्णा देवीची पंचधातूची मूर्ती काही वर्षांपूर्वी अज्ञात चोरांनी चोरून नेली. परंतु सूर्यकिरणे त्या ठिकाणी हजेरी लावतात!

मठात पूर्वी तपस्वी ध्यानी साधू पुरुषांचा वावर होता. मठात त्याच सत्पुरुषांच्या काही समाधी आहेत. समाधीवर त्या साधूंनी पूर्वीपासून त्यांच्या उपयोगात आणलेले मोठे शंख उपलब्ध आहेत. समाधीचे बांधकाम विलोभनीय आहे. सुंदर नक्षीकाम चौथर्‍यावर, दगडांवर  आहे. काही मूर्ती पाषाणाच्या आहेत. त्यामध्ये हनुमान, गणपती, सूर्यनारायण आणि महादेवाची पिंडसुद्धा आहे. संपूर्ण मठ तीन तळांत (तीन मजले) बांधला गेला आहे. पहिला तळ हा जमिनीवर असून, दुसरे दोन्ही तळ हे जमिनीच्या पोटात आहेत. मठात पूर्वेकडील दरवाज्याने प्रवेश करताना आतील भव्यदिव्य बांधकाम दृष्टीस पडते. प्रचंड दगडांतून साकारलेले खांब; तसेच, पुरुषभर उंचीच्या मोठमोठ्या दगडांच्या गुंफणीतून मठाचे उभारलेले छत पाहणाऱ्यास थक्क करते. छताखाली कडक उन्हाळ्यातही थंड सावली पडून राहते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेच्या झळा तेथे लोकांना अजिबात जाणवत नाहीत.

मठाच्या आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मठाधिपती यांची भगव्या वस्त्रांची गादी आहे. गादीवर पूर्वी गोसावी समाजातील संन्यासी बसत असत. त्या गादीला संन्याशाची गादी असेही संबोधले जाते. गावात सध्या स्थायिक असलेले गोसावी समाजाचे पूर्वज त्या गादीची आणि देवाची सेवा करत. त्यांना तो मान दिला गेला होता. त्याच समाजातील सुरजगिरी महाराज या संन्यासी साधूची समाधी मठाच्या दुसऱ्या तळामध्ये आहे. गादीच्या जवळ छोटासा दरवाजा दिसून येतो. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर, प्रचंड असा दगडी महाल दिसतो. त्या महालात पर्यटकाचा आपोआप प्रवेश होतो. दगडी महालात अन्नपूर्णा मातेचे छोटेसे देवालय आहे. महालात काही भुयारी व गुप्त वाटा असल्याचे दिसून येते. महालातील दुसऱ्या तळात प्रवेश केल्यावर त्या ठिकाणी, वरील बाजूला हवा आणि उजेड मिळण्यासाठी छोटी, सोवन्यासारखी व्यवस्था आहे. भाविक तशाच एका सोवन्यातून तूप दुसऱ्या तळात सोडतात. ती प्रथा अनेक वर्षांपासून आहे. त्या ठिकाणाला तुपाचा आड असे संबोधले जाते.

मठात दगडी पायऱ्यांचा जिना असून, आतील बाजूने मठाच्या छतावर जाता येते. छतावर पूर्वेकडील प्रवेशद्वारावर पुरातन सुंदर अशी छोट्या विटा आणि चुना यांमधून साकारलेली लाल रंगाची खोली होती. त्या खोलीतून समोरच्या परिसरावर, बाजूच्या शेतीवाडीवर लक्ष ठेवता येत होते. वर, काही ठिकाणी टेहळणी बुरुजही दिसून येतात.

मठाची तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली असून, मठाचे खूप मोठे नुकसान त्यामुळे झालेले आहे. ढासळलेल्या ठिकाणी प्रचंड दगडी शिळा, उभे-आडवे दगड, पांढरी माती दिसून येते. मठात उत्तरेला धान्याची कोठारे आहेत. मठाचा आतील परिसर किंवा प्रांगण संपूर्ण दगडी फरशीने युक्त असून, ती फरसबंदी तंतोतंत अशी बसवलेली आहे. मठात हेमाडपंथी शैलीतील एक समाधी मंदिर आहे. त्या समाधीत चौथऱ्यावर सुंदर असे नक्षीकाम आहे. मठात अनेक ठिकाणी भुयारी मार्ग असलेले दिसतात. मठाच्या मध्यभागी असणाऱ्या एका भुयारातून खाली उतरल्यावर; पुढे, खूप काळाकुट्ट अंधार दिसतो. तेथे कोठूनही सूर्यप्रकाशाचा उजेड पोचत नाही. त्या भुयारातून खाली सरळ उतरल्यावर आतील बाजूस एक शिवालय दृष्टीस पडते. शिवालयात महादेवाची मोठी पिंड आहे. शिवालयात समोरच का छोट्या कमानीत सूर्यनारायणाची सात घोड्यांवरील रथावर आरुढ असणारी दगडी मूर्ती आहे. ती मूर्ती सुबक असून पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. पिंडीवरील कलशातील पाणी एका कोपऱ्यात जमा होऊन पुन्हा ते गुप्त मार्गाने मठाबाहेर जाण्याची व्यवस्था आहे. शिवालयाच्या समोर ध्यान-भजन करण्यासाठी प्रशस्त अशी खोलीसारखी जागा आहे. आत नंदीच्या, गणपतीच्या मूर्ती आहेत. नंदीच्या लगतच भुयार असून त्या भुयारातून दुसऱ्या एका दगडी महालात प्रवेश करता येतो. त्या महालात संत सुरजगिरी महाराजांची समाधी आहे. त्या महालातूनही पुढे काही गुप्त वाटा व भुयारी मार्ग आहेत. महालांच्या मध्यवर्ती भागात लोखंडी साखळदंड टांगल्याचे दिसून येतात. काही गावकरी एका महालात फार पूर्वी यादवकालीन नाणी सापडल्याचे सांगतात.

वास्तू ज्या ठिकाणी बांधलेली आहे ते ठिकाणही खोलगट भागात आहे; त्या ठिकाणच्या जमिनीत कसलेही लहानमोठे दगड सापडत नाहीत; किंवा त्या जमिनीला धरही नाही; असे असतानाही वास्तूचे एवढे प्रचंड मोठे बांधकाम करण्यासाठी दगड व माती कोठून जमा केली? याबाबत पर्यटकांना आणि भाविकांना आश्चर्य वाटते. मौजे पोथरे हे गावच खोलगट ठिकाणी वसलेले आहे. गावाच्या दक्षिणेला आणि उत्तरेला उंच माळरान, पठार  आहे. त्या माळरानावर मोठ्या प्रमाणात दगड आहेत. त्याच माळरानातून मोठे दगड मिळवून त्यातून ही वास्तू साकारली गेली असण्याची शक्यता वाटते.

उत्तरेला माळरानावर विलोभनीय अशी धर्मराज टेकडी आहे. ती टेकडी छोट्या पिरॅमिडसारखी आहे. टेकडीच्या पायथ्याला खूप मोठे मोठे दगड दिसतात. त्याच परिसरात एका छोट्या टेकडीवर रेणुका मातेचे मंदिर पूर्वीपासून आहे. प्रचंड मोठ्या गोल दगडी स्वरूपातील रेणुकाई त्या ठिकाणी आहे. मठातील होमकुंडावरील चौथऱ्यावर अस्पष्ट असा शिलालेख उपलब्ध आहे. मठात धातूच्या मूर्ती नाहीत. मात्र मठात अनेक वैभवशाली बाबींच्या पाऊलखुणा दिसतात. मठात बैल किंवा घोडे बांधण्यासाठी जागा दिसतात. त्यांना वैरण, पाणी यांसाठीच्या जागाही दिसतात. मठातील जमिनीच्या पोटात असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या तळात दगडी महालांमध्ये अनेक ठिकाणी काळाकुट्ट अंधार आहे. त्या ठिकाणी मशाली किंवा दिवटे वापरून लोक वावरत. अंधारात खूप मोठ्या प्रमाणावर वटवाघुळे छताला लटकून बसलेली दिसतात. पश्चिम दिशेला असलेल्या दगडी महालातून दुसऱ्या तळात भुयारी मार्गातून गेल्यावर महादेवाची छोटी पिंड दिसते. अशा प्रकारे संपूर्ण मठात अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडी अथवा छोटी शिवालये दिसून येतात. त्यावरून शनी व शिव ही नावे एकत्रित करून गावाचे नाव ‘शनिशिवपूर’ असे करावे अशी मागणी गावातील युवक संघटनेने केली आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांनी भूमिगत होण्यासाठी त्या मठाचा आधार घेतला होता. मठाच्या दुसर्‍या व तिसर्‍या तळातील भुयारी मार्गांची माहिती इंग्रजांना नसल्याने; तो मठ क्रांतिकारकांसाठी महत्त्वाचा ठरला गेला. पत्री सरकारचे क्रांतिकारक त्या मठात काही दिवस राहत होते असे सांगितले जाते. मठातून एक भुयारी मार्ग मठाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या कान्होळा नदीकडेही जात होता, परंतु आता खूप पडझडीमुळे त्याचे अवशेषही नामशेष झालेले आहेत.

मठाची रचना उत्तम असून स्थापत्यकलेचा तो सुंदर असा नमुना आहे. मठातील प्रांगणाला किंचित उतार दिला असल्याने पावसाचे पाणी मठातील एका कोपऱ्यात जमा होते. ते एका कुंडातून मठाबाहेर काढले गेले आहे. मठाच्या छतावर जमा होणारे पावसाचे पाणी दगडांच्या पन्हाळीद्वारे खाली सोडले आहे. ती दगडी पन्हाळी मठाच्या छतावर दिसून येतात. मठात पूर्वी सेवेकरी किंवा पुजारी राहत होते. कालांतराने, ते त्यांच्या सोयीनुसार शेतीवाडीत राहण्यास गेले. गावकरी धार्मिक उत्सव मठात मठाच्या व देवाच्या अनुषंगाने श्रावण महिन्यात व चैत्र महिन्यात साजरे करतात. त्यात भजन, कीर्तन, भारुड आदी कार्यक्रम असतात. शनेश्वराच्या जन्माच्या चैत्र महिन्यातील दिवशीही मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शनिजन्म दिनी किंवा शनी अमावस्येला मठात भाविक व पर्यटक दर्शनासाठी गर्दी करतात.

मठाचे वैभव अनेक वर्षें प्रसिद्ध होऊ शकले नाही याची खंत गावातील युवा पिढीला वाटते. त्यामुळे ते मठाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन मठाची व तेथील वास्तूंची माहिती लोकांना देत असतात. मार्च 2017 मध्ये त्या वास्तूला पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. साबळे व त्यांचे सहकारी यांनी भेट दिली. त्यांनी ती वास्तू जागतिक वारसा असल्याचे मत नोंदवले आहे.

– हरिभाऊ हिरडे 8888148083, haribhauhirade@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.