पुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर

0
92
_Trishund_Ganpati_1.jpg

पुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने दुर्लक्षित आहे. ते एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्त यांच्याकरता प्रसिद्ध होते. ते नंतर त्रिशुंड गणपती या नावाने ओळखले जाते. त्रिशुंड गणपती पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिर भरवस्तीत असूनसुद्धा ते पुणेकरांसाठी अपरिचित आहे! समाधी मंदिर, सुबक कोरीव काम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्पे, शिवाचे अवतार, गणेशयंत्रे, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती यांमुळे मंदिर शिल्पदृष्ट्या व धर्मभावदृष्ट्या असाधारण आहे.

नागझिरा ओढ्याच्या काठावर असणाऱ्या सोमवार आणि मंगळवार पेठांच्या भागात अठराव्या शतकात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी शहापुरा पेठ इसवी सन १६०० मध्ये वसवली. थोरल्या बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून तिचे सोमवार पेठ असे नामकरण १७३५ मध्ये केले. गोसावीपुरा नावाचा भाग त्या पेठेत होता. गोसावी समाजाची वस्ती तेथे मोठ्या प्रमाणात होती. ते गोसावी सधन होते. त्या गोसाव्यांच्या हातात सावकारी, सुवर्ण-रत्न यांचा व्यापार होता. अनेक गोसावींच्या समाधी स्मशानात होत्या. त्या काळात समाधीशेजारी शिवमंदिर उभारण्याची प्रथा होती. मंदिरे स्मशानपरिसरात असल्यामुळे भाविकांची वर्दळ कमी असे. त्यामुळेच त्रिशुंड मंदिर हे उत्कृष्ट शिल्प असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले. ते हठयोगी आणि गोसावी पंथीय यांचे श्रद्धास्थळ आहे. मंदिराजवळ पोचेपर्यंत तेथे मंदिर आहे हे कळून येत नाही.

त्रिशुंड मंदिराची उभारणी इंदूरजवळच्या धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी ह्यांनी १७५४ ते १७५७ या काळात केली. त्रिशुंड मंदिर पेशवेकालीन असले तरी ते पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे. पेशवेकालीन मंदिरांचे गर्भगृह दगडी व सभामंडप लाकडी असतात. मंदिरावर बांधकामाच्या राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलींचा प्रभाव आहे. मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले आहे.

मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर उंच जोत्यावर बांधले आहे. मंदिराच्या खाली तळघर आहे. मंदिरासमोर दगडी अंगण आहे. मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पद्धतीचे स्तंभ आहेत. स्तंभांवर घटपल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेले आहेत. स्तंभांवर कीर्तिमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. स्तंभांच्या वरील भागात कीचक किंवा भारवाहक यक्ष कोरलेले असून यक्षांनी त्यांच्या पाठीवर व हातांनी छताचा भाग तोलून धरला आहे. यक्षांनी हातात साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा पकडलेल्या आहेत. स्तंभाच्या खालील बाजूस श्रीकृष्ण, विठ्ठल इत्यादी देवता कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंला द्वारपाल आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर ब्रिटिश सैनिक कोरलेले असून त्यांनी एकशिंगी गेंड्याला साखळदंडानी बांधलेले आहे. ते शिल्प भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन करते. ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतांवर १७५७ साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ताबा मिळवला. आसाम प्रांताचे प्रतीक म्हणून गेंडा कोरलेला आहे. मंदिरात असलेल्या शिलालेखानुसार मंदिराची उभारणी १७५४ मध्ये झालेली आहे आणि प्लासीची लढाई झाली १७५७ साली. त्याचा अर्थ ते शिल्प प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांच्या सन्मानार्थ कोरले गेले असावे आणि ते कोरणा-या कारागिरांनी गेंड्याला बघितलेले असावे. शिल्पाच्या खाली अर्धउठावातील एकमेकांशी झुंजणारे हत्ती दाखवले आहेत. द्वारशाखेच्या खाली अधिष्ठानावर (जोत्यावर) दोन्ही बाजूंला गजलक्ष्मीचे (लक्ष्मीवर दोन्ही बाजूंनी दोन हत्ती सोंडेत धरलेल्या कलशाने अभिषेक करणारे) शिल्प कोरले आहे. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती कोरली आहे. मूर्तीच्या खालच्या भागात गणेशयंत्र कोरले आहे. द्वारशाखेच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. त्या शिल्पाच्या दोन्ही बाजूंला असलेल्या मकरमुखातून निघालेली महिरप आहे. महिरपीच्या वर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूंला एकमेकांचे हात धरून उभे असलेले वानर आहेत. विष्णूचे विविध अवतार सर्वात वरील पट्टीवर दाखवले आहेत. त्याच पट्टीवर डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील चित्राकृतीत एका साधूने स्वतःच्या हाताने दुसऱ्या साधूला खाली डोके आणि वर पाय अशा स्थितीत पकडले आहे.

दर्शनी भागात दोन्ही बाजूंना राजस्थानी शैलीची रिकामी गवाक्षे आहेत. त्या गवाक्षांच्या वर पक्षी बसलेले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात सर्वात वर शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिराचे शिखर एकतर बांधले गेले नसावे किंवा ते पडले गेले असावे. त्यामुळे शिखराच्या आतील घुमट बघण्यास मिळतो. मंदिराच्या दर्शनी भागात काल्पनिक प्राणीसुद्धा दाखवले आहेत.

प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश करताना उंबरठ्याच्या शेजारी डाव्या आणि उजव्या भिंतींत बंद असलेले दरवाजे लक्ष वेधून घेतात. त्या बंद दरवाज्यांच्या मागे तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वर्षभर त्या तळघरात गुढघाभर पाणी असते. दरवर्षी फक्त गुरुपौर्णिमेला तळघरात जाऊन गुरूंच्या समाधीचे दर्शन घेता येते. बाकीच्या दिवशी, ते दरवाजे बंद असतात. दगडी सभामंडपाच्या भिंतीत रिकामे कोनाडे आहेत. गजलक्ष्मीचे सुरेख शिल्प सभामंडपातून अंतराळात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या वर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आणि कोनाडे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती व गणपतीच्या खालच्या बाजूला गणेशयंत्र कोरलेले आहे.

_Trishund_Ganpati_2_0.jpgसभामंडपातून अंतराळात आल्यानंतर गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला दोन लहान दरवाजे आहेत. गर्भगृहात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या दरवाज्याने बाहेर पडल्यानंतर गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर दक्षिणेला असलेल्या देवकोष्ठामध्ये नटराजाची सुबक मूर्ती आहे. पश्चिमेच्या देवकोष्ठामध्ये लिंगोद्भव शिवशिल्प आहे. लिंगोद्भवाची कथा पुराणामध्ये येते. कथेनुसार एकदा विष्णू आणि ब्रह्म यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चाललेला असतो. वाद चालू असताना भगवान शंकर तेथे प्रकट होतात व म्हणतात, की जो कोणी आदिलिंगाचा उगम आणि अंत शोधेल तोच श्रेष्ठ. त्याप्रमाणे ब्रह्म हंसाचे रूप घेऊन आकाशात जातो आणि विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळात जातो. परंतु दोघांना उगम आणि अंत शोधण्यात यश येत नाही. शेवटी, ब्रह्म आणि विष्णू शंकराचे श्रेष्ठत्व मान्य करतात. तेथील शिल्पात ब्रह्म हंसरूपात व विष्णू वराहरूपात कोरलेले आहेत. शिवलिंगावर नागाचा फणा दाखवलेला आहे. अनेक शैव लेण्यांमध्ये आणि शिवमंदिरामध्ये लिंगोद्भव गोष्ट दाखवलेली असते, पण त्रिशुंड मंदिरातील लिंगोद्भव शिव वेगळे आहे. उत्तरेच्या देवकोष्ठामध्ये कोणत्या देवतेची मूर्ती आहे ते ओळखता येत नाही. उत्तरेकडील देवकोष्ठ बघून उजव्या बाजूच्या दरवाज्याने पुन्हा अंतराळात येता येते.

गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून हातामध्ये साखळी पकडलेले जटाधारी साधू आहेत. दरवाज्याच्या ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती व गणपतीच्या खालच्या बाजूला गणेशयंत्र कोरलेले आहे. दरवाज्याच्या वर शिव आणि त्याच्या एका मांडीवर पार्वती बसलेली असून दुसऱ्या मांडीवर बसलेली स्त्री कोण आहे ते सांगता येत नाही. मूर्तीच्या एका बाजूला शंकराचे वाहन नंदी व दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले आहेत. दरवाज्यावर सुबक महिरप आहे. दरवाज्याच्या वर दोन देवनागरी लिपीत व संस्कृत भाषेत आणि एक फारशी शिलालेख आहेत.

तीन सोंडा असलेली मयुरारूढ गणेशमूर्ती गर्भगृहात आहे. मोराने फणा उगारलेला नाग चोचीत धरला आहे. मूर्तीच्या महिरपीवर व गणपतीच्या कानावर असलेल्या छिद्रांचा उपयोग दागिने घालण्यासाठी केला जात असावा. गणपतीला सहा हात आहेत. वरील उजव्या हातात अंकुश, मधील उजव्या हातात शूल, खालील उजव्या हातात मोदकपात्र, वरील डाव्या हातात परशू, मधील डाव्या हातात पाश आहेत आणि खालील डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या शक्तीला आधार दिला आहे. गणपतीची डाव्या बाजूची सोंड शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करते. उजव्या बाजूची सोंड खालील उजव्या हातात असलेल्या मोदकपात्राला स्पर्श करते. मधील सोंड मोराच्या डोक्याला स्पर्श करते. मोराच्या उजव्या बाजूला उंदीर आणि डाव्या बाजूला स्त्री भक्त आहे. तसेच, मोराच्या दोन्ही बाजूंना चवरीधारी स्त्रिया आहेत. गणपतीच्या मागच्या भिंतीवर शेषशायी विष्णू आणि गणेशयंत्र आहे. तळघरात जाण्याचा मार्ग गाभा-याच्या उजव्या भिंतीतून आहे. पुजारी समाधीपाशी दिवा लावण्यासाठी त्या मार्गाचा वापर करतात.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर तीन शिलालेख आहेत. त्यांपैकी पहिला आणि दुसरा शिलालेख संस्कृत भाषेत (देवनागरी लिपी) आणि तिसरा शिलालेख फार्सी भाषेत आहेत.

लेखात गणपती, सरस्वती, श्री गुरू व दक्षिणमूर्ती यांना नमन केले आहे. संवत १८०१ शालिवाहन शके १६७६ भावनाम संवत्सर मार्गशीर्ष महिन्यात सौम्यवार (बुधवार) रोजी श्री देवदत्त याने श्री महाकाल रामेश्वराची स्थापना केली असे लिहिले आहे. महाराष्ट्रातील शिलालेखांत उत्तरेकडील विक्रम संवत दिले जात नाही. परंतु विक्रम संवतचा उल्लेख असलेला महाराष्ट्रातील हा महत्त्वाचा लेख आहे.

दुस-या लेखात कालनिर्देश नाही. तो लेख पहिल्या लेखाबरोबर कोरलेला असावा. लेखात शंकराची व कालीची स्तुती आहे. सर्वात शेवटी यत्र योगेश्वर हा गीतेतील श्लोक दिला आहे.

तिस-या लेखास हिंदू मंदिरातील फारसी शिलालेख म्हणून महत्त्व आहे. फकीर गुरुदेव यांचे हे मकान (घर) तारीख ७ माहे जिल्काद हिजरी ११६७ या दिवशी बांधून पूर्ण झाले. शिलालेख उठावाचा असून लेखात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. शिलालेख असा आहे –

ई मकान गुरुदेवदत्त
फुकरा फी तारीख हफ्तुम
शहर जूकअद रोज चहार शम्बेह
सनह ११६७ तअ्मीर नमूदे शुद

मंदिरात असलेले तिन्ही शिलालेख मंदिराच्या बांधकामासंदर्भात आहेत. शिलालेखांनुसार ते मंदिर श्रीमहाकाल, रामेश्वर व दत्तगुरू यांचे आहे. तिन्हीपैकी एकाही लेखात गणपती मंदिराचा उल्लेख नाही! गणपतीच्या मूर्तीची स्थापना कोणी, कधी आणि का केली? गणपतीच्या स्थापनेनंतर शंकराच्या मूर्तीचे (किंवा शिवलिंगाचे) आणि दत्ताच्या मूर्तीचे काय झाले? मंदिर गणपतीचे आहे, तर मग विष्णू आणि शंकर यांच्या शिल्पांबरोबर त्यांच्या विविध अवतारांची शिल्पे मंदिरावर का आहेत? गणपती संदर्भात एकही शिल्प तेथे का नाही? मंदिराबद्दल प्रश्न भरपूर आहेत, पण उत्तर एकाचेही मिळत नाही.

– (संदर्भ- मराठी व संस्कृत शिलालेखांच्या विश्वात, तेंडुलकर महेश, स्नेहल प्रकाशन, २०१५)

– पंकज समेळ
pankajsamel.1978@outlook.com

Last updated on 19th Sep 2018

About Post Author