पाबळचा विज्ञानाश्रम

विकास आणि शिक्षण यांची यशस्वी सांगड

 आपल्या प्रचलित शिक्षणपध्दतीच्या दुखण्यावर आणि त्यावरच्या रोगापेक्षा जालीम अशा उपाययोजनांवर चर्चा नेहमी होते. मूलगामी बदल व्हायला हवा यावर सर्वत्र एकवाक्यता दिसते, पण हा बदल नेमका असावा कसा आणि तो व्यवस्थेमध्ये रुजवावा कसा, याबद्दल कृतिशील विचार अभावाने समोर येतो. या संदर्भात ग्रामीण भागाचा विकास आणि शिक्षण यांना एकत्र आणणारे पाबळच्या विज्ञान आश्रमाचे गेल्या तीन दशकांतले काम महत्त्वाचे आहे. डॉ. श्रीनाथ कलबाग या द्रष्ट्या संशोधकाने या प्रश्नाची व्याख्या व्यापक केली. त्यांनी माहिती, ज्ञान, उद्योजकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, शाळा आणि भोवतालचा समाज अशा विशाल संदर्भचौकटीत या समस्येची उकल केली.

डॉ. श्रीनाथ कालबागविज्ञान आश्रमाच्या कामाचं सार असलेला ‘आय.बी.टी.’ (Introduction to Basic Technology) हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या सत्तरहून अधिक शाळांमधे राबवला जातो. महाराष्ट्र शासनाने आय.बी.टी.ला दहावीसाठी मान्यता दिलेली आहे. आय.बी.टी.च्या विद्यार्थ्यांना पदविका आणि I.T.I. अभ्यासक्रमांसाठी राखीव जागांचीही सोय केलेली आहे. विज्ञान आश्रमा चा अभ्यासक्रम शाळांसंबंधित पारंपरिक शिक्षणाबरोबर शिकवला जात आहे. उत्साहाची गोष्ट म्हणजे कर्नाटक आणि गोव्यातल्याही काही शाळांनी हा अभ्यासक्रम चालू केला आहे. हा अभ्यासक्रम शालेय शिक्षणाचा अनिवार्य भाग व्हावा म्हणून अनेक संस्था व व्यक्ती काम करत आहेत. अमेरिकेतल्या ‘लेंड अ हॅंड इंडिया’ या संस्थेने ‘प्लॅन १००’ या योजनेखाली शंभर शाळांना निधी पुरवण्याचे ठरवले आहे आणि या योजनेच्या सार्वत्रिकीकरणासाठी लागणारी monitoring यंत्रणाही उभी केली आहे.

विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे रोजच्या जगण्याच्या पातळीवर आणण्याचे महत्त्वाचे काम विज्ञान आश्रमाने केलेले आहे. शासकीय परिभाषेत ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा अभ्यासक्रम पूर्व-व्यावसायिक शिक्षण या गटात मोडतो. ‘व्यावसायिक प्रशिक्षण’ हा आय.बी.टी. अभ्यासक्रमातील महत्त्वाचा घटक आहे हे खरेच – पण या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य हे की व्यावसायिक प्रशिक्षण हे इथे केवळ साध्य न राहता ते उद्योजकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबवण्याचे प्रभावी साधन म्हणून हाताळले जाते..

आय.बी.टी. हा विषय आठवीपासून चालू होतो आणि मुले तो दहावीपर्यंत शिकतात. वेळापत्रकात आठवड्यातील एक दिवस आय.बी.टी.साठी दिला जातो. ‘काम करत करत शिकणे’ हा आय.बी.टी.चा गाभा आहे. ‘ऐकलेले विसरले जाते, वाचलेले लक्षात राहते आणि केलेले समजते’ हे तत्त्व सर्वमान्य आहे. विज्ञान आश्रमाने त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांचे काम उत्पादक असावे, त्याचा केवळ शाळेला नाही तर गावालासुध्दा लाभ व्हावा याकडे लक्ष दिले. शाळेतले शिक्षण हे फक्त चार भिंतींत मर्यादित न राहता ते आजुबाजूच्या समाजाशी कसे जोडले जाऊ शकते याचे हा अभ्यासक्रम हे उदाहरण आहे.

IBTमुले हा विषय चार विभागांत शिकतात – शेती व पशुपालन, अभियांत्रिकी, ऊर्जा व पर्यावरण आणि गृह व आरोग्य. विविध कौशल्ये हाताळत मुले आणि मुली त्यामागचे विज्ञान, गणित, व्यवस्थापन समजून घेतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ही कामे त्यांच्या निर्मितिक्षम मनाला चालना देतात – त्यांना आत्मविश्वास देतात. आय.बी.टी.च्या एका उद्योजक माजी विद्यार्थ्याचे भाष्य या बाबतीत मार्मिक आहे. तो म्हणतो, आपण जेव्हा एक गोष्ट शिकतो, तेव्हा एकच गोष्ट करू शकतो आणि आपण जेव्हा चार गोष्टी शिकतो तेव्हा पाचवीही करू शकतो!

इथे मुले आणि मुली जेव्हा फेरोसिमेंट्ची टाकी बांधतात तेव्हा तो केवळ एक प्रयोग नसतो. त्यांना त्यात भूमितीचे धडे मिळतात. काँक्रिट किती लागेल हे काढण्यासाठी घनफळाची संकल्पना आवश्यक आहे हे सहज कळते. पोलादी तारांचे जाळे विणून त्यावर सिमेंट आणि वाळूचे मिश्रण थापताना संघभावनेचे, व्यवस्थापनाचे धडे मिळतात आणि स्वत:च्या शाळेसाठी उपयुक्त गोष्ट केल्याचे समाधानही मिळते. अभियांत्रिकी विभागात ते वेल्डिंग शिकून शाळेतल्या बाकांची दुरुस्ती करतात, ऊर्जा आणि पर्यावरण विभागात ते कांडी कोळसा, सौर शेगडी आणि सौर ड्रायर तयार करत करत पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोताची वेगवेगळी रूपे समजून घेतात, गृह आरोग्य विभागात रक्ततपासणी आणि पाणी तपासणीचे तंत्र शिकून गावासाठी त्याचा वापर करतात आणि शाळेच्या शेतात भाजीपाला काढून गावच्या बाजारात विकून त्यामागचे अर्थशास्त्रही जाणून घेतात. हे सर्व कल्पनारंजन नाही. आय.बी.टी.राबवत असलेल्या शाळांना भेट देणे जरी तुम्हाला शक्य नसले तरी इंटरनेटवर ‘शिक्षणातून विकास’ हा माहितीपट तुम्ही पाहू शकाल. vigyan ashram documentary वर क्लिक केले की हा माहितीपट उपलब्ध होईल.

काम करत करत शिकणारी मुले ज्या पध्दतीने या प्रयोगात रमताना दिसतात ते पाहिल्यावर आय.बी.टी.च्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळ जवळ शंभर टक्के असते असे मुख्याध्यापक का म्हणतात, हे सहज लक्षात येते.

शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष कौशल्य शिकवताना विज्ञान-तंत्रज्ञानाची तोंडओळख, दोस्ती, आपुलकी, प्रेम आणि विश्वास तयार व्हावा यासाठी विज्ञान आश्रम प्रयत्न करतो. या प्रक्रियेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाणणे, प्रयोग करणे, मुलांनी स्वतःचे नवे निष्कर्ष काढणे, छोटे शोध लावणे, समाजातले प्रश्न या नजरेने जाणून घेणे आणि आपली कौशल्ये व दॄष्टी वापरून त्यावर उपाय शोधून काढणे अशा मोठ्या विस्ताराच्या गोष्टी साध्य करण्याचा विज्ञान आश्रमाचा प्रयत्न आहे. थोडक्यात, विज्ञान-तंत्रज्ञान आणि समाजपरिसर यांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना आपल्या परिसराचे भान हे केवळ शालेय पुस्तकांतून न येता ते प्रत्यक्ष अनुभवामधून यावे अशी या प्रयोगाची रचना आहे.

अभय पाटील
9890116701
abhay.patil@gmail.com

समीर शिपूरकर
9422089310
sameership@yahoo.com

About Post Author