पेठ आणि बाजीराव-मस्तानीचं नातं

8
32
carasole

मराठा सरदार पिलाजी जाधव हे बाजीरावांचे जणू सल्लागार होते! त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका मस्तानी प्रकरणात आहे. पेशव्यांच्या बहुतेक लढायांमध्येही पिलाजी बाजीरावांबरोबर असायचे. पिलाजी बाजीरावाच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी हजर होते. बाजीरावांपासून मस्तानीस जो मुलगा झाला त्याचे नाव समशेर बहाद्दूर. पेशव्यांना समशेरसाठी योग्य कुळातील वधू मिळेना. ते काम पिलाजीकडे आले. त्यांनी ते काम आस्थेने पार पाडले.

पिलाजी जाधव यांच्याकडे नाशिक प्रांताचा सारा वसूल करण्याचे काम १७२४ पासून होते. त्यामुळे पिलाजी यांना पेठ संस्थानाची माहिती होती. पेठ हे संस्थान नाशिकपासून पस्तीस कोसांवर होते. ते संस्थान ‘दळवी’ यांच्या अधिपत्याखाली होते. पिलाजी यांनी त्या घराण्यातील मुलगी समशेरसाठी सुचवली. त्यांनी नानासाहेब पेशवेंना तसे सुचवले. नानासाहेबांनाही कुलाचाराच्या दृष्टीने ते स्थळ योग्य वाटले आणि सोयरीक ठरवली गेली.

पेठच्या दळवी घराण्याचा इतिहास मजेशीर व रोमांचकारी आहे. दळवी घराण्याचे पूर्वीचे आडनाव पवार. ते बहुधा माळव्यातील प्राचीन परमारांपैकी असावेत. ते सोळाव्या शतकात माळव्यातून आल्यावर इकडे ‘पवार’ झाले असावेत. त्या घराण्याचे मुख्य जावजी पवार यांनी पेठवर ताबा सोळाव्या शतकात मिळवला. त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘दळवी’ हे नाव घेतले. दळवी या शब्दाचा अर्थ ‘दळाचा प्रमुख’ असा होतो. म्हणून त्यांना दळवी नाव स्वीकारण्यात अभिमान वाटला. जावजी दळवी यांचा नातू कृष्णाजी दळवी हे स्वतंत्र बाण्याचे होते. ते बागलाणच्या राजाचे नेतृत्व झुगारून स्वतंत्र राहू लागले. मोगलांनी बागलाण १६३६ मध्ये जिंकून त्यांच्या आधिपत्याखाली आणले. त्यावेळी दळवी यांचे वंशज लक्षधीर संस्थानाच्या गादीवर होते. त्यांनी औरंगजेबाविरुद्ध बंड केले. औरंगजेबाने ते मोडून काढले. बंडाची सजा म्हणून लक्षधीर व त्यांचे भाऊ राम दळवी यांना कुटुंबासह दिल्लीला नेले गेले. लक्षधीर व राम दळवी यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. दोघे भाऊ दिल्लीच्या तुरुंगात फाशीची वाट पाहत बसले.

त्या दोन भावांपैकी राम दळवी वैद्यकीय जाणकार होता. त्याचा आदिवासी भागातील झाडपाला, औषधी वनस्पती यांचा अभ्यास होता. योगायोग असा, की औरंगजेबाची मुलगी जनानखान्यात आजारी पडून अत्यवस्थ झाली. तिच्यावर पुष्कळ औषधोपचार करण्यात आले. अनेक हकीम-वैद्य झाले. मात्र त्या उपचारांचा तिला गुण येईना. राम दळवी यांची माहिती कोणीतरी औरंगजेबाच्या कानावर घातली. अखेरचा इलाज म्हणून राम दळवी यांना औरंगजेबाच्या मुलीवर औषधोपचार करण्यास सांगण्यात आले. राम दळवी यांच्या औषधाने बादशहाची मुलगी बरी झाली! औरंगजेबासमोर वेगळाच पेच निर्माण झाला. ज्याने औषध देऊन मुलगी वाचवली, त्याला फासावर द्यायचे? मग दळवी बंधूंची फाशी रद्द करण्यात आली. पण त्या बदल्यात त्या दोघांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. दोघे बंधू नाईलाजाने मुसलमान झाले. राम दळवी यांचे नाव अब्दुल रहीम व लक्षधर यांचे अब्दुल मोमीन असे ठेवण्यात आले. त्यांची कैदेतून मुक्तता करून त्यांना परत पाठवण्यात आले. तसेच, त्यांना पेठ संस्थान निर्वाहासाठी देण्यात आले.

जेव्हा लक्षधीर आणि राम दळवी यांना दिल्लीला नेण्यात आले, तेव्हा फक्त लक्षधीर यांची बायको आणि मुले त्यांच्याबरोबर दिल्लीला गेली होती. राम दळवी यांची पत्नी व दोन मुले दक्षिणेत पेठ संस्थानी राहिली होती. त्यांचे धर्मांतर झाले नव्हते. राम दळवी यांनी परत आल्यावर त्यांना मुसलमान हेण्याचा आग्रह केला नाही. उलट, पेठ संस्थानाचे दोन भाग केले गेले. त्यांनी त्यांच्या पश्चात ते संस्थान मुसलमान व हिंदू संततीस मिळावे अशीच व्यवस्था करून ठेवली. त्यांचा इस्लाम धर्म केवळ नावापुरता होता. त्यांची राहणी हिंदू पद्धतीची होती. बाजीरावाचा मुलगा समशेर बहाद्दूर याच्याकरता शोधलेली मुलगी संमिश्र खानदानाची होती. पिलाजी यांनी शोधून काढलेली ती मुलगी नानासाहेब पेशव्यांनी पसंत केली. तिचे नाव लाल कुवर असे होते.

त्या वेळच्या रीतीरिवाजाप्रमाणे नानासाहेब पेशव्यांनी पेठकरांकडे जातीने मागणी घातली. बाजीराव-मस्तानी पुत्र समशेर बहाद्दूर आणि लालकुवर यांचे लग्न १४ जानेवारी १७४९ला थाटामाटात लागले. जवळ जवळ वीस वर्षांनंतर –एका क्षत्रिय खानदानी वंशाची आणखी एक मुलगी वधू म्हणून पेशव्यांच्या घरात वाजत गाजत आली. बाजीराव-मस्तानीचा पेठशी संबंध आला तो असा!

– अशोक पाटील

About Post Author

8 COMMENTS

 1. मस्त लेख. खरोखर सुंदर
  मस्त लेख. खरोखर सुंदर.

 2. Aapas. Uttam itihasachi mahit
  Aapas. Uttam itihasachi mahit dilya baddal me aapla aabhari aahe. Dhanyawad.

 3. खुप छान माहिती मिळाली , शमशेर
  खुप छान माहिती मिळाली. शमशेर बहादुरचे पुढे काय झाले याची माहिती अपडेट करावी ही विनंती.

 4. माहितीपुर्ण लेखन वाचायला
  माहितीपूर्ण लेखन वाचायला मिळाले. लेखक व थिंक महाराष्ट्र दाेघांचेही अभिनंदन!

 5. Thank you very much sir….so
  Thank you very much sir. Very nice information about Bajirao-Mashtani and Samsher bahadur.

 6. ज्या तालुक्यात मी जन्माला…
  ज्या तालुक्यात मी जन्माला आलो पण मलाही हा इतिहास कुठे वाचण्यात आला नाही आणि कोणी तोंडी सांगितले नाही असा आज नवीन पिढीला माहिती नाही आपल्या मुळे आज माझ्या ज्ञानात भर पडली..आजून काही इतिहास असेल तर अपडेट करा धन्यवाद

 7. पेठ तालुक्यातील शिलालेख…
  पेठ तालुक्यातील शिलालेख बद्दल माहिती हवी आहे

Comments are closed.