पर्यावरणपूरक सणसमारंभ -काळाची गरज

0
37

गावागावात शिक्षणप्रसार झाला तसे समाजसुधारणेचे वातावरण सर्वत्र तयार होऊ लागले; छोट्यामोठ्या प्रसंगातही मोठ्या सुधारणांची बीजे दिसतात. तशा कोल्हापूर परिसराच्या खेड्यांतील काही नोंदी –

गणापूर येथील कार्यकर्ते संजय सुळगावे यांनी एका वर्षी मला वटपौर्णिमेच्या समारंभासाठी बोलावले. मला शंका आली. पुरुषांनी महिलांना हळदीकुंकू देण्याची प्रथा सुरू झाली की काय? मी भीत भीतच शिंगणापूर गाठले. ते गाव कोल्हापूरपासून चार किलोमीटरवर आहे.

समारंभाच्या ठिकाणी तीन-चार फूट उंचीचे स्टेज होते. माईकवरून ‘हॅलो-हॅलो’ म्हणत सूचना दिल्या जात होत्या. महिला नटूनथटून समारंभस्थळाकडे येत होत्या. त्यांची मुले त्यांच्या मागून पाय ओढत चालत होती. मोठ्या मुलांनी ग्राऊंडवर पळापळीचा खेळ सुरू केला होता.

समारंभ सुरू झाला. पाच महिलांना माईकवरून नावे पुकारून स्टेजवर बोलावण्यात आले. पाचही महिला विधवा होत्या. त्या पाच वेगवेगळ्या जातींच्या होत्या.

ग्राऊंडच्या कडेने पाच खड्डे काढण्यात आले होते. आम्हाला तिकडे जाण्याची सूचना मिळाली. त्या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण पाच ठिकाणी करण्यात आले. आम्ही त्या महिलांचे सत्कार तशा अभिनव पद्धतीने, वटपौर्णिमा साजरी झाल्यानंतर केले.

शिंगणापूरच्या कार्यकर्त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याच वेळी विधवेलाही मंगलप्रसंगी मान देण्याचा व सर्व जाती समान आहेत असा समतेचा संदेशही दिला गेला.

आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागपंचमीच्या दिवशी सर्पांची माहिती सांगणारे पोस्टरप्रदर्शन भरवले होते. त्यामध्ये विषारी व बिनविषारी साप, सापांचे अन्न, निसर्गसाखळीतील त्यांचे महत्त्व, सर्पदंशावर उपाय, सर्पासंबंधीच्या अंधश्रद्धा इत्यादीची माहिती होती. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक आर. वाय. पाटील सर यांच्या हस्ते झाल्यावर ते पालकांच्यासाठी खुले करण्यात आले.

वैभव लक्ष्मीव्रत म्हणजे फळझाडांची कत्तलच! कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील कार्यकर्त्यांनी महिलांचे प्रबोधन केले. लक्ष्मीव्रताने लक्ष्मी-पैसा मिळाला असता, तर भारत दरिद्री आणि व्रते न करणारे अमेरिकन श्रीमंत झाले नसते. त्यातूनही ज्यांना व्रत करायचे असेल त्यांना सांगण्यात आले, की आम्ही आमच्या फळझाडांवर मटणाचे पाणी शिंपडले आहे, त्यामुळे त्यांची पाने देवाला चालणार नाहीत. झाडांची कत्तल थांबली.

गौरी-गणपतीचा सण म्हणजे उत्सवाला उधाण! घरांची साफसफाई आणि सजावट. नवे कपडे घालून गणपती आणि त्यानंतर गौरी बसवायची. त्याला प्रतिष्ठापना म्हणतात. खीर-मोदक खायचे. आरती, जयजयकार आणि त्यानंतर त्यांचे विसर्जन. कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विसर्जित गणेशमूर्ती दान करा, निर्माल्य पाण्यात टाकू नका, पाणी प्रदूषण टाळा अशी मोहीम राबवली. त्या मोहिमेस राज्यभर प्रतिसाद मिळाला. राजे संभाजी तरुण मंडळ, विद्यापीठ हायस्कूल, आदर्श हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, प्रबुद्ध भारत हायस्कूल, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज इत्यादी पन्नासाच्यावर शाळाकॉलेजांनी त्या उपक्रमात सहभाग नोंदवला. ‘निसर्ग’ संस्थेने मातीचे-शाडूचे गणपती करण्याचा उपक्रम राबवला. फटाके वाजवल्याने धुराचा आणि ध्वनीचा त्रास होतो. श्वसनाचे विकार होतात.

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने फटाकेमुक्त दिवाळीचा प्रचार केला. अनेक शाळांनी त्याला प्रतिसाद दिला. मुलांनी फटाक्याऐवजी पुस्तके खरेदी केली. कोल्हापूरकरांनी सुरू केलेला तसाच दुसरा उपक्रम म्हणजे ‘होळी लहान करा’, ‘पोळी व शेती दान करा’. तोही राज्यभर पोचला. लहानथोर रंगपंचमी मोठ्या उत्साहाने खेळतात, पण रासायनिक रंगांनी त्वचेवर व डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ लागले आहेत. ‘निसर्ग’ संस्थेच्या अनिल चौगुले यांनी फुलापानांपासून नैसर्गिक रंग करण्याच्या कार्यशाळा घेतल्या. शेकडो किलो रंग तशा पद्धतीने तयार करून विक्री होत आहे.

प्रज्ञा पोवार आणि राहुल कोळगे ही दोघे सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यांनी मानपान-रुसवेफुगवे टाळलेच, पण अन्न असलेले तांदूळ अक्षता म्हणून वापरण्याऐवजी फुलांच्या अक्षता केल्या आणि वऱ्हाचडी मंडळींना डॉ. छाया आणि विलासराव पोवार लिखित ‘सत्यशोधक दासराम’ या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या. असे सत्यशोधकी विवाह वाढत आहेत.

डॉल्बीच्या दणदणाटाने अनेकांना बहिरे केले, हार्ट अटॅकने मारले, खिडक्यांची तावदाने फोडली, इमारतींचे मजले जमीनदोस्त केले. त्यावर सर्व थरांतून विरोध वाढू लागला, तसे अनेक तरुणांनी, मंडळांनी डॉल्बीमुक्त उत्सव साजरे करणे सुरू केले आहे. पोलिस खातेही डॉल्बीवर नियंत्रण आणत आहे.

एकूणच, पर्यावरणपूरक सण-समारंभ साजरे करण्याच्या दिशेने समाजाचा विकास सुरू आहे!

– अनिल चव्हाण

(युगांतर, 10 ते 16 ऑगस्ट 2017 वरून उद्धृत)

About Post Author