पुरातत्त्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र

1
56
carasole

साने गुरुजी यांचे नाव घेतले की आठवते ती ‘श्यामची आई’ आणि त्या पाठोपाठ ‘साने गुरुजी कथामाला.’ आणखी थोडी माहिती असलेल्यांना आठवते ते त्यांचे ‘भारतीय संस्कृती’ हे पुस्तक. गुरुजींनी ते १९३७ साली लिहिले. त्याच्याही आधी गुरुजींनी राजवाडे यांचे चरित्र लिहिले.

पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लेखकाच्या नावाखाली नामदार गोखले व ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या चरित्राचे कर्ते असे वाक्य छापले आहे. पुस्तकाला द.वा.पोतदार यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत पोतदारांनी स्पष्ट म्हटले आहे, “त्यांचे (राजवाडे यांचे) सहाध्यायी, सहकारी, विरोधक, शिष्य, मित्र, ग्रंथाभ्यासक या सर्वांच्या आठवणीही अजून पुष्कळ प्रसिद्ध व्हावयास पाहिजेत. तसेच, त्यांचा इतरांशी व इतरांचा त्यांच्याशी झालेला पत्रव्यवहार, त्यांचे अप्रसिद्ध लेख व संग्रह या सर्वांचे अवलोकन चरित्रलेखकास अवश्य आहे. असा योग येईल तेव्हा राजवाडे यांचे सांगोपांग चरित्र लेखकास अवश्य हाती घेता येईल. रा.साने यांचा प्रयत्न त्या दृष्टीचा नाही. त्यांनी साधारण बहुश्रुत वाचकास राजवाडे यांच्या योग्यतेची ओळख व्हावी म्हणून हा प्रयत्न केला आहे. अशी या सानेकृत चरित्राची मर्यादा आहे.”

साने गुरुजी स्वत: ‘लेखकाचे दोन शब्द’ यामध्ये म्हणतात, “मी राजवाडे यांच्या प्रस्तावना व लेख बरेचसे स्वत: वाचून त्यातील माहितीचा उपयोग केला आहे. मी चरित्रातील बराचसा भाग राजवाडे यांच्या शब्दांतच दिला आहे.”

पुस्तकाबाबतच्या दोन स्पष्ट उल्लेखांतून लेखक व प्रस्तावनाकार यांचा प्रामाणिकपणा स्पष्ट होतो आणि पुस्तकांचे अंतरंग कोणत्या दृष्टीने पाहवे याबद्दल संदेह व भ्रांती राहत नाही.

पहिल्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी, साने गुरुजींनी “कै. राजवाडे यांच्या चरणी प्रणती या शीर्षकाखाली भुजंगप्रयात वृत्तात साठ ओळींची कविता लिहिली आहे. त्यांतील काही वेधक भाग पुढे दिला आहे-

नमो विश्वनाथा नमो बुद्धिमंता! नमो तेजवंता, नमो मानवंता
स्वभू तोषवीली, स्वभू भूषवीली! जनांनी जितात्मे गतश्री बनोनी
तुझ्या बुद्धिला काही नाही अगम्य! सदा डुंबसी ज्ञानगंगेत रम्य
किती पंकजे आणिली त्वा खुडोनी! मती आमुची गुंग होते बघुनी
कुणी पाणिनी मानिती मूर्तिमंत! गणावे गिबन बोलती ज्ञानवंत
कळावी कशी योग्यता वास्तवीक! अम्हा, जे सदा मागतो रोज भीक.

साने गुरुजींनी राजवाडे यांचे चरित्र आठ प्रकरणांत लिहिले आहे. प्रकरणांची शीर्षके त्या त्या प्रकरणात काय आहे ते सांगतात. उदाहरणार्थ, जन्म,  बाळपण, शिक्षण, इतिहास संशोधन व इतिहास मंडळ, भाषाविषयक कामगिरी, समाजशास्त्रविषयक व इतर निबंध, राजवाडे यांचे लिहिणे-त्यांचे स्वरूप, गुणदोष इत्यादी. राजवाड्यांची विशिष्ट मनोवृत्ती, स्वभावाशी परिचय, अंत व उपसंहार. या शीर्षकांवरून लक्षात येते, की पोतदारांनी प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे, साने गुरुजींनी राजवाडे यांच्या कार्याची ओळख एवढाच हेतू ठेवून लिखाण केलेले आहे. राजवाड्यांचे भाऊ वैजनाथशास्त्री व इतर कुटुंबीय यांचे उल्लेख पहिल्या प्रकरणात नाहीत. राजवाड्यांच्या कौटुंबिक जीवनासंबंधी सबंध पुस्तकात फक्त एक उल्लेख आहे. तो असा – “पंचवीस-सव्वीस वर्षांचे असताना पत्नी वारली तेव्हा ‘पुरूष अगर स्त्री – यांस दुस-यांदा लग्न करण्याचा हक्क नाही. शेष भागीदाराने संन्यस्त वृत्तीने देशसेवा वा देवसेवा, शक्यतेनुसार करून शेष आयुष्य चालवावे’ हे धीरोदात्त उद्गार काढले (पृष्ठ १०५) – त्याच सुमारास (१८९६) त्यांची भार्या मरण पावली. संसाराचा पाश तुटला.”(२३)

राजवाडे यांनी सारे लिखाण मराठीत केले, पण त्यांचा विद्यार्थिदशेत सारा व्यवहार इंग्रजीत होई. त्याबाबत पुस्तकात राजवाडे यांच्या शब्दांतील उल्लेख असा – ‘एका दुष्ट खोडीने मात्र मला अतोनात ग्रासले. ती खोड म्हणजे इंग्रजी बोलण्याची, इंग्रजीत विचार करण्याची. वयाच्या बाराव्या वर्षापासून सव्वीसाव्या वर्षापर्यंत वाचणे, लिहिणे, विचार करणे वगैरे सर्व मानसिक क्रिया मी इंग्रजीत करू लागलो. शाळेत व कॉलेजात प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथांशी शिक्षकांनी व परीक्षकांनी माझी क्षणभरही ओळख करून दिली नाही.

… कॉलेजात तर बहुतेक सर्व व्यवहार इंग्रजीत करू लागलो. बंधूंना व मित्रांना पत्रे लिहायची ती इंग्रजीत. डिबेटिंग सोसायटीत मोठमोठी, अद्वातद्वा व्याख्याने द्यायची ती इंग्रजीत. आचार्याबशी व गड्यामाणसांशी बोलायचे तेही मराठीमिश्रित इंग्रजीत…’ (पृष्ठ क्रमांक१३)

राजवाडे त्यातून वाचले ते विष्णुशास्त्री चिपळूणकर व परशुरामतात्या गोडबोले यांच्यामुळे. राजवा़डे केवळ वाचले नाहीत तर मराठीचे खंदे पुरस्कर्ते बनले. त्यांचे शालेय शिक्षण व कॉलेजचे शिक्षण इतरांसारखे झाले नाही. ते शिक्षणासाठी अनेक शाळांत जाऊनही एकोणिसाव्या वर्षी खाजगी रीतीने मॅट्रिकच्या परीक्षेस बसून पास झाले. त्या वेळच्या शिक्षकांसंबंधी राजवाडे लिहितात, “त्या सुमारास विद्वत्तेने व मनोरचनेने राष्ट्रहित साधण्यास बराच लायक असा एक पुरुष सरकारी नोकरीस लाथ मारून पुण्यास आला.” (तो थोर पुरुष म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर (पृष्ठ ६). राजवाडे सर्वसामान्य शिक्षकांना ते इंग्रजीसाठी गुलाम तयार करत असल्याबद्दल दोष देत. राजवाडे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडत पडत १८९० मध्ये बी.ए. झाले. त्यांच्या वसतिगृहातील आयुष्यक्रमाचे, दैनंदिन व्यवहारांचे व अभ्यासपद्धतीचे सविस्तर वृत्त त्या प्रकरणात आले आहे.

राजवाडे यांचा स्वत:च्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास होता.  “मी बी.ए.च्या परीक्षेत पास होण्यासाठी हिंदुस्थानचा व महाराष्ट्राचा इतिहास मॅट्रिकच्या वेळी जेवढा शिकलो होतो तेवढा बास होता” (पृष्ठ ११) राजवाडे यांनी पदवी परीक्षा पास होण्याच्या आधीच प्लेटोच्या ‘रिपब्लिक’चा मराठी अनुवाद केला होता.

राजवाडे यांनी ‘भाषांतर’ हे मासिक १८९५ मध्ये सुरू केले. काशिनाथपंत साने यांचे १८९६ च्या सुमारास, ‘महाराष्ट्र इतिहासाचे महत्त्व’ या विषयावरील भाषण ‘केसरी’त सारांश रूपाने प्रसिद्ध झाले. काकासाहेब पंडित त्यावेळी पुण्यास विद्यार्थी होते. त्यांना त्या भाषणाने प्रभावित केले व त्यांना त्यांनी मराठ्यांच्या  इतिहासाची साधने जमवावीत असे वाटू लागले. त्यांना त्यांच्या घरमालकाच्या जुन्या कागदपत्रांच्या पेटार्याात पानिपत लढाईच्या आधी गोविंदपंत बुंदेले यांनी लिहिलेले पत्र मिळाले. त्यानंतर त्यांना आणखी काही कागदपत्रे मिळाली. ती सर्व त्यांनी राजवाड्यांना दिली. राजवाडयांच्या इतिहास संशोधनाला तेथून सुरुवात झाली. त्यांनी अतीव मेहेनत करून मराठ्यांच्या इतिहासाचा पहिला खंड प्रसिद्ध केला. त्याला १२७ पृष्ठांची प्रस्तावना लिहिली. त्यांच्या त्या खंडाची प्रशंसा ज्ञानकोशकार केतकर यांनी केली. ते म्हणतात, “साहित्यशोधन, बारीक शोध आणि इतिहास विकासविषयक विचार या दृष्टींनी पाहता अर्वाचीन इतिहासाच्या क्षेत्रात राजवाडे यांच्या पहिल्या खंडाच्या योग्यतेचा दुसरा ग्रंथ गेल्या पन्नास वर्षांत हिंदुस्थानात झालेलाच नाही.” (पृष्ठ २४)

राजवाडे यांच्या इतिहास संशोधनाची परिणती म्हणजे भारतीय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना होय. राजवाड्यांनी जिवापाड मेहेनत करून व कामात सातत्य ठेवून इतिहास साधने प्रसिद्ध करण्यासाठी बावीस खंड प्रकाशित केले. त्यांनी तशीच महत्त्वाची कामगिरी भाषाशास्त्रातही केली. त्यांनी ‘ज्ञानेश्वरीचे व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी तीस हजार धातू (शब्दांमधील) गोळा केले व त्यांची प्रक्रिया, व्युत्पत्ती वगैरे उलगडण्याचा प्रयत्न केला.

राजवाडे यांनी महानुभाव पंथाची गुप्त भाषा उलगडली. महानुभावी पंथाच्या ‘लीलासंवाद’ ग्रंथाचा एक अर्थ गुप्त, सांकेतिक भाषेत होता. सतत तेरा दिवस खटपट करून तो ग्रंथ ज्या गुप्त संकेतांनी लिहिला होता, तो अर्थ राजवाड्यांनी उलगडून दाखवला.

राजवाड्यांच्या कर्तृत्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे समाजशास्त्रविषयक निबंध. त्यांनी कादंबरी लिखाणासंबंधी लिहिले आहे, की ह्युगो, टॉलस्टाय यांच्यासारखी ग्रंथरचना व्हावी अशी इच्छा असेल तर त्याला एकच उपाय आहे. त्यांच्यासारखी मने ह्या देशातील कादंबरीकारांची बनली पाहिजेत. उत्तमोत्तम कादंबरीकार व्हायचे म्हणजे मनोवृत्ती अत्यंत जाज्वल्य पाहिजे. श्रेष्ठ विद्या, विस्तृत वाचन, मोठा प्रवास, तीक्ष्ण निरीक्षण, कडक परीक्षण, थोर औदार्य, गाढ सहानुभूती व नाटकी लेखणी हे गुण तर हवेतच; परंतु सर्वात मुख्य गुण म्हणजे जाज्वल्य मनोवृत्ती हवी. (पृष्ठ ५२)

सानेगुरुजी राजवाड्यांच्या महत्त्वाच्या कामगिरीची ओघवती माहिती देऊन त्यांच्या स्वभावाच्या गुणदोषांचे विवेचन करतात. गुरुजी आधी त्यांच्या भाषेसंबंधी लिहितात – ‘राजवाडे यांची भाषा संस्कृत शब्दप्रचुर आहे. तरीपण ती जातिवंत व शुद्ध वळणाची वाटते. त्यांचे लिहिणे फार परिणामकारक असे. इंग्रजीमध्ये कार्लाईलची भाषाशैली जशी अगदी निराळी व स्पष्टपणे उठून दिसणारी आहे, तसेच राजवाडी भाषेचे आहे.’ (पृष्ठ ५९)

‘राष्ट्राचा अध:पात का झाला, असे अध:पात का होतात- कसे होतात याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशाने राजवाडे त्यांच्या जीवितकार्यास लागले. राष्ट्रास हीनदीन स्थिती का आली ते समजल्याशिवाय राष्ट्राच्या उद्धारार्थ योग्य दिशेने प्रयत्न करणे शक्य होणार नाही हे त्यांच्या बुद्धीने जाणले.’ (पृष्ठ६०) त्यांनी अनेक मंडळे काढली – इतिहास संशोधन मंडळ, रेल्वे उतारूंच्या तक्रारी दूर करणारे मंडळ इत्यादी इत्यादी. पण त्यांतील फक्त दोन-तीन चालू राहिली. त्याचे कारण काय?

गुरूजी लिहितात- “मंडळे स्थापन करणे हे काम, मंडळे चालवणे हे दुसरे काम. राजवाडे यांच्याजवळ त़डजोड नसे. त्यांना अंगमोड व पदरमोड करणारी माणसे आवडत. राजवाडे यांची कार्य करण्याची तडफ, त्यांच्या कामाच उरक इतरांत नसे. त्यांस इतरांच्या फावल्या वेळात देशकार्य करण्याच्या प्रवृत्तीचा संताप येई व मग ते दुसर्याावर न विसंबता एकटे कार्य करू लागत. त्यांना डॉ. जॉन्सन यांच्याप्रमाणे जगाचे, जगातील लोकांच्या मनोवृत्तीचे ज्ञान नीट झाले नाही.

डॉ. जॉन्सन लोकांवर प्रथम असाच संतापे, परंतु तो पुढे कमी संतापू लागला. कारण तो म्हणे, “मी जगापासून अपेक्षाच थो़डी करतो. त्यामुळे जग मला चांगले दिसू लागले आहे.”(पृष्ठ ६२-६३) गुरुजी पुढे सांगतात. “इंग्रजी सरकारास घालवून देऊन देश देहाने, मनाने, बुद्धीने स्वतंत्र कसा होईल याचीच तळमळ त्यांना (राजावाडे यांना) लागून राहिली होती.” हिंदुस्थानातून इंग्लिशांस घालवून देणे हेच सुशिक्षित हिंदवासीयांचे आद्य कर्तव्य होय असे त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. रसायनशास्त्र, इतर भौतिक शास्त्रे यांत पारंगत व्हा. ते विद्यार्थ्यांस सर्व कला आपल्याशा करा असे वारंवार बजावत.” (पृष्ठ ६५)

राजवाडे यांनी त्यांच्या वयाला सेहेचाळिसावे वर्ष लागल्यावर एका टिपणात १८९४ ते १९०९ या काळात साडेसात हजार पृष्ठे मजकूर लिहून व छापून झाला अशी नोंद केली आहे. त्यांना वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत काम करून पुढची दहा ते पंधरा वर्षे विश्रांती घ्यायची होती. “राजवाड्यांस पूर्वजांचे दुर्गुण स्पष्टपणे दिसत होते. शास्त्रसंवर्धन केले नाही, कार्यप्रवणता ठेवली नाही, उद्योगधंदे-कारखाने जगाकडे पाहून निर्मिले नाहीत, या सर्व चुका ते कबूल करतात (पृष्ठ ७४) पण त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी व श्रीमंत माधवराव पेशवे या तीन विभूती म्हणजे तीन परमेश्वरच वाटत.” (पृष्ठ ७५)

गुरुजींनी शेवटच्या प्रकरणात राजवाड्यांच्या स्वभावावर प्रकाश टाकला आहे. राजवाडे स्वच्छतेचे भोक्ते होते. त्यांचे स्वत:च्या हाताने स्वयंपाक करण्याचे कारण स्वच्छतेचा आग्रह हे होते. ते चहा वगैरे अग्निमांद्य करणा-या पदार्थांचा तिरस्कार करत. त्यांचा भर पौष्टिक आहार घेण्यावर असे. ज्वलज्जहाल वृत्तीने कार्यास आजन्म वाहून घेणारे कामसू लोक आढळत नाहीत, म्हणून ते चिडखोर व रागीट बनले. गुरुजींनी त्यांच्या मनस्वीपणाच्या, स्पष्टवक्तेपणाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत.

लेखक – पांडुरंग सदाशिव साने, एम.ए.
प्रकाशक व संपादक – श्रीधर नारायण हुद्दार. बी.ए.(टिळक)
प्रथमावृत्ती १९२८, पुष्ठे ११२, किंमत दहा आणे

– मुकुंद वझे

‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ने २०११ साली ‘साने गुरूजी डॉट नेट’ या संकेतस्‍थळाची निर्मिती केली. त्‍यावर साने गुरूजी यांची सर्व पुस्‍तके वाचण्‍यास मोफत उपलब्‍ध आहेत. प्रस्‍तुत लेखाचा विषय असलेले ‘इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र’ हे पुस्‍तक वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

About Post Author

1 COMMENT

  1. खूप छान माहीत मिळाली लालठाणे…
    खूप छान माहीत मिळाली लालठाणे आणि पालघर परिसराबद्दल

Comments are closed.