पॉप बॉयज् क्रू – नृत्यातून समाजसेवा

3
26
carasole

‘पॉप बॉयज् क्रू’ हा डान्स ग्रूप ठाण्यामध्ये बाळकुम या छोट्या गावामधील एकत्र आलेल्या व समान वैचारिक पातळी असलेल्या; तसेच, नृत्यकलेची व समाजसेवेची आवड असलेल्या युवकांचा आहे.

त्या ग्रूपचे कोअर मेंबर व प्रशिक्षक अमित पाटील, निलेश पाटील, भूपेंद्र पाटील, राज धिंगाने व सागर मोरे हे आहेत. ते युवक एकिकडे टीव्हीवरील रिअॅलिटी शो पाहात असत. दुसरीकडे समाजामध्ये अनेक समस्या चालू असल्‍याचे त्‍यांच्‍या पाहण्‍यात येई. त्‍यासंदर्भातील विचारातून त्‍यांनी नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन व जनजागृती साधण्याचा विचार केला. त्यांच्या ग्रूपमध्ये अक्रोबेटिक, फ्री स्टाइल, बॉलिवूड टाइप व कन्टेप्रररी या फॉर्मवर नृत्य केले जाते. भूपेंद्र पाटील, निलेश पाटील, राज धिंगाने, सागर मोरे हे चौघे ग्रूपला प्रशिक्षण देतात. ‘पॉप बॉयज् क्रू’ प्रमाणेच मुलींसाठी ‘पॉप गर्ल्स क्रू’, लहान मुलांसाठी ‘लिटल पॉप बॉयज् क्रू’ व महिलांसाठी ‘पॉप बॉयज् लेडीज’ असे ग्रूप आहेत.

त्‍या ग्रूपने आतापर्यंत दीडशेहून अधिक पारितोषिके मिळवली. त्यांनी प्रथम क्रमांक कधी सोडलेला नाही. तेच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांनी तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम स्पर्धांत जिंकली आहे. मिळालेले पैसे बँकेत ठेवले जातात व त्यांचा उपयोग नृत्यासाठी लागणारे सामान खरेदीसाठी केला जातो. करिअर गायडंन्स व महिलांचे आरोग्य या विषयांवर शिबिरे आयोजित करण्यावरही ते पैसे खर्च केले जातात.

तो ग्रूप त्यांच्या नृत्यातून संदेश देण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. समाजात घडणाऱ्या सामाजिक समस्या व त्या समस्यांना कसे सामोरे जावे याची जाणीव ती मुले नृत्यांतून लोकांना देतात. ‘मुलगी वाचवा’, ‘स्त्री-एकात्मता टिकवा’, ‘भ्रष्टाचार करू नका’, ‘आईवडिलांचा आदर करा’, ‘पाणी वाचवा’ असे सामाजिक विषय मुलांनी त्यांच्या नृत्यातून मनोरंजनात्‍मक पद्धतीने लोकांसमोर आणले आहेत. तसेच, ‘सामाजिक कर्तव्य कसे पाळावे?’, ‘देश सुजलाम -सुफलाम कसा बनेल?’ याबाबतही संदेश नृत्यातून लोकांना देण्याचा प्रयत्न मुले करत असतात.

त्‍या ग्रूपने सुपरस्टार मायकेल जॅक्सनच्या गाण्यावर नृत्य करून सर्वप्रथम 2009 साली पारितोषिक मिळवले. त्या नृत्‍यामध्ये त्यांनी सर्वसामान्य मुलगा जिद्दीने पुढे कसा जाऊ शकतो त्याचे चित्र लोकांसमोर उभारले. त्यांनी 2010 साली वेगळ्याच विषयाला हात घातला. प्रेमप्रकरणातून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तसेच, भ्रष्टाचारसुद्धा वाढला आहे. या ग्रुपने त्या दोन्ही विषयांवर नृत्य सादर करून आत्महत्या व भ्रष्टाचार अयोग्‍य असल्‍याचे दाखवले. त्या नृत्याच्‍या सादरीकरणाने लोकांना थक्क केले व ग्रूपला मान्यवरांकडून बक्षिसे मिळाली. त्यांनी 2011 साली ‘स्त्री-भ्रूणहत्या’ विषयावर नृत्य करून लोकांच्या डोळ्यांत पाणी आणले. पुढे भूतदया विषय हाताळून रानटी व पाळीव प्राण्यांबद्दल प्रेमभावना व त्यांचा बचाव यावर संदेश दिला. त्यांनी 2012 साली क्रांतिवीरांसंदर्भात नृत्य सादर करून यशाची उच्च पातळी गाठली. ग्रूपने त्या एका वर्षात चाळीस पारितोषिके पटकावण्‍याचा विक्रम केला.

त्यांनी 2013 साली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांसमोर सादर केली आणि अन्यायाविरूद्ध लढा व स्त्री जातीबद्दल आदर ही दोन मुल्ये लोकांसमोर सादर केली. त्यांची 2014 -2015 साली ‘झाडे वाढवा’, ‘पाणी वाचवा’, ‘आईवडिलांचा आदर करा’ यांवर आधारित नृत्ये होती.

याप्रकारचे यश मिळवल्‍यानंतर ग्रुपने ‘India Book of Record’मध्‍ये नाव नोंदवण्‍याची कल्पना स्‍फूरली. ‘पॉप बॉयज् क्रू’ने ‘हातपंखां’च्या (waving fan) साह्याने India Book of Record व Limca Book of Record मध्ये 26 जानेवारी 2016 रोजी त्यांचे नाव कोरले. त्‍यासाठी ‘माजिवडा इंग्लिश स्कूल’ व ‘बाळकुम विद्या प्रसारक संस्था,’ या दोन शाळांच्या दोनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांना अडीच महिने waving fan चे प्रशिक्षण ‘पोप बॉयज् क्रू’ने दिले. त्यामध्ये त्यांनी रंगमंचावर विद्यार्थ्‍यांच्‍या हाती हातपंखाचा तिरंगा देऊन त्‍याची लाट तयार केली होती. ती लाट भारताची गरिबी, बेरोजगारी, स्त्री भ्रूणहत्या व बलात्कार यांवर मात करून प्रत्येकाच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करणारी आहे, असा त्‍यामागचा विचार होता. त्‍या ग्रूपच्या प्रशिक्षकांना अनेक मुलींच्या आई भेटून सांगतात, की ”तुमच्या स्त्री-पुरुष समानतेच्या संदेशामुळे घरात त्यांच्या मुलींना मानाचे स्थान मिळू लागले आहे. घरचे वातावरण सुखद झाले आहे.” या ग्रूपने असाच एक प्रसंग जवळूून अनुभवला. एका कुटुंबात पहिली मुलगी झाली, तेव्हा दुसऱ्या वेळी मुलगा जन्माला यावा म्हणून स्त्रीला पतीकडून त्रास सुरू झाला होता, पण त्याच वेळी त्या कुटुंबाने ‘पॉप बॉयज् क्रू’ने सादर केलेले स्त्री-भ्रूणहत्येवर नृत्य पाहिले व कुटुंबातील त्या पुरूषाचे त्यांचे डोळे उघडले. त्‍याला दुसरी मुलगी झाल्यावर लक्ष्मी जन्माला आली म्हणून त्‍याने मोठी पार्टी आयोजली. त्‍यात त्‍याने ‘पॉप बॉयज् क्रू’ला बोलावून त्यांचे आभार मानले.

या ग्रूपने महाराष्ट्र महोत्सव, ठाणे महापौर चषक, युवा महोत्सव, इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड असे अनेक सन्मान मिळवले आहेत.

संपर्क – अमित पाटील (9920303878), popboyzcrew@yahoo.com

– नेहा जाधव

About Post Author

3 COMMENTS

  1. Pop boyz crew ✌️✌awsm work !
    Pop boyz crew ✌️✌awsm work ! Successful group ..!

  2. Pop boyz crew ✌️✌awsm work !
    Pop boyz crew ✌️✌awsm work ! Successful group ..! Keep it up

  3. आपल्या सामाजिक कार्यास मानाचा
    आपल्या सामाजिक कार्यास मानाचा मुजरा. जो सामाजीक बांधिलकी जपतो तोच यशस्वी ठरतो.

Comments are closed.