पैठणीचे गाव- येवला (Yeola)

8
1373

महाराष्ट्रातील अनेक गावांना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. तेथे विशेष उद्योग व्यवसाय आहेत. या गावांच्या अंतरंगात शिरले की त्यांच्या भरजरी पोताची जाणीव होते. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातले – येवला. ते महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील महिलांच्या जिव्हाळ्याचे गाव. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा महत्त्वाचा सहभाग होता.

माधव सावरगावकर हे प्रथितयश लेखक मुळचे येवल्याचे. त्यांनी त्यांच्या गावाचा इतिहास आणि वर्तमान जिव्हाळ्याने या लेखात सांगितला आहे.

‘मोगरा फुलला’ या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

पैठणीचे गाव – येवला (Yeola)

नाशिक जिल्ह्यातील येवला हे गाव दौंड-मनमाड ह्या रेल्वे मार्गावर आहे. ते मनमाडपासून दक्षिणेला चोवीस मैल आणि मुंबईपासून दोनशे साठ किलोमीटरवर आहे. येवल्याचे मूळ नाव येवलंवाडी. येवला गावाचे संस्थापक राजे रघुजीबाबा पाटील यांचा जन्म 1577 साली झाला. ते त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी येवलंवाडी गावाजवळच्या पाटोदे या गावी स्थायिक झाले. येवलंवाडीच्या लोकांनी चोर, दरोडेखोर यांच्या भीतीने पाटोद्याला स्थलांतर केले होते. गावचे देशमुख पाटील त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यास असमर्थ होते. रघुजीबाबांनी त्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलला. त्यांनी देशमुखीचे व पाटीलकीचे हक्क विकत घेतले व संपूर्ण भागाचा कारभार स्वतःच्या हाती घेतला. येवलंवाडी हे औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक या तिन्ही व्यापार केंद्रांना जोडणाऱ्या मार्गावर असल्याने रघुजीबाबांनी येवलंवाडी येथे स्थलांतर केले. येवलंवाडी परिसरात सिंदीच्या आणि बाभळीच्या झाडांची घनदाट जंगले होती. दरोडेखोर त्या जंगलांच्या आश्रयाने रहात असत. रघुजींनी प्रथम तेथील जंगले तोडून दरोडेखोरांचे आश्रयस्थानच नष्ट केले. दाट झाडी तोडून ती जागा वस्तीसाठी योग्य केली. पाटोद्यास गेलेल्या लोकांना येवलंवाडी येथे परत आणले.

रघुजीबाबांनी स्वत:ला राहण्यासाठी उत्तराभिमुखी भव्य दिंडीदरवाजा व चारी बाजूंनी मजबूत तटबंदी असलेली गढी बांधली. त्या गढीचे अवशेष येवल्यात पहाता येतात. रघुजीबाबांनी पैठण, अहमदाबाद, हैदराबाद येथून क्षत्रिय कोष्टी व मुस्लिम विणकरांना आणून येवल्यात वसवले. तेव्हापासून येवल्यात वस्त्रोद्योगास  सुरुवात झाली. व्यापाराच्या निमित्ताने गुजरातमधील लेवा पाटीदार पटेल समाज व पाटण येथील पटणी समाज मोठ्या प्रमाणात येवल्यात येऊन स्थायिक झाला. रघुजीबाबांना या प्रदेशाचा राजा म्हणून मान्यता मिळाली होती. त्यांची स्वारी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी हत्तीवरून सीमोल्लंघनास जात असे. त्यांना मुजरा करायला गावातले सगळे लोक गढीवर येत असत.

येवल्यात आलेल्या मुसलमान समाजासाठी रघुजीबाबांनी एक मशीद बांधून दिली. मशीद पाटलांनी दिली म्हणून तिचे नाव ‘पाटील मस्जिद’ होते. ते काळाच्या ओघात ‘पटेल मस्जिद’ झाले आहे. रघुजीबाबांना संतान नव्हते. त्यांनी वृद्धापकाळी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गढीच्या पश्चिमेस; सध्याच्या ‘रघुजींची बाग’ या ठिकाणी जिवंत समाधी 1666 साली घेतली. हजारो भाविक समाधीच्या दर्शनास येऊ लागले. रघुजींचा भाऊ पिलाजी पाटील याच्यापासून पुढील वंशविस्तार झाला. समाधीच्या ठिकाणी दरवर्षी चैत्र अमावस्या ते अक्षय्य तृतियेच्या दरम्यान जत्रा भरते. पहिल्या दिवशी गंगा दरवाजा ते समाधीस्थानापर्यंत भव्य मिरवणूक निघते. एक हजार कावडीवाले गंगेतून (गोदावरी) पाणी आणतात. त्या पाण्याने समाधीला अभिषेक होतो. दुसऱ्या दिवशी, सत्यनारायणाची महापूजा होते. त्याच दिवशी कुस्त्यांची भव्य दंगल होते. तिसऱ्या दिवशी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होतात व रात्री छबिना मिरवणूक निघून जत्रेची सांगता होते. माझ्या शालेय जीवनातल्या प्रत्येक वर्षी रघुजीबाबांच्या जत्रेत खाल्लेल्या गुडी शेव, गुडदाण्या, रेवड्या यांची चव हा लेख लिहिताना मला आठवते आहे.

येवल्याच्या स्थापनेच्या वेळी हा प्रदेश दिल्लीच्या पातशाहीच्या अखत्यारीखाली होता. त्यानंतर हे गाव साताऱ्याच्या छत्रपतींच्या अंमलाखाली गेले. माधवराव पेशवे यांनी येवला व त्याच्या आसपासची गावे सरदार विठ्ठल शिवदेव यांना दिली. या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे येवल्यात मोठमोठे वाडे व गढ्या मोठ्या संख्येने होत्या. त्यातील अनेक वाडे पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत सुस्थितीत होते. प्रत्येक वाड्याला मोठमोठे नक्षीदार लाकडी दरवाजे होते. भिंतींवर सुंदर चित्रे (त्यातली काही आजही काही ठिकाणी बघायला मिळतात), बळद, भुयारे हे सर्व मुबलक प्रमाणात होते. आज बऱ्याच वाड्यांच्या ठिकाणी नवीन उंच इमारती झाल्या आहेत. तरीही काही वाडे आजही तग धरून आहेत. उदाहरणार्थ; बालाजीचा वाडा. त्या वाड्यात बालाजीचे भव्य मंदिर आजही आहे. वाड्याला भव्य प्रवेशद्वार व चारही बाजूंनी दगडी कोट आहेत, त्याच्या चारही टोकांना दगडी बुरूज होते. दुसरा सुस्थितीत असलेला वाडा म्हणजे, आपटे गुरुजींची भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा ज्या वाड्यात सुरू केली तो विनय मंदिर वाडा आजही तीन देवळांजवळ उभा आहे. इंग्रजांनी ती शाळा उध्वस्त करून गुरुजींना तुरुंगात टाकले पण वाडा शाबूत राहिला. भालदार गल्लीच्या टोकावर बर्वे वाडा नावाचा वाडा त्याच्या भोवतालची भिंत व बुरूज यांच्यासह गत वैभवाची साक्ष देत उभा आहे. येवल्याचे संस्थापक रघुजी पाटील यांच्या गढीशेजारी रघुजीबाबांचे वंशज राहात असलेला पाटील वाडा आजही नांदता आहे. शहराच्या मध्यभागी टिळक मैदानावर अती भव्य, देखणा व लाकडावरचे अतिशय सुंदर नक्षीकाम असलेला महाजन वाडा होता. तो पाडून तेथे मोठी इमारत बांधली गेली. आमचा स्वत:चा वाडा चौसोपी होता, चौक, कितीतरी खोल्या, बाहेर सदर असावी अशी ओसरी असा ऐसपैस होता. दर्शनी भिंती बुरुजासारख्या होत्या व त्यांची रुंदी सुमारे पाच ते सहा फूट होती. आत बळद, गोठे असे गोकूळ होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी हा वाडा मोडून तेथे इमारत बांधली गेली.

येवला हे नाव सर्वसामान्यांना पैठणीसाठीच माहीत असले तरी तेथे इतरही वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय प्रसिद्ध आहेत. भारतात घोड्यांचा बाजार राजस्थानात व खानदेशात शिंदखेडा येथे वर्षातून फक्त एकदा, तोदेखील यात्रेच्या निमित्ताने भरतो. मात्र येवले शहरात दर मंगळवारी घोड्यांचा बाजार भरतो. तेथे लोक लांबून खऱ्या घोडेखरेदीसाठी येतात; लाखो रूपयांची उलाढाल होते.

कै. सत्यनारायणदास वर्मा यांनी येवल्यात आशिया खंडातला पहिला पेपीनचा (पपईच्या चिकापासून तयार केलेल्या पावडरचा) कारखाना सुरू केला. एंझोकेम लॅबरोटरीज, कोटमगाव ह्या कंपनीचा कारखाना 1964 च्या सुमारास सुरू झाला. ती पावडर चामडे, सौंदर्यप्रसाधने, साबण पावडर, अन्न आणि औषध उद्योगात भारतातच वापरली जाते असे नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. त्या कारखान्याला लघु उद्योग क्षेत्रात सर्वात जास्त परकिय चलन मिळवून दिल्याबद्दल तीन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले होते. ती कंपनी दहा वर्षांपूर्वी अंतर्गत वादांमुळे बंद पडली.

येवला ही कतृत्ववान माणसांची खाण आहे. येवला येथे 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती रामचंद्र उर्फ तात्या टोपे यांचा जन्म 1814 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग टोपे व आईचे नाव रखमाबाई. त्यांचे वडील विद्वान संस्कृत तज्ञ्ज होते. त्यांच्या विद्वत्तेची ख्याती पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशेवे यांच्या कानावर गेली. पेशव्यांनी पांडुरंग टोपे यांना कुटुंबासह पुण्याला बोलावून घेतले. इंग्रजांच्या हाती पेशव्यांचा पराभव 1818 मध्ये झाल्यावर टोपे कुटुंबीय पेशव्यांच्या समवेत ब्रह्मावर्त (बिठूर) येथे गेले. तात्या टोपे यांचे बालपण येथे गेले. त्यांचे शिक्षण श्रीमंत नानासाहेब व लहानगी मनकर्णिका तांबे (झाशीची राणी) यांच्या बरोबरीने बिठूर येथे झाले. तात्यांनी इंग्रजांविरुद्ध पंचावन्न लढाया लढल्या. ते राजस्थानातील छीपा बरोड गावानजीकच्या लढाईत 1 जानेवारी 1859 रोजी मारले गेले.

तात्या टोपे यांच्यासारखाच एक हुतात्मा म्हणजे अनंत कान्हेरे. त्यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी तेव्हाचा नाशिकचा जुलमी कलेक्टर, जॅक्सन ह्याचा वध केला. अनंत कान्हेरे यांना आर्थिक साहाय्य व पूर्वतयारीसाठी मदत येवल्याचे प्रसिद्ध व्यापारी काशीनाथ दाजी टोणपे यांनी केली होती. येवला गावात महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी 1920 साली काढली व राष्ट्रीय गणेशोत्सवाची सुरुवात केली. आपटे गुरुजी रत्नागिरीहून येवला येथे 1918 साली आले व त्यांनी येवला हेच त्यांचे कार्यक्षेत्र निवडले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे एका जाहीर सभेत प्रथमच धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली. ‘मी अस्पृश्य म्हणून जन्मलो पण अस्पृश्य म्हणून मरणार नाही!’ ही त्यांची याच सभेतली घोषणा होती. त्या काळी येवल्यामध्ये अस्पृश्यांना पिण्याचे पाणी दुसऱ्या कोणाकडे मागावे लागत असे. आपटे गुरुजी यामुळे अस्वस्थ झाले आणि त्यांनी बहुजनांचा विरोध पत्करून येवल्यात ‘एक गाव एक पाणवठा’ असा सत्याग्रह केला व ही दुष्ट रूढी मोडून काढली. 1866 साली स्थापन झालेल्या व पस्तीस हजारपेक्षा जास्त पुस्तके असलेल्या येवल्याच्या सार्वजनिक वाचनालयाने माझ्यासह अनेकांची वाचनाची भूक भागवली व आमचे भावजीवन समृद्ध केले.

येवल्यातील कर्तृत्ववान व्यक्तींविषयी एक योगायोग म्हणजे आपटे गुरुजींचे पुत्र शं. बा. आपटे हे ज्या वर्षी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्याच वर्षी तात्या टोपे यांच्या कुळातील त्र्यंबक कृष्णाजी टोपे हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नंतर ते मुंबईचे नगरपालही झाले. साने गुरुजींचे लाडके शिष्य, विचारवंत लेखक, वक्ते व साधना साप्ताहिकाचे कुशल संपादक यदूनाथ थत्ते हेही येवल्याचे. तसेच स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ललिता पवारही येवल्याच्याच.

येवला नाव ऐकताच सगळ्यांचे, विशेषत: स्त्रियांचे डोळे पैठणीच्या आठवणीने चमकू लागतात. पैठण ह्या गावावरून ह्या महावस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. पैठणच्या सातवाहन राजाचा ह्या कलेला आश्रय होता. सतराव्या शतकात शामदास कलजी गुजराथी हे पैठणहून येऊन येवल्यात स्थायिक झाले. त्यांनी स्वत:बरोबर अनेक कसबी कारागीर येवल्यात आणले. तेव्हापासून येवला गावात पैठणी, कद, हिमरू शाली, शेले ह्यांचे उत्पादन सुरू झाले. येवला आणि आसपासच्या गावात पैठणीचे पंधराशे ते दोन हजार माग आहेत व नव्वद टक्के पैठण्या येवल्यातच बनवल्या जातात. या उद्योगामुळे जवळ जवळ पंधरा ते वीस हजार विणकरांना रोजगार मिळाला आहे. पैठणी विणकामासाठी अस्सल जर वापरली जाते. जरीचा रूंद काठ-पदर, ठसठशीत वेलबुट्टी, मोहक नक्षीकाम, ह्या अंगभूत वैशिष्ट्यांनी पैठणी अधिक सुंदर दिसते.

carasole

भारत सरकारने भारतीय विणकरांच्या वस्त्रांचे प्रदर्शन लंडन येथे 1972 साली भरवले होते. त्या प्रदर्शनात येवल्याचे शांतिलाल भांडगे पैठणी हस्तकलेचे दोन नमुने ठेवले होते. ते पाहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून महाराष्ट्र सरकारकडे पैठणीची विचारणा होऊ लागली. डबघाईला आलेल्या पैठणी वस्त्रोद्योगाला या वेळेपासून नवीन संजीवनी प्राप्त झाली. महाराष्ट्र सरकारने लघु उद्योग केंद्राच्या वतीने पैठण येथे पैठणी प्रशिक्षण केंद्र सुरू करून अनेक विणकरांना प्रशिक्षित केले. ह्याच प्रशिक्षित विणकरांनी येवल्यात खाजगी पैठणी उत्पादन करून पैठणीची वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

शांतीलाल भांडगे यांनी ब्रिटिश एअरवेजच्या सर्व विमानांवर लावण्यासाठी पैठणीचा लोगो 1994 मध्ये बनवून दिला. त्यांनी दिल्ली मेट्रोच्या मुख्य कार्यालयासाठी पैठणीचा एक वैशिष्ट्यपूर्ण पदर 2011 साली करून दिला. भांडगे यांनी लघु उद्योग केंद्रातर्फे सर्व विणकरांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली. भारत सरकारने 1986 हे वर्ष ‘हातमाग वर्ष’ म्हणून साजरे केले होते. भांडगे यांचा विणकाम या हस्तकलेसाठी योगदान दिल्याबद्दल उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 1991 साली वर्षभर मेहेनत करून तयार केलेल्या ‘आसावरी ब्रोकेड’ ह्या पैठणीला तत्कालीन राष्ट्रपती कै. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार व ताम्रपट दिला गेला. त्यांना विणकाम व हस्तकला या क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी 2010 साली ‘संत कबीर’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. येवला व पैठण हे दोनच तालुके पैठणी निर्मितीची भौगोलिक क्षेत्रे असल्याचे पुरावे सादर करून ‘रजिस्ट्रार ऑफ जीआय अँड पेटन्टस’ ह्यांचेकडे सादर करण्यात आले. त्यायोगे या कायद्याद्वारे पैठणी उद्योगास संरक्षण मिळाले. सध्या टीव्ही सिरियलमध्ये पैठणी देण्यात येत असल्याने घराघरांत व देश विदेशात पैठणीचा प्रसार झपाट्याने होतो आहे असे काही विणकरांचे म्हणणे आहे. असे हे आमचे समृद्ध कला-परंपरेचे गाव येवला ! आणि अर्थातच, मी येवलेकर म्हणून मला येवल्याचा रास्त अभिमान आहे.

– माधव सावरगावकर 9820301035 madhav.sawargaonkar@pfizer.com

About Post Author

8 COMMENTS

  1. येवल्याचा हा इतिहास आपल्या लेखणीच्या रूपाने शब्दबद्ध केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आपणास शुभेच्छा

  2. अतिशय सुंदर लेख….. मला देखिल पैठणी साडीचा नॅशनल मेरिट अवॉर्ड 2011मिळाला आहे
    श्री. विजय रामभाऊ डालकरी.

  3. Nice reporting about yeola. We are really proud of yeola due to its cosmopolitan composition. The information about festivals is missing.
    I
    LOVE
    YEOLA

  4. अतिशय परिपूर्ण लेख. खरंतर सध्या येवले हे गाव पैठणीसाठी जनसामान्यांत ओळखले जाते पण त्या गावाला एव्हढी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ह्याची सहसा कोणाला जाणीव नसावी. ह्या लेखातून ही माहिती पुढे आली हे चांगले झाले. ह्या उपक्रमातून महाराष्ट्राची सर्वांगीण ओळख होते आहे.
    माधव तुमची लेखनशैली नेहमीच लोकांना आवडत आलेली आहे.

  5. जागतिक स्तरावर येवल्याचे नाव स्वातंत्र्य पूर्व काळात व आता आधूनिक काळात उज्वल करणाऱ्याची माहिती कळाली.
    येवलेकर असल्याचा सार्थ अभिमान उफाळून आला.
    अभ्यास पूर्ण लेखा बद्दल माधव सावरगावकर यांचे आभार.

  6. खूप छान माहितीपूर्ण लेख आहेत,थिंक महाराष्ट्र ची वाचकांसाठी ही अतिशय वेगळे विषय घेऊन येताना एक वेगळे व्हिजन आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here