पवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’

carasole

मुंबईच्या पवई तलावाचे जलसंरक्षण कार्य ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ करते. पवई तलाव आणि दिवंगत ‘ख्यातनाम संगीतकार नौशाद अली यांचे नाते अतूट होते. नौशाद अली हे ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील उत्तम काम पवई तलावाच्या काठीच सुचले आहे असे ते काही वेळा बोलून दाखवत. पवई तलावाच्या संवर्धनाकरता ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना झाल्याने माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असे त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजू नौशाद अली म्‍हणतात व वडिलांचे नाव सरोवर संवर्धिनीला दिल्याने आनंद व्यक्त करतात.

सरोवर संवर्धिनी ही संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉ. एम.एस. कोडारकर यांनी काही ठिकाणी केला व तो यशस्वीही झाला. कोडारकर यांनी काही वर्षे इंग्लंडला लोच लोमंडं या फिल्टर स्टेशनवर संशोधनात्मक काम केल्यामुळे त्यांच्या गाठीशी तसा अनुभव होता, त्याचा फायदा पवई तलावाच्या संवर्धनाकरता घ्यावा याकरता ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने घेतला. पवई तलावाचे संवर्धन करता यावे आणि पर्यावरणाविषयी विद्यार्थी व जनसामान्य यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने ‘इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्वाटिक बायोलोजिस्ट’ या संस्थेच्या मदतीने ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना 2 फेब्रुवारी 2008 रोजी केली. पवई तलावातील जल आणि मत्स्य संवर्धन करणे, जलजागृती करून जलसाक्षरतेची मोहीम राबवणे, प्रशिक्षण शिबिरे योजणे, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारे पर्यावरण तसेच प्रदूषण मुक्ततेचे कार्यक‘म राबवणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत व मुंबईबाहेर काही धरणे अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत बांधण्यात आली. तानसा 1892 साली, अप्पर वैतरणा 1960 साली व भातसा 1955 साली (ठाणे जिल्ह्यात मुंबईपासून अदमासे शंभर किलोमीटर अंतरावर) बांधण्यात आली. तर मुंबईत विहार 1858 व तुळशी 1879 मध्ये निर्माण झाली. परंतु पवई तलावाचा प्रकल्प अयशस्वी झाला, त्याचे पाणी पिण्यालायक निघाले नाही. म्हणून तो तलाव Western India Fishing Association ला दीर्घ मुदतीसाठी भाडेपट्टीवर माश्यांची पैदास व गरवली करण्यासाठी देण्यात आला. नंतर Bombay Presidency Angling Association ला छंद म्हणून गरवली करणा-या संघटनेस 1939 साली परवानगी देण्यात आली. संस्थेचे नाव बदलून ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ असे 1955 साली ठेवण्यात आले. संस्थेचे संस्थापक म्हणून American Express चे  हू गो बेसिल हेज यांचे नाव घेतले जाते.

संस्थेने तिच्या घटनेत 1991 मध्ये बदल करून पवई तलावाच्या संवर्धनाकरता व तेथील पर्यावरण टिकवण्यासाठी तेथे काम सुरू केले. असे म्हणतात की पवई तलावाच्या जागी एक गाव होते. गावात झोपड्या विखुरलेल्या होत्या. गावात एकच विहीर होती. बि‘टिश सरकारच्या काळात एका सरकारी अधिका-याने मुंबईला पाणी मिळावे म्हणून पवई तलावाची निर्मिती केली. तो तलाव दोन धरणे व दोन टेकड्यांच्या साहाय्याने तयार केला गेला. धरणांची उंची दहा मीटर एवढी आहे. तलावाची खोली दहा ते चाळीस फूट एवढी आहे. गाळ भरल्याने आता मात्र त्याची खोली जास्तीत जास्त एकोणीस फूट एवढी भरते. पावसाळ्यात दहिसर नाला, गोपाळ नाला व आजुबाजूच्या टेकड्यांतील छोट्या ओढ्यातून पाणी वाहून तलावात येते. नंतर ते धरणावरून वाहून जाऊन विहार-पवई नाल्याला मिळते. शेवटी ते मिठी नदीला मिळून ती नदी माहीम खाडीला पोचते.

पवई तलाव हा जैवविविधतेचे उत्तम उदाहरण आहे. तलावात कटला, रोहू, निर्गल, कल्बोस, ग्रास कार्प, सिल्व्हर, गोरामी, तिरापिया, महालसिर अशा अनेक प्रकारच्या माशांच्या जाती आढळून येतात. तलावात मगरींचेही वास्तव्य आहे. तलावाच्या परिसरात पाणकावळे, करढोक, करकोचे, इग्रेट, पाणकोंबडी, घार यांसारखे विविध पक्षी दिसतात.

एके काळी टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या पवई तलावासभोवती गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहरीकरणाने तो नितांतसुंदर तलाव त्याचे अस्तित्वच हरवून बसला आहे. शहराचा विकास करताना पवई तलावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून संवर्धन होणे आवश्यक होते. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे व चुकीच्या पद्धतीने केलेल्या विकासकामांमुळे तलाव पूर्णपणे प्रदूषित झाला आहे. प्रदूषणामुळे जैवविविधतेचा -हास झालेला दिसून येतो. पवई तलावात माश्यांच्या सदतीस जाती 1947 मध्ये होत्या. ती संख्या 1955 साली एकतीसवर आली. तर माश्यांच्या फक्त दहा प्रजाती 1991 मध्ये तलावात दिसून आल्या. तलावाच्या पाण्यात नत्र आणि स्फुरद यांचे वाढते प्रमाण घातक निळे-हिरवे शैवाळ आणि जलपर्णी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. स्थलांतरित पक्ष्यांची सं‘ख्या जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे.

‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने राज्य सरकारकडे पंधरा वर्षांपूर्वी पवई तलाव आणि पर्यावरण याविषयी प्रस्ताव तयार करून दिला होता. राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवला. केंद्र सरकारने पवई तलावासाठी सव्वीस कोटी रुपयांची तरतूद करून राष्ट्रीय तलाव संरक्षण कार्यक्र‘मात पवई तलावाला सामील करून घेण्याचे ठरवले. ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’च्या माध्यमातून तलावातील प्रदूषण थांबवण्यासाठी तेव्हापासून प्रयत्न सुरू आहेत. संशोधन, प्रयोग, प्रकल्प उभारणी, उपाययोजना, जनजागृती यासाठी प्रयास करण्यात येत आहेत. पर्यावरणाचा -हास थांबवणे ही प्राथमिक गरज असून प्रदूषण करणा-या नागरिकांना जलस्रोताचे महत्त्व पटवून देणे, तलाव समस्यामुक्त करणे यासाठी ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ काम करत आहे. उपद्रवी मंगुर मासे नष्ट करण्यावर भर देणे, अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवणे, वृक्षलागवड करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सामाजिक कार्य करून घेणे यांसारखे उपक्र‘म ‘अॅग्लिंग असोसिएशन’च्या मदतीने हाती घेतले जातात.

‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ने ‘महाराष्ट्र स्टेट अॅणग्लिंग असोसिएशन’ व ‘इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्वाटिक बायोलोजिस्ट’ या संस्थांच्या सहकार्याने 7 व 8 सप्टेंबर 2012 रोजी आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती. त्यावेळी माधवराव चितळे व डॉ. नाकामुरा (जपान) यांच्या उपस्थितीत डॉ. वॉल्टर रास्ट (अमेरिका) यांच्या हस्ते ‘डॉ. एम.एस. कोडारकर फील्ड स्टेशन’चे उद्घाटन झाले. त्या ‘फील्ड स्टेशन’तर्फे कार्यशाळाही विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येतात. ‘डॉ. एम.एस. कोडारकर फील्ड स्टेशन’मध्ये मुलांच्या वयानुसार त्यांच्याकडून काही घटकांचा अभ्यास करून घेतला जातो. शालेय मुलांसाठी पाण्याचे तापमान कसे मोजतात, सामू पेपरच्या साहाय्याने पाण्याचा सामू पाहणे व पाणी अल्कली की आम्ल आहे हे ठरवणे, पाण्याचा वास व रंग, सहज दिसणा-या वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास करणे असे कार्यक्रम प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये घेतले जातात. त्यामुळे प्रदूषण कशामुळे होते ते मुलांना समजते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून आणखी काही घटकांचा अभ्यास करण्यात येतो. त्यांना पाण्याची पारदर्शकता, क्षारता, विरघळलेल्या प्राणवायू, तरंगणा-या कणांचे प्रमाण, नत्र व स्फुरद यांचे पाण्यातील प्रमाण काढणे शिकवले जाते. शेकडो विद्यार्थी ‘फील्ड स्टेशन’ला वर्षभर भेट देत असतात. पवई तलावाला गरवली करण्याचे सुखधाम असे संबोधले जाते. ते त्याचे वर्णन सार्थ होण्यासाठी झटणे जरुरीचे आहे.

– डॉ. प्रमोद साळसकर

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.